सुखी माणसाचा सदरा

सुट्टीच्या दिवशी घरच्यांबरोबर मळ्यात फिरायला गेलं की, बिया आलेल्या सूर्यफुलांचा शोध सुरु व्हायचा. एक तर त्या मोठ्याशा फुलाबद्दल खूप आकर्षण असायचं आणि दुसरं म्हणजे सगळीच सूर्यफुलं सूर्याकडे तोंड करून आहेत का हे पाहायचं कुतूहल! त्यातल्या त्यात पक्व झालेल्या सूर्यफुलाच्या असंख्य बियांतून एकेक ‘बी’ काढायची आणि तिथेच दाताने फोडून आतला पांढरा गर खायचा. त्यासाठी आजूबाजूची शेतंही आम्ही फिरत असू.
सुखी माणसाचा सदरा

निसर्गाबद्दल आतून ओढ वाटत असेल आणि त्याला जाणून घेण्यासाठी तुम्ही उघड्या डोळ्यांनी त्याच्याजवळ गेलात तर निसर्ग स्वतः तुमचा गुरु बनतो. या गुरूची निसर्गशाळा रात्रंदिवस अखंड सुरु असते. खरं तर अगदी लहानपणापासून ही निसर्गशाळा कळत-नकळत आपलं व्यक्तिमत्व घडवत असते. आज मागे वळून बघताना निसर्ग कसा आजुबाजूला भरून होता, हे जाणवतं. हायस्कूलमध्ये असताना वर्गाबाहेर जांभूट्या, करवंदाच्या पाट्या घेऊन विकायला बसलेल्या एक-दोन तरी बायका असायच्या. पन्नास पैशाला छोटा पेलाभर जांभूट्या. त्यात मीठ टाकायचं. निळा स्कर्ट आणि पांढरा शर्ट हा आमचा गणवेष. जांभळाच्या हंगामात आमच्या निळ्या स्कर्टचे खिसे नेहमीच जांभूट्यांनी भरलेले असायचे. सगळ्यांच्या जिभा पण निळ्या-निळ्या! चौथीपर्यंत आमच्या मराठी शाळेची वेळ होती सकाळी साडे सात ते साडे दहा. नंतर मोठी सुट्टी. पुन्हा अडीच ते साडेपाच शाळा(school) भरायची. लांबच्या शेतात, मळ्यांत राहणारे मुले-मुली मधल्या सुट्टीत शाळेच्या परिसरात, व्हरांड्यात असायचे. आमचं घर शाळेजवळच होतं. तरीही बऱ्याचदा आम्ही त्यांच्या सोबतच असायचो. मग हमखास ‘रानातल्या गोष्टी’ निघायच्या किंवा काहीतरी गूढ, रहस्यमय ऐकायला मिळायचं. जसं एकदा टीब्लू नानांच्या (त्यांचं हे नाव का पडलं, ते आजतागायत कळलं नाही ) सुमीने किडलेली दाढ बरी करण्यासाठी तिची आई कशी एकावर एक सात मडके ठेवते आणि मग धूर करून कशी दाढ काढते वगैरे वगैरे. ह्या सगळ्या गप्पा चालू असताना आमचा एक नित्याचा उद्योग चालू असायचा. तो म्हणजे खाऊन टाकलेल्या बोरांच्या बिया वाळूतून, मातीतून गोळा करायच्या. जवळच पडलेला एखादा दगड घेऊन त्या फोडायच्या. त्याच्या आत एक किंवा दोन बदामासारख्या डाळिंब्या निघायच्या, बदामाच्याच रंगाच्या. त्या आम्ही खायचो. सुट्टीच्या दिवशी घरच्यांबरोबर मळ्यात फिरायला गेलं की, बिया आलेल्या सूर्यफुलांचा शोध सुरु व्हायचा. एक तर त्या मोठ्याशा फुलाबद्दल खूप आकर्षण असायचं आणि दुसरं म्हणजे सगळीच सूर्यफुलं सूर्याकडे तोंड करून आहेत का हे पाहायचं कुतूहल! त्यातल्या त्यात पक्व झालेल्या सूर्यफुलाच्या असंख्य बियांतून एकेक ‘बी’ काढायची आणि तिथेच दाताने फोडून आतला पांढरा गर खायचा. त्यासाठी आजूबाजूची शेतंही आम्ही फिरत असू. शाळेच्या मागं खूप अडचणीत, काटेरी तारेच्या कुंपणामागं एक विलायती चिंचेचं झाड होते. बहुतेक उन्हाळ्याच्या का कसल्याशा सुट्ट्यांमध्ये याला चिंचेचे घोस लागायचे. उंच काटेरी झाडावर लाल, खुललेल्या टपोऱ्या चिंचांचे आकडे काढायसाठी आमचे प्रयत्न चालायचे. मी, आक्की, तायडी, बारकी सगळ्यांचा एकत्र ठरवून केलेला कार्यक्रम असायचा. कुठून तरी लांब काठी आणून त्याला ॲल्युमिनयमच्या तारेचा आकडाच करून ठेवला होता. या आकड्याने आम्ही या चिंचा काढत असू. स्वतः कष्ट करून काढलेल्या या चिंचा खाण्याचा आनंद काही निराळाच असायचा. आमच्या चुलत चुलत्याच्या उंच बांधावर एक बोरीचं झाड होतं. मध्यम जांभळाच्या आकाराइतकी बोरं यायची तिला आणि खूप गोड. गर तर खोबऱ्यासारखाच! म्हणून तिला खोबरी बोर म्हणायचो. बांधाच्या खाली खूप खोल जागा होती. तिथं चुलत्याचा शेण-पाचोळा टाकण्याचा ‘उकिरडा’ होता. शेतात गेलं की पहिली चक्कर बोरीकडे! आधी खाली पिकून पडलेली बोरं शोधायची. नंतर बोरीच्या झाडावर चढायचं. हो! आंब्याच्या झाडाइतकं मोठ्ठं झाड होतं ते. त्यावर अगदी सहज चढून फांद्या हलवायच्या आणि बोरं पाडून खायची. चिंचा, बोरं, आवळे, कैरी म्हटलं कि तोंडाला मटकन पाणी येतं. शेतातल्या कोवळ्या काकड्या तोडून खाण्यासाठी मैत्रिणीच्या लांबच्या शेतात गेल्यावर, वेलीला सापडलेली छोटीशी काकडी दिसल्याचा आनंद, शेताजवळूनच वाहणारा मोठा ओढा, काठावर असलेली गूढ दाट झाडी आणि कुठल्या तरी वेगळ्याच जगात आल्याचा भास... हे सगळं स्वप्नवत दृश्य असायचं. या सगळ्यातून होणारं शिक्षण, निसर्गाशी जुडलेलं नातं हाच तर अमुर्तपणे रचलेला निसर्गप्रेमाचा पाया. मी ज्या शहरात सध्या राहत आहे त्याला झाडांचं शहर म्हणावं इतके इथले लोक झाडप्रेमी आहेत. घरांच्या अवती-भवती, रस्त्यांच्या दुतर्फा तर झाडं आहेतच; परंतु रस्त्यात आडवी येणारी मोठी झाडं रस्त्याला वळसा घालायला लावून वाचवलेली दिसतात. काल संध्याकाळी घरी येताना चांगलंच अंधारून आलं होतं. घराकडे जातानाची वाट थोडीशी निर्जन, दुतर्फा मोठी पामची झाडं, एक आजोबा बनलेला पिंपळवृक्ष. शहरातला झगमगाट इथे अंधाराला व्यत्यय आणत नाही. पुढे झाडांच्या कुशीत लपलेले बंगले आणि त्यापुढे एक छोटीशी शासकीय बाग...असा सगळा थाट. घराकडं चालत जाताना कधी चाफ्याचा तर कधी मस्त रातराणीचा घमघमाट दरवळतो. मध्येच एखाद ठिकाणी जुई फुललेली असते. ताजी हवा, वातावरणातील बोचरी थंडी आणि जागोजागी उधळलेले हे नैसर्गिक अत्तर... एक आत्ममग्न अनुभूती मिळते. इतर वेळी नुसतीच सामान्य असणारी मी, निसर्गाच्या सान्निध्यात आनंदून जाते, याचा शोध मला नक्की लागलेला आहे. म्हणूनच अशा अनेक संधी शोधून गावं भटकणं, तिथली माणसं, तिथला निसर्ग, डोंगर, नद्या आणि जंगल यांना भेटणं हे माझ्या आनंदाचं निधान आहे. विशेषतः या माणसांच्या गोष्टींतून मला माहितीची खजिना मिळतो. या लोकांकडं असणारी माहिती ही नुसती माहिती नसते तर जगण्याच्या अनुभवातून, रोजच्या संघर्षातून आलेल्या उपयुक्त ज्ञानाचा तो साठा असतो. रोजच्या जगण्यासाठी ते ज्ञान वापरावं लागतं. उदाहरणार्थ पावसाळ्यात अमाप पाऊस पडतो, मोठ्या बाजाराच्या गावाशी असणारा संपर्क काही महिने सुद्धा तुटू शकतो. अशा वेळी आजूबाजूच्या परिसरातून कोणत्या भाज्या आणायच्या, आजारी झालो तर कोणत्या झाडपाल्याचं औषध घ्यायचे हे वेगळे शिकवण्याची गरजच उरत नाही. नियमित वापरातून ते ज्ञान, कौशल्य आत्मसात होत जातं. कोरडवाहू भागात पावसाळ्याच्या हंगामातली शेतीची कामं उरकली की पुढचे काही महिने जरा निवांतपणा मिळतो. मग टोळके-टोळके एकत्र बसून गप्पा-गोष्टी सुरु असतात. आजूबाजूला असणारा निसर्ग न्याहाळणं हे वेगळं सांगावं लागत नाही. डोंगर, पाऊस, पक्षी, प्राणी, कीटक आणि झाड या सगळ्याचं ज्ञान गटात चर्चेतून पक्कं होत जातं. रिकामटेपणातून कला सुचत जातात. निरीक्षणांची गाणी बनतात. त्याच्या गोष्टी रचल्या जातात. त्यातूनच कलाकार निर्माण होतात. नाच बसवला जातो. ठेका धरला जातो त्यावर. त्यातूनच उभा राहतो एखादा तमाशाचा फड; ज्यात स्त्रीपात्र रंगवताना इतकी तल्लीनता येते कि नाक टोचून घेतलं तरी त्याची लाज वाटत नाही. पुरुषी वेशात वावरताना देखील हा स्त्रीपात्र करत असावा याची खात्री पटावी. कधी कांबड, तारफा, मोरगा, फुगडी अशी नृत्य उभी राहावीत, तर कधी बुहाड्याच्या माध्यमातून गावचं सांस्कृतिक वैभव निर्माण व्हावं. सोंग नाचवताना मुखवटे तयार करण्यासाठी पुन्हा निसर्गातील झाडांचं, रंगांचं ज्ञान उपयोगी पडावं. अशा या परंपरा निसर्गाशी जोडून हजारो वर्ष, अनेक पिढ्या सांभाळत आलेल्या. माणसांच्या जगण्याला समृद्ध करत आलेल्या. शुद्ध हवा, शुध्द पाणी, शुद्ध अन्न, शुद्ध मनाची निखळ माणसं... ज्ञान, कला, साहित्य आणि नैसर्गिक संस्कृतीने संपन्न माणसं... दुसऱ्यावर कोणत्याही स्वार्थाशिवाय प्रेम करणारी माणसं... खिशात पैसा कमी असला तरी घरात धान्याची पोती आणि जंगलात फळं-भाज्या असल्या की अजून फारशा गरजा नसलेली समाधानी माणसं... त्यांच्याकडून ‘सुखी माणसाचा सदरा’ मला मिळाला. तीच आनंदाची गुरुकिल्ली सर्व वाचकांपर्यंत पोहचवत असताना मला समजलेले, उमगलेले वेगवेगळे ज्ञानाचे पैलू पुढच्या वर्षभर इथे मांडत जाईन. त्यात तुम्हाला जंगलं भेटतील, शेती भेटेल तर कधी प्राणी-पक्षी-कीटक देखील भेटतील. सगळ्यात जास्त भेटेल तो तिथला निसर्ग, त्याला जवळून ओळखणारी तिथली माणसं आणि त्यांची आदिम खाद्यसंस्कृती. ------------- (लेखिका निसर्ग अभ्यासक आणि कार्यकर्त्या आहेत.) इमेल – ranvanvala@gmail.com

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com