राज्यपाल की ‘सत्य'पाल?

मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक हे कोणतीही भीडभाड न ठेवता व्यक्त होणारे बोलभांड राजकारणी म्हणून प्रसिध्द आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा घमेंडीपणा आणि शेतकरी आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींविषयी त्यांनी दाखवलेली असंवेदनशीलता याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे मलिक सध्या चर्चेत आले आहेत.
about satyapal malik
about satyapal malik

मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक हे कोणतीही भीडभाड न ठेवता व्यक्त होणारे बोलभांड राजकारणी म्हणून प्रसिध्द आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा घमेंडीपणा आणि शेतकरी आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींविषयी त्यांनी दाखवलेली असंवेदनशीलता याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे मलिक  सध्या चर्चेत आले आहेत. शेतकरी आंदोलनाविषयी पंतप्रधानांचा दृष्टिकोन अयोग्य असल्याची टीका मलिक यांनी यापूर्वीही वारंवार केली होती. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना किमान आधारभूत किमतीला कायदेशीर अधिष्ठान देण्याच्या मागणीचे हिरीरीने समर्थन करत होते आणि आता पंतप्रधान झाल्यावर मात्र त्यांनी घुमजाव केले, या विसंगतीवरही मलिक यांनी बोट ठेवले होते. 

परंतु ताज्या प्रकरणात मात्र त्यांनी सर्व मर्यादा पार करून स्फोटक विधाने केली. ‘आंदोलनात मृत्यूमुखी पडलेले शेतकरी माझ्यासाठी मेले का?' अशी विचारणा मोदी(narendra modi) यांनी केल्याचे व आपण त्याला त्याच भाषेत प्रत्युत्तर दिल्याचे मलिक यांनी सांगितले. दोघांमध्ये झालेली खडाजंगी कोणताही आडपडदा न ठेवता मलिक यांनी सांगून टाकली. एवढेच नव्हे तर या खडाजंगीनंतर (पंतप्रधानांच्या सूचनेवरून) गृहमंत्री अमित शहा यांना भेटून त्यांच्या कानावर हा प्रकार घातला असता ‘सत्यपाल, इनकी अक्ल मार रख्खी है लोगोंने...' असे शहा यांनी बोलून दाखवल्याचा दावा मलिक यांनी केला. मलिक यांंनी उधळलेल्या या विचारमौक्तिकांमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. लखीमपूर शेतकरी(farmer) हत्या प्रकरणामुळे आधीच अडचणीत आलेल्या भाजपची(BJP) आणखी शोभा झाली. कॉंग्रेसने(congress) सत्ताधारी पक्षाला कोंडीत पकडण्याची संधी सोडली नाही. शिवाय नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यात बेबनाव असल्याच्या चर्चेला खाद्य मिळाले. सत्यपाल मलिक यांनी मग खुलासा करून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. परंतु मूळ वक्तव्य न नाकारता केवळ अमित शहा यांची वादातून सुटका करण्याची त्यांची धडपड लपून राहिली नाही. शहा यांनी मोदींबद्दल वादग्रस्त विधान केलेले नाही, तसेच मोदी आणि शहा यांच्यात उत्तम ताळमेळ आहे, अशी वकिली त्यांनी केली. परंतु तोपर्यंत बाण सुटून गेलेला होता. मलिक यांच्या वक्तव्याचा व्हिडिओच उपलब्ध असल्यामुळे नेहमीप्रमाणे पत्रकारांनी आपल्या विधानाचा विपर्यास केल्याचा बचाव करण्याची सोय उरली नाही. या वादामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. राज्यपालासारखे घटनात्मक पद भूषवणाऱ्या व्यक्तीने राजकीय विधाने करणे औचित्याला धरून नाही. परंतु विद्यमान राजवटीतही साधनशुचितेचा आनंदीआनंद आहे. त्यामुळे भाजपच्या सत्ताकाळात प. बंगाल असो महाराष्ट्र असो की मेघालय असो; राज्यपाल कायम चर्चेत राहिले आहेत. शिवाय मलिक हे लोकदल, कॉंग्रेस, जनता दल, समाजवादी पक्ष असा प्रवास करून भाजपमध्ये आलेले राजकारणातील गाळीव रत्न आहेत. तरूण वयात आमदारकी, नंतर राज्यसभेची खासदारकी, केंद्रीय राज्यमंत्रीपद, भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, बिहार, जम्मू-काश्मीरचे राज्यपालपद अशी त्यांची प्रदीर्घ कारकिर्द राहिली आहे. जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा काढण्यात आणि राज्याचे विभाजन करण्यात राज्यपाल या नात्याने त्यांनी कळीची भूमिका बजावली होती. कालांतराने त्यांचे पंतप्रधानांशी बिनसले. 

हे हि पहा : 

मलिक आपले राजकीय भवितव्य सुरक्षित करण्यासाठी पंतप्रधानांवर टीका करून सहानुभूती गोळा करत असण्याची एक शक्यता आहे. शिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा किंवा भाजपमधील एका प्रभावशाली गटाचा पाठिंबा असल्याशिवाय मलिक पंतप्रधानांवर टीका करण्याचे धाडस करतील का, असाही प्रश्न उपस्थित झाला आहे. बहरहाल या साऱ्यामुळे भाजपमध्ये सारे काही आलबेल नाही आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘लार्जर दॅन लाईफ' बनवलेली प्रतिमा भुसभुशीत पायावर उभी आहे हा संदेश मात्र गेला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com