उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे ईडीच्या फेऱ्यात; ९४ एकर जमिनीवर टाच

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक गैरव्यवहारप्रकरणी राज्याचे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याशी संबंधित सुमारे ९४ एकर जमिनीवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सोमवारी (ता. २८) टाच आणली.अनिल देशमुख आणि नवाब मलिकयांच्यानंतर तनपुरे यांच्या रूपाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणखी एका मंत्र्यावर ईडीने कारवाई केली आहे.
Prajakt Tanpure
Prajakt Tanpure

नवी दिल्ली - महाराष्ट्र राज्य सहकारी बँक गैरव्यवहारप्रकरणी राज्याचे ऊर्जा राज्यमंत्री (Minister of State for Energy) प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांच्याशी संबंधित सुमारे ९४ एकर जमिनीवर सक्तवसुली संचालनालयाने (Enforcement Directorate) (ईडी) सोमवारी (ता. २८) टाच आणली. अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यानंतर तनपुरे यांच्या रूपाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Nationalist Congress Party) आणखी एका मंत्र्यावर ईडीने कारवाई केली आहे.

ईडीच्या म्हणण्यानुसार, नागपूर येथील राम गणेश गडकरी सहकारी साखर कारखाना कमी भावात आणि अपेक्षित प्रक्रिया पूर्ण न करता २००७ मध्ये तनपुरे यांच्या मे. प्रसाद शुगर अ‍ॅण्ड अलाईड अ‍ॅग्रो प्रोडक्टला विकण्यात आला. या कारखान्याचे मूल्य २६ कोटी ३२ लाख रुपये असताना त्याची केवळ १२ कोटी ९५ लाख रुपयांना विक्री झाली, तसेच खरेदी रक्कम ५२ दिवसांत भरणे अपेक्षित असताना २०१० मध्ये ही रक्कम भरून व्यवहार पूर्ण करण्यात आला, असा दावा ईडीकडून करण्यात आला आहे.

लिलावापूर्वी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली नव्हती. लिलावात फक्त प्रसाद शुगर लि.तर्फेच बोली लावण्यात आली होती. मात्र, दुसरा खरेदीदार केवळ कागदावर दाखविण्यात आला. त्याने इसार रक्कमही भरली नाही आणि तो प्रसाद शुगर लि.चा डमी होता, असेही ईडीला तपासात आढळून आले. प्रसाद शुगरला हा पैसा त्रयस्थांकडून मिळाला होता आणि त्याचे स्पष्टीकरण त्यांना देता आले नाही, असे ईडीचे म्हणणे आहे. त्यातील काही पैसे राम गणेश गडकरी कारखान्याचे माजी अध्यक्ष रणजित देशमुख यांनीच दिल्याचे ईडी तपासात आढळून आले. कारखाना व त्यातील मालमत्तेचा ताबा घेतल्यावर यंत्रसामुग्रीसह कारखाना तेथून हलवून नगरमधील वांबोरी येथे उभारण्यात आला. २०११ मध्ये जमीन व बांधकाम तक्षशीला सिक्युरिटीजला विकण्यात आले, असे ईडीने म्हटले आहे.

रणजित देशमुख १९९५ ते २००४ या कालावधीत कारखान्याचे अध्यक्ष होते. प्राजक्त तनपुरे यांचे वडील प्रसाद तनपुरे ऑगस्ट २००४ ते मार्च २०१० या कालावधीत महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे संचालक होते.  ईडीने एकूण १३ कोटी ४१ लाख रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. त्यामध्ये नागपूरमधील कारखान्याची ९० एकर जमीन व अहमदनगरमधील ४.६ एकर जमिनीचा समावेश आहे. 

राज्य सहकारी बँकेच्या तत्कालिन संचालकांनी व अधिकाऱ्यांनी साखर कारखाने कवडीमोल भावाने आपल्याच नातलगांना व हितसंबंधीयांना विकल्याचा मुख्य आरोप आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाने ऑगस्ट २०१९ मध्ये त्याबाबत गुन्हा नोंदविला होता. त्यावर आधारित ही कारवाई ईडीने केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने ऑगस्ट २०१९ मध्ये त्याबाबत आदेश दिल्यावर पोलिसांनी हा गुन्हा नोंदविला होता. गैरमार्गाने या साखर कारखान्यांची विक्री झाल्याच्या आरोपाचा तपास करावा, असा उच्च न्यायालयाचा आदेश होता.

ईडीने २६ ऑगस्ट २०१९ रोजी याप्रकरणी आर्थिक गैरव्यवहार (पीएमएलएल) कायद्यानुसार तपासाला सुरुवात केली. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने गुन्ह्याचा तपास बंद केल्याचा अहवाल न्यायालयाला सादर केला. पण अपेक्षित प्रक्रिया पूर्ण न करता हा गुन्हा बंद केल्याचा दावा करत ईडीने याप्रकरणी तपास सुरूच ठेवला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com