खानदेशात पंधरा लाख क्विंटल कापूस खरेदी

खानदेशात महासंघाची सर्व केंद्रे सुरू असून, चार लाख क्विंटल कापसाची खरेदी आम्ही सीसीआयचे सबएजंट म्हणून केली आहे. चुकारे पाच ते सात दिवसांत शेतकऱ्यांना दिले जात आहेत. सीसीआयची खरेदी महासंघापेक्षा अधिक झालेली आहे. - आर. जी. हुले, विभागीय व्यवस्थापक, पणन महासंघ, जळगाव विभाग
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

जळगाव ः खानदेशात यंदा कापसाची शासकीय खरेदी विक्रमी स्थितीत पोचली असून, सुमारे १५ लाख क्विंटल कापसाची खरेदी भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) व महाराष्ट्र  राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाच्या केंद्रांमध्ये झाली आहे. सध्याही खरेदी सुरूच असून, ५४५० ते ५५०० रुपये क्विंटल असा दर शासकीय केंद्रांमध्ये दिला जात आहे. 

‘सीसीआय’ची नंदुरबारमध्ये शहादा व नंदुरबार, धुळ्यात शिरपूर, जळगाव जिल्ह्यांत जामनेर तालुक्‍यात पहूर व शेंदूर्णी, बोदवड, भुसावळ, चोपडा, जळगाव, पाचोरा, एरंडोल येथे केंद्रे सुरू आहेत. पणन महासंघातर्फे धरणगाव, धुळे, मालेगाव (जि. नाशिक), कासोदा (ता. एरंडोल), अमळनेर, पारोळा, भडगाव येथे खरेदी केंद्रे सुरू आहेत. खानदेशात महासंघाने चार लाख क्विंटल तर सीसीआयने सुमारे ११ लाख क्विंटल कापसाची खरेदी केली आहे. खरेदी सुरूच असून, सध्या दुय्यम दर्जाच्या कापसाची खरेदी ५४५० रुपये क्विंटलने केली जात आहे. पणन महासंघाच्या केंद्रांमध्ये दर्जेदार कापसाला कमाल ५५०० रुपये क्विंटल दर दिला जात आहे.

शासकीय कापूस खरेदी डिसेंबरपासून वेगात सुरू आहे. मध्यंतरी महासंघाची काही केंद्रे सरकीचा अधिकचा साठा झाल्याने बंद झाली होती. नंतर सरकीचे सौदे झाले व खरेदी पुन्हा सुरू झाली. तर ‘सीसीआय’ची केंद्रे सुरुवातीपासून सुरू आहेत. खानदेशात पणन महासंघाने मागील दोन वर्षे कापसाची कुठलीही खरेदी केली नव्हती. तर सीसीआयची खरेदी मागील वर्षात १० लाख क्विंटलपेक्षा अधिक झाली नव्हती.

यंदा मात्र महासंघ व सीसीआयने मिळून सुमारे १५ लाख क्विंटल कापसाची खरेदी करून मागील पाच वर्षांमधील सर्वाधिक खरेदीचा विक्रम केल्याची स्थिती आहे. खरेदी सुरूच असून, कापसाचे दरही स्थिर आहेत. कापसाखालील क्षेत्र झपाट्याने रिकामे झाल्याने कापसाची आवक पुढे कमी होऊ शकते, असा अंदाज आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com