खानदेशात कापसाची खेडा खरेदी मंदावली

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

जळगाव  ः खानदेशात कापसाची बाजारातील आवक कमी असली, तरी दरात चढउतार सुरू आहेत. कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात बऱ्यापैकी झाली; परंतु या आठवड्यात खरेदी मंदावली असून, दर ४७०० ते ५००० रुपये क्विंटलपर्यंत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात निराशाजनक स्थिती असल्याने कारखानदार सावध भूमिकेत आहेत. 

खेडा खरेदी संथ असल्याने अनेक शेतकरी शासकीय केंद्रात कापूस विक्रीला पसंती देत आहेत. कारण या केंद्रात कापसाला किमान ५२०० रुपये क्विंटल दर मिळत आहे. मागील आठवड्यात बॅंका शुक्रवारपासून (ता.२१) रविवारपर्यंत (ता.२३) बंद होत्या. त्यामुळे मागील आठवड्याच्या अखेरीस खरेदी कमी झाली होती. यातच या आठवड्यातही खरेदी मंदावल्याने शेतकरी कापूस विक्रीसाठी शासकीय यंत्रणांकडे जात आहेत.  खानदेशात सुमारे ९१ जिनिंग प्रेसिंग कारखाने सुरू आहेत; परंतु या कारखान्यांचे एजंटही खेडा खरेदीसंबंधी गतीने कार्यवाही करीत नसल्याचे चित्र आहे.

कापसाचा फारसा साठा शेतकऱ्यांकडे नाही. नंतरच्या वेचणीचा कापूस काही शेतकऱ्यांकडे आहे. बाजारात कापसाची आवक कमी असून, या आठवड्यात प्रतिदिन सरासरी ११ ट्रक (एक ट्रक आठ मेट्रिक टन क्षमता) कापसाची आवक खेडा खरेदीमध्ये झाली. धुळ्यात कापसाची आवक अतिशय कमी आहे. जळगाव जिल्ह्यात अमळनेर, पारोळा, पाचोरा, चाळीसगाव, बोदवड भागात कापसाचा तुटवडा आहे. यामुळे शेतकऱ्यांना दरवाढीची प्रतीक्षा आहे.  यंदा उत्पादकता घसरल्याने फटका बसल्याने दर अधिकचे हवेत, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. चोपडा, यावल, जळगाव, जामनेर या भागात कापसाचा साठा शेतकऱ्यांकडे आहे.

धुळ्यात फक्त शिरपुरात कापूस साठा आहे; परंतु नंदुरबार भागात कापसाचा साठा फारसा शेतकऱ्यांकडे नसल्याने या भागात पुढे मागणी वाढली तर कापसाची टंचाई वाढू शकते, अशी स्थिती आहे. खरेदीदार आंतरराष्ट्रीय बाजारातील हालचालींनुसार खरेदी करीत आहेत. नंदुरबारमधील लोकनायक जयप्रकाश नारायण सहकारी सूतगिरणीत खरेदी सुरू आहे; तर पणन महासंघातर्फेही खरेदी सुरू आहे. शेतकरी बैलगाड्यांमध्ये भरून कापसाची विक्री शासकीय केंद्रात करीत आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com