चिकनच्या दरात सुधारणा

कोट... राज्यात नगर, नाशिक, पुणे, सांगली जिल्ह्यात सर्वाधिक कुक्कुटपालन उद्योग केला जातो. चिकन खाल्ल्याने कोरोना होतो या अफवेने उत्पादकांचे मोठे नुकसान झाले. अनेकांनी फुकट, बेभावात कोंबड्या वाटल्या. चिकनमुळे कोरोना होत नाही हे पटल्याने आता नागरिक मागणी करू लागले आहेत. त्यामुळे पंधरा दिवसांपासून मागणी वाढली आहे. मात्र मागणीच्या तुलनेत केवळ दहा टक्के कोंबड्या सध्या उपलब्ध आहेत. नव्याने टाकलेली पिले तयार झाली तरी मागणीचा विचार करता दरात वाढ राहण्याची शक्यता आहे. - सचिन भोंगळ, सचिव, नगर जिल्हा पोल्ट्री फेडरेशन
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर ः चिकन खाल्ल्याने कोरोना विषाणूचा संसर्ग होतो या अफवेने पोल्ट्री व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर गेल्या महिनाभरात कंपन्यांनी तसेच वैयक्तिक शेतकऱ्यांनी नव्याने कोंबडी पिलांचा सांभाळ केला नाही. मात्र, गेल्या आठ दिवसांपासून चिकनला मागणी वाढली आहे. परिणामी सध्या मागणीच्या तुलनेत केवळ पंधरा ते वीस टक्के पुरवठा होत आहे. मुंबई, पुण्यासह मोठ्या शहरात मागणी चांगली असल्याने गेल्या दोन महिन्यांच्या तुलनेत जिवंत कोंबडीच्या दरात ४० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे चिकनचे किरकोळ दरही किलोमागे ७० रुपयांनी वाढले आहेत. अंड्याचे प्रतिनग दरही एक रुपयाने वाढले आहेत.

शेतीला पूरक उद्योग म्हणून राज्यात सुमारे ५० हजारांवर शेतकरी कुक्कुटपालन व्यवसाय करतात. राज्यात दर ४२ दिवसाला २५ कोटींवर कोंबड्यांचे उत्पादन होते. यातील बहुतांश शेतकरी देशी व परदेशी पोल्ट्री उद्योगातील कंपन्यांशी करारावर उत्पादन घेतात. याशिवाय परसातील कुक्कुटपालनातूनही मोठ्या प्रमाणात देशी कोंबड्याचे उत्पादन घेतले जाते. ‘कोरोना’च्या अफवेमुळे चिकन खाणे बंद झाले आणि कुक्कुट व्यावसायिकांवर संकट ओढवले. मार्चमध्ये आठ दिवसांत अचानक ७० ते ८० टक्क्यांनी मागणी घटली. परिणामी दीड महिन्याचा कालावधी पूर्ण केलेल्या कोंबड्याची कंपनीकडून उचल थांबली. खाद्य पुरवठाही थांबला. परिणामी पूर्ण क्षमतेने वाढ झालेल्या कोंबड्यांना खाद्य देणे परवडणारे नसल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी त्यांची बेभावात विक्री केली. कित्येक ठिकाणी कोंबड्या नष्ट कराव्या लागल्या. यामुळे एकट्या नगर जिल्ह्याला पाचशे कोटींपेक्षा अधिक फटका बसला.

चिकनमुळे कोरोना होत नाही ही खात्री पटल्यानंतर आता गेल्या पंधरा दिवसांपासून चिकनला मागणी वाढली आहे. मात्र आता सध्या फक्त पंधरा ते वीस टक्केच विक्रीयोग्य कोंबड्या उपलब्ध आहेत. मागणीच्या तुलनेत पुरवठा होत नसल्याने मोठ्या शहरात घाऊक दरात चाळीस रुपयांनी वाढ झाली आहे. किरकोळ दरातही ६० ते ७० रुपये प्रती किलोने वाढ झाली आहे. मागणी सुरु झाल्याने कंपन्यांनीही पिल्लांचा पुरवठा सुरु केला आहे. आधीच मोठा फटका बसल्याने नव्याने फक्त वीस टक्के शेतकऱ्यांनी पिल्ले घेतली आहेत. लॉकडाउन वाढल्यानंतर चिकनच्या दरात पुन्हा वाढ होणार असल्याचा अंदाज जाणकार व्यक्त करत आहेत.

वाहतुकीच्या अडचणी कायम ‘कोरोना’मुळे महिनाभरापूर्वी पूर्ण क्षमतेने वाढ झालेल्या कंपन्या उचल करत नसल्याने, खाद्य देण्यालाही परवडत नसल्याने वेगवेगळ्या मार्गाने कोंबड्या नष्ट कराव्या लागल्या. आता मागणी वाढत आहे. मात्र कोंबड्या उपलब्ध नाहीत, शिवाय जेथे उपलब्ध आहेत तेथे मागणी असूनही वाहतुकीअभावी उचलण्याला अडचणी येत आहेत, त्याचा फटका उत्पादकांना बसत आहे, असे नगर जिल्हा पोल्ट्री फेडरेशनचे अध्यक्ष अभिषेक खंडागळे यांनी सांगितले.   असे आहेत तर दर (कंसात दोन महिन्यांपुर्वीचे)

  • जिवंत कोंबडी ः ११० ते ११५ (७० ते ७५)
  • चिकनचे किरकोळ दर ः १८० ते १९० (१२० ते १३०)
  • अशी आहे स्थिती

  • मागणीच्या तुलनेत वीस टक्केच पुरवठा
  • किरकोळचे दर ६० ते ७० रुपयांनी वाढले
  • नव्याने वीस टक्केच पिल्लांचा सांभाळ
  • वाहतुकीअभावी उपलब्ध पक्षीही उचलण्यास अडचणी 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com