साताऱ्यात ऊसदराबाबत अंतिम निर्णयासाठी ३० ला पुन्हा बैठक

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सातारा : या वर्षी उसाला एफआरपी अधिक पाचशे दर मिळावा, ऊस गाळप करून १४ दिवस होऊन ही पहिली उचल दिलेली नाही, अशा कारखान्यांवर कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी संघटनांनी केली. मात्र, या मागणीबाबत प्रशासनाने हात झटकल्याने शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी तुम्ही लक्ष घालू नका, कारखानदार आणि संघटना बघून घेईल, असे सुनावत जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांचा निषेध नोंदविला. दरम्यान, ऊसदरावर अंतिम निर्णय घेण्यासाठी येत्या ३० तारखेला पुन्हा बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी दिली.

ऊसदराबाबत निर्णय घेण्यासाठी शेतकरी संघटना, कारखानदारांचे प्रतिनिधी, ऊस उत्पादक शेतकरी आणि प्रशासन अशी संयुक्त बैठक सोमवारी (ता. २३) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात दुपारी चार वाजता आयोजित केली होती. बैठकीसाठी शेतकरी संघटनांचे पदाधिकारी व कारखान्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत सुरवातीला बळीराजा शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी ऊस उत्पादकांची भूमिका मांडताना एफआरपीची रक्कम उशिरा देणाऱ्या कारखान्यांवर गुन्हे दखल होत नाहीत, भरारी पथकाकडून वजनकाट्यांची तपासणी करूनही एकही कारखाना सापडत नाही. कारखान्यांत काटेमारी होत आहे. या वर्षीसाठी एफआरपी अधिक पाचशे रुपये दर मिळाला पाहिजे. मालेगाव आणि सोमेश्‍वर कारखान्यांनी मागील वेळी तीन हजार रुपये दर दिल्याचे निदर्शनास आणून दिले. तसेच कारखान्यांकडून कर्जाची वसुली ऊस बिलातून होते, ती तातडीने थांबवावी हे मुद्दे मांडले. 

त्यानंतर कारखान्यांच्या प्रतिनिधींची उपस्थिती आणि प्रत्यक्षात किती दर दिला याची माहिती प्रत्येक प्रतिनिधींकडून घेण्यात आली. यामध्ये अजिंक्‍यतारा, खटाव-माण साखर कारखाना पडळ, जरंडेश्‍वर कारखान्याचे प्रतिनिधी बैठकीस गैरहजर राहिल्याने त्यांना नोटीस पाठविण्याचा निर्णय जिल्हाधिकारी प्रभारी रामचंद्र शिंदे यांनी घेतला. ऊस दराबाबत प्रशासनाची भुमिका पारदर्शक असायला हवी, शेतकरी अतिवृष्टी, पूर यामुळे अडचणीत आलेला आहे. आम्ही आमच्या घामाचे दाम मागायला आलो आहोत, त्यामुळे सर्वांनी सकारात्मक चर्चा करून निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा राजू शेळके व्यक्त केली.

एफआरपी कमी व वेळेत न देणाऱ्या कारखान्यांवर कोणतीच कारवाई होत नाही, पण अपेक्षित दर मागणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिस कारवाई करतात हा मुद्दा सर्वांनी मांडला. तोडणी वाहतुकीचे पैसे पाच कारखाने ५५० रुपये लावतात, तर उर्वरित कारखाने सहाशे ते साडेसातशे रुपये लावतात हे सर्वांनी निदर्शनास आणून दिले. मात्र, एफआरपीबाबत आम्ही कारखान्यांना सक्ती करू शकत नाही, असे श्री. शिंदे यांनी सांगितल्याने शेतकरी संघटनांचे पदाधिकारी आक्रमक झाले. त्यांनी प्रशासनाने कारखाने व शेतकरी यांच्यामध्ये सहभाग घेऊ नये आमचे आम्ही बघून घेऊ असे सांगितले. तसेच जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांचा निषेध नोंदविला. 

पोलिस अधीक्षकांनी मात्र, शेतकऱ्यांच्या सोबत आम्ही आहोत, त्यामुळे प्रशासन व पोलिसांना सहकार्य करण्याची भूमिका मांडली. कोणताही निर्णय न होता, बैठक आटोपती घेण्यात आली. एफआरपी अधिक पाचशे रूपयांसाठी येत्या ३० तारखेला पुन्हा बैठक घेण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला.

तीन कारखान्यांवर कारवाईची मागणी बैठकीस जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मात्र, अजिंक्‍यतारा, जरंडेश्वर आणि खटाव माण ॲग्रो प्रोसेसिंग या तीन कारखान्यांचे कोणीही प्रतिनिधी उपस्थित नव्हते. त्यामुळे या तीन कारखान्यांवर कारवाई करण्याची मागणी शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनीनी केली. त्यास सर्वांनी एकमुखी पाठिंबा दिला. दरम्यान हा निर्णय साखर सहसंचालक घेतील, असे प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी सांगितले.

टेपरेकॉर्ड लावणाऱ्या ट्रॅक्‍टरवर कारवाई उसाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्‍टरच्या ट्रेलरला रिफ्लेक्‍टर नसल्याने अपघात होण्याचे प्रमाण अधिक आहे. आतापर्यंत दहा हजार अपघात झाल्याचे आकडेवारी सांगते. त्यामुळे प्रत्येक कारखान्यांनी ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रेलरला रिफ्लेक्‍टर लावण्याची सक्ती करण्याचे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत यांनी केले. तसेच टेपरेकॉर्ड लावणाऱ्या ट्रॅक्‍टरमुळे अपघाताचे प्रमाण वाढते, त्यामुळे अशा ट्रॅक्‍टरवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना दिले.

कारखानानिहाय या वर्षीची एफआरपी (रुपये) : श्रीराम कारखाना २५६३, रयत अथणी शुगर २७६५, स्वराज इंडिया २२३२, ग्रीन पॉवर शुगर गोपूज २५७८, जयवंत शुगर २९३८, शरयू कारखाना २६००, कृष्णा कारखाना २९२४, बाळासाहेब देसाई कारखाना २६५८, किसन वीर कारखाना २६५५, सह्याद्री कारखाना २८५५.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com