हापूस आंबा, पल्प निर्यातीतून १८२ कोटी परकीय चलन

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

रत्नागिरी  ः रत्नागिरीचा हापूस हा जगप्रसिद्ध असला तरीही जिल्ह्यात होणाऱ्या उत्पादनापैकी अवघ्या आठ ते दहा टक्केच हापूस आंब्याची निर्यात होत आहे. गतवर्षी जिल्ह्यात उत्पादित झालेल्या दीड लाख टन हापूस आंब्यांपैकी ११ हजार २२८ टन आंब्यांची तर ८ हजार टन पल्पची निर्यात विविध देशांमध्ये झाली. त्यातून अंदाजित १८२ कोटी रुपयांचे परकीय चलन प्राप्त झाले आहे. याबाबतचा अहवाल पणन मंडळाच्या रत्नागिरी कार्यालयाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर केला आहे.

महाराष्ट्रात ५ लाख ६६ हजार हेक्टरवर आंबा लागवड असून ३.३१ लाख मेट्रिक टन उत्पादन मिळते. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर व ठाणे या जिल्ह्यात सर्वाधिक हापूसची लागवड केली जाते. रत्नागिरी जिल्ह्यात ६५ हजार १०९ हेक्टरवर हापूस आंबा लागवड करण्यात आलेली आहे. यातून दरवर्षी १ लाख ५२ हजार ५०० मेट्रिक टन हापूस आंबा उत्पादन मिळते. कोकणात १ लाख १४ हजार ८२२ हेक्टरवर हापूस आंबा लागवड असून २ लाख ७० हजार ५२ मेट्रिक टन हापूस आंबा उत्पादन घेतले जाते. मुंबई, कोल्हापूर, सांगली, पुणे या मोठ्या शहरांमधून हापूसला सर्वाधिक मागणी आहे. महाराष्ट्रातील काही प्रमुख जिल्ह्यांमध्ये हापूस पाठवण्यात येतो. त्याचबरोबर गुजरात, अहमदाबादलाही हापूसची मागणी आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात हापूसची उलाढाल अंदाजे ११०० कोटी असून, प्रक्रियायुक्त पदार्थांची उलाढाल १०० कोटीपर्यंत आहे. देशांतर्गत बाजाराबरोबरच विविध देशांमध्ये हापूसची निर्यात होते. त्यात आखाती देशांसह अमेरिका, इंग्लंड, जपान, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियाचा समावेश आहे; परंतु देशातून निर्यात होणाऱ्या आंब्यापैकी हापूसचा टक्का अत्यंत कमी आहे. सर्वाधिक निर्यात केशरची होते. त्यापाठोपाठ २० टक्के हापूस निर्यात होतो.

रत्नागिरी जिल्ह्यातून ११ हजार २२८ मेट्रिक टन हापूस निर्यात होतो. त्यातून सर्वसाधारणपणे ११८ कोटींचे परकीय चलन प्राप्त होते. आंबा पल्पला सौदी अरेबिया, नेदरलँड, युरोपीय देश, अरब देश, कुवेत, अमेरिका, जर्मनी व चीनमधून मोठी मागणी आहे. रत्नागिरी जिल्ह्यातून ८ हजार ४ मेट्रिक टन पल्प निर्यात होतो. त्यातून ६३ कोटी ३९ लाखांचे परकीय चलन मिळते. दोन्ही मिळून सुमारे १८२ कोटी रुपयांचे परकीय चलन प्राप्त होते. निर्यात वाढविण्यासाठी वाहतूक सुविधांची गरज आहे. समुद्रमार्गे हापूसची थेट निर्यात होणार असेल तर त्यातून मोठा फायदा स्थानिक शेतकऱ्यांना होऊ शकतो. त्यादृष्टीने सरकारकडून प्रयत्न करण्याची गरज आहे.    मॅंगो प्रोसेसिंग लिमिटेडच्या माध्यमातून १० कोटींची उलाढाल  आंबा पल्पसाठी जिल्ह्यात क्लस्टर योजनेंतर्गत कोकण मँगो प्रोसेसिंग (रत्नागिरी) प्रा. लिमिटेडची स्थापना करण्यात आली आहे. त्याचे ७८ सभासद आहेत. त्या प्रकल्पाची क्षमता ३५०० मेट्रिक टन इतकी असून, सध्या २५०० मेट्रिक टन आंब्यावर प्रक्रिया केली जाते. त्यातून सुमारे १२५० मेट्रीट्रिक टन आंब्याचा पल्प तयार केला जातो. त्यातून सुमारे १० कोटी रुपये उलाढाल होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com