नेप्ती उपबाजारात आता रोटेशन पद्धतीने कांदा लिलाव 

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर  ः नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारात अडते, व्यापारी, हमाल, मापाडी व बाजार समितीचे कर्मचारी यांच्या उपस्थितीत एकत्रितपणे रोटेशन पद्धतीने कांदा लिलाव केले जाणार आहेत. 

नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी संचालक मंडळाची बैठक झाली. सभापती विलास शिंदे, उपसभापती रेवणनाथ चोभे, सचिव अभय भिसे यांच्यासह संचालक या वेळी उपस्थित होते. नगर बाजार समितीत जिल्ह्यासह राज्यभरातून कांदा विक्रीला येतो. नेप्ती उपबाजार पेठेत त्याचे लिलाव होतात. येथे आतापर्यंत आपापल्या सोयीनुसार लिलाव व्हायचे. कधी कधी एकाच वेळी बोली लावली जायची. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये विभाजन व्हायचे आणि जास्त स्पर्धा न झाल्याने वाटेल त्या भावात कांदा खरेदी केला जायचा म्हणजेच भाव पडायचे. आता स्पर्धेमुळे सर्व व्यापाऱ्यांना सर्व अडतींवर लिलावात भाग घेता येईल. या पद्धतीला ‘रोटेशन’ म्हणतात. नेवासे तालुक्‍यातील घोडेगाव बाजार समितीत ही पद्धत अवलंबिली जात आहे. त्याच धर्तीवर आता नगर बाजार समितीनेही कांदा लिलावासाठी रोटेशन पद्धत राबवण्याचा निर्णय घेतला आहे.

या पद्धतीनुसार नेप्ती उपबाजारातील सर्व अडते चार गटांत विभागले जाणार आहे. एका वेळी एकाच गटातील अडतींवर लिलाव सुरू होतील. त्यानंतर दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या अशा क्रमाने बोली लावली जाईल. असे केल्याने व्यापाऱ्यांमध्ये माल घेण्यासाठी स्पर्धा होईल असा विश्‍वास संचालक मंडळाने व्यक्त केला आहे. 

संचालक मंडळाने अन्य बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव कशाप्रकारे चालतात, त्यात येणाऱ्या अडचणींबाबत नेवासे, घोडेगाव, राहुरी येथील बाजार समित्यांना भेटी देऊन कामकाजाची पद्धत समजून घेतली. त्यानुसार नेप्ती उपबाजारातील कांदा बाजारामध्ये शनिवारी रोटेशन पद्धतीने कांदा लिलाव झाले. आपला कांदा सकाळी दहा वाजेपर्यंत नेप्ती उपबाजारात विक्रीसाठी आणून मापाड्याकडून वजन करून तत्काळ काटापट्टीची एक प्रत ताब्यात घ्यावी. यामुळे अडते, व्यापारी व शेतकरी यांच्यात संशयाचे वातावरण राहणार नाही असे या वेळी सांगण्यात आले.

नेप्ती उपबाजारात सुमारे ८० अडते व शंभरावर परवानाधारक कांदाव्यापारी आहेत. कांद्याच्या आवक-जावकेनुसार त्यांची संख्या कमी-जास्त होऊ शकते. शक्‍यतो लिलाव सुरू असताना कांदाउत्पादक शेतकऱ्यांनी उपस्थित असणे अपेक्षित आहे. या सर्व प्रक्रियेवर बाजार समितीचे संचालक देखरेख ठेवतील. स्वतःच्या अडतीवर अडत्याला बोली लावता येणार नाही, असे सचिव अभय भिसे यांनी सांगितले. 

दर लिलावाला मोठी आवक नगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारात सोमवार, गुरुवार व शनिवार असे तीन दिवस कांद्याचे लिलाव होतात. येथे जिल्ह्यासह राज्याच्या वेगवेगळ्या भागांतून कांद्याची आवक होत असते. दर लिलावा दिवशी चाळीस ते पन्नास हजार कांदा गोण्यांची आवक होत असते. त्यामुळे रोटेशन पद्धतीचा शेतकऱ्यांना फायदा होणार अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com