पुढील हंगामावरही शिल्लक साखरेचे ओझे? 

साखर उद्योगावरील संभाव्य संकट पाहता किमान विक्री दर ३१०० रुपयांवरून ३४५० रुपये प्रति क्विंटल असा व्हावा. तरच त्याचा फायदा पुढील हंगामापर्यंत होऊ शकेल. याशिवाय थकलेले निर्यात अनुदान व कर्ज पुनर्रचनेकडे सरकारने गांभिर्याने लक्ष देण्याची गरज आहे. - प्रकाश नाईकनवरे, व्यवस्थापकीय संचालक, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना फेडरेशन
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

कोल्हापूर: देशात यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत साखरेचे उत्पादन घटले असले तरी ‘कोरोना’मुळे सर्वाधिक मागणी असलेल्या महिन्यांमध्येच अपेक्षित उठाव झाला नाही. याचाच परिणाम म्हणून साखरेचा पुढील हंगामही जादा साखरेचे ओझे घेऊन सुरु होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. साखरेच्या एकूण विक्रीपैकी सुमारे ३३ टक्के साखर ही मार्च ते जून मध्ये विकली जाते. यंदा ही साखर शिल्लक राहण्याची शक्‍यता आहे. त्याचा फटका पुढील हंगामाला बसण्याचा अंदाज साखर उद्योगातील तज्ज्ञांचा आहे. 

साखर उद्योगात मार्च ते जून हे महिने साखरेला मागणी असणारे महिने आहेत. या काळात शीतपेये व अन्य औद्योगिक कारणांसाठी साखर जादा प्रमाणात वापरली जाते. परंतु, यंदा ‘कोरोना’चे संकट मार्चमध्येच तीव्र होऊ लागले आणि मागणी रोडावली. मार्चच्या शेवटच्या सप्ताहापासून साखरेचा औद्योगिक वापर पूर्णपणे थांबला. याचा नकारात्मक परिणाम मार्च, एप्रिल महिन्यात झाला. साखर उद्योगातील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार आता मे व जून हेच महिने काहीसे आधाराचे ठरणार असले तरी मार्च, एप्रिलमध्ये न खपलेल्या साखरेचा अतिरिक्त बोजा हा पुढील हंगाम सुरु होईपर्यंत साखर उद्योगाच्या डोक्‍यावर संकट म्हणून राहणार आहे. 

राष्ट्रीय साखर महासंघाने दिलेल्या माहितीनुसार यंदा २६५ लाख टन साखर उत्पादन होण्याची शक्‍यता आहे. ‘कोरोना’मुळे आता २४० लाख टन स्थानिक खप आणि ४५ लाख टन साखरेची निर्यात होईल. यामुळे हंगाम अखेरीस ११५ लाख टन साखर शिल्लक असेल. नव्या हंगामात म्हणजे २०२०-२१ मध्ये नव्या उत्पादनासहित ४१५ लाख टन साखर शिल्लक असेल. त्यातून पुन्हा स्थानिक खप २६० लाख टन व निर्यात ४० लाख टन साखर वजा केली तर हंगामाच्या अखेरीस पुन्हा देशात ११५ लाख टन साखर शिल्लक असेल.    शिल्लक साखर ही कारखान्यांना भेडसावणारी नेहमीची समस्या आहे. त्यात यंदाही भरच पडेल असे वाटते. देशात किंबहुना राज्यात यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत साखर उत्पादन कमी झाले. ‘कोरोना’मुळे उत्पादित साखरेची विक्री झाली नाही. यामुळे अडचणी कायम आहेत. साखर निर्यात जरी झाली तरी स्थानिक साखरेचा खपही मोठ्या प्रमाणात वाढणे अपेक्षित आहे. सध्याची परिस्थिती पाहता पुढील दोन ते तीन महिन्यांत उठाव होईल याची शाश्‍वती नाही. परिणामी व्याजाचा बोजा मात्र कारखान्यांवर पडणार आहे, असे साखर तज्ज्ञ  विजय औताडे यांनी सांगितले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com