सांगली बाजारसमितीत हळद विक्रीत पाच लाख क्विंटलने घट

सांगलीःयावर्षी ‘कोरोना’च्या संकटामुळे येथील बाजारसमितीत हळदविक्रीत पाच लाख क्विंटलने घट झाली आहे. सव्वा तीन महिन्यांत ३ लाख ७५ हजार ५५० क्विंटल हळदीची विक्री झाली. त्यातही हळदीच्या दरात पाचशे ते सातशे रुपयांनी घट झाली.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सांगली ः सांगली बाजार समिती हळदीच्या व्यापाऱ्यासाठी देशभरात प्रसिद्ध आहे. गतवर्षी १ एप्रिल ते ११ जुलै या कालावधीत बाजार समितीत आठ लाख ६९ हजार ८८ क्विंटल हळदीची विक्री झाली होती. यावर्षी ‘कोरोना’च्या संकटामुळे विक्रीत पाच लाख क्विंटलने घट झाली आहे. सव्वा तीन महिन्यांत केवळ ३ लाख ७५ हजार ५५० क्विंटल हळदीची विक्री झाली आहे. त्यातही हळदीच्या दरात पाचशे ते सातशे रुपयांनी घट झाली आहे.

सांगली बाजार समितीत हळदीचा मुख्य हंगाम मार्च ते मे अखेरपर्यंत असतो. या कालावधीत बाजार आवारात हळदीची आवक मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे दिवसातून दोन वेळा सौदे घ्यावे लागतात. गतवर्षी १ एप्रिल ते ११ जुलै या कालावधीत सहा लाख एक हजार १७४ क्विंटल राजापुरी हळदीची विक्री झाली होती. या हळदीला सरासरी ८१४० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला होता. चांगल्या दर्जाच्या हळदीला १० हजार ३१६ रुपये क्विंटलपर्यंत दर मिळाला होता. आंध्रप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू यासह महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेल्या दोन लाख ६८ हजार ७१४ क्विंटल हळदीची विक्री झाली होती. परराज्यातील हळदीला ५७२५ रुपये क्विंटल असा मिळाला होता. 

यंदा हळदीचा हंगाम सुरू झाल्यानंतर काही दिवसाच ‘कोरोना’चा प्रादुर्भाव वाढला. यातूनच दोन ते अडीच महिने बाजार समित्या बंद होत्या. वाहतूक व्यवस्थाही बंद करण्यात आली होती. त्याचा परिणाम हळदीच्या आवक आणि विक्रीवर झाला. यावर्षी म्हणजे १ एप्रिल २०२० ते ११ जुलै या कालावधीत तीन लाख ५९ हजार ८१० क्विंटल हळदीची विक्री झाली आहे. या दरम्यान हळदीला सरासरी ७४०९ रुपये क्विंटल असा दर मिळाला. राजापुरी हळदीच्या विक्रीत दोन लाख ४१ हजार ३६४ क्विंटलने घट झाली. तर सरासरी दर ७१४ रुपयांनी कमी झाले. अन्य राज्यांतून केवळ १५ हजार ७४० क्विंटल हळदीची आवक झाली आहे. या हळदीच्या दरात पाचशे ते १ हजार रुपयांची घट झाली आहे.

सांगली बाजार समितीत राज्यासह परराज्यांतून हळदीची आवक आणि विक्री मोठ्या प्रमाणात होते. सौद्याच्या स्पर्धेतून दराची चढाओढ होत असते. परंतु यंदा ‘कोरोना’च्या प्रादुर्भावामुळे परपेठ हळदीच्या आवकेत दोन लाख ५० हजार क्विंटलने घट झाली असल्याचे दिसून येत आहे. ही स्थिती बघता भविष्यात परराज्यांतून सांगली बाजार समितीत हळद येणार का असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.   

हळदीची उलाढाल (रुपये, क्विंटल) एप्रिल ते जुलै २०१९
हळद  विक्री  सरासरी दर 
राजापुरी हळद ६,०१,१७४ ८१४०
परपेठ २,६८,७१४ ५७२६
एप्रिल ते जुलै २०२०
हळद विक्री सरासरी दर
राजापुरी हळद  ३,५९,८१०  ७४०९
परपेठ  १५,७४० ५१०१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com