चिकनमध्ये कोरोना ही अफवा : डॉ. अजित रानडे

डॉ. अजित शंकर रानडे
डॉ. अजित शंकर रानडे

पुणे  : गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमांवर कोरोना या विषाणूच्या ब्रॉयलर्स कोंबड्यांमध्ये प्रादुर्भावाच्या बनावट पोस्ट्स फिरत असून, शास्त्रीयदृष्ट्या यास कुठलाही आधार नसल्याचे स्पष्टीकरण मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयातील कुक्कुटपालनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अजित शंकर रानडे यांनी दिले आहे.

महाराष्ट्र पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाअंतर्गत (माफसू) येणाऱ्या मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाने कोरोना विषाणूसंदर्भात पसरवल्या जाणाऱ्या अफवांना शास्त्रीय माहितीद्वारे उत्तर देण्याची भूमिका घेतल्याचे डॉ. रानडे यांनी सांगितले.

“सध्या समाजमाध्यमांत काही खोडसाळ पोस्ट्सद्वारे कोरोना विषाणूचा चिकन खाण्याशी संबंध जोडला जातोय. प्रत्यक्षात कोंबड्यांमध्ये कोरोना विषाणू आढळल्याच्या एकाही घटनेची नोंद भारतात नाही. व्हॉट्सॲप, फेसबुक आदी माध्यमांवर पक्ष्यांचे शवविच्छेदनाचे फोटो प्रसारित केले जात आहेत. खरे तर ते राणीखेत या रोगाने प्रादुर्भाव झाल्याचे फोटो आहेत,” असे डॉ. रानडे यांनी सांगितले. “भारतामध्ये मांसाहाराची पद्धत सर्वाधिक सुरक्षित आहे. चिकन व मटण उकळवून, शिजवून घेतले जाते. पाणी हे १०० डिग्री तापमानाशिवाय उकळले जात नाही. एवढ्या तापमानात कुठलाही विषाणू जिवंत राहू शकत नाही. कारण कुठलाही विषाणू साधारण २७ ते ४५ डिग्रीपेक्षा अधिक तापमानात जगत नाही. शिवाय भारतात मांसाहारी पदार्थ शिजवताना आले, हळद आदी औषधी गुणधर्माचे मसाले वापरले जातात. त्यामुळे आजपर्यंत चिकन-मटणातून एखाद्या विषाणूजन्य रोगाची बाधा झाल्याच्या भारतात नोंदी नाहीत,” असे डॉ. रानडे यांनी स्पष्ट केले.

“ग्राहकांनी व्हॉट्सॲप वा फेसबुक आदी माध्यमांतील विपर्यास केलेल्या पोस्ट्सवर विश्वास ठेवू नये. भारतीय चिकन व अंडी खाण्यासाठी पूर्णत: सुरक्षित आहेत. अनेकदा कुक्कुटपालन व्यवसायासंबंधीच्या आकसातून वा गैरसमजातून ठरावीक मंडळींकडून अशा प्रकारच्या पोस्ट्स व्हायरल केल्या जातात. त्या प्रमाण मानू नयेत,” असे आवाहनही त्यांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com