सहकारी सूतगिरण्यांना सौरऊर्जा प्रकल्पाकरिता अनुदानासाठी प्रयत्न : राजेंद्र पाटील - यड्रावकर

वस्त्रोद्योग राज्यमंत्री राजेंद्र पाटील - यड्रावकर
वस्त्रोद्योग राज्यमंत्री राजेंद्र पाटील - यड्रावकर

मुंबई : सहकारी सूतगिरण्यांना सौरऊर्जा प्रकल्प राबविण्याकरिता राज्य शासनामार्फत अनुदान मिळण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे वस्त्रोद्योग राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी सांगितले.

विधानभवनात वस्त्रोद्योग आयुक्तालयाची नुकतीच आढावा बैठक झाली. त्या वेळी ते बोलत होते. वस्त्रोद्योग आयुक्त माधवी खोडे यांच्यासह मंत्रालयीन अधिकारी या वेळी उपस्थित होते. या वेळी श्री. पाटील-यड्रावकर म्हणाले, की राज्यात १४० सहकारी सूतगिरण्या असून सर्वसाधारण प्रवर्गातील ११४, मागासवर्गीय प्रवर्गातील २३ आणि आदिवासी प्रवर्गातील ३ सूतगिरण्या आहेत. त्यात पूर्ण उत्पादनाखालील ३६ सूतगिरण्या असून अंशत: उत्पादनाखालील ३३ तर उभारणीखालील २७ सूतगिरण्या आहेत. राज्यातील उत्पादनाखाली असलेल्या सहकारी सूतगिरण्यांना पुनर्वसनासाठी थकीत वैधानिक देणी व अन्य आर्थिक अडचणी सोडविण्यासाठी राज्य शासनाकडून कर्जरुपाने अर्थसाहाय्य देण्यात येते. या आर्थिक वर्षात पाच कोटींचा निधी देण्यात येईल.सहकारी सूतगिरण्या तोट्यात असल्याने अपारंपरिक ऊर्जा व वस्त्रोद्योग विभागाने पुढाकार घेतल्यास या सूतगिरण्यांना सौरऊर्जेचे प्रकल्प सुरू करता येतील.

राज्य शासनाकडून सहकारी सूतगिरण्यांना सवलतीच्या दराने वीजपुरवठा केला जातो. या सूतगिरण्या सौरऊर्जेवर सुरू झाल्यास कायमस्वरूपी उपाय होण्यास मदत होणार असून, राज्य शासनाला सवलतीच्या दरात वीज उपलब्ध करून देण्याची आवश्यकता भासणार नाही, यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे बैठक घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.  ‘सवलतीबाबत अभ्यासाअंती निर्णय’ दरम्यान, २७ अश्वशक्तीवरील यंत्रमाग उद्योगाला वीज सवलतीमध्ये १ रुपये २२ पैशांची सवलत पूर्ववत करण्यासंदर्भात उपमुख्यमंत्र्यांकडे बैठक झाली असून, गुजरात आणि कर्नाटक राज्याचा अभ्यास केल्यानंतर त्यावर निर्णय घेण्यात येईल, असे या बैठकीत ठरल्याचे राज्यमंत्र्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com