खानदेशात लाल कांद्याचे दर नीचांकी स्थितीत

जळगाव ः खानदेशात लाल कांद्याचे दर नीचांकी स्थितीत पोहोचले आहेत. किमान दर ५०० व कमाल दर १५०० रुपये प्रतिक्विंटल, असे आहेत. सरासरी ८०० रुपये प्रतिक्विंटलचा दर आहे.
Red onion prices lower in Khandesh
Red onion prices lower in Khandesh

जळगाव ः खानदेशात लाल कांद्याचे दर नीचांकी स्थितीत पोहोचले आहेत. किमान दर ५०० व कमाल दर १५०० रुपये प्रतिक्विंटल, असे आहेत. सरासरी ८०० रुपये प्रतिक्विंटलचा दर आहे.  दरात मोठी घट गेल्या दोन दिवसांत झाली आहे. कांद्याची जळगाव बाजार समितीत मंगळवारी (ता. ३०) ७०० क्विंटल आवक झाली. त्यात उन्हाळ कांद्याची अधिक आवक होती. तर पावसाळी किंवा खरिपातील लाल कांद्याची आवक कमी होती. परंतु या दोन्ही प्रकारच्या कांद्यांचे दर घसरले. खर्च वजा करता कुठलाही नफा शेतकऱ्यांच्या हाती राहत नसल्याची स्थिती आहे. एकरी २५ ते २८ हजार रुपये खर्च आला आहे. आणि उत्पादन आठ ते १० क्विंटल एवढेच आले आहे. त्यात खर्च व उत्पादन आणि उत्पन्न याचा कुठलाही ताळमेळ बसत नसल्याची स्थिती आहे. फक्त चार ते पाच हजार रुपये कांदा विक्रीतून हाती येत आहेत. अर्थात, एकरी २० ते २२ हजार रुपये तोटा सहन करावा लागत आहे. यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. पावसात कांद्याची मोठी हानी झालेली असतानादेखील दरात मोठी पडझड झाल्याने शेतकऱ्यांना फटका बसत आहे. नीचांकी दर कमी आवक व उत्पादन असतानादेखील का आहेत, असा प्रश्‍न शेतकरी उपस्थित करीत आहेत.  धुळे, पिंपळनेर येथेही दर कमीच आहेत. साक्री (जि. धुळे) तालुक्यातील शेतकरी आपला कांदा जळगाव बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणत आहेत. पिंपळनेर बाजार समिती आठवड्यातून दोन दिवस बंद केली जात आहे. धुळे बाजार समितीदेखील आठवड्यातून दोनदा बंद केली जात असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. कमी दर्जाच्या कांद्याचे लिलावच होत नाहीत. कांदा बाजार समितीमध्ये पडून राहत आहे. यामुळे शेतकऱ्यांना त्यात आणखी मोठा तोटा सहन करावा लागत आहे. व्यापाऱ्यांनी एकी करून दर पाडल्याची तक्रार शेतकरी करीत आहेत. जळगाव बाजार समितीत मोठी अनागोंदी सुरू आहे, असा आरोपही शेतकरी करीत आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com