सोलापूर जिल्हा दूध संघाची निवडणूक बिनविरोधसाठी ‘वेट अॅण्ड वॅाच’ 

सोलापूर ः राज्यात नावाजलेल्या सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (दूधपंढरी) संचालक मंडळाची निवडणूक जाहीर झाली आहे. पण संघ सध्या आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहे. या परिस्थितीत संघाला स्वतःच्या खर्चातून निवडणूक परवडणारी नाही, ही निवडणूक बिनविरोध होणे आवश्यक आहे
Weight and Watch for Solapur District Milk Association Election Unopposed
Weight and Watch for Solapur District Milk Association Election Unopposed

सोलापूर ः राज्यात नावाजलेल्या सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (दूधपंढरी) संचालक मंडळाची निवडणूक जाहीर झाली आहे. पण संघ सध्या आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहे. या परिस्थितीत संघाला स्वतःच्या खर्चातून निवडणूक परवडणारी नाही, ही निवडणूक बिनविरोध होणे आवश्यक आहे. पण आधी पुढाकार घेणार कोण, यावरुन महाविकास आघाडी आणि भाजपकडून प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण केला गेला आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंकडून तूर्तास वेट अॅण्ड वॅाचची भूमिका असल्याचे दिसते.  राज्यातील काही मोठ्या दूध संघात दूधपंढरीचा समावेश होतो. आजही दूधपंढरीचा ब्रॅण्ड महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचलेला आहे. पण अलीकडच्या काही वर्षात दूध संघातील आर्थिक व्यवहाराचे गणित कोलमडल्याने संघ अडचणीत आला. त्याचा परिणाम दूध संकलनावर झाला. परिणामी, गेल्या दोन वर्षापासून दूध संघावर प्रशासकीय मंडळ कार्यरत आहे. प्रशासकीय मंडळाने सध्या बऱ्यापैकी प्रयत्न करत संघ सावरण्याचा प्रयत्न केला आहे. मधल्याकाळात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर मात्र संघात राजकीय उलथापालथी झाल्या. संघाचे अध्यक्ष, भाजपचे आमदार प्रशांत परिचारक हे बाजूला गेले. त्यानंतर पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे आणि आता शिवसेनेत असलेले माजी आमदार दिलीप माने अध्यक्ष झाले. पण तेही फारकाळ राहिले नाहीत. शेवटी प्रशासकाच्या हाती कारभार आला. त्यामुळे आता महाविकास आघाडी आणि भाजप अशा दोन्ही बाजूंकडून निवडणूका कधी लागतात, याकडेच लक्ष लागले होते. अखेरीस ही निवडणूक जाहीर झाली. पण संघ नेमका अडचणीत कोणामुळे आला, नेमके काय झाले, यावर कोणीही चर्चा करत नाही. आता तर फक्त सत्ता मिळवणे, एवढेच उद्दिष्ट दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी ठेवल्याचे दिसते.  माळशिरस वगळता जिल्ह्यातील दहा तालुक्यातील ३१६ मतदार संस्था या निवडणुकीसाठी पात्र ठरल्या आहेत. त्यात सर्वाधिक मंगळवेढा, मोहोळ, पंढरपूरच्या संस्थांचा समावेश आहे. भाजपकडून आमदार प्रशांत परिचारक, आमदार समाधान आवताडे, महाविकास आघाडीकडून आमदार बबनराव शिंदे, आमदार संजय शिंदे, माजी आमदार दिलीप सोपल, माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार दिलीप माने, माजी आमदार दीपक साळुंखे, शेकापचे चंद्रकांत देशमुख हे नेतृत्व करत आहेत. संघाची आर्थिक परिस्थितीचा विचार करता निवडणूक बिनविरोध होणे आवश्यक आहे. पण भाजपकडून त्यादृष्टीने अद्यापही काहीच हालचाली केल्या नाहीत, तर महाविकास आघाडीची नुकतीच बैठक झाली. त्यांनी मात्र आम्ही स्वतःहून कोणताही प्रस्ताव देणार नाही, समोरून आल्यानंतर पाहू, अशी भूमिका घेतल्याने बिनविरोध निवडणुकीबाबत शक्यता कमीच दिसते आहे.  सव्वाशे अर्जाची विक्री  दूध संघाच्या निवडणुकीसाठी २८ जानेवारी ही अर्ज दाखलची शेवटची मुदत आहे. ही तारीखही दोन दिवसावर आली आहे. गेल्या दोन दिवसात या निवडणुकीसाठी तब्बल सव्वाशे अर्जाची विक्री झाली आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंकडून वातावरण अद्याप शांतच असले, तरी अर्जाच्या विक्रीवरुन चुरस वाढणार असल्याचे दिसते.  ज्येष्ठांची उणीव  जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत दरवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार (कै) सुधाकर परिचारक, शेतकरी कामगार पक्षाचे ज्य़ेष्ठ नेते, माजी आमदार (कै.) गणपतराव देशमुख हे संघाच्या कारभारात लक्ष घालत, संघाची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी पुढाकर घेत. पण आज हे दोनही नेते हयात नसल्याने  त्यांची उणीव भासत असल्याचे दिसते. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com