हिरवे हिरवेगार गालिचे, हरित तृणांच्या मखमालीचे, लॉन, गार्डनिंग व्यवसायाची शोधली संधी

हिरवे हिरवेगार गालिचे हरित तृणांच्या मखमालीचे... बालकवींची ही कविता सुप्रसिद्ध आहे. असेच हिरवेगार ‘लॉन व गार्डनिंग' निर्मिती करून त्याचे कानशिवणी (ता. जि. अकोला) येथील श्रीराम मालठाणे यांनी व्यवसायात रूपांतर केले आहे.
मालठाणे यांनी तयार केलेले लाॅन व त्याचे मॅट
मालठाणे यांनी तयार केलेले लाॅन व त्याचे मॅट

हिरवे हिरवेगार गालिचे हरित तृणांच्या मखमालीचे... बालकवींची ही कविता सुप्रसिद्ध आहे. असेच हिरवेगार ‘लॉन व गार्डनिंग' निर्मिती करून त्याचे कानशिवणी (ता. जि. अकोला) येथील श्रीराम मालठाणे यांनी व्यवसायात रूपांतर केले आहे. एकेकाळी आर्थिक परिस्थिती अत्यंत कमकुवत असताना कौशल्य, नाविन्यता, परिश्रम व उद्योजकता यांच्या व्यावसायिक दृष्टिकोन या गुणांच्या आधारे मालठाणे यांनी वर्षाला सुमारे सात ते आठ लाख रुपयांची उलाढाल करण्यापर्यंत मजल मारली आहे. अकोला जिल्ह्यातील कानशिवणी येथील श्रीराम मालठाणे यांचे चार भावांचे कुटुंब होते. चार भावांमध्ये शेतीचे विभाजन झाल्यानंतर वाट्याला सव्वा एकर क्षेत्र आले. त्यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह होणे शक्य नव्हते. त्यामुळे श्रीराम यांनी जनावरे पाळणे, दुसऱ्यांकडे मोलमजुरी करणे सुरू केले. यातून थोडीफारच मिळकत व्हायची. नवीन काही केले पाहिजे याची जाणीव सातत्याने होत होती. यातूनच लॉन व गार्डनिंग व्यवसायाचा शोध लागला. बाग व्यवस्थापनाचे काम थोडेफार येत होते. त्यास तांत्रिक जोड देण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील हॉर्टीकल्चर विभागाचे प्रशिक्षण घेतले. औरंगाबाद येथे वाल्मीमध्येही प्रशिक्षण घेतले. यातून अंगभूत गुणांना तंत्रशुद्ध ज्ञानाची जोड मिळाली. त्यानंतर सुरू झालेला प्रवास जोमाने सुरू ठेवला. व्यवसायात कमावला विश्वास मालठाणे यांनी व्यवसायात सात-आठ वर्षांपूर्वी पाऊल ठेवले. तेव्हापासून आजपर्यंत ग्राहकांना सेवा देताना कुठेही कुचराई केली नाही. ग्राहकांचा विश्वास सातत्याने वाढविला. यातून अनेक कामे मिळाली. अदानी समूहाच्या वीज केंद्रातील सात एकरांतील बागकामाचे व्यवस्थापन त्यांच्याकडे असते. त्यांच्या कामाचे एक छायाचित्र कंपनीच्या एका प्रकाशनाच्या पहिल्या पानावर झळकले आहे. अकोला शहरातील एमआयडीसी क्षेत्रातील कारखाने, विविध हॉटेल्स, दवाखाने, मंगल कार्यालये, अपार्टमेंट, बंगले आदी मिळून दोनशेवर कामे मालठाणे यांनी केली आहेत. शहरात कुठलेही काम असेल तर त्यांचे नाव विश्वासाने घेतले जाते. व्यावसायिक पद्धतीने लॉनची कामे करणाऱ्या व्यक्ती प्रति चौरस फूट ३० ते ४० रुपये दर आकारतात. मालठाणे हेच काम त्याहून कमी किंमतीत करून देतात. त्यामुळे ग्राहकांचा ओढा वाढल्याचे ते सांगतात. संपूर्ण कुटुंब व्यवसायात मालठाणे कानशिवणी येथे कृषिमित्र आहेत. गावातील शेतकऱ्यांपर्यंत नवीन तंत्रज्ञानाची माहिती पोचविण्याचे काम करतात. आपल्या शेतात सोयाबीन, मूग, उडीद, तूर, हरभरा, भुईमूग अशी पिके घेतात. लॉन, बाग विकसित करण्याचे व विक्री, विपणनाचे काम ते करतात. तर पत्नी अनिता शेती व लॉन गवताच्या लागवडीचे व्यवस्थापन सांभाळतात. मुलगा प्रथमेश शिक्षण सांभाळून मदत करतो. व्यवसायातून समृद्धी शेती आणि लॉन व्यवसाय मिळून वर्षाची उलाढाल सात ते आठ लाख रुपयांवर पोचली आहे. कधीकाळी जनावरे सांभाळण्याची तसेच मोलमजुरी करण्याची वेळ आलेल्या मालठाणे यांच्या आयुष्यात आज सुखसमृद्धी आली आहे. सिमेंटचे टुमदार घर बांधले आहे. घरासमोर दुचाकी आली. सव्वा एकर शेतीचे क्षेत्र सहा एकरांपर्यंत नेले. सामाजिक जबाबदारी म्हणून शाळा, मंदिर, सार्वजनिक ठिकाणी लॉन, झाडे लावण्याचे कामही मालठाणे करतात. मंदिर परिसरात विनामूल्य काम करून दिले आहे. कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना पुरस्कार मिळाले आहेत. अकोला येथील जय गजानन परिवारातर्फे सन्मानचिन्ह, साडीचोळी देऊन दांपत्याचा सत्कार करण्यात आला आहे. व्यवसायातील महत्त्वाच्या बाबी

  • लॉनसाठी वापरल्या जाणाऱ्या गवताची अर्ध्या एकरांपर्यंत लागवड.
  • यात प्रामुख्याने सिलेक्शन व डायमंड हे प्रकार
  • सिलेक्शन हे लॉन गवत मोठ्या क्षेत्रावर म्हणजेच हॉटेल, मंगल कार्यालये आदी ठिकाणी वापरले जाते.
  • डायमंड प्रकार देखावे, घरगुती वापराची कामे यासाठी उपयोगात आणला जातो.
  • दोन्ही गवतांची (लॉन) शेतात लागवड. त्यानंतर मॅटमध्ये त्याचे रूपांतर करून विक्री.
  • विविध प्रकारच्या बागांची निर्मिती.
  • लॉन लागवड, शोभिवंत झाडांची आरास, झाडांना योग्य आकार वा कॅनोपी करून देणे
  • जेथे लॉन तयार करायचे तेथे आधी काळी माती आणून टाकली जाते, त्यात शेणखत मिसळून मातीचे मिश्रण तयार करून घेतात. त्यावर गवताचे मुळासकट हिस्से ठरावीक अंतरावर लावतात. त्यानंतर त्यावर पाणी शिंपडणे आवश्यक असते. लॉनची नियमित देखभाल ठेवावी लागते.
  • गरजेनुसार सकाळ -संध्याकाळ पाणी तसेच अधून-मधून खतमात्रा द्यावी लागते.
  • लॉनचा हिरवेपणा वाढविण्यासाठी नत्रयुक्त खतांचा वापर होतो. लॉनमध्ये दुसरे गवत आले तर ते उपटून फेकावे लागते.
  • बऱ्याचवेळा हे काम किचकट असते. यासाठी स्वतःची पद्धत विकसित केली आहे.
  • एक ते दीड महिन्यात मॅट तयार होते.
  • तीन इंचापर्यंत त्याची उंची ठेवावी लागते.
  • कमी खर्चात तयार केले यंत्र गवत कापणीचे ३५ ते ४० हजार रुपयांचे यंत्र मालठाणे यांच्याकडे होते. त्याचा वापर करताना अडचणी येत होत्या. त्यामुळे त्यांनी आपल्या गरजेनुसार यंत्र बनवून घेतले. त्यासाठी अवघा १० हजार रुपयांपर्यंत खर्च आला. कापलेले गवत बाहेर टाकण्यासाठी यंत्राला जाळीची टोपली तयार केली. वजन कमी झाल्याने यंत्र हाताळणीला सोपे झाले. संपर्क- श्रीराम मालठाणे-९६६५१०३६९९  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com