साग लागवडीतून पर्यावरणालाही चांगला परतावा

साग लागवडीतून पर्यावरणालाही चांगला परतावा
साग लागवडीतून पर्यावरणालाही चांगला परतावा

जंगलाशेजारच्या शेतामध्ये अन्य पिके घेण्यामध्ये वन्य प्राण्यांचा त्रास होत असे. तो टाळण्यासाठी ऊस पिकाऐवजी दोन एकर क्षेत्रामध्ये साग लागवडीचा प्रयोग केला आहे. साग लागवडीच्या दीर्घकालीन गुंतवणुकीतून चांगल्या परताव्याची अपेक्षा आहे. सोबतच पर्यावरणासाठीही वनशेती फायद्याची ठरणार आहे.

विळद (ता. जि. नगर) येथील विलास ज्ञानदेव जगताप यांच्याकडे २० एकर शेती आहे. ऊस हे मुख्य पीक असून, बांधावर काही झाडांची लागवड करण्याच्या उद्देशाने शोध सुरू होता. या वेळी जळगाव येथील साग लागवड या विषयामध्ये कार्यरत व्यक्तीची भेट झाली. त्यांनी बांधावर सागाची लागवड करण्याऐवजी दोन एकर जंगलाशेजारच्या क्षेत्रामध्ये लागवडीचा सल्ला दिला. १५ ते २० वर्षापर्यंत दीर्घकाळ गुंतवणूक करण्याची क्षमता असल्यास उसापेक्षा साग शेती फायद्याची ठरत असल्याचा हिशेब त्यांनी सांगितला. विलासरावांची एक शेती जंगलाला जवळ असल्याने वन्य प्राण्यांचा सतत उपद्रव होतो. या ठिकाणी कोणतेही पीक घेण्यामध्ये अडचण येते. त्यात ऊस पिकाची घटती उत्पादकता, दरवर्षी वाढत चाललेला उत्पादनखर्च यामुळे अन्य पिकांच्या शोधात ते होते.

  • सन २००४ मध्ये दोन एकरावर साग आणि फळबागेमध्ये सीताफल लागवडीचा निर्णय घेतला. शासकीय फळबाग योजनेतून त्यांनी ३० बाय ३० फूट अंतरावर एक सीताफळ आणि १२ बाय ६ फूट अंतरावर साग अशी लागवड केली.
  • या साग बागेमध्ये पहिल्या वर्षी सोयाबीनचे आंतरपीक घेतले. मात्र या पिकाचे हरणांनी नुकसान केले. सागाला कोणताही वन्यप्राणी खात नसल्याने यामधील जागेमध्येही दुसऱ्या वर्षी आणखी एका सागाची लागवड केली. आता त्यांच्या एकूण १८०० साग झाडे आणि सीताफळ ६०० झाडे आहेत. अधिक सूर्यप्रकाश मिळविण्याच्या स्पर्धेमुळे दुसऱ्या वर्षी लावलेली साग झाडेही वेगाने वाढली आहे.
  • सागाचे स्टंप अमरावतीवरून सुमारे ५५ रुपये या दराने घरपोच मिळाले.
  • साग शेतीतील महत्त्वाचे...

  • सागाला पाण्याचा निचरा उत्तम होणारी जमीन लागते. पानथल किंवा भारी जमीन चालत नाही. हलकी, डोंगराळ जमीन चालते. जमिनीच्या प्रकारानुसार प्रत्येक झाडाची वाढ वेगवेगळी आहे. जगताप यांच्या शेतातही काही झाडांची घेर हे २ ते १२ इंचापर्यंत आहे. तसेच उंची ही १५ ते ४० फूट आहे.
  • सागाला हवामान दमट, बाष्पयुक्त लागते. कोरडे हवामान चालत नाही.
  • वनविभागाच्या शेजारी असलेल्या शेतीमध्ये दोन बाय दोनचा खड्डा घेऊन, त्यात पोयटा, गांडूळ खत, १९ः१९ः१९ मिश्रखत, शेणखत टाकून बेड भरून घेतले.
  • जूनमधील पहिल्या पावसानंतर सागाचे स्टंप लावले. ठिबक सिंचन संच बसवला आहे.
  • पहिली तीन वर्षे एकरी वीस हजार या प्रमाणे खतासाठी खर्च केला. त्यानंतर खते देण्याची गरज राहत नाही. सागास दरवर्षी जूनमध्ये पाने नवी येतात, जानेवारीनंतर पानगळ होते. या पानगळीतून सुमारे दोन मेट्रिक टन सेंद्रिय खत उपलब्ध होते. त्याचा सागाच्या वाडीसाठी अधिक उपयुक्तता आहे.
  • पानगळीमुळे जमिनीवर आच्छादन होऊन जमिनीत ओलावा राहतो.
  • पहिली दोन वर्षे काही किडींचा प्रादुर्भाव झाल्याने फवारणी केली. मात्र त्यानंतर कीडनाशकाची फवारणी केलेली नाही.
  • पहिली तीन वर्षे सागबागेची काळजी घेणे आवश्यक असते.
  • सीताफळ लागवडीचा फायदा शासकीय योजनेतून सीताफळ लागवड केली असून, ठिबक सिंचन व अन्य खर्च अनुदानातून मिळाला. सध्या सीताफळांच्या झाडांना ठिबकने दिलेले पाणी अप्रत्यक्षरीत्या सागाला मिळते. सीताफळाची विक्री पुणे व नगर येथील बाजारपेठेत केली जाते. त्याला सरासरी वीस ते तीस रुपये प्रति किलो असा दर मिळतो.

    सागाचे अर्थशास्त्र

  • एकूण १८०० साग झाडे. सध्या पाचव्या वर्षी सागाची उंची चाळीस फुटांपर्यंत गेली आहे. आता उंची वाढणे थांबले असून, घेर वाढत आहे. घेर सहा ते १२ इंचांपर्यंत गेला आहे. जंगलाशेजारीच जमीन व परिस्थिती असल्याने या शेतीतील सागाला चांगला दर मिळण्याची अपेक्षा विलासराव जगताप यांनी व्यक्त केली.
  • प्रत्येक झाडांपासून २० घनफूट साग लाकूड मिळण्याची अपेक्षा आहे. सध्या सागाचा दर पाच हजार रुपये घनफूट आहे.
  • चांगल्या लाकडासोबतच अन्य लाकूडही सुमारे १८ टन मिळण्याची अपेक्षा असून, त्यापासून ७२ हजार रुपये मिळतील.
  • सर्वात महत्त्वाचे म्हणजे सागाच्या लागवडीचा पर्यावरणालाही चांगला फायदा होतो. जमिनीची धूप रोखली जाते. पानगळीमुळे जमिनीवर पाला पाचोळा आच्छादन होऊन गांडुळाची वाढ होते. ओलावा टिकून राहतो.
  • पर्यावरण संरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा असून, कार्बन क्रेडिटच्या दृष्टीने साग लागवडीसाठी अधिक प्रोत्साहन मिळाले पाहिजे. जंगलामध्ये वाढणारा हा वृक्ष असून, काटक आहे. त्यामुळे बांधासह शेतीमध्ये लागवड करणे शक्य आहे. सागामुळे आमच्या जमिनीची धूप थांबली असून, जमिनीत पावसाचे पाणी मुरण्यास मदत झाली आहे. - विलास ज्ञानदेव जगताप, संपर्क ः९९७५३१७१९९

    साग तोडण्यासाठी परवाना वन विभागाऐवजी कृषी विभागाशी जोडल्यास शेतकरी साग लागवडीकडे वळतील. पर्यावरण संरक्षणासाठी कार्बन क्रेडिटची प्रमाणपत्रेही शेतकऱ्यांना मिळाल्यास वनशेतीचा विकास वेगाने होऊ शकेल, असे वाटते. - डॉ. सकेचंद अनारसे, वरिष्ठ संशोधक, वनशेती संशोधन प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

    बांधावर साग लागवड करताना... जोगेश्वरी आखाडा (ता. राहुरी, जि. नगर) येथील कारभारी डौले यांनी बांधावर साग केली होती. त्यांचा अनुभव थोडक्यात

  •   वडिलांनी शेतात चर घेतला होता. त्यात निलगिरीची झाडे लावण्याचे नियोजन होते. मात्र त्या ऐवजी सागाचे स्टंप लावण्याचा सल्ला वनअधिकारी असलेल्या पाहुण्यांकडून मिळाला. त्यानुसार १९९२ मध्ये दीडशे स्टंप शेताच्या बांधावर लावली. तीन वर्षे योग्य काळजी घेतल्यानंतर ही झाडे पाच वर्षांत तीस ते चाळीस फुटांपर्यंत वाढली. दीड ते दोन फूट घेर झाला. मात्र बांधावरील झाडे असल्यामुळे केवळ सहाशे ते सातशे रुपये घनफूट बाजारात मिळाला. चंद्रपूर, परतवाडा येथे जंगलातील साग लाकूड हे अधिक टिकाऊ असल्याने त्याला बाजारात तीन ते चार हजार रुपये घनफूट असा दर मिळतो. दीडशे झाडांचे पंधरा ते वीस लाख रुपये मिळण्याची अपेक्षा असताना केवळ सव्वा लाख रुपये मिळाल्याचे कारभारी डौले यांनी सांगितले. मात्र सागाच्या झाडांच्या पानगळीमुळे चांगले सेंद्रिय खत जमिनीला मिळून ती भुशभुशीत झाली. पानांखाली गांडुळाची वाढ चांगली झाली. तसेच तणांचा प्रादुर्भावही झाला नाही. उसाला सागाचा वसावा जाणवला नाही.
  •  बांधावर साग लागवड केलेल्या बाबासाहेब भुजाडी यांचाही डौले यांच्या प्रमाणेच अनुभव आहे.
  • संपर्क  ः कारभारी डौले, ९४२२७२७०१७

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com