कलिंगडापासून विविध पदार्थनिर्मिती

पूर्ण पक्वता गाठल्यानंतर कलिंगडाची काढणी केल्यास त्यात आरोग्यवर्धक घटकांचे प्रमाण सर्वाधिक असते. अशा फळांची योग्य तापमानाला साठवण, वाहतूक करावी. कलिंगडापासून आरोग्यवर्धक पेये, खाद्य पदार्थ तयार करता येतात.
कलिंगडापासून विविध पदार्थ निर्मिती
कलिंगडापासून विविध पदार्थ निर्मिती

उन्हाळ्यामध्ये कलिंगड हे फळ उत्तम मानले जाते. त्याची किंमत प्रति १० ते २० रुपये इतकी असून, एका फळाचे वजन साधारणपणे दोन किलोपर्यंत असते. बहुतांश फळे ही ताज्या स्वरूपात विकली जातात. या फळांपासून विविध उत्पादने तयार करणे शक्य आहे. काढणी ः

  • लागवड केल्यानंतर सुमारे ३ ते ४ महिन्यांमध्ये कलिंगडे काढणीला येतात. बाजारात पाठवण्यासाठी कलिंगडांची काढणी पूर्ण पक्वता गाठल्यावरच करावी. कारण वेलीपासून फळ वेगळे केल्यानंतर अंतर्गत रंग चांगला येणे व गोडी मिळणे या क्रिया थांबतात.
  • पक्वता गाठल्याची लक्षणे ः फळाचा आकार, सालीचा रंग, त्यावरील चमक किंवा तेलकटपणा, फळावर मारल्यानंतर येणारा पोकळपणाचा विशिष्ट आवाज, वेलीची स्थिती. तसेच फळ जिथे जमिनीला टेकते तेथील रंग (इंग्रजीमध्ये त्याला ग्राउंड स्पॉट म्हणतात) फिक्कट पांढऱ्यापासून बदलून मलईदार पिवळा होतो. ज्या फळामध्ये पांढऱ्या बियांचे प्रमाण अधिक असते, ते अद्यापही पिकलेले नसते.
  • फळाच्या मध्यावरील विद्राव्य घन पदार्थांचे प्रमाण किमान १० टक्के असावे.
  • फलांची काढणी वेलीपासून ओढून करण्याऐवजी धारदार चाकूने कापून करावी. देठाची बाजूवर फळे ठेवू नयेत. फळाच्या या बाजूची साल पातळ असते.
  • काढणीनंतर सात दिवसांपर्यंत फळे १८ ते २२ अंश सेल्सिअस तापमानामध्ये ठेवल्यास उत्तम रंग येतो; मात्र १२ अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानामध्ये ठेवल्यास त्याचा रंग फिक्कट होतो; मात्र काढणीनंतर फळांच्या गोडीमध्ये (त्यातील शर्करेच्या प्रमाणामध्ये) काहीही बदल होत नाही.
  • साठवण आणि वाहतूक ः काढणीनंतरच्या पहिल्या चोविस तासांमध्ये कलिंगड फळ १२ ते १५ अंश सेल्सिअस तापमानाला थंड करावे. त्यामुळे अधिक काळासाठी टिकण्यास मदत होते. साठवणीसाठी तापमान १० ते १५ अंश सेल्सिअस आणि सापेक्ष आर्द्रता ९० टक्क्यांपर्यंत ठेवल्यास फळे २-३ आठवडे ठेवता येतात. सिफेट संस्थेने विकसित केलेली बाष्पीभवनाधारीत शीतगृहे त्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. आरोग्यासाठी फायदे कलिंगड फळ खाण्याचे किंवा ताजा रस पिल्याने आरोग्यासाठी लक्षणीय फायदे होतात. या फळामध्ये सिट्रूलिन हे अमिनो आम्ल मोठ्या प्रमाणात असून, ते रक्तवाहिन्यांवरील ताण कमी करते. अतिकष्टामुळे स्नायूंमध्ये आलेला ताण कमी करते.

  • हृदय, त्वचा आणि कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी ः कलिंगडातील गरांना आकर्षक लाल रंग देण्यासाठी लायकोपेन महत्त्वाची भूमिका निभावते. ते आरोग्यासाठी उपयुक्त असून, विशेषतः मुक्त कणांमुळे हृदयाला होणाऱ्या हानीपासून वाचवण्यासाठी मदत करते. लायकोपेन युक्त आहारामुळे अतिनील किरणांपासून त्वचेला इजा पोचत नाही. सूर्यप्रकाशामध्ये सातत्याने काम करण्यामुळे येऊ शकणाऱ्या सुरकुत्या आणि त्वचेच्या कर्करोगालाही ते दूर ठेवते. विविध प्रकारचे कर्करोगासाठी प्रतिबंधक ठरत असल्याचे संशोधनातून पुढे येत आहे.
  • उत्तम रक्तप्रवाहासाठी सिट्रूलिन ः सिट्रूलिन हे अमिनो आम्ल कलिंगडामध्ये मुबलक आहे. शरीरामध्ये त्याचे रूपांतर अग्रेनिन या आवश्यक अमिनो आम्लामध्ये केले जाते. त्याचा उपयोग रक्तप्रवाह सुधारण्यासाठी आणि रक्तवाहिन्यावरील ताण कमी करण्यासाठी होतो. या हृदयविकार दूर ठेवण्यासाठी चांगला परिणाम होतो. अतिव्यायामामुळे येणारा स्नायूवरील ताण कमी करण्यासाठी हा घटक उपयुक्त ठरतो.
  • वजन कमी करण्यासाठी ः सिट्रूलिन हाच घटक पेशीतील मेदाच्या साठवणीमध्येही फेरफार करत असल्याचे प्राण्यांवरील चाचण्यांमध्ये दिसले आहे. ते मेदाच्या साठवणीसाठी कार्यरत टीएनएपी या विकरांना रोखण्याचे काम करते.
  • दाह कमी करणारा कलिंगड रस ः व्यायामापूर्वी कलिंगडाच्या रसाचे सेवन केल्यास दाह कमी करते. त्यातील फ्लॅव्हेनॉइड, कॅरोटीनॉइड यासारखे घटक दाह निर्माण करणाऱ्या ट्रीटेरपेनॉइड घटकांशी लढतात.
  • जीवनसत्त्वे आणि खनिजे ः कलिंगडामध्ये क जीवनसत्त्वाचे प्रमाण अधिक असते. त्याचप्रमाणे बीटी कॅरोटीन असून, त्याचे शरीरामध्ये अ जीवनसत्त्वामध्ये रूपांतर होते. अल्प प्रमाणात ब जीवनसत्त्व असते. त्यामध्ये पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअम ही खनिजे आहेत. कलिंगडाच्या बियांमध्ये लोह आणि जस्ताची पातळी अधिक असते. योग्यरीत्या पक्व कलिंगडामध्येच वरील सर्व आरोग्यदायी घटक मुबलक असतात. खाण्यासाठी पक्व कलिंगडाचीच निवड करावी.
  • मूत्रपिंडाच्या आरोग्यासाठी ः कलिंगड रसामध्ये मूत्रपिडांच्या स्वच्छतेसाठी विशेषतः त्यातील अमोनिया आणि युरिक आम्ल धुऊन काढण्यासाठी उपयुक्त ठरेत. परिणामी मुतखडा होण्याचे प्रमाण कमी होते. कलिंगडाच्या बियाही मूत्रपिंडाच्या कार्यक्षमतेसाठी उपयुक्त ठरतात.
  • कलिंगडापासूनची उत्पादने १) कलिंगड केळी स्प्लिट ः दोन केळी सोलून अधिक लांबीच्या बाजूने अर्धे करून घ्यावीत. पुन्हा त्याचे तुकडे करावेत. आईस्क्रिमच्या स्कुपरने कलिंगडाचे तीन स्कूप दोन केळी कापामध्ये ठेवावे. शक्य तेवढ्या बिया काढून टाकाव्यात. त्यावर वेगवेगळ्या फळांचे मिश्रण वापरता येते. त्यावर पाव कप ड्रिझल कॅरामल टाकावे. त्यावर पाव कप मधामध्ये भाजलेले बदाम टाकावेत. दोन केळी आणि एक मध्यम आकाराचे कलिंगड यापासून चार प्लेट बनवता येतात. २) कलिंगडाचे सॉफ्ट ड्रिंक ः कलिंगडाच्या बारीक कापलेल्या फोडी, साखर, व्हॅनिला रस आणि मिठ फूड प्रोसेस किंवा ब्लेंडरमधून बारीक करून घ्यात. थोडे हलवल्यानंतर रेफ्रिजरेटरमध्ये थंड करा. पुढे या कलिंगड रसामध्ये आवश्यक तितक्या तीव्रतेपर्यंत क्लब सोडा किंवा सेल्टझर मिसळा. ३) कलिंगड रस ः कलिंगडावरील फवारणीचे अंश किंवा नैसर्गिक तेलकटपणा कमी करण्यासाठी बाह्य बाजू स्क्रबरच्या साह्याने घासून घ्या. त्याला व्हिनेगर लावा. त्यानंतर कलिंगडाचे तुकडे करून त्यापासून रस काढा. मोठ्या कलिंगडाचा चौथा भाग दोन माणसांसाठी पुरेसा होईल. कलिंगडाची हिरवी साल आणि आतील गराचे पातळ तुकडे ज्युसरमध्ये घालून त्याचाही रस काढा. अर्थात, त्यामुळे कलिंगडाच्या रसाची गोडी थोडीशी कमी होईल; पण कलिंगडाच्या सालीमध्ये व पांढऱ्या गरामध्येही आरोग्यासाठी उपयुक्त घटक असतात. ४) कलिंगडाचा सिरप ः कलिंगडाचे बारीक तुकडे करून फूड प्रोसेसरद्वारे रस काढा. हा रस मोठ्या व जाड तळ असलेल्या भांड्यामध्ये मध्यम आचेवर तापत ठेवा. थोड्या वेळाने त्याला हलवत राहा. खालील बाजूला करपणार नाही, हे पाहा. आवश्यकतेइतका घट्ट झाल्यानंतर चाळणीतून गाळून घ्या. त्यापासून दोन उत्पादने तयार करता येतात. १) मऊ लाल कलिंगड पाक २) घट्ट कलिंगड गर. या घट्ट कलिंगड गलाला कलिंगड लोणी असे म्हणतात. त्याचा वापर ब्रेडवर पसरून (स्प्रेड) खाण्यासाठी होतो. ५) कलिंगड माऊसी ः कलिंगडाच्या गराचे तुकडे करा. त्यापासून फूड प्रोसेसरमध्ये प्युरी तयार करून घ्यावी. एका भांड्यामध्ये दोन कप प्युरी घ्या. पाव कप वेगळ्या भांड्यामध्ये शांत ठेवा. भांड्यातील दोन कप प्युरीला मध्यम आचेवर उकळी आणा. बाजूला ठेवलेल्या पाव कप कलिंगड प्युरीमध्ये जिलेटीन चांगले मिसळून घ्या. वरील उकळी आलेल्या द्रावणाखालील आच बंद करून, त्यात जिलेटीन मिसळलेला कलिंगड प्युरी चांगली मिसळून घ्या. त्यातील जिलेटीनला गाठी येणार नाहीत, याकडे लक्ष द्या. त्यात अर्धा चमचा लिंबाचा रस आणि अर्धा कप साखर मिसळा. चांगले मिसळल्यानंतर बाजूला थंड होऊ द्या. त्यानंतर त्यावर मलई पसरवा. कलिंगड माऊसीचे छोट्या वाट्यामध्ये लहान भाग करून, रेफ्रिजरेटरमध्ये सेट करून घ्या. त्यासाठी साधारणपणे दोन तास किंवा अधिक वेळ लागतो. ६) कलिंगडाच्या सालींची भाजी ः ही खास राजस्थानी डिश आहे. कलिंगडाच्या सालीला काकडीप्रमाणे एक कुरकुरीतपणा असतो. उष्णता दिल्यानंतरही तो टिकून राहतो. त्यामुळे तो शिजल्यानंतरही उत्तम चव येते. सालीमध्ये विविध मसाले चांगल्या प्रकारे मुरतात. भाजी करण्यापूर्वी अत्यंत कठीण असलेल्या जाड हिरव्या साली काढून टाकाव्यात. ७) त्वचेसाठी सौदर्य प्रसाधने ः कलिंगडामध्ये पाण्याचे प्रमाण ९२ टक्के असले तरी त्यातील सूर्यप्रकाशासाठीचे गुणधर्म उच्च आहेत. हे उन्हाळ्यातील फळ असले तरी हिवाळ्यातील त्वचा फाटण्याच्या समस्येसाठी उपयुक्त ठरू शकते. त्यामुळे त्वचेसाठी त्यात अन्य औषधी घटकांचा समावेश करत विविध सौंदर्य प्रसाधने तयार करता येतात.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com