पाने पिवळी पडत असलेल्या संत्रा बागेसाठी उपाययोजना

पाने पिवळी पडत असलेल्या संत्रा बागेसाठी उपाययोजना
पाने पिवळी पडत असलेल्या संत्रा बागेसाठी उपाययोजना

काही संत्रा बागांमध्ये पाण्याचा अतिरिक्त ताण, फायटोप्थोरा बुरशीचा प्रादुर्भाव, क्लोरोसीस विकृती, शेंडे मर यामुळे पाने पिवळी पडत असल्याचे दिसत आहे. त्याचे नेमके कारण शोधून, योग्य ती उपाययोजना करावी. कमी तापमान व पाण्याचा ताण यामुळे झाडाच्या पानाखालील पर्णरंध्राचे (स्टोमॅटा) तोंड बंद होते. प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया अतिशय मंदावते. परिमाणी झाडातील अन्नद्रव्यांचा संतुलित पुरवठा पानांना होत नाही. पानांना मुख्य अन्नद्रव्ये (उदा. नत्र, स्फुरद, पालाश) व जस्त व लोहासारखी सूक्ष्म अन्नद्रव्ये यांची कमतरता भासते. यामुळे शरीरक्रियेतील चयापचयामध्ये बिघाड निर्माण होऊन कर्बोदकांचा पुरवठा कमी होतो. संजीवकांच्या असंतुलनामुळे पानातील हरीतद्रव्यांचा क्षय झपाट्याने वाढतो. यामुळे पाने पिवळी पडतात. अशी पाने लवकर गळून पडतात. अशा विकृतीस क्लोरोसीस असे संबोधतात.

  • काही बागांमध्ये झाडाचा एकच भाग किंवा एकच फांदी पिवळी पडल्याचे दिसून आले. झाडाचा तजेलपणा नाहीसा झालेला दिसला. अशा झाडांवर फायटोफ्थोरा बुरशीचा प्रादुर्भाव दिसून आला.
  • काही बागांमध्ये कोवळ्या तसेच पक्व हिरव्या फांद्या शेंड्यापासून खाली वाळल्याचे दिसते. फांदीचा शेंड्यापासून खाली वाळत आलेला भाग पांढूरका झालेला व त्यावर सूक्ष्म काळ्या गोल पुटकुळ्या दिसून आल्या. या विकृतीला शेंडेमर म्हणून ओळखले जाते.
  • ज्या बागेत संत्र्याला मृग बहरासाठी ताण देण्यात आला, परंतु योग्य पाऊस किंवा वातावरणाअभावी मृग बहर फुटला नाही. अशा बागेत पुनश्च आंबिया बहराकरिता ताण दिला असल्यास ताण व अन्नद्रव्यांचे योग्य नियोजन नसल्याने पाने पिवळी पडण्यासोबतच पानगळ वाढण्याची शक्यता असते.
  • जुन्या संत्रा बागेमध्ये त्याच जागेवर व खड्ड्यामध्ये मातीचे निर्जंतुकीकरण न करता नवी लागवड केलेली असल्यास रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. त्याचप्रमाणे रोगमुक्त कलम वापरण्याऐवजी वाफ्यावरील कलम वापरले असल्यास रोगाची तीव्रता वाढू शकते.
  • चुनखडीचे प्रमाण १० टक्क्यांपेक्षा अधिक असलेल्या जमिनीत संत्रा लागवड केल्यास स्फुरद, पोटॅश, कॅल्शिअम, झिंक व मॅग्नेशिअम या अन्नद्रव्यांची उपलब्धता कमी होते. परिणामी वरील लक्षणाची तीव्रता वाढते.
  • उपाययोजना ः

  • पिवळ्या पडत असलेल्या संत्रा बागेमध्ये अतिरिक्त ताण देणे टाळावे.
  • शिफारशीप्रमाणे अन्नद्रव्याचे व्यवस्थापन करावे.
  • झाडाचे वय १० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक असलेल्या झाडांसाठी, १ किलो अमोनियम सल्फेट, १ किलो सिंगल सुपर फॉस्फेट व ५०० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश किंवा १०:२६:२६ मिश्रखत २ किलो प्रतिझाड याप्रमाणे झाडाच्या परिघात द्यावी. झाडांचे वय १० पेक्षा कमी असल्यास खताची मात्रा अर्धी द्यावी.
  • सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता भरून काढण्यासाठी (मृग व आंबिया दोनही बहरांकरिता) जमिनिद्वारे ः झिंक सल्फेट २०० ग्रॅम, लोह सल्फेट २०० ग्रॅम, बोराॅन १०० ग्रॅम प्रतिझाड फवारणीद्वारे ः आवश्यकतेनुसार झिंक सल्फेट, लोह सल्फेट अर्धा टक्के, तर बोरान ०.१ टक्के किंवा चिलेटेट सूक्ष्म अन्नद्रव्ये २ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. मृग बहर व्यवस्थापन ः

  • संत्रा फळझाडावर मृग बहरातील फळांची संख्या वाजवीपेक्षा जास्त असल्यास दर्जेदार उत्पादन मिळत नाही. किंचित मोठ्या आकाराची फळे हाताने तोडून काढावीत.
  • मृग बहराच्या फळांचा आकार वाढविण्याकरिता, फवारणी प्रति १०० लिटर पाणी १ ग्रॅम जिबरेलिक अॅसिड* अधिक मोनो-पोटॅशियम फॉस्फेट १.५ किलो किंवा पोटॅशियम नायट्रेट १.५ किलो किंवा डीएपी १.५ किलो ः १५ दिवसाच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात.
  • मृग बहराची फळे असलेल्या झाडांना ठिबक सिंचन पद्धतीने ओलीत करावे. याकरिता आठ वर्षे वय असलेल्या झाडांना ८२ लिटर, तर दहा वर्षे वय असलेल्या झाडांना ९२ लिटर पाणी प्रतिदिन प्रतिझाड द्यावे.
  • आंबिया बहर व्यवस्थापन ः

  • आंबिया बहराची फूट व्यवस्थित नसल्यास किंवा झाडाची ताकद कमी पडल्याने कळी अडकलेली असल्यास, फवारणी प्रति १०० लिटर पाणी १ ग्रॅम जिबरेलिक अॅसिड* अधिक १ किलो युरिया.
  • अन्नद्रव्यांच्या त्वरित उपलब्धतेसाठी, फवारणी जिबरेलिक अॅसिड १५ पीपीएम (१.५ ग्रॅम) अधिक डीएपी किंवा १३:०:४५ किंवा ०:५२:३४ या पैकी एक खत १ किलो प्रति १०० लिटर पाणी. या प्रमाणात आलटून पालटून वापर करावा.
  • चिलेटेड स्वरूपातील सूक्ष्म अन्नद्रव्याचे मिश्रण २ ग्रॅम प्रतिलिटर पाणी.
  • रोग व्यवस्थापन ः डिंक्या : या रोगाचा प्रादुर्भाव कलम केलेल्या भागाच्या आसपास होतो. रोगग्रस्त सालीतून डिंक ओघळताना दिसतो. नियंत्रणासाठी,

  • आळ्यातून पाणी देण्याची पद्धत बंद करावी. त्याऐवजी झाडाच्या बुंध्याभोवती दोन वर्तुळाकार आळे तयार करून, बुंध्याला पाणी द्यावे.
  • बागेतील अतिरीक्त पाण्याचा निचरा होण्यासाठी (विशेषतः पावसाळ्यात) संत्रा झाडाच्या दोन ओळींत चर खोदावेत.
  • ओलिताकरिता ठिबक सिंचन वापरावे.
  •  उंच डोळा बांधणीच्या कलमांचा वापर करावा.
  • रोगग्रस्त झाडाची साल धारदार व निर्जंतुक केलेल्या पटाशी किवा चाकूने काढून टाकावी. रोगग्रस्त भाग १ टक्के पोटॅशिअम परमॅग्नेट द्रावणाने (१०० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी) निर्जंतुक करावा. त्यावर बोर्डो मलम (१ः१ः१०) लावावा.
  • झाडावर तसेच रोगग्रस्त भागावर फवारणी प्रतिलिटर पाणी
  • मेटॅलक्झिल (एम) अधिक मॅन्कोझेब (संयुक्त बुरशीनाशक) २ ग्रॅम किंवा फोसेटील ए.एल. २ ग्रॅम.
  • डिंक्या प्रादुर्भाव टाळण्यासाठी, संत्रा झाडाच्या बुंध्यावर बोर्डो मलम (१ः१ः१०) पावसाळ्यापूर्वी (मे) व पावसाळ्यानंतर (आॅक्टोबर) मध्ये लावावे.
  • रोग दिसताच क्षणी ट्रायकोडर्मा हार्जियानम अधिक ट्रायकोडर्मा व्हीरिडी अधिक सुडोमोनास फ्ल्यूरोसन्स प्रत्येकी १०० ग्रॅम अधिक १ किलो शेणखत मिसळून झाडाच्या परिघात जमिनीतून द्यावे. संपूर्ण झाडावर फोसेटील ए.एल. २ ग्रॅम प्रतिलिटरप्रमाणे फवारणी करावी.
  • शेंडेमर ः या रोगाचा प्रसार हवेद्वारे होतो. व्यवस्थापन ः झाडावरील रोगग्रस्त व वाळलेल्या फांद्या (सल) पावसाळ्यापूर्वी काढून जाळाव्यात. त्यानंतर फवारणी प्रतिलिटर पाणी कार्बेन्डाझिम १ ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सिक्लोराइड ३ ग्रॅम किंवा बोर्डो मिश्रण ०.६ टक्के. पुढील दोन फवारण्या १५ ते २० दिवसांच्या अंतराने कराव्यात. कोळशी ः काळ्या, पांढऱ्या माशीच्या प्रादुर्भावामुळे पानावर साचलेल्या चिकट द्रवावर काळसर बुरशीची वाढ होते. यालाच कोळशी असे म्हणतात. रोगाचा प्रादुर्भाव उष्ण व दमट हवामानात अधिक प्रमाणात दिसून येतो. प्रादुर्भाव जास्त असल्यास पाने, फांद्या, फळे व संपूर्ण झाड काळे पडते. फवारणी प्रतिलिटर पाणी कार्बेन्डाझिम १ ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सिक्लोराइड ३ ग्रॅम. कीड व्यवस्थापन ः साल खाणारी अळी : झाडाच्या खोडावरील अळीची जाळी काढून छिद्र मोकळे करावे. त्यानंतर त्यात पेट्रोल किंवा केरोसिन पिचकारीच्या साह्याने छिद्रामध्ये टाकून ते ओल्या मातीने बंद करावे. सीट्रस सिला : नवीन नवतीस सुरवात झाल्यानंतर सिट्रस सिला या किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो. त्याचा पानांवर व फळधारणेवर विपरीत परिणाम होतो. दुर्लक्ष केल्यास फुलगळ, फळगळ संभवते. त्याचप्रमाणे या कीडीमुळे ग्रिनिंग रोगाचाही प्रसार होतो. नियंत्रणासाठी, संत्र्याला नवती आल्यानंतर, नीम तेल १० मिलि प्रतिलिटर पाणी याप्रमाणे १५ दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात. नीम तेल पाण्यात मिसळत नसल्यामुळे १ ग्रॅम डिटर्जंट पावडर प्रतिलिटर द्रावणात मिसळावे किंवा थायामिथोक्झाम (२५ डब्ल्यूजी) १ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. काळी / पांढरी माशी :

  • मालाडा बोनीनेसंसिस या परभक्षक मित्रकीटकाची ४-६ अंडी प्रतिफांदी दोन वेळा सोडावीत.
  • पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी १५ दिवसांच्या अंतराने दोन वेळा करावी. किंवा निंबोळी तेल १० मिली किंवा करंज तेल १० मिली प्रतिलिटर पाण्यात, तर दुसरी फवारणी फक्त निंबोळी तेल १० मिलि प्रति लिटर पाणी याप्रमाणे करावी.
  • मावा : नवीन पालवी फुटण्याच्या किंवा फुलोरा येण्याच्या वेळी, फवारणी प्रतिलिटर पाणी डायमेथोएट (३० ईसी) १ मिलि किंवा क्लोरपायरीफॉस (२० ईसी) १ मिलि. कोळी : या किडीचा उपद्रव पाऊस उघडीप व ढगाळ वातावरण असताना अधिक जाणवतो. डायकोफॉल १.५ मिलि किंवा इथिऑन १ मिलि १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सिंचन व्यवस्थापन ः आंबिया बहरासाठी ताणावर असलेल्या बागेला उखरणी करावी व ओलीत द्यावे. ठिबक सिंचन संच असल्यास १ ते ४, ५ ते ७ व ८ वर्षांपर्यंत झाडांना अनुक्रमे ७ ते ३०, ४४ ते ७२ व ८२ ते १०२ लिटर पाणी प्रतिदिवस जमिनीच्या पोतानुसार पाणी द्यावे. ठिबक संच नसल्यास दुहेरी आळे पद्धतीने १० दिवसांच्या अंतराने ओलित करावे. आच्छादनांचा वापर करावा. संपर्क ः डॉ. दिनेश पैठणकर, ९८८१०२१२२२ (अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प (फळे), डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com