सध्या हरभरा पीक फुलोरा किंवा घाटे लागण्याच्या अवस्थेत अाहे. नाशिक, नगर, पुणे, सोलापूर, नंदूरबार या जिल्ह्यांत हरभरा पिकात घाटेअळी (हेलिकोव्हर्पा आर्मिजेरा) आर्थिक नुकसान संकेत पातळीच्या वर दिसून येत आहेत.
घाटे अळीमुळे हरभरा पिकाचे ३० ते ४० टक्क्यांपर्यंत नुकसान होते. बहुभक्षी कीड व कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे आलेली प्रतिकारक्षमता यामुळे या किडीला राष्ट्रीय किडीचा दर्जा प्राप्त झाला आहे.
किडीचा जीवनक्रम
- अंडी, अळी, कोष, पतंग या चार अवस्थांमधून पूर्ण होतो.
- पतंग फिक्कट तपकिरी रंगाचा. पुढील पंखांवर काळे ठिपके. मादी पतंग ४ ते ६ दिवसांच्या आयुष्यात कोवळ्या पानांवर आणि फुलावर १५० ते ३०० अंडी घालते.
- दोन ते चार दिवसांत अंडी उबवल्यानंतर अळी बाहेर येते. अळीचा रंग यजमान पिकानुसार बदलतो. अळी रंगाने पोपटी, हिरवी, करडी किंवा राखाडी. अळी अवस्था १५ ते २० दिवसांत पूर्ण होऊन अळी जमिनीत कोषावस्थेत जाते. कोषावस्था ८ ते १५ दिवसांची.
- अशाप्रकारे जीवनक्रम ३५ ते ४० दिवसांत पूर्ण होतो.
नुकसानीचा प्रकार ः
- हरभरा वाढीच्या सुरवातीच्या काळात अळ्या पानाच्या वरच्या बाजूस राहून पाने खरवडून खातात. त्यामुळे पानांवर पांढरे ठिपके आढळून येतात.
- सुरवातीच्या काळात झालेले नुकसान चटकन लक्षात येत नाही. कळ्या व फुले लागल्यावर अळ्या त्यावर उपजीविका करतात.
- घाटे लागल्यानंतर अळी शरीराचा डोक्याकडील अर्धा भाग घाट्यात घुसवून आतील दाणे खाते. त्यामुळे घाट्यांवर छिद्रे दिसून येतात.
- घाटे भरण्याच्या काळात प्रादुर्भाव झाल्यास उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येते.
एकात्मिक नियंत्रण
- किडीच्या सर्वेक्षणासाठी हेक्टरी पाच कामगंध सापळे बांबूच्या साहाय्याने पिकापेक्षा अधिक उंचीवर लावावेत.
- पेरणी करताना ज्वारीचे दाणे मिसळले नसल्यास शेतात पिकाच्या उंचीपेक्षा अधिक उंच टी आकाराचे हेक्टरी ५० पक्षी थांबे उभारावेत.
- पीक फुलोऱ्यात किंवा घाटे भरण्याच्या अवस्थेत असताना प्रादुर्भाव वाढल्यास मोठ्या अळ्या गोळा करून नष्ट कराव्यात.
- पीक फुलोऱ्यात आल्यानंतर पाच टक्के निंबोळी अर्क किंवा अझाडिरॅक्टीन (३०० पीपीएम) पाच मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
- अळी दिसू लागताच एचएनपीव्ही ५०० मिली प्रति ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
- जैविक कीडनाशक बिव्हेरिया बॅसियाना सहा ग्रॅम प्रति लिटर पाणी याचाही वापर करता येईल.
- प्रादुर्भाव आर्थिक नुकसान संकेत पातळीपेक्षा अधिक दिसत असल्यास
- शिफारसीत रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करावी.
आर्थिक नुकसान संकेत पातळी ः
अळी प्रति मीटर ओळीत किंवा कामगंध सापळ्यात ८ ते १० पतंग सलग दोन ते तीन दिवस आढळल्यास किंवा पाच टक्के घाट्यांचे नुकसान ः
रासायनिक उपाय
(प्रति १० लिटर पाणी) प्रमाण- नॅपसॅक पंपासाठी
क्विनॉलफॉस (२५ ईसी) २० मिलि
लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ( ५ईसी) १० मिलि
इमामेक्टिन बेन्झोएट (५ एसजी)-४ ग्रॅम
क्लोरॲंट्रानिलीप्रोल (१८.५ एससी) २.५ मिलि
संपर्क ः अंकुश चोरमुले, 8275391731
(कीटकशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)
|