विहीर पुनर्भरणाचे बनविले अभिनव मॉडेल

मी केलेले प्रयोग माझ्या भागातील जमिनीचा प्रकार, भौगोलीक रचना, पर्जन्यमान आदी बाबी लक्षात घेऊन केलेले आहेत. तथापी अन्य भागांसाठी तेथील परिस्थितीनुसार प्रयोगांत वा तांत्रिक रचनेत बदलही होऊ शकतात. त्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मी सदैव तयार आहे. - प्रकाश वसमते
यंदाच्या हंगामात विहिरीस वाढलेली पाणीपातळी
यंदाच्या हंगामात विहिरीस वाढलेली पाणीपातळी

शेततळ्याच्या माध्यमातून विहीर पुनर्भरण करण्याचा अभिनव प्रयोग साकारला आहे लोहगाव (जि. नांदेड) येथील सेवानिवृत्त अभियंता प्रकाश वसमते यांनी. आपले कौशल्य, संशोधकवृत्ती, सिंचन क्षेत्रातील अनुभव व बुद्धिमत्ता यांच्या जोरावर त्यांनी शेततळे, विहिरीची कार्यपद्धती यांची सुबक रचना आखली आहे. या प्रयोगामुळे त्यांच्या विहिरीच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली. अवर्षणात याच पाण्याचा उपयोग त्यांच्या २० एकरांतील पिकांना संरक्षित सिंचन देण्यासाठी झाला आहे. नांदेड जिल्ह्यातील लोहगाव (ता. बिलोली) येथे प्रकाश वसमते यांची वडिलोपार्जित सुमारे २० एकर शेती आहे. जलसिंचन विभागातून अधीक्षक अभियंता म्हणून ते जून २०१४ मध्ये निवृत्त झाले. आता ते पूर्णवेळ शेती करतात. या शेतीत प्रत्येकी दीड एकर आंबा, चिकू, सीताफळ तसेच सागवान व काही क्षेत्रात पेरू, मोसंबी अशी एकूण बारमाही पिके आहेत. काही क्षेत्रात ते हळदीसारखी पिकेही घेतात.ही शेती त्यांनी वाट्याने दिली असली तरी त्यावरील ‘सुपरव्हीजन’ त्यांचीच असते. विहिरीचे कौशल्यपूर्ण बांधकाम सुमारे पंधरा वर्षांपूर्वी वसमते यांनी २२ मीटर खोलीची विहीर खोदली.जमिनीपासून वरून सात मीटर खोलीपर्यंत दगडी चिऱ्याचे बांधकाम केले. त्याखाली मांजऱ्या खडक १५ मीटरपर्यंत फोडला. दगडी बांधकाम असलेल्या जागेचा घेर १२ मीटर तर पक्का मुरूम असलेल्या भागाचा घेर १० मीटर आहे. जमीन काळी असल्यामुळे विहिरीचे बांधकाम करताना विशेष काळजी घेतली. अभियंता असल्याने वसमते यांना जमिनीच्या गुणधर्मांचे पुरेपूर ज्ञान आहे. सात मीटर खोलीपर्यंत चिऱ्याच्या बांधकामानंतरच्या पूर्ण परिघात एक मीटर दगड गोटे भरले. यामागील कारण सांगताना ते म्हणाले की पावसाळ्यात काळी माती फुगते. तिच्या दाबामुळे बांधकाम ढासळण्याची शक्‍यता असते. असा प्रकार होऊ नये म्हणून हे तंत्र वापरले. याचा फायदा पावसाळ्यात जल पुनर्भरणासाठीही होतो. त्यामुळे अन्य विहिरींपेक्षा या विहिरीला जास्त पाणी असते.

प्रयोगांची वैशिष्ट्ये

  1. विहीरीच्या वरच्या भागातील दोन एकर शेती चिबड असल्याने विहिरी शेजारी २०१४ मध्ये २० मीटर लांबी, १० मीटर रुंदी व एक मीटर खोलीचे शेततळे स्वखर्चाने खोदले. शेततळ्यातली काळी माती शेतात पसरुन टाकली. त्याचे दोन फायदे झाले. चिबड जमिनीतील पाणी शेततळ्यात उतरत असल्याने जमिनीचा चिबडपणा कमी झाला. शेततळ्यातील पाणी विहिरीत उतरू लागले. त्या जमिनीत सखलपणा होता. काळ्या मातीमुळे उंचवटा तयार झाला.
  2. छोट्या शेततळ्यापासून होत असलेला फायदा लक्षात आल्यानंतर मोठे शेततळे घेण्याचा निर्णय घेतला. मागेल त्याला शेततळे या कृषी विभागाच्या नव्या योजनेतून २०१७ मध्ये २५ मीटर लांबी, २० मीटर रुंदी व पाच मीटर खोलीचे शेततळे घेतले. त्यासाठी ८० हजार रुपये खर्च आला. त्यास ४५ हजारांचे अनुदान मिळाले. शासनाच्या नियमानुसार केवळ तीन मीटर खोलीपर्यंत शेततळे खोदण्यासाठी अनुदान दिले जात असताना वसमते यांनी शेततळ्याची खोली दोन मीटरपर्यंत वाढवली हे विशेष. या शेततळ्यातून निघालेली ५०० ब्रास काळी माती शेतात पसरुन टाकली. उर्वरीत माती चारही बाजूने तळ्याचे बांध म्हणून वापरली. विहीर व शेततळे यात तीन मीटर अंतर सोडले.
  3. शेततळ्याचे काम अत्यंत आखीव रेखीव झाले आहे. शेततळ्याच्या वरच्या व तळाच्या बाजूला दगडी पिचिंग केले आहे. माती ढासळू नये म्हणून ही तजवीज आहे. अशा प्रकारचे पिचिंग अन्य शेतकरी खर्च वाढत असल्यामुळे करीत नाहीत. इनलेटमधून शेततळ्यात पाणी घेतानाही विशेष काळजी घेतली आहे.

सिल्ट ट्रॅप इनलेटच्या मुखासजवळ तीन मीटर रुंदी व लांबी व दोन मीटर खोलीचा सिल्ट ट्रॅप तयार केला आहे. यामुळे शेततळ्यात पाण्याबरोबर मातीचा गाळ जाण्यापासून अटकाव होतो. यात एक मीटर खोलीपर्यंत दगडवाळू भरून एक मीटरची जागा पाणी साठवण्यासाठी ठेवली आहे. शेताच्या वरील भागातून पाणी प्रथम या ट्रॅपमध्ये जमा होते. या ठिकाणी पाण्याची गती कमी झाल्याने पाण्यातील बराचसा गाळ या ट्रॅपमध्ये जमा होतो. गाळविरहीत पाणी मग इनलेटद्वारे शेततळ्यात पडते. काळ्या जमिनीत असा ट्रॅप अत्यंत गरजेचा असल्याचे वसमते सांगतात. विशेष बाब

  • ट्रॅप व शेततळे यांच्यामध्ये दोन फूट व्यासाचा सिमेंट पाइप
  • ट्रॅप दोन मीटर खोलीचा असेल तर पाइप वरून अर्धा मीटर खाली टाकला आहे.
  • इनलेटमध्ये जुना पत्रा बसवला. त्यामुळे ‘इनलेट’मधून आलेले पाणी पत्र्याद्वारे शेततळ्यात पडते. शेततळ्यात माती न जाण्याचे हे एक उत्कृष्ट तंत्र आहे.
  • ‘बोल्डर्स’चा वापर भूपृष्ठाखाली पाच मीटर खोल शेततळे खोदले आहे. भूपृष्ठावर एक मीटरचा बांध चारही बाजूंनी तयार केला आहे. विहीर व शेततळ्याच्या मधल्या जागेत दोन मीटर खोलीपर्यंत ‘बोल्डर्स’ भरले आहेत. या रचनेमुळे शेततळ्यात तीन मीटरपर्यंत कायम पाणी असते. त्यापेक्षा ते वाढते तेव्हा बोल्डरमधून विहिरीत उतरते. विहीर जमिनीलगत पाण्याने भरते तेव्हा शेततळ्यात चार मीटरपर्यंत साठा असतो. यावेळी ‘इनलेट’मधून पाणी येत असले तरी ते शेततळ्याच्या भिंती फोडून बाहेर जात नाही. ‘इनलेट’ आहे, मात्र ‘आउटलेट’ नाही एरवी इनलेटद्वारे आलेल्या पाण्याने शेततळे भरल्यानंतर जास्तीचे पाणी ‘आउटलेट’द्वारे बाहेर काढले जाते. मात्र आश्‍चर्याची बाब म्हणजे वसमते यांच्या शेततळ्यास आउटलेटच नाही. परंतु, शेततळे भरल्यानंतर पाणी बाहेर पडत नाही हे विशेष. जमा झालेले पाणी भूगर्भात व विहिरीत जाते. विहिरीच्या खालच्या बाजूच्या ६० मीटर अंतरावरील अोढ्यात उतरते. अर्थात येथील भौगोलिक परिस्थिती त्यास कारणीभूत आहे. तो विचार करूनच हे तंत्र वापरले आहे. प्रयोगांची फलश्रुती

  • पूर्वी घेतलेले छोटे शेततळे व विहीर पाण्याने पूर्ण भरल्यानंतर पाणी ओढ्यात उतरत असल्याचे वसमते यांना माहीत होते. मोठे शेततळे केल्यानंतर त्याची चाचणी घेण्याचे ठरवले. उन्हाळ्यात दुसऱ्या विहिरीचे पाणी शेततळ्यात सोडले. ते भरल्यानंतर ‘बोल्डर’ मधून विहिरीत पाणी उतरु लागले. जेव्हा विहीर व शेततळे भूपृष्ठापर्यंत पाण्याने भरले तेव्हा जास्तीचे पाणी ओढ्यात उतरू लागले. या कारणामुळेच शेततळ्यास ‘आउटलेट’ ठेवले नाही.
  • दुसरी बाब म्हणजे शेततळ्यात केवळ १० एकर क्षेत्राचेच पाणी येते.
  • संरक्षित सिंचनाची हमी साग व फळबागेव्यतिरिक्त सोयाबीन, कापूस, मूग व उडीद ही हंगामी पिके आहेत. नांदेड जिल्ह्यात यंदा जुलै, ऑगस्टमध्ये अजिबात पाऊस झाला नाही. त्यामुळे पिके ऊन धरू लागली होती. जूनमध्ये झालेल्या पावसामुळे शेततळ्यातून बरेच पाणी विहीरीत उतरले. त्यामुळे जुलैमध्ये सर्व क्षेत्राला संरक्षित सिंचन मिळाले. कापूस सहा एकर तर सोयाबीन पाच एकर आहे. या पिकांना चांगला फायदा होऊन उत्पादन समाधानकारक होणार असल्याचे वसमते सांगतात. आता शेततळ्यात मत्स्यपालनही सुरू केले जाणार आहे.

    संपर्क - प्रकाश वसमते - ९८७५४३६३२३ (लेखक नांदेड येथे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com