भुरीसह थंडीपासून वाचवा द्राक्षबागा

द्राक्ष सल्ला
द्राक्ष सल्ला

सर्व द्राक्ष विभागांमध्ये सध्या थंडीची लाट आहे. ही लाट येत्या शनिवार-रविवारपर्यंत (ता. ६, ७) अशीच राहील. शनिवार-रविवारनंतर सर्वच विभागांमध्ये कमी-जास्त प्रमाणामध्ये वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. याच काळामध्ये दुपारचे तापमान सर्व विभागामध्ये ३० अंश सेल्सिअसच्या पुढे जाईल. सांगली, सोलापूर भागांमध्ये ३४-३५ अंश, तर नाशिक-पुणे भागामध्ये ३२-३३ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. ढगाळ वातावणामुळे रात्रीचे तापमान बऱ्यापैकी वाढेल. ते नाशिक भागामध्ये १७-१८ अंशांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. सांगली, सोलापूरमध्ये तापमान २० ते २१ पर्यंत जाण्याची शक्यता आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये भुरीच्या नियंत्रणाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. बहुतांशी बागा या सर्वसाधारणपणे छाटणीनंतरच्या ७० दिवसांपुढे आहेत. आता ट्रायअझोल किंवा एचडीएचआय गटातील कोणतीही बुरशीनाशके भुरीच्या नियंत्रणासाठी वापरल्यास त्यांचे रेसिड्यू एमआरएलपेक्षा कमी झाले तरीही निदर्शनास येणार, हे नक्की. या दृष्टीकोनातून विचार केल्यास एक ते दोन वेगवेगळ्या बुरशीनाशकांचा वापर जास्त वेळा करावा. त्यामुळे एक ते दोन रसायनापेक्षा जास्त उर्वरित अंश अहवालात दिसणार नाहीत. त्यासाठी शक्यतो सल्फर व त्यानंतर जैविक नियंत्रक घटकांची फवारणी भुरीच्या नियंत्रणासाठी उपयुक्त ठरेल. एअर ब्लास्ट नोझल किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक तंत्रज्ञान असणाऱ्या फवारणी यंत्रामध्ये सर्वसाधारपणे एकरी १०० लिटर पाणी जाईल, अशी व्यवस्था करावी व त्यानंतर सल्फर (८० डब्ल्यूजी) एकरी ६०० ते ८०० ग्रॅम फवारल्यास भुरीचे नियंत्रण चांगले मिळते. मण्यावर डागही दिसत नसल्याचा बऱ्याच शेतकऱ्यांचा अनुभव आहेत. डाग न येता सल्फर फवारणीचे तंत्रज्ञान शक्य तेवढे आत्मसात करावे.

  • फक्त सल्फर वापरलेल्या बागांमध्ये जैविक नियंत्रणाचा वापर केल्यास भुरीच्या नियंत्रणाला मदत होईल. दोन सल्फरच्या फवारणीमध्ये एक जैविक नियंत्रण घटकांची (अॅम्पिलोमायसीस किंवा ट्रायकोडर्मा किंवा बॅसिलस सबटिलिस) फवारणी घेतल्यास बागेमध्ये भुरी वाढणार नाही.
  • मागील सल्ल्यामध्ये सांगितल्याप्रमाणे ७५ दिवसांपर्यंत कॅल्शिअम पूर्तता करण्यासाठीच्या फवारण्या भुरीच्या नियंत्रणासाठीही मदत करतात.
  • मोनो पोटॅशिअम फॉस्फेट किंवा एसओपी मण्यांवर वापरल्यास भुरीचे नियंत्रण चांगले मिळते.
  • थंडीचे परिणाम ः

  • मण्यांमध्ये पाणी भरण्यास सुरवात झालेल्या बागांमध्ये थंडीच्या दिवसांमध्ये (प्रामुख्याने सकाळ व दुपारच्या तापमानामध्ये २० अंशांपेक्षा अधिक फरक असताना) पिंक बेरी वाढण्याची शक्यता असते. या कारणासाठी मण्यात पाणी भरण्यास सुरवात होण्याच्या काळात घडावर पेपर लावतात. हे पेपर लावण्याआधी भुरीच्या नियंत्रणासाठी चांगली फवारणी करून घ्यावी. पेपर चढवल्यानंतर मण्यामध्ये भुरी वाढणार नाही. पेपर चढवण्याआधी मण्यावर बॅसिलस सबटिलिस या जिवाणूजन्य घटकांची फवारणी भुरीच्या नियंत्रणासाठी उपयुक्त ठरू शकेल.
  • ज्या ठिकाणी अजूनही जास्त थंडी आहे, अशा बागांच्या बाहेर रात्रीच्या वेळी शेकोटी लावाव्यात. थंडीने खराब होणारे घड वाचवता येतील. त्याचप्रमाणे सिलिसिलिक अॅसिड फवारणीसाठी वापरल्यास मण्यांची फार कमी तापमानामध्ये किंवा दुपारच्या जास्त तापमानासाठी सहनशीलता वाढते.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com