कोरडवाहूसाठी जवसाचे ‘लातूर -९३’ वाण विकसित

जवस लातूर 93 वाण विकसित
जवस लातूर 93 वाण विकसित

कमी कालावधीचे, कमी खर्चामध्ये उत्पादन शक्य असलेले जवस हे पीक आहे. या पिकाच्या कोरडवाहू क्षेत्रातही उत्तम उत्पादन देणाऱ्या ‘लातूर जवस-९३’ हे वाण लातूर येथील गळितधान्य संशोधन केंद्रामध्ये विकसित करण्यात आले आहे. परभणी येथे झालेल्या ॲग्रेस्कोमध्ये या वाणाची महाराष्ट्रातील कोरडवाहू क्षेत्रात लागवडीसाठी शिफारस करण्यात आली आहे. राज्यातील बदलते वातावरण आणि रब्बी हंगामातील पावसाची अनियमितता यामुळे कोरडवाहू क्षेत्र वाढत आहे. अशा स्थितीमध्ये कमी कालावधी व कमी लागवड खर्च, कीड व रोगाचा कमी प्रादुर्भाव यामुळे जवस हे पीक रब्बी हंगामातील (विशेषतः कोरडवाहू क्षेत्रातील) महत्त्वाचे तेलबिया पीक म्हणून राज्यात शेतकऱ्यासाठी वरदान ठरू शकते. काही ठिकाणी हे पीक बागायती पिकांमध्ये आंतरपीक म्हणूनही घेतले जाते. वास्तविक जवस पिकाची उत्पादन क्षमता हेक्टरी २० क्विंटल व धाग्याचे उत्पादन हेक्टरी १२ क्विंटल एवढी आहे. मात्र, आपल्याकडे विशेषतः कोरडवाहू क्षेत्रामध्ये जवस पिकाची उत्पादनक्षमता व प्रत्यक्ष उत्पादन यात प्रचंड तफावत दिसून येते. त्यामुळे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी अंतर्गत गळीतधान्ये संशोधन केंद्र, लातूर येथे कोरडवाहू क्षेत्रासाठी उपयुक्त असे ‘लातूर जवस-९३’ हे नवीन वाण विकसित केले आहे. मे २०१७ मध्ये परभणी येथे झालेल्या महाराष्ट्र कृषी विद्यापीठे संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समिती बैठकीत ‘महाराष्ट्रात कोरडवाहू क्षेत्रात लागवडीसाठी जवसाचा नवीन वाण’ म्हणून शिफारस करण्यात आली आहे. वाणाची विशिष्ट्ये :

  • अखिल भारतीय समन्वयीत प्रयोग व राज्यस्तरिय प्रयोगात ‘लातूर जवस-९३’ या वाणाने कोरडवाहू क्षेत्रात ८००-१००० किलो/हेक्टर उत्पादन दिले, तर बागायती क्षेत्रात १४००-१६०० किलो/हेक्टर उत्पादन दिले.
  • अन्य वाणाच्या तुलनेत हा वाण १० ते १५ दिवस लवकर (म्हणजे ९५-१०० दिवसांत) परिपक्व होत असल्यामुळे कोरडवाहू लागवडीसाठी योग्य आहे.
  • यात तेलाचे प्रमाण (३९ %) असून, १००० दाण्याचे वजन ७.५० ग्रॅम आहे. बियाणे मध्यम टपोरे आहेत.
  • ‘लातूर-९३’ हा वाण कमी उंचीचा (३०-३५ सेमी) असल्याने अवकाळी पाऊस, गारपीठ व अन्य नैसर्गिक आपत्तीमध्ये जमिनीवर लोळत नाही. कमी उंचीमुळे आंतरपीक म्हणूनही करडई, हरभरा, उस, गहू या मुख्य पिकात लागवड शक्य आहे. त्याची मुख्य पिकाशी स्पर्धा होत नाही. आंतरपिकापासून ५-७ क्विंटलपर्यंत उत्पादन प्रति हेक्टर मिळू शकते.
  • वेळेवर पेरणी केल्यास (१५ ते ३० ऑक्टोबर) पीक किडी, रोग प्रादुर्भाव व पाण्याच्या ताणापासून वाचू शकते. परिणामी शेतकऱ्यांच्या लागवड खर्चात बचत होऊन, उत्पादनात वाढ होते.
  • राज्यातील कोरडवाहू क्षेत्रामध्ये लागवडीसाठी अत्यंत महत्त्वाचा असे हे पीक व वाण ठरणार आहे.
  • संपर्क : डॉ. अमोल मिसाळ, ७५८८६१२९४३ (गळीत धान्य संशोधन केंद्र, लातूर)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com