सोलापूर ः पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीमुळे गेल्या दहा दिवसांत झालेल्या गर्दीचा
तेलबिया पिके
गादीवाफ्यावर भुईमूग लागवड फायदेशीर
जून महिन्याचा पहिल्या आठवडा ते शेवटचा आठवड्याच्या कालावधीत भुईमुगाची लागवड करावी. लागवड गादीवाफ्यावर करावी. उपट्या जातीची लागवड करताना दोन ओळीत ३० सें.मी. आणि निमपसऱ्या जातीची लागवड दोन ओळीत ४५ सें.मी. अंतर ठेवावे. दोन रोपातील अंतर १० ते १५ सें.मी. ठेवावे.
जून महिन्याचा पहिल्या आठवडा ते शेवटचा आठवड्याच्या कालावधीत भुईमुगाची लागवड करावी. लागवड गादीवाफ्यावर करावी. उपट्या जातीची लागवड करताना दोन ओळीत ३० सें.मी. आणि निमपसऱ्या जातीची लागवड दोन ओळीत ४५ सें.मी. अंतर ठेवावे. दोन रोपातील अंतर १० ते १५ सें.मी. ठेवावे.
भुईमुगासाठी मध्यम, पाण्याचा चांगला निचरा होणारी वाळू व सेंद्रिय पदार्थ मिश्रित जमीन निवडावी. या जमिनीत मुळांची वाढ होऊन आऱ्या सुलभ रितीने जाण्यास तसेच शेंगा चांगल्या पोसण्यासाठी उपयुक्त ठरते. भारी चिकण मातीच्या जमिनीत लागवड करू नये.कारण पावसाचा ताण पडल्यास ही जमीन टणक होते. आऱ्या जमिनीत सुलभरीत्या वाढू शकत नाहीत. परिणामतः शेंगा चांगल्या पोसत नाहीत. भुईमुगाची मुळे, उपमुळे व मुळांवरील गाठीची योग्य वाढ होण्यासाठी तसेच शेंगा चांगल्या पोसण्यासाठी जमीन २० सें.मी.पर्यंत नांगरून २ ते ३ कुळवाच्या पाळ्या देऊन भुसभुशीत करावी. जमिनीचा पोत योग्य प्रमाणात राखण्यासाठी शेवटच्या कुळवणी अगोदर चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीत समप्रमाणात पसरावे.
बियाणे
उपट्या आणि पसऱ्या जाती ः हेक्टरी १०० ते १२५ किलो.
निम पसऱ्या जाती ः हेक्टरी ९० ते ११० किलो
बीजप्रक्रिया
रासायनिक ः प्रति किलो बियाणे
२.५ ग्रॅम कार्बेन्डाझिम किंवा
५ ग्रॅम थायरम किंवा
ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम
जिवाणू संवर्धक
रायझोबियम जिवाणू संवर्धकाचा वापर केल्यामुळे मुळांवरील हवेतील नत्र स्थिर करणाऱ्या गाठीचे प्रमाण वाढविण्यास मदत होते. यामुळे उत्पादनात १० ते १५ टक्के वाढ होते. पेरणीपूर्वी प्रति १० किलो बियाणास २५० ग्रॅम या प्रमाणात प्रक्रिया
करावी.
स्फूरद विरघळणारे जिवाणू (पीएसबी)
आम्लधर्मी जमिनीत खतामधून दिलेला फॉस्फरस हा जमिनीत लोहाबरोबर घट्ट होतो. पीएसबी वापर केल्याने जमिनीतील फॉस्फरस पिकाला उपलब्ध होतो. १० किलो बियाण्यास २५० ग्रॅम पीएसबीची प्रक्रिया करावी.
लागवडीची वेळ
जून महिन्याचा पहिल्या आठवडा ते शेवटचा आठवडा.
लागवडीची पध्दत
सपाट वाफा, गादी वाफा आणि सरी वाफा पद्धतीने लागवड केली जाते.
गादीवाफा पद्धत
- लागवडीसाठी ९० सें.मी.रुंदीचा गादीवाफा करावा. त्यावर तीन ओळी बसतात. दोन ओळीत ३० सें.मी. आणि दोन रोपात १० सें.मी. अंतर ठेवावे.
- उपट्या जातीची लागवड करताना दोन ओळीत ३० सें.मी. अंतर ठेवावे. निमपसऱ्या जातीची लागवड दोन ओळीत ४५ सें.मी. अंतर ठेवून करावी. दोन रोपातील अंतर १० ते १५ सें.मी. ठेवावे.
- या पद्धतीमुळे जादा पाण्याचा निचरा होतो.
- मुळावरील गाठीची वाढ चांगली होते. जमीन भुसभुशीत होते, आऱ्या जमिनीत सहज घुसतात. शेंगा चांगल्या पोसतात. दाणे व्यवस्थित भरले जातात. शेंगांचा आकार वाढतो.
- टोकण करताना बियाणे ५ सें. मी. पेक्षा जास्त खोल पडणार नाही याची काळजी घ्यावी.
- जमीन योग्य वापश्यावर आल्याशिवाय लागवड करू नये.
तण नियंत्रण
तणांच्या तीव्रतेनुसार २ ते ३ वेळा खुरपणी करावी.
लागवडीनंतर ४८ तासांच्या आत पेंडिमिथॅलीन (१.५ किलो क्रियाशील घटक) ५ लिटर प्रति ५०० लिटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी फवारणी करावी.
गरज असेल तर पेरणीनंतर २० दिवसांनी क्विझालोफॉप इथाइल (५% ईसी) ७५० मिलि प्रती ५०० लिटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी फवारणी करावी.
खत व्यवस्थापन
- पेरणीपूर्वी चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे.
- हेक्टरी २५ किलो नत्र आणि ५० किलो स्फुरदाची शिफारस आहे.
- नत्रासाठी युरियाची एक गोणी आणि फॉस्फेटसाठी सिंगल सुपर फॉस्फेटच्या ६ गोण्या घ्याव्यात. किंवा ५० किलोच्या अडीच गोण्या डायमोनियम फॉस्फेटच्या घ्याव्यात.
- गंधक आणि कॅल्शिअमची गरज आऱ्या आणि शेंगा वाढीसाठी असते. त्यामुळे स्फूरद खते सिंगल सुपर फॉस्फेटच्या स्वरूपात दिली तर त्यातून गंधक आणि कॅल्शिअम ही अन्नद्रव्ये मिळतात. जस्त, लोह, बोरॉन ही सूक्ष्म अन्नद्रव्ये वाढीसाठी महत्त्वाची आहेत.
पाणी व्यवस्थापन
- पाणी उपलब्ध असेल तर पेरणीपूर्वी पाण्याची पहिली पाळी देऊन वापसा आल्यावर पेरणी करावी आणि लगेच दुसरे पाणी द्यावे.
- फुले, आऱ्या, शेंगा येण्याच्या वेळी आणि शेंगा भरताना पाणी देणे गरजेचे. तुषार सिंचनाने पाणी दिल्यास उत्पादनात १० ते १५ टक्के वाढ होते.
कीड नियंत्रण
मावा, तुडतुडे , फुलकिडे
पाने, फुलोऱ्यातील रस शोषण करतात. त्यामुळे वाढ खुंटते. पाने पिवळी होतात.
फवारणी ः प्रति लिटर पाणी
- अझाडीरॅक्टीन (१५०० पीपीएम) २ मि.लि. किंवा
- डायमेथोएट (३० टक्के प्रवाही) १ मि.लि.
रोग
पानावरील ठिपके (टिक्का)
- रोगाची सुरवात लवकर येणारा आणि उशिरा येणाऱ्या ठिपक्याच्या स्वरूपात आढळून येतो.
- लवकर येणारे ठिपके तपकिरी रंगाचे अनिमित आकाराचे व सभोवताली सोनेरी वलय असणारे असतात. उशिरा येणारे ठिपके हे गर्द काळे व वर्तुळाकार
- असतात.
- हे ठिपके आकाराने वाढून एकमेकात मिसळतात.पान करपल्यासारखे दिसते.
- हवेतील भरपूर आद्रता आणि २५ ते ३० अंश सेल्सिअस तापमान या रोगाला पोषक असते.
नियंत्रण
- रोग प्रतिकारक फुले मोरणा, फुले वारणा टी ए जी - २४ या जातींची लागवड करावी.
- प्रति किलो बियाणास २.५ ग्रॅम कार्बेन्डाझिम किंवा ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम ची प्रक्रिया करावी.
- आंतरपीक पध्दतीत तूर, मूग, उडीद, बाजरी, ज्वारी इ. पिके घ्यावीत.
- मॅंकोझेब २ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
मर रोग
रोगाचा प्रादुर्भाव बुरशीमुळे जमिनीतून किंवा बियांद्वारे होते.
झाडांची संख्या कमी होऊन उत्पादन घटते.
लक्षणे
- रोपटे जमिनीच्या वर येण्यापूर्वीच मरून जाते. रोपटे जमिनीच्यावर आल्यानंतर वाढीच्या काळात मरून जाते.
- नियंत्रण
- जमिनीची खोल नांगरट करावी. जमीन उन्हाळ्यात चांगली तापू द्यावी.
- जमिनीमध्ये चांगले कुजलेले शेणखत, कंपोस्ट आणि निंबोळी पेंड मिसळावी.
- पेरण्यापूर्वी प्रति किलो बियाणास २.५ ग्रॅम कार्बेन्डाझीम किंवा ४ ग्रॅम थायरमची प्रक्रिया करावी.
शेंडेमर
- टोमॅटो स्पॉटेड विल्ट व्हायरसमुळे होतो.
- प्रसार फुलकिडीमार्फत होतो.
- सुरवातीला कोवळ्या पानावर पिवळसर किंवा पांढऱ्या कंकणाकृती कड्या दिसून येतात. नंतरचा प्रादुर्भाव शेंडा, फुलावर दिसतो. कळी कोमेजून वाळून जाते. वाढ खुंटते.
नियंत्रण
- भुईमुगामध्ये बाजरीचे पीक घेतल्यास रोगाचे प्रमाण कमी दिसते.
- आय सी जी एस -११, ४४, ३७, ८६३२५, कादिरी -३, चंद्रा, टी एम व्ही -२ आणि रॉबट -३३ या रोगप्रतिबंधक जातीची निवड करावी.
फुलकिडीचे नियंत्रण
फवारणी ः प्रति लिटर पाणी
- अझॉडीरॅक्टीन (१५०० पीपीएम) - २ मि.लि. किंवा
- डायमेथोएट (३० टक्के प्रवाही) - १ मि.लि.
- डॉ. डी.के.कठमाळे, ९४०५२६७०६१
- डॉ.एस.बी.महाजन - ९४२११२८३३३
(कृषि संशोधन केंद्र, कसबे डिग्रज,जि.सांगली)
- 1 of 4
- ››