बीबीएफ टोकण यंत्राने करा पेरणी

रुंद वरंबा सरी पध्दतीचा प्रमुख उद्देश म्हणजे पावसाचा खंड पडल्यास जमिनीतील उपलब्ध ओलावा पिकांच्या वाढीसाठी उपयोगी ठरतो. जास्त पावसाच्या कालखंडात पाण्याचा योग्य निचरा होऊन पिकात पाणी साचत नाही. या लागवड तंत्रासाठी बीबीएफ टोकण यंत्र फायदेशीर ठरते.
BBF machine
BBF machine

रुंद वरंबा सरी पध्दतीचा प्रमुख उद्देश म्हणजे पावसाचा खंड पडल्यास जमिनीतील उपलब्ध ओलावा पिकांच्या वाढीसाठी उपयोगी ठरतो. जास्त पावसाच्या कालखंडात पाण्याचा योग्य निचरा होऊन पिकात पाणी साचत नाही. या लागवड तंत्रासाठी बीबीएफ टोकण यंत्र फायदेशीर ठरते.

रुंद वरंबा सरी पद्धतीने सोयाबीन, तूर, मका, भुईमूग, ज्वारी, उडीद, मूग, बाजरी, इत्यादी प्रमुख पिकांची लागवड करता येते. रुंद वरंबा सरी पद्धतीने पेरणी केल्याने सरीद्वारे पावसाच्या पाण्याचे संवर्धन तसेच निचरा झाल्यामुळे पिकाची वाढ चांगली होते. यांत्रिक पद्धतीने आंतरमशागत करता येते. पीक उत्पादनात वाढ मिळते. या तंत्रासाठी ट्रॅक्‍टरचलित रुंद वरंबा सरी टोकण यंत्राचा वापर फायदेशीर ठरतो. ट्रॅक्‍टरचलित रुंद वरंबा सरी टोकण यंत्र

  • ट्रॅक्‍टरचलित चार फणी यंत्राच्या सांगाड्यावर दोन सरी नांगर बसवलेले आहेत.
  • यंत्राच्या सांगाड्यावर एक पेटी बसविलेली आहे. त्या पेटीचे खत व बियाणासाठी दोन मुख्य भाग आहेत. या मुख्य भागाचे फणाच्या संख्येनुसार प्रत्येकी चार उपभाग केले आहेत. अशा प्रकारे यंत्राच्या प्रत्येक फणासाठी स्वतंत्र बियाणे व खतपेटी आहे. त्यामुळे आंतरपिकाची पेरणी करता येते.
  • बियाणे पेरणीसाठी तिरपी प्लेट तर खत पेरणीसाठी उभी प्लेट बसविलेली आहे. यंत्रासोबत विविध पिकांच्या पेरणीसाठी स्वतंत्र प्लेट दिलेल्या आहेत. यंत्रामध्ये आवश्‍यकतेप्रमाणे खताचे प्रमाण कमी जास्त करता येते.
  • टोकण यंत्राने सोयाबीन, तूर, मका, भुईमूग, ज्वारी, मूग, उडीद, कपाशी, बाजरी, कांदा इत्यादी पिकांची पेरणी करता येते.
  • यंत्राची वैशिष्ट्ये  

  • यंत्राच्या दोन्ही बाजूस चाके आहेत. या चाकांच्या ॲक्‍सलवर ५ सें.मी. अंतरावर छिद्रे दिलेली आहेत. या छिद्राद्वारे चाकांच्या ॲक्‍सलची उंची कमी जास्त करता येते. हे छिद्र मुख्य सांगाड्यावर दिलेल्या छिद्रांवर जुळवून पेरणीची खोली ५ ते १५ सें.मी. दरम्यान कमी जास्त करता येते.
  • या यंत्रास शॉव्हेल प्रकाराचे चार फण दिलेले आहेत. दोन फणातील अंतर आवश्‍यकतेनुसार ९ ते १८ इंचापर्यत कमी जास्त करता येते.
  • सदर यंत्राच्या सांगाड्यावर दोन्ही बाजूला सरी यंत्र बसवलेले आहे.
  • शेताच्या कडेला वळताना बी व खत बंद करण्यासाठी जमिनीवर चालणारे चाक उचलावे लागते. त्यासाठी यंत्र हायड्रॉलिक कंट्रोल लिव्हरच्या साहाय्याने उचलावे लागते.त्यानंतर वळण घेऊन हायड्रॉलिक कंट्रोल लिव्हरने यंत्र खाली घेऊन पेरणी करता येते.
  • उपलब्ध अवजाराने रुंद वरंबा सरी पद्धतीने पेरणी

  • बहुतांश शेतकऱ्यांकडे बैलचलित बळीराम नांगर आहेत. तसेच बैलचलित तिफण वापरून शेतकरी पेरणी करतात. या दोन अवजाराने सुध्दा रुंद वरंबा सरी पद्धतीसारखी पेरणी करता येते.
  • पेरणीपूर्वी पाऊस पडल्यानंतर शेतात ४.५ फूट अंतरावर बळीराम नांगराने सरी काढाव्यात.
  • सरी काढताना फाळ एक फूट रुंद ठेवावेत. जेणेकरून एक ते सव्वा फुटाची सरी निघेल.
  • पेरणीयोग्य पाऊस झाल्यानंतर बळीराम नांगराने तयार झालेल्या वरंब्यावर पेरणी करावी.
  • रुंद वरंबा सरी टोकण यंत्राचे फायदे

  • यंत्राच्या साहाय्याने हव्या त्या रुंदीचे वरंबे आणि सऱ्या तयार करता येतात.
  • रुंद वरंबे तयार करत असताना त्यावर बियाण्यांची टोकण करता येते.
  • आंतर पीक पद्धतीनुसार दोन पिके एकाच वेळी घेता येतात.
  • दोन फणांतील तसेच दोन रोपातील अंतर पिकानुसार बदलता येते.
  • ठरावीक अंतरावर आणि खोलीवर बियाणांची टोकण होत असल्याने बियाणे बचत व उगवण चांगली होते. विरळणीची आवश्‍यकता नाही.
  • रासायनिक खतांची उपयुक्तता वाढते.
  • ठरावीक ओळीनंतर सरी तयार होत असल्याची पावसाचे पाणी सरीत थांबते, जमिनीत मुरते.
  • जमिनीची धूप कमी होते. पाणी सरीत टिकून राहिल्याने पिकांचे नुकसान टळते.
  • पावसाचे पाणी पिकात न साचता आवश्‍यक तेवढे सरीत थांबून जास्तीचे पाणी बाहेर निघून जाते. त्यामुळे अतिवृष्टीचा पिकावर विपरीत परिणाम होत नाही.
  • लागवड रुंद वरंब्यावर होत असल्याने मुळा भोवती हवा खेळती राहून उपयुक्त जिवाणू कार्यक्षम राहतात.
  • जमिनीत ओलावा राहतो. अन्नद्रव्यांचा कार्यक्षम वापर होतो.
  • पेरणीसाठी ट्रॅक्‍टरचलित रुंद वरंबा - सरी टोकण यंत्राची जोडणी

  • शेतकरी सोयाबीनची पेरणी शिफारशीप्रमाणे १८ इंच (दीड फूट) अंतरावर करतात. त्याकरिता ट्रॅक्‍टरचलित रुंद वरंबा सरी टोकण यंत्रधारक शेतकऱ्यांनी यंत्राची जोडणी करून पेरणी करावी.
  • यंत्रावर खुणा केल्यानंतर यंत्राचा मध्य सोडून सांगाड्याच्या मागील बाजूस फणाची जोडणी करावी. फण जोडल्यानंतर सांगाड्याच्या समोरील बाजूस सरी नांगर बसवावेत. अशा प्रकारे यंत्र पेरणीसाठी तयार करावे.
  • पेरणी करताना पहिले तास मारल्यानंतर बांधावरून वळताना जाताना पाडलेल्या सरीमध्ये सरी नांगर घालावा, जेणेकरून सरीच्या दोन्ही बाजूंना येणाऱ्या ओळीमध्ये १८ इंच अंतर राहील.
  • प्रत्येक ट्रॅक्‍टरच्या मागील टायरमधील अंतर अश्वशक्तीच्या प्रकारानुसार कमी-जास्त असते. त्यामुळे, यंत्राची जोडणी केल्यानंतर सरी नांगर ट्रॅक्‍टरच्या मागील टायरच्या मध्यभागी आहे की नाही, याची पाहणी करावी. नसेल तर मागील टायर काढून पलटी (बाजू बदलून-आतील बाजू बाहेर व बाहेरील बाजू आत) करून बसवावेत. त्यामुळे दोन्ही टायरमधील अंतर साधारणपणे ८ ते १२ इंच वाढते.
  • अशा प्रकारे टायरच्या मध्यभागी सरी नांगर घेतल्यामुळे पेरणीनंतर जमीन वाफश्‍यावर असताना या यंत्राने आंतरमशागत करता येते. तसेच ट्रॅक्‍टरचलित फवारणी यंत्राने फवारणी करता येते. त्यामुळे वेळ व मजुरांची बचत होते.
  • - सचिन सूर्यवंशी,९४२३३४७२८० (वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख (कृषि विद्या),कृषि विज्ञान केंद्र, तुळजापूर जि. उस्मानाबाद)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com