मुंबई : कोरोना लसीकरणाचा आजचा कार्यक्रम हे एक क्रांतिकारक पाऊल आहे.
अॅग्रो विशेष
दर्जेदार पेरू, सीताफळाच्या उत्पादनावर भर
पेरू आणि सीताफळाचे नियोजन करताना बागेचे टप्पे पाडले आहेत. त्यानुसार १५ दिवस ते १ महिना या अंतराने या टप्प्यांचा बहर धरला जातो. त्यामुळे पीक व्यवस्थापन आणि फळे काढणीचे नियोजन सोपे जाते.
माझ्याकडे पेरू आणि सीताफळाची लागवड आहे. पेरूच्या दोन ते आठ वर्षे वयाच्या बागा आहेत. तीन एकर क्षेत्रावर सरदार जातीची ४२५ झाडे, अडीच एकर क्षेत्रावर गुलाबी गराच्या (बाटली आकार) जातीची ३५० झाडे, अर्धा एकर रत्नदीप जातीची १२० झाडे, आणि अर्धा एकर क्षेत्रावर ललित (गुलाबी गर) जातीची ८० झाडे आहेत. या शिवाय सहा एकरावर सीताफळाच्या फुले पुरंदर जातीची ११०० झाडांची लागवड आहे. पेरू आणि सीताफळाचे नियोजन करताना बागेचे टप्पे पाडले आहेत. त्यानुसार १५ दिवस ते १ महिना या अंतराने या टप्प्यांचा बहर धरला जातो. त्यामुळे पीक व्यवस्थापन आणि फळे काढणीचे नियोजन सोपे जाते.
हंगामाचे नियोजन
- पेरू हंगाम सुरू होण्यासाठी बाग धरताना डिसेंबर महिन्यात पाणी बंद केले जाते. १५ मार्चच्या दरम्यान झाडाची छाटणी करून प्रत्येक झाडाभोवती गोल आळे करून दोन किलो निंबोळी पेंड, पाच पाटी शेणखत आणि दोन पाटी लेंडी खत मिसळून दिले जाते.
- सर्व झाडांना बोर्डोपेस्ट लावली जाते तसेच बोर्डोमिश्रणाची फवारणी घेतो. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एका टप्प्याला पाणी देऊन बाग धरली आहे. साधारणतः आठवडाभरात झाडावर फुटवे निघाले, त्यानंतर पंधरा दिवसांत झाडावर कळी लागण्यास सुरवात झाली.
- यंदा वातावरण चांगले आहे, झाडांवर बुरशी, माव्याचा प्रादुर्भाव कमी आहे. नियंत्रणासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार कीडनाशकांची फवारणी घेतली जाते.
- एप्रिल महिन्यात बाटली पेरू आणि रत्नदीप पेरूची बाग धरली आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सरदार आणि ललित पेरूच्या बागेची छाटणी करून पाणी देण्यात येणार आहे. सरदार पेरूला दिवाळीनंतर चांगली मागणी असते.
- ऑगस्ट महिन्यात पहिला हंगामाच्या पेरूची काढणी सुरू होईल. साधारणतः: डिसेंबरपर्यंत हंगाम चालेल. तोपर्यंत दुसरी बाग काढणीस तयार असेल.
- फळधारणा झाल्यानंतर ढगाळ वातावरणात पेरूवर बुरशीचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे काटेकोर व्यवस्थापन ठेवत रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी घेतो.
- झाडाला आठवड्यातून दोनदा ठिबक सिंचन पद्धतीने दोन तास पाणी दिले जाते. फळे वाढीची अवस्थेत असताना त्यांची फुगवण होण्यासाठी आवश्यकतेनुसार पाटाने पाणी देखील दिले जाते. वाढीच्या टप्यात सूक्ष्मअन्नद्रव्यांचा वापर करतो. पाणी देण्यासाठी चार कोटी लिटर क्षमतेचे शेततळे आहे. पाच विहिरी आहेत. पाऊस झाल्यानंतर शेततळे भरून ठेवले जाते. विहिरींचे पाणी संपल्यानंतर शेततळ्यातील पाण्याचा वापर केला जातो.
- चार वर्षांच्यापुढील पेरूच्या एका झाडापासून साधारणतः १२५ ते १५० किलोपर्यंत उत्पादन घेतले जाते.
- सुमारे सहा एकर क्षेत्रावर सीताफळाच्या ११०० झाडांची लागवड आहे. या लागवडीचे टप्पे पाडलेले आहे. एक महिन्याचे अंतर ठेऊन या बागांचा बहर पकडला जातो. सध्या दोन बागेतील ४५० सीताफळाच्या झाडांचा बहर पकडला आहे. उर्वरित बागेची मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात छाटणी घेऊन पाणी सोडण्याचे नियोजन आहे.
- सीताफळालाही वाढीच्या टप्यानुसार खतांची मात्रा दिली जाते. सीताफळावर मिलीबग नियंत्रणासाठी तज्ज्ञांच्या सल्याने उपाययोजना करतो. सीताफळ आणि पेरूला जास्तीत जास्त सेंद्रिय खतांच्या वापरावर माझा भर आहे. त्यामुळे फळांचे दर्जेदार उत्पादन मिळते.
- राजेंद्र कुंडलीक पोमण, ९८२३०७०७८९
फोटो गॅलरी
- 1 of 653
- ››