अळिंबी उत्पादनामध्ये मोठ्या संधी

भारतामध्ये अळिंबीचे विविध प्रकार उत्पादित केले जातात. त्यातील महत्त्वाचे प्रकार म्हणजे बटण अळिंबी, धिंगरी अळिंबी आणि भाताच्या भुश्शावरील अळिंबी. भाताच्या भुश्शावरील अळिंबीचे उत्पादन ३५ ते ४० अंश सेल्सिअस तापमानामध्ये घेणे शक्य आहे.
Great opportunity in alimbi production
Great opportunity in alimbi production

भारतामध्ये अळिंबीचे विविध प्रकार उत्पादित केले जातात. मात्र त्यातील महत्त्वाचे प्रकार म्हणजे बटण अळिंबी, धिंगरी अळिंबी आणि भाताच्या भुश्शावरील अळिंबी. भाताच्या भुश्शावरील अळिंबीचे उत्पादन ३५ ते ४० अंश सेल्सिअस तापमानामध्ये घेणे शक्य आहे. धिंगरी अळिंबी उत्तरेकडील पठारी प्रदेशामध्ये घेतली जाते, तर बटण अळिंबी ही हिवाळ्यामध्ये घेतली जाते.  अळिंबी उत्पादन हा कमी जागा आणि कमी गुंतवणुकीमध्ये करण्यायोग्य कृषिपूरक उद्योग आहे. भारतामध्येही अळिंबीतील प्रथिने आणि पोषकता यामुळे पूरक खाद्य म्हणून मागणी वाढत असल्याने अळिंबी उत्पादन वेगाने वाढत आहे. अमेरिका, चीन, इटली आणि नेदरलॅंड हे देश जागतिक पातळीवर सर्वांत मोठे उत्पादक असून, एकूण जागतिक उत्पादनामध्ये चीनचा वाटा सर्वाधिक सुमारे ४६ टक्के आहे. भारतामध्ये उत्तर प्रदेश, त्रिपुरा आणि केरळ ही आघाडीची अळिंबी उत्पादक राज्ये  आहेत.  हिमाचल प्रदेशातील सोलन हे शहर अळिंबी उत्पादनासाठी प्रसिद्ध असून, सोलनला भारतातील अळिंबी शहर म्हणून ओळखले जाते. या सोलन येथे भारतीय कृषी संशोधन परिषदेचे अळिंबी संशोधन संचालनालय  आहे.  अळिंबी काय आहे? अळिंबी या बुरशीचाच एक प्रकार असून, त्याच्या विविध प्रजाती आहे. ही बऱ्याच अंशी वनस्पतीप्रमाणे असली तरी यात हरितद्रव्ये नसतात. त्यामुळे प्रकाश संश्‍लेषणाद्वारे स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत. ते बहुतांश वेळा सॅप्रोफाईट (saprophyte) प्रकारातील असून, प्रामुख्याने मृत सेंद्रिय पदार्थांवर वाढतात. जंगलामध्ये विविध ठिकाणी आपल्याला छत्रीप्रमाणे वाढलेले दिसते, ते म्हणजे या बुरशीचे फळांसारखा भाग असतो. संरचनेच्या दृष्टीने अळिंबीचे दोन भाग पडतात. वरील टोपीसारखा भाग असतो, त्याला पायलस ( PILEUS) म्हणतात. ते ज्या दोऱ्यासारख्या भागाशी जोडलेले असते, त्याला मायसेलिया (MYCELIA) म्हणतात. हे मायसेलिया मातीतून पोषक घटक उचलून घेतात. त्यांना वाढीसाठी सूर्यप्रकाशाची गरज नसते.  जंगलामध्ये आढळणाऱ्या अळिंबीच्या हजारो प्रजातीपैकी काही प्रजाती या खाण्यायोग्य असल्या तरी त्यातील काही विषारी व अखाद्यही असतात. सामान्य माणसाला खाद्य आणि विषारी अळिंबी प्रजातींमध्ये भेद करणे शक्य होत नाही. केवळ कवकशास्त्रज्ञच अळिंबीच्या शरीरशास्त्रीय गुणधर्माचा योग्य आढावा घेऊन भेद करू शकतात. मात्र, माणसांनी काही खाद्य प्रजाती लागवडीखाली आणल्या  आहेत.   अळिंबी लागवडीसाठी संधी  भारतामध्ये अळिंबी उत्पादनाला मोठ्या संधी आहेत. अळिंबी ही भारत आणि जगभरातील लोकांसाठी मुख्य आहारापैकी एक बनत आहे. भारतीय शासनाने जाहीर केलेल्या माहितीनुसार, २८ टक्के पुरुष आणि २९ टक्के महिला या शाकाहारी आहे. शाकाहारी लोकांसाठी प्रथिनांचा उत्तम स्रोत म्हणून अळिंबी महत्त्वाची ठरणार आहे. अळिंबीमध्ये असलेल्या पोषक घटक, जीवनसत्त्वे आणि खनिजांमुळे अळिंबीसाठी ‘शाकाहारी मांस’ किंवा ‘मांसाची भाजी’ असेही सामान्यतः म्हटले जाते. वाढत्या लोकसंख्येसोबत भारतामध्ये अळिंबीची मागणी सातत्याने वाढत आहे.  कृषी हवामान परिस्थितीचा विचार करता भारतामध्ये अळिंबी उत्पादनासाठी अनुकूल वातावरण आहे. भारतामध्ये उपलब्ध असलेल्या कृषी अवशेष, स्वस्त मजूर आणि विविध हवामानांमध्ये वाढणाऱ्या अळिंबीची भव्य जैवविविधता फायदेशीर ठरते. सध्या भारतातील अळिंबीचे उत्पादन १३ लक्ष टन प्रति वर्ष इतकेच आहे. भारतीय अळिंबी उद्योगाने २०१० पासून सरासरी ४.३ टक्के वेगाने वाढीचा दर नोंदवला आहे. भारतातील एकूण अळिंबी उत्पादनापैकी पांढऱ्या बटन अळिंबीचे प्रमाण सर्वाधिक ७३ टक्के असून, त्यानंतर धिंगरी (ओयस्टर) अळिंबी १६ टक्के, भाताच्या भुश्शावरील अळिंबी ७ टक्के आणि दुधी अळिंबी ३ टक्के  असे प्रमाण आहे. मात्र अद्याप अळिंबीचे खाद्यातील दरडोई प्रमाण हे १०० ग्रॅम इतके आहे. ते अन्य भाज्यांच्या तुलनेमध्ये अत्यंत कमी  आहे.  अळिंबीचे विविध प्रकार  भारतामध्ये अळिंबीचे विविध प्रकार उत्पादित केले जातात. मात्र त्यातील महत्त्वाचे प्रकार म्हणजे बटण अळिंबी, धिंगरी अळिंबी आणि भाताच्या भुश्शावरील अळिंबी. भाताच्या भुश्शावरील अळिंबीचे उत्पादन ३५ ते ४० अंश सेल्सिअस तापमानामध्ये घेणे शक्य आहे. धिंगरी अळिंबी उत्तरेकडील पठारी प्रदेशामध्ये घेतली जाते, तर बटण अळिंबी ही हिवाळ्यामध्ये घेतली जाते.  पांढरी बटण अळिंबी  (Agaricus bisporus) पांढरी बटण अळिंबी ही लागवडीखालील अळिंबी या नावानेही ओळखली जाते. ही भारतीय बाजारपेठेमध्ये आढळणारी खूपच कमी उग्र चव असलेली अळिंबी आहे. बहुतांश परदेशी अळिंबी जातीच्या तुलनेमध्ये  या अळिंबीचा स्वाद कमी तीव्र  आहे.  भाताच्या भुश्शावरील अळिंबी  भाताच्या भुश्शावरील अळिंबीला काही वेळा भुश्शावरील अळिंबी असेही म्हणतात. याचे उत्पादन भारतामध्ये अनेक वर्षांपासून घेतले जाते. ही अळिंबी प्रामुख्याने उष्ण आणि समशीतोष्ण कटिबंधामध्ये घेतले जाते. या अळिंबीला ग्राहकांकडूनही चांगली मागणी आहे.   धिंगरी अळिंबी  ओयस्टर अळिंबीला भारतामध्ये सामान्यतः धिंगरी अळिंबी या नावाने ओळखले जाते. हा खाद्य अळिंबीतील सर्वांत मोठा प्रकार असून, सर्वाधिक विविधताही त्यात आढळते. धिंगरी अळिंबी ही प्रामुख्याने कुजणाऱ्या लाकडावर वाढते. ही खाद्य जंगली अळिंबी आता व्यावसायिकरीत्या वाढवली जाणारी अळिंबी बनली आहे.  अळिंबी उत्पादनाचे फायदे 

  • अळिंबी हे मानवासाठी लज्जतदार आहार असून, ते प्रथिने, कर्बोदके, खनिजे आणि जीवनसत्त्वाने परिपूर्ण आहे. 
  • शाकाहारामध्ये सामान्यतः प्रथिनांची कमतरता भासते, अशा वेळी अळिंबी हे पोषक घटकांच्या पूर्ततेसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरू शकते. 
  • शेतीप्रमाणे अळिंबी उत्पादनासाठी जमिनीची आवश्यकता नसते.  उलट शेतीमधून उपलब्ध होणाऱ्या टाकाऊ सेंद्रिय पदार्थांवर वर्षभर मानवी आहारामध्ये मूल्यवान ठरणाऱ्या अळिंबीचे उत्पादन घेता येते.  
  • अळिंबी उत्पादन उद्योगातून रोजगाराच्या मोठ्या संधी तयार होऊ शकतात.
  • अळिंबी उत्पादनामध्ये कोणतेही गुंतागुंतीचे तंत्रज्ञान आवश्यक नसल्याने सामान्य माणसेही थोड्याशा प्रशिक्षणाने उत्तम दर्जाचे अळिंबी उत्पादन करू शकतात. 
  • जागतिक बाजारपेठेमध्ये अळिंबीला प्रचंड मागणी असून, निर्यातीसाठी मोठ्या 
  • संधी आहेत. देशासाठी परकीय चलन उपलब्ध करण्याची क्षमता या उद्योगामध्ये आहे. 
  • संपर्क ; शीतल बी. पवार,  ९५११७१०२६५  (संशोधन सहायक, द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com