agricultural news marathi ‘Matt Pot’ technology for the nursery business | Page 2 ||| Agrowon

रोपवाटिका व्यवसायासाठी ‘मॅट पॉट’ तंत्रज्ञान

मुकुंद पिंगळे
बुधवार, 6 ऑक्टोबर 2021

नाशिक जिल्ह्यातील कोठुरे (ता.निफाड) येथील अंकुश मोगल यांनी ‘मोगल ॲग्रो टेक्नॉलॉजी’ च्या माध्यमातून बहुपर्यायी, वापरास सुलभ असे किफायतशीर यंत्रे विकसित केली आहेत. त्यात माती, खत व अन्य आधुनिक माध्यमांच्या मिश्रणातूनआवश्यक त्या आकारामध्ये कुंड्या (मॅट पॉट) बनवता येतात.
 

प्रगत देशामध्ये पर्यावरणपूरक पेपरपॉट निर्मितीसाठी यंत्राचा वापर होत असला तरी भारतीय दृष्टिकोनातून ही यंत्र महागडी ठरतात. नाशिक जिल्ह्यातील कोठुरे (ता.निफाड) येथील अंकुश मोगल यांनी ‘मोगल ॲग्रो टेक्नॉलॉजी’ च्या माध्यमातून बहुपर्यायी, वापरास सुलभ असे किफायतशीर यंत्रे विकसित केली आहेत. त्यात माती, खत व अन्य आधुनिक माध्यमांच्या मिश्रणातून आपल्या आवश्यक त्या आकारामध्ये कुंड्या (मॅट पॉट) बनवता येतात.

रोपवाटिका व्यवसाय हा भाजीपाला, फळे शेतीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. बागायती भागामध्ये तिन्ही हंगामामध्ये पिके घेतली जात असल्याने शेतकऱ्यांना स्वतः रोपे तयार करण्यासाठी वेळ आणि जागा अनेक वेळा उपलब्ध नसते. शेतकऱ्यांचा तयार रोपे वापरण्याकडे कल असतो. रोपे बनवण्यासाठी प्रामुख्याने वेगवेगळ्या आकाराच्या प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर केला जातो. लागवडयोग्य रोप तयार झाल्यानंतर प्रत्यक्ष शेतामध्ये लागवड करताना ही प्लॅस्टिक पिशवी ब्लेडने फाडली जाते. पिशवी काढून टाकताना मुळाभोवतीच्या मातीची हुंडी फुटते. या दोन्हींमध्ये रोपांच्या मुळांना इजा पोचू शकते. त्याच प्रमाणे प्लॅस्टिकचा तयार होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावणे अडचणीचे ठरते. त्या तशाच शेत परिसरामध्ये राहून पर्यावरणासाठी हानिकारक ठरतात.

या दोन्ही समस्यांवर मार्ग काढण्यासाठी मेकॅनिकल इंजिनिअर अंकुश मोगल यांनी प्रयत्न सुरू केले. अभ्यासामध्ये परदेशात कागदापासूनच्या कुंड्यांचा (पेपरपॉट) वापर होत असल्याचे समजले. त्याच्या उत्पादनासाठी परदेशात उपलब्ध यंत्राचा अभ्यास केला. ही यंत्रे भारतीय शेतकरी किंवा रोपवाटिकाचालकाच्या दृष्टीने सोयीची नव्हती. विशेषतः पेपरपॉटसाठी माध्यम म्हणून माती, गांडूळ खत, कोकोपीट किंवा अधिक तंतुमययुक्त घटक वापरता येत नव्हते. शेतकऱ्यांच्या अन्यही काही छोट्या मोठ्या अडचणी लक्षात घेऊन २०१६ मध्ये संकल्पना तयार केली. त्यावर आधारित यंत्राची निर्मिती करून त्याच्या चाचण्या घेतल्या. अथक प्रयत्नातून २०१८ साली मॅटपॉट तंत्रज्ञान विकसित केले. ‘मोगल ॲग्रो टेक्नॉलॉजी’ च्या माध्यमातून हे भारतीय बनावटीच्या ‘मॅटपॉट’ तंत्रज्ञानाचे उत्पादन सुरू केले.

पर्यावरणपूरक बाबींचा विचार
रोपाची शेतीमध्ये लागवड केल्यानंतर तिथेच पडलेला प्लॅस्टिक पिशव्यांचा कचऱ्याची योग्य विल्हेवाट न लावल्यास त्यातून मायक्रोप्लॅस्टिक तयार होते. त्याचे विघटन होत नाही. ते पुढील शेती आणि पर्यावरणासाठी हानिकारक ठरते. हे लक्षात घेऊन अंकुश मोगल यांनी पर्यावरणास अनुकूल ठरेल अशा प्रकारच्या मॅटपॉटची निर्मिती केली. पेपरपॉटचा पेपर हा जमिनीत कुजतो. यात रोपे लावल्यास व पुढे शेतामध्येही वाढ जोमदार होण्यास मदत होते. ही बाब शेतकरी व रोपवाटिका चालकांना प्रात्यक्षिकांद्वारे समजावण्याचे प्रयत्न सुरू केले. प्लॅस्टिक पिशव्यामधील रोपांच्या तुलनेतील फायदे लोकांना समजण्यात येत आहेत.

असे आहे मॅटपॉट तंत्रज्ञान :

 • पेपरपॉट निर्मितीसाठीची यंत्रे ही प्रामुख्याने इटली, अमेरिका व चीन देशातून आयात केली जातात. ही आयात केलेली यंत्रे दोन्ही देशातील कर व अन्य बाबींमध्ये महागडी ठरतात. त्यातच बहुतांश यंत्रे हवारहित स्थिती (व्हॅक्यूम) वर आधारित असतात. हवारहित स्थितीची निर्मिती व स्थिरता जपण्यासाठी अधिक कौशल्य, विजेची सातत्यपूर्ण उपलब्धता व आधुनिक साधने लागतात. त्या तुलनेत मोगल यांनी यांत्रिक घटकांवर आधारित (मेकॅनिकल) असे मॅटपॉट तंत्रज्ञान विकसित केले आहे. आधारित आहे. तुलनेत हे यंत्र कमी वीजपुरवठा, सुलभ वापर व बहुपर्यायी अशा पद्धतीचे आहे.
 • पेपरपॉट निर्मितीसाठी ‘मॅटपॉट’ व त्यासाठी लागणारे माध्यमाचे एकसारखे मिश्रण करण्यासाठी मिक्सर असते. प्रत्येकी ५ अश्वशक्तीची ही दोन्ही यंत्रे आहेत.ती ‘थ्री फेज’ वीजपुरवठ्यावर चालतात.
 • मिक्सरमध्ये माती, गांडूळखत, कोकोपीट, पर्लाईट, व्हर्मिक्युलाईट, पीटमॉस यांचे आपल्या गरजेनुसार एकत्रित करता येते. विशेष म्हणजे या मिक्सरमध्ये विद्राव्य खतेही मिसळता येतात. मिक्सरच्या कामकाजावर आपल्या गरजेनुसार नियंत्रण ठेवता येते.
 • हे मिश्रण एका हॉपरमधून ‘स्क्रू’ द्वारे पुढे ढकलले जाते. एकत्रित माध्यमांचे मिश्रण पुढे मॅटपॉट यंत्रात पाठवले जाते.
 • एका यंत्रात पेपर गाईडला गुंडाळलेला कागद ‘रोलर डाय’ च्याभोवती रोल होऊन चिकटतो. या तयार झालेल्या आकारात माध्यमाचे मिश्रण भरले जाते.
 • गरजेनुसार डाय बदलून जाडी कमी- जास्त करता येते. आपल्या गरजेनुसार हवी तेवढी जाडी उदा. ३०, ४०, ५०, ६० व ८० मिमी व लांबी ठेवता येते.

पॉट निर्मिती 
पॉट निर्मितीसाठी मॅटपॉट मशिन हे २ डाय आधारे काम करते. त्याची कार्यक्षमता १ डायवर ताशी ३००० पॉट्स आणि दोन्ही डाय एकाच वेळेस चालू असतील तर ६००० पॉट्स इतकी आहे. आपल्या गरजेनुसार ही गती कमी अधिक करणे शक्य आहे. त्यामुळे कार्यक्षमता वाढते.

यंत्राची कार्यपद्धती 
यंत्राचा प्रकार...कामकाज
हॉपर.... मिश्रित माध्यमाचा पुरवठा
पेपर गाइड... लांबीनुसार पेपरचा गरजेनुसार पुरवठा
कॉम्प्रेसर... हव्या त्या उंचीची पॉटनिर्मिती
रोलर(डाय).... पॉटनिर्मितीपूर्वी पेपरची आकार निश्चिती
कंट्रोलर... मिश्रणाची घनता निश्चित करण्यासाठी वापर
यामध्ये एकूण ५ मोटर आहेत. त्यांचे कामकाज वेगवेगळे आहे.

यंत्राचे तांत्रिक तपशील:
यंत्र...मॅट पॉट...मीडिया मिक्सर
वीजपुरवठा... थ्री फेज... थ्री फेज
लांबी बाय रुंदी(फूट)... ७.२० बाय ४ ... १० बाय ११
उंची (फूट)... ७ ... ४

रोपांनुसार पॉटचा आकार (मिमी )
रोप प्रकार....जाडी....लांबी
पपई...४०...५०
टिश्युकल्चर केळी...५०...६०
द्राक्ष...५०-६०...८०
डाळिंब...५०-६०...८०
रंगीत ढोबळी मिरची, मिरची, टरबूज...३०...४०
गुलाब रोपे...३०...४०

क्षेत्रीय प्रात्याक्षिकांद्वारे विस्ताराचा प्रयत्न :
नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या विस्तारासाठी विविध ठिकाणी क्षेत्रिय प्रात्यक्षिके घेण्यात आली. पर्यावरण पूरक तंत्र म्हणून फलोत्पादन विभागानेही प्रात्यक्षिके घेण्यासाठी मदत केली. महाराष्ट्र, गुजरात, हरियाना, कर्नाटक, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, आंध्र प्रदेश अशा राज्यांतील शासकीय रोपवाटिकांना प्रायोगिक तत्त्वावर काही पॉल मोफत देऊनही प्रात्यक्षिके घेतली. यासह सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीतही ही यंत्रे उपलब्ध केली आहेत.

पर्यावरणपूरक मॅटपॉट तंत्रज्ञानाचे फायदे :

 • परदेशी बनावटीच्या यंत्राच्या तुलनेत तीनपट स्वस्त.
 • तंत्रज्ञान पूर्णपणे पर्यावरणपूरक.
 • रोपांची हाताळणी सोपी यासह वाहतुकीच्या खर्चात बचत.
 • मॅटपॉट या यंत्रामुळे कार्यक्षमतेत वाढ.

रोपांसाठी उपयुक्तता 

 • पर्यावरणपूरक घटक उदा. कागदाचा वापर असल्यामुळे पॉट लवकर विघटित होतात.
 • मॅटपॉटमध्ये पाणी शोषले जाऊन अतिरिक्त पाण्याचा निचरा होता. हा ओलावा रोपांची वाढीसाठी उपयुक्त ठरतो.
 • अतिरिक्त पाणी राहत नसल्याने रोपवाटिकेत हानिकारक बुरशीची वाढ होत नाही. रोपवाटिकेत त्रासदायक ठरणारे रोग उदा. रोपसड, मुळसड इ. होत नाही. मुळांचे आरोग्य चांगले राहते.
 • सच्छिद्र संरचनेमुळे मुळांभोवती पुरेशी हवा राहते. परिणामी पांढऱ्या मुळांची वाढ चांगली होते. सामान्य प्लॅस्टिक पिशव्यातील रोपांपेक्षा ४० पट अधिक पांढरी मुळे तयार होत असल्याचा दावा मोगल करतात.
 • वेळ व वाहतूक खर्चातही बचत
 • मुळांची गुंडाळी होणे (रूट कॉइलिंग) टाळता येते.

प्रतिक्रिया
शेती आणि पर्यावरण हे एकमेकांशी जोडलेले आहे. आधुनिक शेतीपद्धतीच्या नावाखाली प्लॅस्टिकचा वापर वाढत असून, तो शेतीला अंतिमतः पर्यावरणालाही हानिकारक ठरतो. शेतीतील प्लॅस्टिकचा वापर शक्य तिथे कमी करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी आम्ही पेपर पॉट ही संकल्पना आणली आहे. त्यासाठी खास भारतीय तंत्रज्ञानाने यंत्रे तयार केली आहेत.
-अंकुश मोगल, ९७६३२६९७३६.


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
अन्नप्रक्रिया यंत्रनिर्मितीतील सावंत...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील प्रकाश सावंत...
अधिक ‘कुरकुमीन’ युक्त हळदीचा यशस्वी...पास्टुल (जि. अकोला) येथील संतोष घुगे यांनी आपल्या...
मुक्तसंचार व तंत्रशुध्द पद्धतीने...सातारा जिल्ह्यातील चौधरवाडी येथील हाफीज काझी...
शेतीला मिळाली दुग्ध व्यवसायाची जोडपुण्याच्या पश्‍चिम भागातील मुळशी तालुक्याच्या...
सीताफळाचा ‘कांचन’ ब्रॅण्ड अन्...पंधरा वर्षांपासून सीताफळ लागवडीत हातखंडा, फळाचा...
लाकडी घाण्यावरील तेलाची युवा...कापसेवाडी (जि. सोलापूर) येथील युवा अभियंता संदीप...
नरवाडने जोपासली पानमळ्याची परंपरासांगली जिल्ह्यातील नरवाड हे गाव खाऊच्या पानांसाठी...
एकरी ४० टन सातत्यपूर्ण दर्जेदार केळी...नेवासे (जि. नगर) येथील पठाण कुटुंबाने ऊस पट्ट्यात...
मधमाशीपालनातून मिळाली स्वयंरोजगाराची...उत्तर प्रदेशातील मदारपूर केवली (ता. गोसाईगंज, जि...
प्रयोगशीलतेला दिली तंत्रज्ञानाची जोडप्रयोगशीलता आणि तंत्रज्ञान वापर या दोन बाबी शेतीत...
वडजीत फुलतात वर्षभर गुलाबाचे मळेसोलापूर जिल्ह्यातील वडजी गावशिवारात वर्षभर देशी...
रोपनिर्मिती व्यवसायाने दिला हातभारगळवेवाडी (जि. सांगली) येथील राजाराम गळवे अनेक...
`चॉकी सेंटर’ सुरू करून गुणवत्तापूर्ण...परिसरातील रेशीम शेतकऱ्यांची गरज ओळखून वाकी...
संघर्षमय आयुष्यात मोगऱ्याच्या सुगंधाचा...नाशिक जिल्ह्यात पेठ या आदिवासी तालुक्यातील आड...
संघर्षमय वाटचालीतून शेतीत उभारले वैभवपरभणी जिल्ह्यातील मरसुळ येथील देवराव शिंदे यांनी...
वाशीमच्या शेतकऱ्यांनी उभारली बांधावरची...वाशीम जिल्ह्यातील एरंडा येथील जयकिसान शेतकरी...
पर्यावरणपूरक तंत्रे देणारे वर्ध्याचे...दत्तपूर (वर्धा) येथे ग्रामोपयोगी विज्ञान...
कापडणीसांचे एक्स्पोर्ट क्वालिटी’चे भारी...नाशिक जिल्ह्यातील आसखेडा येथील अमृत कापडणीस यांनी...
बायोगॅसपासून वीज अन्‌ प्रॉम खतनिर्मितीबारामती येथील ‘सेंटर ऑफ एक्सलन्स, डेअरी‘मध्ये...
बचत गटाने उभारली भाजीपाला रोपवाटिकाशिक्रापूर-राऊतवाडी (ता. शिरूर,जि.पुणे) येथील...