agricultural news in marathi Agricultural Development Trust, Baramati Launches Livestock Genetics High Quality Center (Center of Excellence, Dairy) | Page 3 ||| Agrowon

उच्च वंशावळ, दुधाळ जनावरांसाठी सेंटर ऑफ एक्सलन्स, डेअरी

अमित गद्रे 
गुरुवार, 28 ऑक्टोबर 2021

ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या माध्यमातून बारामती (जि. पुणे) येथे पशुधन अनुवंश उच्चता गुणवत्ता केंद्राची (सेंटर ऑफ एक्सलन्स, डेअरी) सुरुवात झाली आहे. या ठिकाणी जातिवंत दुधाळ गीर, साहिवाल देशी गाई, मुऱ्हा, पंढरपुरी म्हैस आणि होल्स्टिन फ्रिजियन संकरित गाईंबाबत विशेष संशोधन सुरू आहे. देशभरातील पशुपालकांना या केंद्रातील संशोधनाचा फायदा होणार आहे.
 

ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या माध्यमातून बारामती (जि. पुणे) येथे पशुधन अनुवंश उच्चता गुणवत्ता केंद्राची (सेंटर ऑफ एक्सलन्स, डेअरी) सुरुवात झाली आहे. या ठिकाणी जातिवंत दुधाळ गीर, साहिवाल देशी गाई, मुऱ्हा, पंढरपुरी म्हैस आणि होल्स्टिन फ्रिजियन संकरित गाईंबाबत विशेष संशोधन सुरू आहे. देशभरातील पशुपालकांना या केंद्रातील संशोधनाचा फायदा होणार आहे.

पुणे जिल्ह्यातील बारामती पंचक्रोशीत ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या माध्यमातून कृषी, शैक्षणिक तसेच पशुपालनातील विविध उपक्रम आणि संशोधन प्रकल्पांना चांगली चालना मिळाली आहे. या परिसरात कृषी विज्ञान केंद्र, कृषी महाविद्यालयाच्या बरोबरीने पशुपालकांच्यासाठी दिशादर्शक आणि आधुनिक तंत्रज्ञानाची दिशा दाखविणाऱ्या पशुधन अनुवंश उच्चता गुणवत्ता केंद्राची सुरुवात झाली आहे. 

या केंद्राच्या वाटचालीबाबत माहिती देताना केंद्राचे प्रकल्प प्रमुख डॉ. धनंजय भोईटे म्हणाले, की २०१५ मध्ये संस्थेचे सीईओ नीलेश नलावडे आणि मी नेदरलॅंडमधील व्हॅन हॉल लॉरेनस्टाइन विद्यापिठाचा प्रकल्प अभ्यासण्यासाठी गेलो होतो. या ठिकाणी डेअरी विकास केंद्राच्या माध्यमातून विद्यापीठ, शेतकरी, पशुपालन उद्योगातील विविध कंपन्या आणि सरकारी विभाग पशुधनाशी निगडित उपयुक्त तंत्रज्ञान विकसित करण्याचे काम करतात. त्याच पद्धतीचे केंद्र बारामतीमध्ये असावे असा विचार करून ‘ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट'ने प्रकल्प अहवाल तयार केला. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या संकल्पनेतून अनुवंश उच्चता गुणवत्ता केंद्राची (सेंटर ऑफ एक्सलन्स, डेअरी) आखणी झाली. संस्थेचे चेअरमन राजेंद्र पवार आणि विश्‍वस्त रणजित पवार यांचे देखील मोलाचे मार्गदर्शन केंद्राच्या उभारणीसाठी मिळाले. प्रकल्पाला राष्ट्रीय कृषी विकास योजना तसेच सर दोराबजी टाटा ट्रस्ट यांचे पाठबळ मिळाले आहे.

काही वर्षांपूर्वी संस्थेचे चेअरमन राजेंद्र पवार आणि राज्यातील काही प्रयोगशील शेतकऱ्यांनी ब्राझील येथील ‘ब्राझिलीयन झेबू कॅटल असोसिएशन'च्या संशोधन प्रक्षेत्राला भेट दिली होती. या ठिकाणी गीर गाय, गुणवत्तापूर्ण रेतमात्रा केंद्र, प्रयोगशील गीर गोपालक आणि विद्यापीठाला भेट देऊन तेथील संशोधन प्रकल्पाचा अभ्यास केला. यातून पशुधन अनुवंश उच्चता गुणवत्ता केंद्राला संशोधनाची योग्य दिशा मिळाली. २०१७ मध्ये केंद्राच्या उभारणीला सुरुवात होऊन २०१९मध्ये प्रत्यक्ष संशोधनात्मक कामकाज सुरू झाले. 

जातीवंत जनावरांची निवड 
प्रकल्पातील संशोधनामध्ये गीर आणि साहिवाल या भारतीय गोवंशाच्या निवडीबाबत डॉ. धनंजय भोईटे म्हणाले, की कमी पाऊस पडणारा प्रदेश आणि कोरड्या वातावरणात गीर आणि साहिवाल हे देशी गोवंश चांगल्या प्रकारे तग धरतात. त्यांची दूध देण्याची क्षमता, रोगप्रतिकारशक्ती चांगली आहे. उदाहरण द्यायचे झाले तर भारतातील गुजरात, पंजाब, हरियाना राज्यांत हे गोवंश आहेत. तसेच ब्राझीलमध्ये गीर आणि आफ्रिका खंड तसेच ऑस्ट्रेलियामध्ये साहिवाल गोवंश पशुपालकांनी चांगल्या प्रकारे सांभाळला आहे. सध्या आपल्याकडील गीर गाय प्रति वेत २००० लिटर, साहिवाल २३०० लिटर सरासरी दूध उत्पादन देते.या गोवंशाची चांगली पैदास केली, योग्य व्यवस्थापन ठेवले तर निश्‍चितपणे दूध उत्पादनवाढीला चांगली संधी आहे.

प्रकल्पाच्या माध्यमातून पशुपालकांपर्यंत नवीन तंत्रज्ञान पोहोचविण्यासाठी राष्ट्रीय डेअरी विकास मंडळ, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, माफसू या संस्थांच्या बरोबरीने संशोधन आणि सहकार्य करार करण्यात आला आहे. येत्या काळात प्रकल्पाच्या माध्यमातून  नेदरलँड, स्वीडन, इस्राईलमधील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

आधुनिक मुक्त संचार गोठा 
प्रकल्पामधील मुक्त संचार गोठ्यामध्ये देशी गोवंश आणि म्हशी मिळून २००, होल्स्टिन फ्रिजीयन २०० आणि गाभण गाई,म्हशी आणि वासरांच्या गोठ्यामध्ये ५० जनावरांसाठी स्वतंत्रपणे विभागणी आहे. वळू आणि रेड्यासाठी स्वतंत्र गोठा आहे. प्रकल्पामध्ये हवेशीर मुक्त संचार गोठा आहे. त्यामुळे वायुविजन चांगल्या प्रकारे होते. संशोधनाबाबत डॉ. भोईटे म्हणाले, की हवामान बदलामुळे तापमानात चढ-उतार होत आहेत. त्याचा दुधाळ जनावरांचे आरोग्य आणि दूध उत्पादनावर परिणाम होताना दिसतो. गोठ्यात नेहमीच्या तापमानापेक्षा एक अंश सेल्सिअसने वाढ झाली तर  संकरित गाईंमध्ये ३ ते ४ लिटर दूध उत्पादनात घट येते. देशी गाई, म्हशींमध्ये याबाबत संशोधनाला संधी आहे. त्यादृष्टीने आम्ही नोंदी ठेवत आहोत. प्रकल्पातील मुक्त संचार गोठ्यामध्ये तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी फॅन आणि फॉगर प्रणाली बसविलेली आहे. इस्राईलमधील ‘कूलिंग ऑफ काऊ‘ या तंत्रज्ञानाचा वापर प्रकल्पामध्ये केला आहे. यामुळे दूध उत्पादनात सातत्य ठेवले जाते. 

या ठिकाणी फॅन आणि फॉगर प्रणालीमध्ये (टीएचआय इंडेक्स) संगणकाद्वारे स्वयंचलित पद्धतीने गोठ्यातील तापमान आणि आर्द्रता नियंत्रित केली जाते. गोठ्याच्या बाहेर सरासरी ४० अंश सेल्सिअस तापमान असेल तर संकरित गाईंच्या गोठ्यामध्ये स्वयंचलित यंत्रणेद्वारे ३२ अंश सेल्सिअस तापमान नियंत्रित ठेवले जाते. गाई, म्हशींना दूध काढणीसाठी मिल्किंग पार्लरमध्ये नेताना त्यांच्या अंगावर पाण्याचा फवारा सोडला जातो. त्यामुळे शरीर थंड राहून ताण येत नाही, त्यांच्या दूध उत्पादनात सातत्य राहते.

प्रकल्पात सध्या ६० गीर, २० साहिवाल गाई, ५१ मुऱ्हा आणि १२ पंढरपुरी म्हशी आणि १०५ होल्स्टिन फ्रिजियन गाईंचे संगोपन केले जाते. याचबरोबरीने २ गीर, १ साहिवाल वळू आणि १ मुऱ्हा आणि १ पंढरपुरी रेड्याचे पैदाशीसाठी संगोपन करण्यात आले आहे. गीर,साहिवाल गाई आणि मुऱ्हा, पंढरपुरी म्हशींमध्ये कृत्रिम रेतन केले जाते.जर रेतन यशस्वी झाले नाही तर जातिवंत वळूचा वापर केला जातो. होल्स्टिन फ्रिजियन गाईंसाठी सेक्स सॉर्डेट सिमेन वापरले जाते. 

‘टीएमआर’ तंत्राने खाद्य पुरवठा  
 प्रकल्पातील गोठ्यामध्ये सुमारे ५०० जनावरांना वर्षभर पुरेसा चारा उपलब्ध होण्यासाठी चार बंकर सायलेज आहेत. एका बंकरमध्ये ५०० टन मुरघासाची साठवणूक होते. त्यामुळे वर्षभरासाठी २००० टन मुरघास जनावरांसाठी उपलब्ध होणार आहे. जनावरांच्या खाद्यामध्ये मुरघास, वाळलेला चारा, संतुलित खुराक, खनिज मिश्रण हे टीएमआर (टोटल मिक्स राशन) पद्धतीने एकत्र केले जाते. जनावरांच्या वाढीचा गट आणि दूध उत्पादनानुसार दररोज टीएमआर दिले जाते. त्यामुळे जनावरांचे संतुलित पोषण होते. टीएमआर खाद्य देण्यासाठी दूध उत्पादन, शारीरिक वाढ तसेच गाभण जनावरांचे स्वतंत्र गट तयार केले आहे. 

वासरांना वाढीसाठी मिल्क रिप्लेसर, काफ स्टार्टर दिले जाते. तसेच दर १५ दिवसांनी वजन वाढीचा वेग मोजला जातो. वासरांची वाढ चांगली झाली ती लवकर माजावर येतात, त्यांचे वेत जास्त मिळू शकतात. 

प्रत्येक जनावराला ॲक्टिव्हिटी मीटर 
प्रक्षेत्रावरील प्रत्येक गाई, म्हशीच्या गळ्यातील पट्ट्यामध्ये ॲक्टिव्हिटी मीटर आणि ट्रान्स्पाँडर आहे. यामुळे दररोजची हालचाल, दूध उत्पादनातील चढ उताराची नोंद होते. त्यानुसार जनावर आजारी आहे, माजावर आहे किंवा कोणत्या अवस्थेत आहे, याची संगणकावर नोंद होते. त्यामुळे पुढील व्यवस्थापन करणे सोपे जाते.

भ्रूण प्रत्यारोपणाचा प्रयोग 
ब्राझिलीयन गीर वळूचे सेक्स सॉर्टेड सिमेन आणि राजकोट किंवा भावनगरमधील उच्चवंशावळीच्या दुधाळ गीर गाईंचे गर्भ यांच्यापासून तयार झालेला भ्रूण प्रकल्पातील गीर गाईंमध्ये प्रत्यारोपित करण्यात आले. यातून २३ वासरांचा जन्म झाला. यामध्ये ब्राझीलियन गीर गोवंशाची २० आणि भारतीय साहिवाल गोवंशाची ३ वासरे आहेत. तसेच पाच होल्स्टिन फ्रिजियन वासरांचा जन्म झाला आहे. यातील ४ कालवडी ‘अमेरिकन ब्रिडर असोसिएशन’कडून मिळालेल्या भ्रूण वापरातून जन्मलेल्या आहेत. 

आधुनिक मिल्किंग पार्लर 
प्रकल्पामधील गाई, म्हशींचे दूध काढणीसाठी आधुनिक मिल्किंग पार्लर आहे. या ठिकाणी दररोज प्रत्येक गाई, म्हशीने किती दूध दिले याची स्वयंचलित पद्धतीने संगणकावर नोंद ठेवली जाते. मिल्किंग पार्लरमध्ये गीर, साहिवाल, मुऱ्हा, होल्स्टिन फ्रिजियन गाईंचे दूध काढले जाते. गोठ्यामध्ये पंढरपुरी म्हशींचे स्वतंत्र मिल्किंग मशिनने दूध काढले जाते.

पशुपालकांसाठी प्रकल्पाचे फायदे

 • दुधाळ जनावरांची जनुकीय तपासणी. दूध उत्पादन क्षमता, ए१, ए२ दुधाची तपासणी. संकर झाला आहे की नाही हे तपासण्यासाठी जनुकीय प्रयोगशाळा.
 • रोग निदानासाठी रक्त, शरीर स्त्राव नमुने तपासणी प्रयोगशाळा.
 • कृत्रिम रेतन किंवा नैसर्गिक रेतन केल्यानंतर २८ ते २९ व्या दिवसांपासून पुढे गर्भधारणा निदानाची सुविधा. गोठीत रेतमात्रा साठवणुकीची सोय.
 • दूध आणि चाऱ्यामधील पोषक आणि विषारी घटकांची तपासणी. त्याद्वारे समतोल आहाराबाबत मार्गदर्शन.
 • पशुपालकांसाठी सल्ला-सेवा सुविधेसाठी टोल फ्री क्रमांक. संकेतस्थळावर माहिती.
 • ‘कृषिक’ ॲप वर तांत्रिक माहिती, सल्ला सेवा.
 •  बारामती परिसरातील सहा गावात पशू तपासणीसाठी फिरता दवाखाना.
 • प्रक्षेत्रावर चारा बॅंकेमध्ये मका, बाजरी, ज्वारी, संकरित नेपिअर, मारवेल, मुलॅटो, स्टायलो, सुबाभूळ लागवड.
 • औषधी वनस्पती उपचाराबाबत मार्गदर्शन. ‘हर्बल गार्डन’ची लवकरच उभारणी.

प्रकल्पाची उद्दिष्टे

 • शास्त्रीय, उच्च तंत्रज्ञानाचा वापर. 
 • जातिवंत दुधाळ गीर, साहिवाल गोवंश, मुऱ्हा, पंढरपुरी म्हशी आणि होल्स्टिन फ्रिजीयन या संकरित गाईंबाबत संशोधन, संवर्धन आणि तंत्रज्ञान विस्तार.
 • शुद्ध वंशाच्या कालवडी आणि वळूंची पैदास. आरोग्य आणि दूध उत्पादनवाढीच्या क्षमतेचा अभ्यास.
 • जातिवंत कालवडींचा दूध उत्पादन, प्रजननासाठी वापर. वळूचा सिमेन निर्मितीसाठी उपयोग. चांगल्या गुणवत्तेच्या कालवडी, सिमेन पशूपालकांच्यापर्यंत पोहोचविणार.
 • संतुलित पशु आहार, गुणवत्तापूर्ण चारा, मूरघास निर्मिती आणि वापराबाबत प्रशिक्षण. 
 • दूध उत्पादनाचा अंदाज घेण्यासाठी जनुकीय प्रयोगशाळा. पशुपालकांकडील जातिवंत कालवडी आणि वळूंची तपासणी.
 • गाई, म्हशीतील आजार आणि खनिज कमतरता तपासण्यासाठी आधुनिक रोग निदान प्रयोगशाळा.
 • पशुपालकांसाठी प्रात्यक्षिक आधारित प्रशिक्षण, तंत्रज्ञान विस्तारावर भर. 
 • पशुपालनातील नवनवीन संकल्पना आणि संशोधनाला चालना.
 •  कृत्रिम रेतन, भ्रूण प्रत्यारोपण, सेक्स सॉर्टेड सिमेनची निर्मिती आणि प्रसार.

प्रकल्पातील गाई, म्हशींचे दूध उत्पादन
 

जनावर      प्रति वेत प्रति दिन उद्दिष्ट (प्रति दिन)
गीर     २१०० लिटर ७ ते १२ लिटर    २० लिटर
साहिवाल      २३०० लिटर    ८ ते १४ लिटर २५ लिटर
मुऱ्हा म्हैस    ३६०० लिटर   १६ ते १८ लिटर  ३० लिटर
पंढरपुरी म्हैस २६०० लिटर    १३ लिटर   १८ लिटर 
होल्स्टिन फ्रिजियन  ७००० लिटर      ३० ते ३२ लिटर  ४५ लिटर

‘ट्रस्ट डेअरी’ ब्रॅण्ड
प्रकल्पामध्ये स्वच्छ दूधनिर्मितीवर भर दिला आहे. उत्पादन ते पॅकिंगपर्यंत कोणताही मानवी स्पर्श दुधाला होत नाही. धार काढताना हात, जनावरे, सड तसेच दूध काढणी यंत्राची स्वच्छता ठेवली जाते. कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त दूध काढण्यावर भर आहे. यांत्रिक पद्धतीने काढलेले दूध चार अंश सेल्सिअस तापमानाला बल्क कूलरमध्ये साठविले जाते. त्यानंतर पाश्‍चरायझेशन, होमोजिनायझेशन केले जाते. त्यानंतर प्रक्रियेसाठी दूध पाठविले जाते. प्रकल्पामध्ये दुधावर प्रक्रिया करणारे युनिट आहे. या ठिकाणी लस्सी, पनीर, ताक, दही, तूप,आइस्क्रीम निर्मिती केली जाते. 

या उत्पादनांची ‘ट्रस्ट डेअरी‘ ब्रॅण्डने बारामती आणि पुणे शहरामध्ये विक्री केली जाते. सध्या दररोज म्हशीचे ३०० लिटर तसेच गीर, साहिवाल गाईचे २०० लिटर आणि होल्स्टिन फ्रिजियन गाईंचे ७०० लिटर दूध उत्पादन होते. देशी गाईच्या दुधाचे पाऊच पॅक तसेच तूप, म्हशीच्या दुधापासून पनीर, दही, लस्सी, आइस्क्रीम निर्मिती केली जाते. होल्स्टिन फ्रिजियन गाईच्या दुधाची पुण्यात विक्री होते. तसेच तूपनिर्मितीवर भर दिला आहे. 

- डॉ. धनंजय भोईटे, ९६५७४५६८०६
(प्रकल्प प्रमुख,अनुवंश उच्चता गुणवत्ता केंद्र, बारामती, जि. पुणे)


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
अळिंबी उत्पादन, प्रक्रियेत मिळविली ओळखखुटाळा (ता. चिमूर, जि. चंद्रपूर) या दुर्गम...
सिंचन स्रोत बळकटीतून ग्रामविकासाला दिशापरभणी जिल्ह्यातील म्हाळसापूर (ता. सेलू) येथील...
दर्जेदार पेरू, खरबूज उत्पादनात हातखंडाकानळदा (ता.जि. जळगाव) येथील रवींद्र राजाराम भोई व...
सातत्यपूर्ण रेशीम शेतीने बदलले अर्थकारणसातारा जिल्ह्यातील अंतवडी येथील तानाजी रामचंद्र...
ऊस- केळी पीकपद्धतीत कुशल व्यवस्थापन...आष्टा (जि. सांगली) येथील विराज पवार या तरुण...
साहिवाल संगोपनासह सेंद्रिय उत्पादनांचे...सायकी (ता. उमरेड, जि. नागपूर) येथील सुरेश सावजी...
दुग्ध व्यवसायाला गीर गोवंश पैदाशीची जोडनाशिक येथील राहुल खैरनार यांनी बाजारपेठेचा अभ्यास...
सामूहिक प्रयत्नातून बचत गटांची प्रगतीकोल्हापूर जिल्ह्यातील महिला बचत गटांनी गेल्या दोन...
शेतीला मिळाली पोल्ट्री व्यवसायाची जोडपारंपरिक शेतीमधील आर्थिक नफ्याची मर्यादा लक्षात...
शेततळ्यांत विविध माशांच्या संगोपनातून...श्रीगोंदा तालुक्यातील (जि. नगर) कोळगाव येथील...
भरडधान्यांचे मल्टिमिलेट लाडू, नाचणी...पुणेनजीक उरुळीकांचन येथील कृषी पदवीधर महेश लोंढे...
राजेवाडीने घेतलाय व्यावसायिक शेतीचा...बियाणे उद्योगाचा जिल्हा असलेल्या जालना...
प्रयत्न, चिकाटी, एकत्रित श्रमांतून शेती...प्रयत्न, चिकाटी व इच्छाशक्ती व कृषी विज्ञान...
सातत्याने निर्यातक्षम डाळिंब उत्पादनात...सेंद्रिय आणि रासायनिक अशा एकात्मिक पद्धतीने...
काळ्या तांदळाचा लागवड प्रयोग यशस्वी; दर...मंडणगड : औषधी गुणांनी युक्त असलेल्या काळ्या...
प्रयोगशील एकात्मिक शेतीत पंचक्रोशीत...कांबी (जि. नगर) येथील बाळासाहेब खरात व कुटुंबाने...
दुग्ध व्यवसायासोबत यशस्वी गांडूळ...परभणी जिल्ह्यातील उमरा (ता. पालम) येथील शिंदे...
शेती विकासामध्ये कळसूबाई संस्थेचे...अकोले (जि. नगर) येथे जून २०१७ मध्ये कळसूबाई परिसर...
केळीपासून वेफर्स, पीठ, लाडू, शेव...सुनसगाव (जि. जळगाव) येथील विजय व पूनम या नारखेडे...
बारमाही भाजीपाला पिकांसह थेट विक्री...सिंधुदुर्ग जिल्ह्यात नाधवडे येथील रमाकांत यादव...