महिला गटाने रुजविले शेती, पूरक उद्योगाचे तंत्र...

कुशिवडे (ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) आणि म्हाप्रळ (ता. मंडणगड, जि. रत्नागिरी) येथील महिला गटांनी बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन भाजीपाला, हळद लागवडीसह शेळीपालन सुरू केले.
Okra cultivation by women's group at Kushiwade.
Okra cultivation by women's group at Kushiwade.

कुशिवडे (ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) आणि म्हाप्रळ (ता. मंडणगड, जि. रत्नागिरी) येथील महिला गटांनी बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन भाजीपाला, हळद लागवडीसह शेळीपालन सुरू केले. कृषी विभाग आणि कृषी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनामुळे महिला बचत गटाच्या माध्यमातून गावशिवारामध्ये नवीन तंत्रज्ञान रुजले आहे. राज्यामध्ये ‘आत्मा‘ आणि ‘उमेद'ने सुरू केलेल्या बचत गट चळवळीमुळे ग्रामीण भागातील महिला स्वयंपूर्ण होत आहेत. गटाच्या माध्यमातून मिळणाऱ्या आर्थिक साह्यामुळे महिलांचा भाजीपाला लागवडीसह कृषिपूरक व्यवसायाकडे कल वाढला आहे. कुशिवडे (ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) आणि म्हाप्रळ (ता. मंडणगड, जि. रत्नागिरी) येथील महिलांनी भाजीपाला, हळद लागवडीसह शेळीपालन, म्हैसपालनाला चालना दिली. यातून आर्थिक प्रगतीचा मार्ग सापडला आहे. कुशिवडे (ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) गाव शिवारात पारंपरिक पद्धतीने शेती केली जाते. परंतू उत्पन्न वाढविण्यासाठी सात वर्षांपूर्वी गावातील महिलांनी कृषी विभाग, उमेद योजनेअंतर्गत भैरीभवानी महिला समूह गटाची स्थापना केली. सध्या या गटामध्ये निर्मला गोसावी (अध्यक्षा), मानसी गोसावी (सचिव), संगीता गोसावी, गीतांजली गोसावी, सुरेखा गोसावी, साक्षी गोसावी, कल्पना गोसावी, नर्मदा गोसावी, दीपिका गोसावी, शेवंती गोसावी, अनसूया गोसावी या सदस्या कार्यरत आहेत. गट स्थापन झाल्यानंतर पहिल्या वर्षी गटातील महिलांनी तीन एकरांवर भाजीपाला लागवडीचे नियोजन केले. बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन भेंडी, काकडी, मिरची, कारली, टोमॅटो आणि झेंडू लागवड केली. भाजीपाला लागवडीसाठी गटाने ठिबक सिंचन, आच्छादन तंत्राचा वापर केला. जमीन मशागत, भाजीपाला बियाणे, खते आदी निविष्ठाच्या खरेदीसाठी गटातील महिलांनी दागिने गहाण ठेवून प्रारंभिक खर्चासाठी रक्कम उभी केली. कृषी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार महिलांनी सुधारित पद्धतीने भाजीपाला लागवड केली. डिसेंबर ते मे महिन्यापर्यंत महिलांनी गाव परिसरातील बाजार तसेच चिपळूण बाजारपेठेत भाजीपाल्याची विक्री केली. पहिल्या वर्षी खर्च वजा जाता प्रत्येक सदस्याला दहा हजारांचा नफा झाला. सलग तीन वर्षे गटाने भाजीपाला लागवड यशस्वी केली. त्यानंतर गटाने सामूहिक पद्धतीने एक एकरावर भात लागवड सुरू केली आहे. याचबरोबरीने कुळीथ, मूग, मटकी लागवड केली जाते. भाजीपाला, भात शेती यशस्वी झाल्यानंतर गटाने शेळीपालनाचा निर्णय घेतला. शेळीपालनाची जोड  शेतीच्या बरोबरीने आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी दोन वर्षांपूर्वी महिला गटातील पाच सदस्या शेळीपालनाकडे वळल्या. कोकणामध्ये शिमगोत्सवादरम्यान शेळी, बोकडांना मागणी असते. शेळीपालन व्यवसायासाठी गटाने बॅंकेकडून अडीच लाख रुपयांचे कर्ज घेतले. गटाने सुरुवातीला दहा गावठी शेळ्या विकत घेतल्या. मानसी गोसावी यांच्या शेडमध्ये या शेळ्यांचे संगोपन केले जाते. सध्या गटाकडे ६० शेळ्या, २० बोकड आणि २० करडे आहेत. पाचही सदस्या या शेळ्यांचे दैनंदिन व्यवस्थापन पाहतात. दररोज सकाळी शेळ्यांना गावशिवारातील डोंगरात चरायला नेण्यात येते. संध्याकाळी शेळ्यांना चारा, पेंड, भुसा असे खाद्य दिले जाते. शेळ्या चारण्यासाठी दर आठवड्याला दोघी जणी असे नियोजन आहे. शेळ्यांना वर्षभर सकस चारा उपलब्ध होण्यासाठी गटातर्फे एक एकरावर नेपिअर गवताची लागवड करण्यात आली आहे. दरमहा शेळ्यांच्या व्यवस्थापनाचा खर्च आठ हजारांपर्यंत होतो. शेळ्यांना पशुतज्ज्ञांच्या शिफारशीनुसार लसीकरण केले जाते. औषधोपचारासाठी गटातील सदस्यांना मंगेश गोसावी आणि संतोष गोसावी यांची मदत होते. गाव परिसरात बोकडांना चांगली मागणी असते. एक बोकड सरासरी २० ते २५ किलोच्या दरम्यान असतो. शक्यतो वजनावर विक्री केली जाते. पहिल्या वर्षी शेळीपालनातून गटाला सर्वसाधारणपणे सत्तर हजारांचा फायदा झाला. ही रक्कम गटातील सदस्यांनी वाटून घेतली. शेळ्यांची संख्या वाढत असल्याने येत्या काळात नवीन सामूहिक शेड बांधण्याचे नियोजन महिलांनी केले आहे. संपर्क : मानसी गोसावी, ९३५९३७५३७६ हळद, झेंडू ठरले फायदेशीर... म्हाप्रळ (ता. मंडणगड, जि. रत्नागिरी) येथे जागृती ग्रामसंघांतर्गत काम करणाऱ्या महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून हळद आणि झेंडू लागवडीचे प्रशिक्षण घेतले. ग्रामसंघामध्ये १५० महिला कार्यरत आहेत. या गावातील राधाबाई स्वयंसाह्यता महिला समूहातील सदस्या प्रतिमा तांबे यांनी पारंपरिक पिकांच्या बरोबरीने हळद, झेंडू विक्रीतून आर्थिक मिळकत वाढविण्यास सुरुवात केली आहे. बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन दोन वर्षांपूर्वी प्रतिमा तांबे, ज्योती तांबे, नवीना घाणेकर, मनीषा जाधव यांनी एकत्र येऊन झेंडू, हळद लागवडीचे नियोजन केले. २०१९ मध्ये उमेद आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात महिलांनी हळद लागवडीचे प्रशिक्षण घेतले. कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्याने या महिलांनी दोन गुंठे क्षेत्रावर हळदीच्या सेलम जातीची लागवड केली. योग्य पीक व्यवस्थापन केले. हळकुंड विक्री न करता गटातील सदस्यांनी हळद पावडर तयार करून थेट ग्राहकांना विक्री करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या वर्षी या महिलांनी १४ किलो हळद २४० रुपये प्रति किलो दराने गाव परिसरातील ग्राहकांना विकली. विक्रीसाठी पाव किलोची पाकिटे तयार करण्यात आली होती. त्यामुळे ग्राहकांकडून चांगली मागणी मिळाली. दुसऱ्या वर्षी १५ किलो हळद पावडर तयार झाली. खर्च वजा जाता सदस्यांना अडीच हजारांचा नफा मिळाला. यंदाच्या वर्षी देखील सदस्यांनी हळद लागवडीचे नियोजन केले आहे. सणाच्या काळात झेंडू फुलांची मागणी लक्षात घेऊन प्रतिभा तांबे यांनी एक गुंठा क्षेत्रावर झेंडू लागवड केली होती. १० ते २० फुलांचा एक वाटा या प्रमाणे गावामध्येच त्यांनी झेंडू फुलांची विक्री केली. खर्च वजा जाता तीन हजारांचे उत्पन्न मिळाले. यंदाच्या वर्षी देखील त्यांनी झेंडू लागवडीचे नियोजन केले आहे. पशुपालनाची जोड  म्हाप्रळ येथील क्रांती स्वयंसाह्यता समूहातील सदस्या मनीषा मनोज जाधव यांनी शेतीला म्हैसपालनाची जोड दिली आहे. पहिल्या टप्प्यात त्यांनी तीन गावठी म्हशी घेतल्या. या म्हशींचे चांगले आरोग्य आणि आहार व्यवस्थापन ठेवले. त्यामुळे दूध विक्रीतून अपेक्षित नफा मिळू लागला. सध्या त्यांच्याकडे चार म्हशी आहेत. सध्या दररोज ५ ते ७ लिटर दुधाची ग्राहकांना विक्री होते. म्हैसपालनाच्या बरोबरीने गावातील चार महिलांना सोबत घेऊन आठवडी बाजार तसेच अन्य ठिकाण खाद्य पदार्थाचे दुकान सुरू करून उत्पन्नवाढीचा त्यांचा प्रयत्न असतो. या व्यवसायासाठी त्यांनी गटातून पंधरा हजार रुपयांचे खेळते भांडवल घेतले होते. त्याचा चांगला फायदा महिलांना झाला आहे. संपर्क : प्रतिभा तांबे, ७८२१९३७४६०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com