agricultural news in marathi agro advisory | Agrowon

कृषी सल्ला :आंबा, सुपारी, काजू, नारळ

डॉ. विजय मोरे, डॉ. शीतल यादव
शुक्रवार, 23 एप्रिल 2021

नवीन लागवड केलेल्या नारळ बागेत ३ ते ४ वर्षे वयापर्यंतच्या माडांना ४ ते ५ दिवसांच्या अंतराने पाणी देण्याची व्यवस्था करावी. तसेच कडक उन्हामुळे पाने करपू नयेत म्हणून रोपांना वरून सावली करावी.

नवीन लागवड केलेल्या नारळ बागेत ३ ते ४ वर्षे वयापर्यंतच्या माडांना ४ ते ५ दिवसांच्या अंतराने पाणी देण्याची व्यवस्था करावी. तसेच कडक उन्हामुळे पाने करपू नयेत म्हणून रोपांना वरून सावली करावी.

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार रत्नागिरी जिल्ह्यात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहील. दिनांक २१ ते २५ एप्रिल, २०२१ दरम्यान कमाल आणि किमान तापमानात वाढ संभवते. तसेच दिनांक २२ ते २४ एप्रिल, २०२१ दरम्यान आकाश ढगाळ राहील.

आंबा 

 • फळधारणा.
 • काढणीस तयार असलेल्या चौदा आणे (८० ते ८५ टक्के) तयार आंबा फळांची काढणी देठासह झेल्याच्या साह्याने करावी. आंबा काढणी सकाळी लवकर किंवा संध्याकाळी ४ नंतर करावी. उष्णतेमुळे फळांचे तापमान वाढून साक्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. यासाठी आंब्याची फळे काढल्यानंतर लगेच सावलीमध्ये ठेवावीत. तसेच आंबा फळांची वाहतूक रात्रीच्या वेळेस करावी. फळे काढणीच्या किमान ८ दिवस अगोदर झाडावर कोणतीही फवारणी करू नये.
 • देठकुजव्या आणि फळकूज या काढणीपश्‍चात बुरशीजन्य रोगांपासून आंबा फळांचे संरक्षण करण्यासाठी फळे काढणीनंतर लगेच ५२ अंश सेल्सिअस तापमानाच्या पाण्यात १० मिनिटे बुडवून काढावीत. नंतर फळे पिकविण्यासाठी ठेवावीत. कोरूगेटेड फायबर बॉक्समध्ये फळे पॅकिंग करावीत.
 • ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असल्याने मोठ्या आकाराच्या आंबा फळांवर फळमाशीचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता आहे. बागेमधील गळलेली फळे गोळा करून नष्ट करावीत. आंबा फळांचे फळमाशीपासून संरक्षण करण्यासाठी विद्यापीठाने शिफारस केलेले ‘रक्षक फळमाशी सापळा’ एकरी २ या प्रमाणात लावावेत. सापळा झाडांच्या उंचीप्रमाणे साधारण जमिनीपासून २ ते ३ मीटर उंचीवर राहील अशा प्रकारे टांगावा.
 • गोटी ते अंडाकृती आकाराच्या आंबा फळांवर दापोली कृषी विद्यापीठाने दिलेल्या शिफारशीनुसार फळगळ कमी करण्यासाठी, फळाचा आकार व वजन वाढून डागविरहित फळांसाठी आणि फळमाशीपासून तसेच प्रखर सूर्यकिरणापासून संरक्षण करण्यासाठी २५ बाय २० सेंमी आकाराची कागदी पिशवी लावावी. आवरण घालताना फळाच्या देठाकडे इजा होणार नाही याची काळजी घ्यावी.
 • नवीन लागवड केलेल्या आंबा कलमांना पहिल्या वर्षी आठवड्यातून २ वेळा, तर दुसऱ्या वर्षी १५ दिवसांतून २ वेळा व तिसऱ्या वर्षी महिन्यातून २ वेळा प्रत्येक कलमांना ३० लिटर पाणी देण्याची व्यवस्था करावी. तसेच झाडाच्या आळ्यामध्ये गवताचे आच्छादन करावे.

काजू 

 • फळधारणा
 • तापमानात वाढ संभवत असल्याने नवीन लागवड केलेल्या काजू कलमांना ८ दिवसांच्या अंतराने १५ लिटर पाणी प्रति कलम देण्याची व्यवस्था करावी.
 • झाडाच्या बुंध्याभोवती गवताचे आच्छादन करावे.

नारळ 

 • फळधारणा
 • नवीन नारळ लागवडीसाठी किमान १ मीटर खोलीपर्यंत कसदार, भुसभुशीत आणि पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीची निवड करावी.
 • नारळावरील इरिओफाईड कोळीच्या प्रादुर्भावामुळे फळाच्या देठाखालच्या भागात पांढरट, पिवळे, त्रिकोणी चट्टे दिसून येतात. प्रादुर्भित भागावरील फळांचे आवरण तडकते. परिणामी, नारळ लहान राहतात. तसेच लहान फळांची गळ होते. किडीच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी, नारळ बागेत स्वच्छता ठेवावी. नारळाच्या आळ्यामध्ये ओलावा टिकविण्यासाठी नारळाच्या शेंड्या पुराव्यात आणि झावळ्यांचे आच्छादन करावे. तसेच ५ टक्के कडुनिंबयुक्त कीटकनाशक (ॲझाडिराक्टीन) ७.५ मिलि अधिक ७.५ मिलि पाणी मिसळून द्रावण तयार करावे. हे द्रावण वर्षातून तीन वेळा (ऑक्टोबर ते नोव्हेंबर, जानेवारी ते फेब्रुवारी आणि एप्रिल ते मे) मुळाद्वारे द्यावे. द्रावण दिल्यानंतर ४५ दिवसांपर्यंत नारळ काढू नयेत.
 • याशिवाय नारळावर कडुनिंबयुक्त कीटकनाशक (१ टक्का) ४ मिलि प्रति लिटर पाण्यातून नारळाच्या घडावर पडेल अशी फवारणी करावी. फवारणी करण्यापूर्वी सर्व कीडग्रस्त व तयार नारळ काढून घ्यावेत. पडलेली फळे, फुलोरा गोळा करून नष्ट करावेत.
 • नवीन लागवड केलेल्या नारळ बागेत ३ ते ४ वर्षे वयापर्यंतच्या माडांना ४ ते ५ दिवसांच्या अंतराने पाणी देण्याची व्यवस्था करावी. तसेच कडक उन्हामुळे पाने करपू नयेत म्हणून रोपांना वरून सावली करावी.

सुपारी 

 • फळधारणा
 • तापमानात वाढ संभवत असल्याने सुपारी बागेस ४ ते ५ दिवसांच्या अंतराने पाणी देण्याची व्यवस्था करावी.
 • कडक उन्हामुळे नवीन लागवड केलेल्या सुपारीच्या रोपांची पाने करपू शकतात. म्हणून रोपांना वरून सावली करावी.

पांढरा कांदा 

 • पक्वता
 • कांदा पात ६० ते ७५ टक्के पिवळे पडून आडवी पडली असल्यास (माना मोडणे) कांदा पिकाची काढणी करावी.

भुईमूग 

 • शेंगा अवस्था
 • शेंगा भरण्याच्या अवस्थेतील भुईमूग पिकांस १० ते १२ दिवसांच्या अंतराने पाणी देण्याची व्यवस्था करावी.

उन्हाळी भात 

 • फुलोरा ते दाणे भरण्याची अवस्था
 • उन्हाळी भात फुलोरा ते दाणे भरण्याच्या अवस्थेत असल्याने खाचरात पाण्याची पातळी ५ सें.मी.पर्यंत नियंत्रित करावी.

हळद 

 • पूर्वमशागत
 • हळद लागवड करावयाच्या जमिनीची पूर्वमशागत करण्यास सुरुवात करावी. यासाठी पहिली नांगरणी १८ ते २२ सें.मी. खोल करून जमीन १५ ते २० दिवस उन्हात तापून द्यावी. जेणेकरून कीड, रोगाच्या सुप्तावस्था नष्ट करण्यास मदत होईल.

आले 

 • पूर्वमशागत
 • आले लागवड करावयाच्या जमिनीची पूर्वमशागत करण्यास सुरुवात करावी. यासाठी जमिनीची पहिली नांगरणी १८ ते २२ सें.मी. खोल करून जमीन १५ ते २० दिवस उन्हात तापून द्यावी. जेणेकरून कीड, रोगाच्या सुप्तावस्था नष्ट करण्यास मदत होईल.

भाजीपाला पिके 

 • फळधारणा
 • तापमानात वाढ संभवत असल्याने भाजीपाला पिकाला ४ ते ५ दिवसांच्या अंतराने नियमित पाणी देण्याची व्यवस्था करावी.

माती परीक्षण 

 •  सर्वसाधारणपणे दर ३ ते ४ वर्षांतून एकदा खरीप पीककाढणी नंतर लगेच किंवा एप्रिल-मे महिन्यामध्ये माती परीक्षण करणे आवश्यक आहे. परंतु वर्षातून २ ते ३ वेळा लागवडीखालील जमिनीचे माती परीक्षण दरवर्षी करणे जरुरीचे आहे.
 •  हंगामी पिकांकरिता (भात, नागली, भुईमूग) २० ते २५ सेंमी आणि फळबाग पिकांकरिता (आंबा, काजू, नारळ सुपारी) ६० सेंमी खोलीवरचे मातीचे नमुने घ्यावेत.

पशुधन 

 • तापमानात वाढ संभवत असल्याने जनावरांच्या शरीराचे तापमान संतुलित राहण्यासाठी जनावरांना ताजे, स्वच्छ व थंड पाणी मुबलक प्रमाणात द्यावे.
 • उष्णतेचा ताण कमी करण्यासाठी वैरणीवर १ टक्का गूळपाणी आणि ०.५ टक्का मीठ यांचे स्वतंत्र द्रावण करून शिंपडावे.
 • उष्णतेपासून जनावरांचे संरक्षण करण्याकरिता दुपारच्या वेळी जनावरांच्या अंगावर थंड पाणी शिंपडावे. त्यामुळे शरीराचे तापमान कमी होण्यास मदत होईल.
 • जनावरांना पशुवैद्यकाच्या सल्लाने फऱ्या रोगावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लसीकरण करून घ्यावे

कुक्कुटपालन 

 • तापमानात वाढ संभवत असल्याने कुक्कुटपालन शेडमध्ये पाण्याची भांडी वाढवावी. पिण्यासाठी स्वच्छ आणि थंड पाण्याची मुबलक प्रमाणात देण्यात यावे.
 • कोंबड्यातील राणीखेत रोगावर पशुवैद्यकाच्या सल्ल्याने लसीकरण करून घ्यावे.

- (०२३५८) २८२३८७
डॉ. विजय मोरे, ९४२२३७४००१
डॉ. शीतल यादव, ८३७९९०११६०
(ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि कृषी विद्या विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली)


इतर ताज्या घडामोडी
पशुवैद्यक करणार घरपोच सेवा बंदनागपूर : पशुवैद्यकांना फ्रंटलाइन वर्कर्स व कोरोना...
सोयाबीन बियाणे निर्बंध मध्य प्रदेशकडून...पुणे ः परराज्यांत सोयाबीन बियाणे विक्रीवर निर्बंध...
‘महाबीज’चे सोयाबीन बियाणे दर ‘जैसे थे’अकोला : खरीप हंगामासाठी ‘महाबीज’ने सोयाबीन...
देशाच्या तुलनेत निम्मी साखर एकट्या...कोल्हापूर : देशाच्या साखरनिर्यात कोट्यापैकी जवळ...
‘गोकुळ’चा कल सत्तांतराकडेकोल्हापूर : अत्यंत चुरशीने झालेल्या कोल्हापूर...
‘सह्याद्री’च्या पर्वतरांगेमधून...नाशिक : सह्याद्रीच्या पर्वतरांगेत पश्‍चिम घाट...
राज्यात आंब्याचा हंगाम ऐन बहरातअकोल्यात बदाम आंबा ४००० ते ४५०० रुपये क्विंटल...
सोशल मीडियाद्वारे ६५ टन कलिंगड विक्रीपुणे : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी एप्रिल...
मध्य प्रदेश सरकारकडून बियाणे विक्रीवर...पुणे ः सोयाबीन बीजोत्पादनात देशात सर्वात मोठा...
पशुखाद्य निर्मितीचा कच्चा माल दुपटीने...सांगली : पशुखाद्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या...
दक्षिण भागात गारपिटीची शक्यतापुणे :  गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका...
परभणी जिल्ह्यात कडक निर्बंध लागूपरभणी ः  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी...
परभणी जिल्ह्यात लघु तलावांत सरासरी १९...परभणी ः वाढते तापमान, बाष्पीभवनाचा वाढलेला वेग,...
नाशिक जिल्ह्यात बाजार समित्यांमध्ये...नाशिक : पणन विभागाच्या परिपत्रकात सलग ३...
नाशिक : 'ऑक्सिजन एक्स्प्रेस'द्वारे २७....नाशिक : ‘‘जिल्ह्यातील प्राणवायूची तूट भरून...
सांगलीत केळीच्या क्षेत्रात घट होण्याची...सांगली ः जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात झालेल्या...
रत्नागिरीत ३७ टन काजू बी तारणरत्नागिरी ः काजूचे बाजारातील दर घसरल्यानंतर...
आदिवासी विकास मंडळ करणार गव्हाची खरेदीयवतमाळ : आदिवासी विकास महामंडळाकडून राज्यात...
परभणीत सोयाबीनचे दीड हजार क्विंटल...परभणी ः परभणी तालुक्यात यंदा ११० हेक्टरवर उन्हाळी...
भुईमुगाचे वाण निकृष्ट, कंपन्यांवर...यवतमाळ : जिल्ह्यात भुईमुगाच्या शेंगा न धरण्याचे...