संत्रा प्रक्रियेतून शेतकरी कंपनीची उलाढाल चार कोटींवर

वरुड (जि. अमरावती) येथील श्रमजीवी नागपुरी संत्रा फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीने आधुनिक स्वयंचलित अशा संत्रा प्रक्रिया प्रकल्प उभारला आहे. तो शेतकरी कंपनीचा असा एकमेव प्रकल्प ठरला असून, तिसऱ्याच वर्षी चार कोटी सतरा लाखांवर पोहोचली आहे.
quality oranges are packed in Shramjivi Nagpuri Orange project
quality oranges are packed in Shramjivi Nagpuri Orange project

वरुड (जि. अमरावती) येथील श्रमजीवी नागपुरी संत्रा फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीने आधुनिक स्वयंचलित अशा संत्रा प्रक्रिया प्रकल्प उभारला आहे. तो शेतकरी कंपनीचा असा एकमेव प्रकल्प ठरला असून, तिसऱ्याच वर्षी चार कोटी सतरा लाखांवर पोहोचली आहे. विदर्भाचे मुख्य फळपीक संत्रा आहे. अमरावती जिल्ह्यातील सुमारे एक लाख हेक्टर क्षेत्रावर संत्रा लागवड आहे. संत्र्याची टिकवण क्षमता वाढण्यासोबतच त्याचा दर्जा राखला जावा याकरिता पहिल्या टप्प्यात ग्रेडिंग, वॅक्स कोटिंग केले जाते. पूर्वी अशाप्रकारचे प्रकल्प बोटावर मोजण्याइतकेच होते. मात्र या संदर्भात जागृती वाढल्याने अशा प्रकल्पांची संख्या वाढली आहे. वरुड (जि. अमरावती) येथील श्रमजीवी नागपुरी संत्रा फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीने आधुनिक स्वयंचलित अशा संत्रा प्रक्रिया प्रकल्प उभारला आहे. तो शेतकरी कंपनीचा असा एकमेव प्रकल्प ठरला आहे.  ४०० शेतकऱ्यांनी उभारली कंपनी श्रमजीवी नागपुरी संत्रा उत्पादक कंपनीची स्थापना २२ सप्टेंबर २०१५ रोजी करण्यात आली. सात संचालकासह कंपनीचे तब्बल ४६८ भागधारक आहेत. कंपनीच्या एका शेअर्सची किंमत एक हजार रुपये असून, चार लाख ६८ हजार रुपयांचे भागभांडवल उभे केले आहे. कंपनीचे अध्यक्ष नीलेश मगरदे आहेत. प्रमोद कोहळे, सुभाष शेळके, रवींद्र ढोक, मनीष लोखंडे, केतकी गिद, रेखाताई जिचकार हे संचालक असून, तज्ज्ञ संचालक म्हणून विष्णुपंत निकम, ताजखान मजनेखान हे काम पाहतात. भाडेतत्त्वावरील जागेत उभारला प्रकल्प शेतकरी कंपनीने वरुड बाजार समितीच्या संत्रा लिलाव मंडी परिसरात हा प्रकल्प उभारला असून, त्याकरिता २०१९ मध्ये बाजार समितीसोबत वीस वर्षांचा भाडेकरार केला आहे.  ९० बाय १०० फूट आकार क्षेत्रासाठी प्रति वर्ष साठ हजार रुपये भाडे दिले जाते. या जागेवर शेतकरी उत्पादक कंपनीने अर्ध्या उंचीपर्यंत सिमेंट विटांची भिंती व त्यावर आणि बाजूस टीन पत्र्याचे शेड उभारले आहे. यामुळे बांधकामावरील खर्चात बचत झाल्याचे रमेश जिचकार सांगतात. वरुड बाजार समितीत पूर्वी संत्र्याचे व्यवहार होत असत. आता संत्रा ग्रेडिंग, कोटिंग प्रकल्पही सुरू झाला आहे. शेतकऱ्यांच्या मालावर थेट बाजार समिती परिसरातच प्रक्रिया करणे शक्य होणार आहे. अशाप्रकारचा प्रकल्प असलेली वरुडची बाजार समिती विदर्भात एकमेव ठरली आहे.  कंपन्यांसोबत केले मार्केटिंग लिंकेज प्रक्रिया केलेल्या संत्रा विक्रीसाठी बिग बास्केट, मोअर रिलेट लिमिटेड या कंपन्यांसोबत मार्केटिंग लिंकेज करण्यात आले. १८०० टनांपर्यंत संत्रा फळांचा पुरवठा या कंपन्यांना हंगामात करण्यात आला. आंबिया बहरातील संत्रा फळांची या कंपन्यांची मागणी राहते. एक हजार रुपये प्रति टन याप्रमाणे या कंपन्यांकडून शेतकरी उत्पादक कंपनीला ग्रेडिंग आणि वॅक्स कोटिंगसाठी शुल्क अदा करण्यात आले. कंपन्यांकडून शेतकऱ्यांच्या बागेची पाहणी करून त्याची खरेदी होते. नंतर फळांची तोडणी करून तो माल प्रक्रिया केंद्रात आणला जातो. या ठिकाणी ग्रेडिंग, वॅक्सिंग प्रक्रिया केली जाते. या महत्वाकांक्षी उपक्रमाची सुरुवात जिल्हाधिकारी शैलेश नवाल आणि आमदार देवेंद्र भुयार यांच्या उपस्थितीत करण्यात आली होती. त्यासोबतच अन्य खासगी व्यापाऱ्यांना मागणीनुसार एक हजार रुपये प्रति टनाप्रमाणे प्रक्रिया करून दिली जाते. लहान म्हणजेच ५० मि.मी. आकाराच्या फळाचा पुरवठा सिट्रस प्रोसेसिंग इंडस्ट्रीज, नांदेड यांनी केला. त्याला १३ रुपये प्रति किलो असा दर मिळाला.  भागधारकांना देणार लाभांश ६० टक्के प्रक्रिया खर्च होतो, तर उर्वरित ४० टक्के हे निव्वळ नफा उरतो. कंपनी नफ्यात असल्याने पहिल्याच वर्षी भागधारकांना लाभांश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आठ ते दहा टक्के याप्रमाणे हा लाभांश देण्याचे प्रस्तावित असल्याचे संचालक मंडळाने सांगितले. किसान रेल्वेचा पर्याय ठरला फायद्याचा  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने संत्रा वाहतूक कमी खर्चात आणि वेळेत व्हावी याकरिता किसान रेल्वेचा पर्याय उपलब्ध केला होता. या किसान रेलच्या माध्यमातून दोन हजार टनांपेक्षा अधिक संत्र्याची वाहतूक वरुड ऑरेंज सिटी रेल्वे स्थानकावरून झाली. त्यामध्ये श्रमजीवी शेतकरी उत्पादक कंपनीसह शेतकरी, व्यापाऱ्यांच्या संत्र्यांचा समावेश होता. ऑपरेशन ग्रीन अंतर्गत आत्मनिर्भर योजनेतून ५० टक्के अनुदानावर ही वाहतूक झाल्याने शेतकऱ्यांना याचा चांगला फायदा झाला. दिल्ली आणि कोलकाता भागात संत्रा पाठविण्यात आला. बांगलादेशातील बेनापोलला देखील किसान रेल्वेने संत्रा पाठविण्याचे प्रस्तावित होते. मात्र तेथील स्थानकावर एकाचवेळी संत्रा अनलोडिंगची सुविधा नसल्याने ते शक्य झाले नाही.  प्रकल्पाकरिता उभारला निधी संचालकांकडून घेतलेल्या अनामत रकमेसोबतच बँक कर्जाच्या माध्यमातून ४० लाख रुपयांची उभारणी करण्यात आली. एकूण एक कोटी ६० लाख रुपये खर्चून हा प्रकल्प उभारला. यातील ९५ लाख रुपयांचा निधी कृषी विभागाच्या गटशेती योजनेतून अनुदान स्वरूपात मिळाला. या रकमेतून शेडचे बांधकाम, यंत्रसामग्री त्यासोबतच कंपनीचे कार्यालय अशी कामे केली. ४०० चौरस फूट आकाराचा शेतकरी प्रशिक्षण हॉलही बांधला आहे. कोरोनामुळे प्रशिक्षण वर्गांचे आयोजन शक्य झाले नसले, तरी पुढे या कामाला गती देण्याचा मानस कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश जिचकार यांनी व्यक्त केला.  स्नोको ब्रॅण्ड केला विकसित श्रमजीवी नागपुरी संत्रा उत्पादक कंपनीने संत्र्याच्या ब्रॅण्डिंगकरिता स्वतःचा ‘स्नोको’ ब्रॅण्ड विकसित केला आहे. या माध्यमातून सात टन संत्र्यांची पुणे बाजारपेठेत विक्री करण्यात आली. २९ रुपये प्रति किलो या प्रमाणे दरानुसार पुण्यातील संबंधित व्यापाऱ्यांशी करार करण्यात आला होता.  असे आहे प्रस्तवित उपक्रम 

  • कंपनीने १०० चौरस फुटांचे व्यावसायिक गाळा  बांधला असून, कृषी निविष्ठा विक्री व सल्ला केंद्रही चालवले जाते. मात्र कोरोनामुळे या उपक्रमाला अपेक्षीत प्रतिसाद मिळालेला नाही. 
  • कंपनीला १४ लाख ८७ हजार रुपये किंमतीची अवजारे बँक मंजूर झाली आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातील या अवजारे बँक सुरू करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना भाडेतत्त्वावर विविध अवजारे पुरवली जातील. 
  • पणन संचलनालयाच्या मॅग्नेट प्रकल्पातून विविध उपक्रमांकरीता ६० टक्के अनुदान मिळते. त्या अंतर्गंत ५० किलोवॉट क्षमतेचा सौरऊर्जा वीजनिर्मिती प्रकल्प शेतकरी उत्पादक कंपनीने प्रस्तावित केला आहे. 
  • ३० मेट्रिक टन क्षमतेचे प्रीकूलिंग चेंबर, शीतगृहाची उभारणी करण्यात येणार आहे. सोबतच फळांच्या वाहतुकीकरिता वातानुकूलित व्हॅनही घेण्याचे नियोजन आहे. अडीच कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्याकरिता मॅग्नेट प्रकल्पातून अनुदानाची तरतूद आहे. 
  • उभारली आधुनिक यंत्रणा 

  • कंपनीने १०० टन प्रति दिवस क्षमतेचा ग्रेडिंग आणि वॅक्स कोटिंग प्रकल्पाची उभारणी केली आहे. 
  • शेतकऱ्याचा माल आल्याबरोबर स्मॉल फ्रूट अ‍ॅलिमेनटरद्वारे ५० मि.मी. आकारापेक्षा लहान फळे वेगळी केली जातात. त्यानंतर उर्वरित फळे बाजारात मागणी असलेल्या ग्रेडची शिल्लक राहतात. 
  • दुसऱ्या प्रक्रियेत संत्रा फळे धुतली जातात. ब्रशच्या साह्याने त्यावरील पाणी पुसले जातो. 
  • त्यावर मेणाचा थर (वॅक्स कोट) दिला जातो. हा थर संयंत्राच्या आतच वाळतो. 
  • कोरडी झालेली फळे ग्रेडिंग मशिनमध्ये जातात. इथे कॅमेरा सेन्सर ग्रेडिंग पद्धतीचा अवलंब केला आहे. परिणामी, अचूक प्रतवारी होते. ५५ ते ६०, ६० ते ६५, ६५ ते ७०, ७० ते ७५ मि.मी. अशाप्रकारचे सहा आउटलेट असून त्या आकाराची फळे बाहेर पडतात. अशा प्रकारची सलग १०० फुटांची एकच यंत्रणा उभारली आहे. या साऱ्या प्रक्रिया एकाच प्लॅटफॉर्मवर होतात. 
  • साधारणतः ६० ते ७५ एम.एम. आकाराच्या फळांना बाजारात ग्राहकांची मागणी अधिक राहते.  या प्रकल्पाच्या माध्यमातून ३५ जणांना रोजगार मिळाला आहे. 
  • अशी आहे उलाढाल (आकडे रुपयांत) ६०,२२,२२५ २०१८-१९ १,७६,५०,४८४ २०१९-२० ४,१७,५०,००० २०२०-२१ - रमेश जिचकार (मुख्य कार्यकारी अधिकारी),  ९८२३२५३५०१

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com