agricultural news in marathi agro advisoryManagement of pink bollworm on cotton | Agrowon

असे करा कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन

डॉ. राजरतन खंदारे, डॉ. अनंत लाड (बडगुजर)
शुक्रवार, 22 ऑक्टोबर 2021

सध्या कपाशीचे पीक बोंडे धरण्याच्या किंवा धरलेल्या अवस्थेत आहे. अशा कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. गुलाबी बोंड अळीच्या केवळ रासायनिक कीटकनाशकाचा वापर करण्याऐवजी एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अवलंब केला पाहिजे.
 

सध्या कपाशीचे पीक बोंडे धरण्याच्या किंवा धरलेल्या अवस्थेत आहे. अशा कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. गुलाबी बोंड अळीच्या केवळ रासायनिक कीटकनाशकाचा वापर करण्याऐवजी एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अवलंब केला पाहिजे.

सध्या कपाशीचे पीक बोंडे धरण्याच्या किंवा धरलेल्या अवस्थेत आहे. अशा कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. दरम्यानच्या काळात बीटी कपाशी वाणांमुळे बोंड अळ्यांचा प्रादुर्भाव कमी झाला होता. मात्र गुलाबी बोंडअळी या किडीची त्यासाठी प्रतिकारशक्ती वाढली आहे. परिणामी या किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो. त्यांच्या व्यवस्थापनासाठी केवळ रासायनिक कीटकनाशकाचा वापर करण्याऐवजी एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अवलंब केला पाहिजे.

गुलाबी बोंडअळीच्या विविध अवस्था
अंडी : अंडी आकाराने चपटी, लंबगोल, १ मि.मी. लांब असतात. रंगाने मोत्यासारखी चमकदार पांढरी असून पृष्ठभाग खडबडीत असतो. अंडी सुरवातीला हिरवट रंगाची असून पक्व झाल्यावर लालसर किंवा नारंगी दिसतात.

अळी : अंड्यातून निघालेली अळी लहान, १ मि.मी. लांब, पांढरी असून तिचे डोके तपकिरी असते. पूर्ण वाढलेली अळी ११-१३ मि.मी. लांब, लंबगोलाकार, पांढरी असून प्रत्येक वलयावर गुलाबी पट्टा असतो. हा गुलाबी पट्टा नंतर पूर्ण शरीरावर पसरतो. त्यामुळे पूर्ण शरीर गुलाबी दिसते. नर अळीच्या शरीरातील गडद तपकिरी जननग्रंथी वरच्या बाजूने दिसतात.

कोष : कोष लालसर तपकिरी, ८-१० मि.मी. लांब असून मागची बाजू टोकदार असते.

पतंग : पतंग ८-९ मि.मी .लांब, करड्या तपकिरी रंगाचे असून समोरच्या पंखावर काळ पट्टे असतात. मागील पंख रुपेरी करडी असून कडांना झालर असते.

जीवनक्रम 
कोषातून उत्पत्ती झाल्यानंतर २-३ दिवसांनी नर व मादी पतंगाचे मिलन होते. मादी पतंग पहिल्या पिढीची अंडी ही कपाशी कायिक वाढीच्या अवस्थेत असताना पात्याजवळ किंवा पात्यावर घालते. दुसऱ्या व त्यानंतरच्या पिढीची अंडी बोंडावर घालते. अंडी एक एकटी किंवा ४-५ च्या समूहात असतात. एक मादी १०० पेक्षा जास्त अंडी घालते. अंडी अवस्था ३-७ दिवसांची असून, अंड्यातून निघालेली अळी ताबडतोब पाते, फुले किंवा बोंडामध्ये शिरते. अळी तीन वेळा कात टाकते. अळीचे दोन प्रकारचे जीवनक्रम असतात.

  • कमी कालावधीचा जीवनक्रम (पूर्ण वाढलेली अळी कोषावस्थेत जाते. त्यातून ताबडतोब पतंग बाहेर पडून पुढील जीवनक्रम होतो.) कमी कालावधीचा जीवनक्रम असलेल्या अळ्या बोंडाला छिद्र करून बाहेर पडून जमिनीवर पालापाचोळ्यात कोषावस्थेत जातात किंवा पूर्ण वाढलेली अळी बोंडाला छिद्र करते व बोंडामध्येच कोषावस्थेत जाते. अळी अवस्था ८-२१ दिवस असते. कोषावस्था ६-२० दिवस असते. कोषावस्थेतून पतंग बाहेर पडतात. साधारणपणे नर-मादीचे प्रमाण १:१ असते. पतंग ५-३१ दिवस जगतात. हा जीवनक्रम ३-४ आठवड्यात पूर्ण होतो.
  • दीर्घ कालावधीचा जीवनक्रम (पूर्ण वाढलेली अळी सुप्त अवस्थेत राहते.) दीर्घ कालावधीचा जीवनक्रम असलेल्या अळ्या स्वत:भोवती गोलाकार कोष विणून त्यात सुप्तावस्थेत राहतात. ही सुप्तावस्था पुढील हंगामापर्यंत किंवा दोन वर्षे देखील राहते. हा दीर्घ कालावधीचा जीवनक्रम हंगामाच्या शेवटी आढळून येतो. हा जीवनक्रम ५-१० महिन्यात पूर्ण होतो. वर्षभरात ४ ते ६ पिढ्यांची उत्पत्ती होते.

मुख्य यजमान वनस्पती : कापूस, अंबाडी, भेंडी

नुकसानीचा प्रकार
अंड्यातून निघालेली अळी पाते, कळ्या, फुले व बोंडाना छोटे छिद्र करून आत शिरते. सुरवातीला अळ्या पाते, कळ्या, फुलांवर उपजीविका करतात. प्रादुर्भाव ग्रस्त फुले अर्धवट उमललेल्या गुलाबाच्या कळीसारखी दिसतात. अशा कळ्यांना डोमकळ्या म्हणतात. प्रादुर्भाव ग्रस्त पाते, बोंडे गळून पडतात किंवा परिपक्व न होताच फुटतात व गळून गेलेली बोंडे सडतात. बोंडामध्ये एकदा काही अळी शिरली की तिची विष्ठा व बोंडाच्या बारीक कणांच्या साह्यानेही छिद्र बंद करते. त्यामुळे बोंडावर अळीचा प्रादुर्भाव दिसून येत नाही. अळी बोंडातील बिया खाते. एक अळी १ ते ५ बिया खाते. त्यामुळे रुई सडते व खराब होते. प्रादुर्भावग्रस्त बोंडाची वाढ खुंटते, बोंडे पूर्ण पणे फुटत नाहीत. अळी एका

कप्प्यातून दुसऱ्या कप्प्यात शिरते. त्यामुळे रुईची प्रत खालावते. त्याच बरोबर सरकीतील तेलाचे प्रमाण कमी होते. गुलाबी बोंडअळीचा सर्वांत जास्त प्रादुर्भाव उत्तर भारतात ऑगस्ट-नोव्हेंबर आणि मध्य भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबर तसेच दक्षिण भारतात डिसेंबर-एप्रिल या कालावधीत आढळतो.

व्यवस्थापन 

  • प्रादुर्भावग्रस्त गळालेली पाने व बोंडे जमा करून नष्ट करावे.
  • गुलाबी बोंडअळीग्रस्त डोमकळ्या दिसून आल्यास, त्या तोडून आतील अळीसहीत नष्ट कराव्यात.
  • गुलाबी बोंडअळीसाठीचे कामगंध सापळे वापरावे. सर्वेक्षणासाठी हेक्टरी ५ सापळे आणि मोठ्या प्रमाणात नर पतंग पकडण्यासाठी २५ सापळे प्रति हेक्टरी लावावेत.
  • ट्रायकोग्रामा ट्रोडीया बॅक्ट्री या परोपजीवी मित्रकीटकाच्या अंड्याचे ५ ते ६ कार्ड प्रति हेक्टरी फुलोरा व बोंड अवस्थेत पिकावर लावावेत.
  • कपाशीची फरदड घेण्याचा मोह टाळावा.
  • गुलाबी बोंडअळीने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यानंतरच लेबल क्लेमनुसार खालील रासायनिक कीटकनाशकांचा आलटून पालटून वापर करावा.
  • आर्थिक नुकसानीची पातळी - सरासरी ८ ते १० पतंग प्रति सापळा, सतत २ ते ३ दिवस किंवा ५ ते १० टक्के कळ्या, फुले, बोंडाचे नुकसान.

फवारणी (प्रति लिटर पाणी)
पहिली फवारणी : निंबोळी अर्क (५ टक्के) किंवा ॲझाडीरॅक्टीन (१५०० पीपीएम) ५ मि.लि.
दुसरी फवारणी : प्रोफेनोफॉस (५० टक्के ईसी) ३ मि.लि. किंवा
थायोडीकार्ब (७५ टक्के डब्लूपी) २ ग्रॅम.
तिसरी फवारणी : थायामेथोक्झाम (१२.६ टक्के) + लॅंबडा सायहॅलोथ्रीन (९.५ टक्के झेडसी) ०.४ मि.लि. किंवा क्लोरॲन्ट्रानिलीप्रोल (९.३ टक्के) + लॅंबडा सायहॅलोथ्रीन (४.६ टक्के झेडसी) ०.५ मि.लि.
चौथी फवारणी : पायरीप्रोक्सिफेन (५ टक्के) अधिक फेनप्रोपाथ्रिन (१५ टक्के ईसी) १ मि.लि. किंवा लॅंबडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के ईसी) ०.७५ मि.लि. किंवा
सायपरमेथ्रिन (२५ टक्के ईसी) ०.४ मि.लि. किंवा
प्रोफेनोफॉस (४० टक्के) + सायपरमेथ्रिन (४ टक्के ईसी) २ मि.लि.

वरील कीटकनाशकांचे प्रमाण नॅपसॅक पंपासाठी आहे. कीटकनाशकांचे द्रावण करताना व फवारणी करताना चष्मा, हातमोजे व तोंडावर मास्क वापरावा. पायरेथ्रॉईड गटातील कीटकनाशकाची फवारणी नोव्हेंबर महिन्याआधी सुरू करू नये, यामुळे पांढऱ्या माशीचा उद्रेक होऊ शकतो.

डॉ. राजरतन खंदारे (संशोधन सहयोगी), ८२७५६०३००९
डॉ. अनंत लाड (बडगुजर), (सहायक प्राध्यापक), ७५८८०८२०२४
(कृषी कीटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)


इतर अॅग्रोगाईड
हरितगृहात गुलाब लागवडीनंतर घ्यावयाची...हरितगृहामध्ये गुलाब लागवड केल्यानंतर त्यांची...
असे करा कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचे...सध्या कपाशीचे पीक बोंडे धरण्याच्या किंवा धरलेल्या...
पूर्वहंगामी उसासाठी एकात्मिक अन्नद्रव्येएक टन ऊस उत्पादनासाठी १.२५ ते १.५० किलो नत्र, ०....
तंत्र भुईमूग लागवडीचे...भुईमूग उत्पादन वाढीसाठी गादी वाफ्याचा वापर करून...
द्राक्ष बागेत हंगामापूर्वी करावयाची...सध्या फळछाटणीचा कालावधी सुरू असून, येत्या हंगामात...
मोसंबीवरील साल खाणारी अळी, कोळी, रसशोषक...मराठवाड्यातील अनेक भागात मोसंबी, संत्रा फळपिकावर...
दर्जेदार काळी मिरीचे उत्पादन तंत्रमिरी लागवड स्वतंत्रपणे, नारळ व सुपारीच्या बागेत...
जमिनीतील ओलावा साठवणकोरडवाहू क्षेत्रातील पिकांचे नियोजन करताना...
भेंडी पिकासाठी संतुलित अन्नद्रव्य...खरीप भेंडी लागवड साधारणतः जून ते जुलैमध्ये केली...
रानभाज्यांचे आहारातील महत्त्वमहाराष्ट्रामध्ये स्थानिक वातावरणानुसार, तिथे...
हलक्‍या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा...महाराष्ट्रावरील हवेच्या दाबात वाढ होत असून, उत्तर...
लिंबूवर्गीय पिकातील आंबिया बहर फळगळ...सद्यःस्थितीत आंबिया बहराची फळे ही विकसनशील...
लिंबूवरील खैऱ्या रोगाचे व्यवस्थापनलिंबावरील खैऱ्या (कँकर) हा रोग संसर्गजन्य आहे....
वेलवर्गीय पिकासाठी मंडप उभारणी मंडपामध्ये वेली ६ ते ७ महिने चांगल्या...
तेलबिया पिके अन् मधमाशीपालनामध्ये संधीसर्व तेलबिया पिकांमध्ये मधमाश्‍या व त्याद्वारे...
फळपिकांसाठी अभिवृद्धीच्या सुधारित पद्धतीफळझाडांची अभिवृद्धी बिया तसेच शाखीय पद्धतीने...
चारसूत्री, ड्रम सीडरने भात लागवडचारसूत्री पद्धतीने लागवड  सूत्र १: भात...
द्राक्ष बागेत खुंट रोपांचे व्यवस्थापन...सध्याच्या स्थितीत द्राक्ष लागवड असलेल्या...
द्राक्ष बागेत द्या अन्नद्रव्यांच्या...गेल्या काही दिवसांपासून द्राक्ष लागवडीखालील...
तंत्र वांगी लागवडीचे...सुपीक, मध्यम आणि पाण्याचा चांगला निचरा होणारी...