भारतीय साखरेसाठी यंदा ‘फिलगुड’

गेल्या महिन्याच्या कालावधीत साखर उद्योगासाठी चांगले वातावरण तयार झाले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेले साखरेचे दर आणि स्थानिक बाजारात ही सणासुदीमुळे वाढलेली मागणी यामुळे येत्या काही महिन्यात साखर दराचा वारू हा चौफेर उधळलेलाच असेल अशी शक्यता आहे.
chances of sugar prices in India will increase in the future
chances of sugar prices in India will increase in the future

गेल्या महिन्याच्या कालावधीत साखर उद्योगासाठी चांगले वातावरण तयार झाले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेले साखरेचे दर आणि स्थानिक बाजारात ही सणासुदीमुळे वाढलेली मागणी यामुळे येत्या काही महिन्यात साखर दराचा वारू हा चौफेर उधळलेलाच असेल अशी शक्यता आहे. कारखानदारांनी नियंत्रणात साखर विक्री केल्यास साखर दरवाढ आणखी काही महिने कायम राहू शकते असा अंदाज साखर उद्योगातून व्यक्त होतोय. सध्या, साखरेच्या आंतरराष्ट्रीय किमती चार वर्षांच्या उच्चांकावर आहेत . लंडन बाजारात प्रतिटन ५०० डॉलर्सच्या आसपास दर मिळत आहे. (भारतीय चलनानुसार अंदाजे ३५००० रुपये प्रति टन). गेल्या सहा महिन्यांत साखरेचे दर प्रति टन ८० ते ९० डॉलर इतक्या प्रमाणात वाढले आहेत. का आहे भारतीय साखरेला संधी? ब्राझीलमध्ये सध्याच्या साखर हंगामात साखर उत्पादनात घट आली आहे. (एप्रिल २०२१ - मार्च २०२२) कमी साखरेच्या उत्पादनाच्या अहवालांमुळे, दुष्काळामुळे जागतिक किमती तेजीत राहण्याची अपेक्षा आहे. ब्राझीलचा पुढील साखर हंगामदेखील जादा साखर उत्पादनाचा राहणार नाही असा अंदाज आहे. यामुळे जागतिक बाजारात ४० ते ५० लाख टन साखरेचा तुटवडा भासेल असे अंदाज जागतिक संस्थांनी केले आहेत. याचाच परिपाक म्हणून भारतीय साखरेला अन्य देशांकडून मागणी वाढू शकते.

  • थायलंडमध्ये साखरेचे उत्पादन यंदाच्या वर्षांच्या तुलनेत पुढील हंगामात वाढण्याची शक्यता आहे. यंदा या देशातील साखर उत्पादन वाढणार असले तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत ते कमीच असल्याने साखर जगतामध्ये अतिरिक्त साखरेचा प्रश्‍न कमी असणार आहे. साखर जानेवारी २०२२ नंतरच बाजारात येण्याची शक्यता आहे. यामुळे भारतीय साखर कारखान्यांना त्यांची अतिरिक्त साखर जानेवारी २०२२ पर्यंत आणि त्यानंतर एप्रिल २०२२ पर्यंत ब्राझीलियन साखर बाजारात येण्यापूर्वी निर्यात करण्याची चांगली संधी आहे.
  • येत्या हंगामात अनेक साखर कारखान्यांनी निर्यातीसाठी फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट केले आहेत. त्यामुळे भारतीय साखर कारखाने या संधीचा लाभ घेतील आणि पुढील हंगामात ६० लाख टन साखरेची निर्यात करू शकतील, असा विश्‍वास साखर उद्योगाला आहे.
  • निर्यातीत घोडदौड

  • ११ महिन्यांत (१ ऑक्टोबर २०२० ते ऑगस्ट २०२१) ६६.७० लाख टन साखर निर्यात
  • गेल्या हंगामातील याच कालावधीत निर्यात झालेल्या ५५.७८ लाख टनांच्या तुलनेत हे जवळपास ११ लाख टन अधिक आहे.
  • जानेवारी-ऑगस्ट, २०२१ कालावधीत सुमारे ६२.२१ लाख टन साखर प्रत्यक्षात निर्यात झाली. मुख्यतः २०२०-२१ हंगामाच्या साखर धोरणांर्तगत आणि काही प्रमाणात ओपन जनरल लायसन अंतर्गत.
  • सध्या (सप्टेंबरअखेर) २.२ लाख टन साखर बंदरावर आहे, सर्व आकडेवारी पाहिल्यास हंगामात एकूण निर्यात ७० लाख टनांना पार करू शकते.
  • आतापर्यंत एकूण अंदाजित निर्यातीपैकी एकूण ३४.२८ लाख टन कच्ची साखर, २५.६६ लाख टन पांढरी साखर आणि १.८८ लाख टन रिफाइन साखर कारखान्यांकडून निर्यातीसाठी वितरित केली गेली. याव्यतिरिक्त बंदर आधारित रिफायनरींना सुमारे ७.१७ लाख टन कच्ची साखर वितरित करण्यात आली.
  • भारतातील साखरेची निर्यात प्रामुख्याने इंडोनेशिया, अफगाणिस्तान, श्रीलंका, सोमालिया, यूएई, चीन, सौदी अरेबिया, सुदान इत्यादींना करण्यात आली आहे, इंडोनेशियाला २९ टक्के अफगाणिस्तानला एकूण निर्यातीच्या १३ टक्के साखर निर्यात झाली.
  • देशांतर्गत स्थिती आंतरराष्ट्रीय पातळीवर साखरेचे दर वाढल्याने याचा सकारात्मक परिणाम भारतीय साखर बाजारावर होत आहे. सध्या सर्व स्तरांवरून साखरेच्या किमती वाढल्याने देशातील साखर कारखानदार गतीने साखर विक्री करत आहेत. सणासुदीचे दिवस व आंतरराष्ट्रीय पातळीवर साखर चांगल्या दराने विकली जात असल्याने स्थानिक देशांतर्गत बाजारातील साखरेचे दर गेल्या महिन्याभरात क्विंटलला तब्बल ५०० ते ६०० रुपयांनी वाढले आहेत. ऑगस्टमध्ये जी साखर ३००० ते ३१०० रुपयांपर्यंत विकली जात होती, त्यात साखरेची किंमत आता ३५०० ते ३६०० रुपयांपर्यंत गेली आहे. दोन महिन्यांपूर्वी ज्या साखरेला खरेदीदार मिळत नव्हते त्याच साखरेच्या खरेदीसाठी आता व्यापाऱ्यांची गडबड सुरू आहे. त्यामुळे पहिल्यांदाच देशांतर्गत साखर बाजारात ‘फिलगुड’चे वातावरण आहे. पुढील दोन महिन्यांत संयमाने साखर विक्री करण्याची गरज गेल्या दोन-तीन वर्षांत कमी साखर दरामुळे पिचलेल्या साखर कारखानदारांना सध्याची परिस्थिती साखरे विक्रीसाठी अतिशय उपयुक्त आहे. यामुळे दिलेले विक्री कोटे तातडीने संपण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पण यातून दुसरा धोकाही जाणवत असल्याचे साखर तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कारखान्यांनी साखर जास्तीत जास्त बाहेर आणल्यास पुन्हा दर कमी होऊन कमी दरात साखर विक्री होईल, असा अंदाज साखर खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनी बांधला आहे. एकदम साखर बाजारात आल्यास दर कोसळतील व त्याचा फायदा हे व्यापारी घेऊ शकतील असा एक प्रवाह व्यापाऱ्यांचा आहे. यामुळे येत्या दोन महिन्यांत साखर कारखान्यांनी भरमसाट साखर विक्री न करता अगदी थोड्या थोड्या प्रमाणातच साखर विक्री करावी असे साखर उद्योगातील तज्ज्ञांना वाटते. यंदाच्या हंगामाच्या मध्यानंतर साखरेचे दर हे तेजीतच राहणार असल्याने साखर कारखान्यांनी जादाची साखर बाजारात आणून साखर उद्योगाचे नुकसान करू नये, असे आवाहन साखर तज्ज्ञांचे आहे. थायलंड, ब्राझील या स्पर्धक देशांची दादागिरी यंदा साखर उद्योगावर कमी प्रमाणात असल्याचे संकेत असल्याने भारताला जागतिक बाजारावर आपल्या साखरेचे छाप पाडणे शक्य होणार आहे. केंद्राचा आधार साखरेचे किमान विक्री मूल्य वाढवावे अशी मागणी साखर कारखानदारांची असली तरी केंद्र मात्र साखरेचे मूल्य वाढवून द्यायला अद्याप तयार नाही. त्याच्या बदल्यात केंद्राने साखर निर्यात अनुदान योजनेतील थकलेली देणी तातडीने देण्यासाठी पावले उचलली आहेत. गेल्या हंगामात साखर कारखान्यांनी निर्यात केलेल्या साखरेचे अठराशे कोटी रुपयांचे अनुदान शासनाने कारखान्यांना देण्यासाठी मंजूर केले आहेत. मागील सगळे थकीत अनुदान ऑक्टोबर २०२१ अखेर देण्याची तयारीही केंद्राने दाखवली आहे. साखर कारखान्यांनी जास्तीत जास्त साखर देशाबाहेर पाठवावी यासाठीच हे प्रोत्साहन केंद्रामार्फत देण्यात येत आहे. त्याचा फायदा कारखान्यांनी करून घेण्याची गरज आहे. भविष्यात दर वाढण्याची शक्‍यता असल्याने कारखान्यांनी टप्प्याटप्प्याने करार केल्यास कारखान्यांना साखर विक्रीतून चांगली रक्कम मिळू शकेल असा अंदाज साखर उद्योगाचा आहे. आगामी हंगामाच्या प्रारंभी सुचिन्ह यंदाचा हंगाम सुरू होण्यापूर्वीच साखरेच्या दरात झालेली वाढ कारखानदारांना सुखकारक ठरत आहे. पण दुसरीकडे एफआरपीचे तीन तुकडे करण्याबाबत केंद्र विचारात असल्याने शेतकरी संघटना आंदोलनाच्या तयारीत आहेत. एफआरपीचे तुकडे करण्याबाबत केंद्राने अद्याप कोणतेच आदेश काढले नसल्याने अजून तरी एफआरपी तुकड्यात मिळेल अशी शक्यता नाही. गेल्या महिन्यात साखरेचे दर चांगले असल्याने विक्रीही होत आहे. यामुळे यंदाची एफआरपी देण्यात साखर कारखान्यांना अडचण येऊ नये असा अंदाज साखर उद्योगाचा आहे. महाराष्ट्रात विक्रमी साखर उत्पादन होणार? महाराष्ट्रात यंदा विक्रमी साखर उत्पादन होण्याची शक्यता आहे. कदाचित देशात पहिल्या क्रमांकावर महाराष्ट्र असेल. २०१६ - १७ पासून उत्तर प्रदेशने सातत्याने देशात साखर उत्पादनात आघाडी टिकवली होती, परंतु गेल्या वर्षीपासून महाराष्ट्राने साखर उत्पादनात अग्रक्रम राखला आहे. गेल्या हंगामात १०७ लाख टन साखर तयार झाली होती येणाऱ्या वर्षात महाराष्ट्रात ११२ लाख टन साखर उत्पादित होईल. उत्तर प्रदेशात १११ लाख टन साखरेचे उत्पादन होईल असा अंदाज साखर उद्योगातील सूत्रांचा आहे. या दोन वर्षांपासून महाराष्ट्रात पाऊसमान चांगले झाल्याने याचा फायदा ऊस शेती वाढीव वाढण्यासाठी झाला आहे.   इथेनॉलनिर्मितीमुळे ३४ लाख टन साखर कमी तयार होणार यंदा इथेनॉलनिर्मिती प्रकल्पांना पाठबळ दिल्याने नवीन प्रकल्प उभे राहिले आहेत. उसाच्या रसापासूनही इथेनॉलनिर्मिती होणार असल्याने या सर्व प्रक्रियेमुळे सुमारे ३४ लाख टन साखर कमी उत्पादित होईल असा केंद्राचा अंदाज आहे. गेल्या वर्षी २० लाख टन साखर कमी उत्पादित झाली होती. गेल्या वर्षी ३५० कोटी लिटर इथेनॉलचे उद्दिष्ट होते. यापैकी ३२१ कोटी लिटरचे करार झाले. तर १४५ कोटी लिटरचा प्रत्यक्ष पुरवठा झाला. कोट गेल्या काही वर्षांत पहिल्यांदाच साखर उद्योगांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. दरवाढ झाल्याने साखर विक्री गतीने होत असली, तरी जागतिक परिस्थिती पाहता भविष्यात याहून अधिक साखर दर वाढण्याची शक्यता असल्याने कारखान्यांनी अंदाज घेऊनच साखर निर्यात करावी असे मला वाटते. - अभिजित घोरपडे, साखर निर्यातदार राष्ट्रीय साखर सहकारी महासंघाच्या वतीने आम्ही सातत्याने कारखानदारांना यांना प्रोत्साहन मिळावे त्यासाठी प्रयत्न करत आहोत, निर्यात अनुदान मिळवण्यासाठी आम्ही स्वतः संघाच्या वतीने केंद्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी घेत आहोत. मागील थकीत देणी देण्याबाबत सातत्याने पत्रव्यवहार करत आहोत. यामुळे आगामी काळात केंद्राकडून रखडलेली अनुदानाची रक्कम कारखान्यांना नक्कीच मिळून त्याचा सकारात्मक फायदा यंदाच्या हंगामावर होईल अशी शक्यता आहे. - प्रकाश नाईकनवरे, व्यवस्थापकीय संचालक, राष्ट्रीय साखर सहकारी साखर कारखाना महासंघ

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com