agricultural news in marathi article by Dr. Nagesh tekale | Page 2 ||| Agrowon

‘चामोली’ आपत्तीचा अन्वयार्थ

डॉ. नागेश टेकाळे
सोमवार, 1 मार्च 2021

बर्फ वितळल्यानंतर उघडा पडलेला मातीचा भाग शेती, झाडे यांच्या आच्छादनाने झाकून घेणे गरजेचे आहे. त्यात स्थानिक शेतकऱ्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. त्यांना शेतीसाठी, वनशेतीसाठी प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. हेच चामोली आपत्तीतून स्पष्ट होत आहे. 

बर्फ वितळल्यानंतर उघडा पडलेला मातीचा भाग शेती, झाडे यांच्या आच्छादनाने झाकून घेणे गरजेचे आहे. त्यात स्थानिक शेतकऱ्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. त्यांना शेतीसाठी, वनशेतीसाठी प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. हेच चामोली आपत्तीतून स्पष्ट होत आहे. 

आपल्या देशात २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेश आहेत. त्यातील भौगोलिक आणि शासकीय यंत्रणेमध्ये ईशान्येकडील अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड आणि त्रिपुरा या सात राज्यांचे वातावरण बदलाच्या पार्श्‍वभूमीवर मोठे महत्त्व आहे. या राज्यांना सात सख्ख्या बहिणी म्हणतात. त्यांच्यामध्ये संस्कृती, जैवविविधता, नद्या, पाणी, कृषी, धर्म, अर्थ आणि हिमालयाची सावली यामध्ये एकसंधपणा आहे. थोडक्यात, त्या एकाच नाळेने जोडलेल्या आहेत. एका बहिणीला काही दुखापत अथवा अपघात झाला, तर लगेच इतरांच्या डोळ्यांत आपोआप पाणी येते, कारण ती वेदना त्यांनाही झालेली असते. हवामान बदलाच्या पार्श्‍वभूमीवर त्यांचे हे नाते समजून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. कृषी, संस्कृती, धर्म, जैवविविधता अशा अनेक बाबतींत साम्य असल्याने सिक्किम या राज्याला या सात बहिणींचा धाकटा भाऊ समजतात. प. बंगालच्या सिलिगुडी जिल्ह्याचा भाग मध्ये आल्यामुळे हे राज्य भौगोलिकरीत्या नकाशावर वेगळे दिसते. भारतात होणाऱ्या वातावरण बदलाचे हे आठजण सर्व प्रथम साक्षीदार आहेत. थोडा कुठे बदल झाला, की सर्व प्रथम ओरखडा यांच्या अंगावर येतो. 

उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश एका बाजूला आणि विरुद्ध बाजूला तिबेट आणि नेपाळची सीमा असलेले अजून एक राज्य - उत्तराखंड हेही हिमालयाच्याच सावलीमध्ये आहे. कृषी, हवामान बदल, नद्या या बाबतीत हे राज्य सुद्धा ईशान्येकडील सात राज्यांशी साम्य दर्शविते. 

उत्तराखंडला उत्तरांचल अथवा देवभूमी असेही म्हणतात. कारण या राज्यात असलेली गंगोत्री, यमुनोत्री, बद्रिनाथ, केदारनाथ, रुद्रप्रयाग, उत्तरकाशी ही तीर्थक्षेत्रे. नंदादेवी, व्हॅली ऑफ फ्लॉवर, जिम कॉर्बेट जंगल आणि भारतीय वन संशोधन संस्था याच राज्यात आहे. तब्बल ८६ टक्के हिमालय आणि ६५ टक्के जंगल असलेले हे निसर्गरम्य राज्य आज वातावरण बदलाच्या तडाख्यात सापडले आहे. डेहरादून, हरिद्वार, ऋषिकेश हा सपाट भाग वगळता सर्व शेती ही हिमालयाच्या उतरणीवर केली जाते. तब्बल ७० टक्के शेतकरी एक एकरापेक्षाही कमी जमिनीचे मालक आहेत. येथील सुमारे ५० टक्के शेती वातावरण बदलाने नष्ट झाली आहे. वाढते शहरीकरण, नद्यांवर होणारे जलविद्युत प्रकल्प आणि त्यासाठी हिमालय फोडून तयार होणारे बोगदे, सध्या तयार होत असलेला चार धाम महामार्ग आणि त्यासाठी गेलेले लाखो वृक्षांचे बळी ही या राज्याची शोकांतिका आहे. दहा दशलक्ष अल्पभूधारक शेतकरी असलेल्या या राज्यात लोकसंख्येच्या पाचपट अधिक प्रवासी पर्यटनासाठी येतात. त्यासाठी होणारी प्रतिदिन हजारो वाहनाची वर्दळ, हिमालयाचा चढ चढताना खर्च होणारे जीवाश्म इंधन, त्यातून बाहेर पडणारा काळा धूर आणि काजळी यामुळे येथील पांढरा शुभ्र बर्फ आज काळवंडलेला दिसतो. असा बर्फ जास्त उष्णता शोषून घेतो आणि सहज वितळतो. २५ वर्षांपूर्वी केदारनाथपर्यंत प्रवास करताना रस्त्याच्या कडेला हमखास शेती दिसत असे. आज तेथे शेती नाही आणि बर्फसुद्धा दिसत नाही. 

प्रचंड थंडी मात्र आहे. जून २०१३ मध्ये केदारनाथ मंदिरामागेच प्रचंड मोठी ढगफुटी झाली आणि सहा कि.मी परिसर पाण्याखाली आला. मंदिर परिसरामधील शेकडो दुकाने, निवासस्थाने वाहून गेली. ५००० पेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडले, कितीतरी बेपत्ता झाले. थोडीबहुत नुकसानभरपाई मिळाली तरी परिसरामधील गरीब शेतकरी त्याच्या उन्हाळी पिकासह कायमचा निराधार झाला. केव्हाही ढगफुटी होऊ शकते, या भीतीपोटी होणारी थोडीफार शेतीही कमी होत आहे. काही दिवसांपूर्वी म्हणजे सात फेब्रुवारी रोजी चामोली येथील हिमकडा कोसळल्याची घटना आणि त्यातील १४० च्या वर मृत्यू सर्वांना माहीत आहेत. मात्र त्यासोबत ‘चिपको’ आंदोलनामधील प्रसिद्ध रैनी गाव व त्याच्या भोवतालची तेरा गावे आणि शेती पूर्ण नष्ट झाली याबद्दल कोणीही बोलत नाही. 

शेतकरी हाच खरा हिमालयाचा रक्षक
हिमालयाच्या कुशीमध्ये शांतपणे जीवन जगण्याचा, पारंपरिक शेतीवर उदरनिर्वाह करण्याचा स्थानिकांना अधिकार नाही काय? “मुकी मेंढरे, कोणीही हाका” अशी त्यांची अवस्था आहे. जलविद्युत प्रकल्प आला की निमूटपणे विस्थापित व्हा. विकासासाठी रस्ता तयार करावयाचा आहे. जमीन द्या! यामुळे लाखो शेतकरी आज शेती सोडून पर्यटन व्यवसायात प्रवेश करत आहेत. हिमालयीन मौल्यवान पारंपरिक पिकांच्या बियाण्यांचा हा फार मोठा न भरून येणारा ऱ्हास आहे.

हिमकडे, हिमनद्या वितळत असल्यामुळे आज उत्तराखंडमधील हिमालयाच्या शुभ्र गालिच्याखाली हजारो थंड पाण्याचे लहान मोठे तलाव तयार झाले आहेत. बाहेरून काहीही दिसत नाही. शेतकऱ्याना आज या सुप्त आणि गुप्त तलावांचीच जास्त भीती वाटते. त्यामध्ये बर्फ वितळून पाणी साठू लागले की तलाव फुटणार. त्याखाली येणारी सर्व शेती आणि गावे वाहून जाणार, या भीतीत स्थानिक लोक जीवन जगत आहेत. तलाव म्हटले की शेतकऱ्यांचा खरा आनंद. मग तो भरलेले शेत तळे असो अथवा नैसर्गिक. उत्तराखंडमधील पर्वतराजीत असे हे भरलेले कृत्रिम तलाव शेतकऱ्यांसाठी मृत्यूचे सापळेच बनत आहेत.

उपग्रहामधून न दिसणाऱ्या या तलावांच्या रक्षणाची, त्यांना प्रत्यक्ष भेटी देऊन त्यातील पाणी पाटाद्वारे जवळच्या नदीत सोडण्याची ‘डीआरडीओ’च्या शास्त्रज्ञांची तयारी सुरू झाली आहे. ही स्थानिक गावे आणि तेथील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असली, तरी हिमकड्यापासून पाणीपुरवठा होत असलेल्या हिमालयामधील शुभ्र पाण्याच्या या वाहत्या नद्यांवर डायनामाइट, सुरुंग वापरून हिमालयास फोडून, बोगदे तयार करून जागोजागी जलविद्युत केंद्रे तयार करू नयेत, यासाठी  स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध वाढत आहे. यात पर्यावरण आणि निसर्ग याचाही विचार होणे गरजेचे आहे. 

उत्तराखंडमध्ये बासमती तांदूळ, गहू, सोयाबीन, भुईमूग, ऊस, सफरचंद, नासपती, प्लम, लिची, तेजपत्ता, राजमा, बटाटे, रताळी आणि औषधी वनस्पतींची शेती केली जाते. डेहराडून, हरिद्वार परिसर सपाट असल्यामुळे आणि गंगेच्या आशीर्वादामुळे येथे शेती सधन आहे. मात्र पर्वतीय भाग आणि तेथील जमीन सेंद्रिय घटकांनी परिपूर्ण असूनही उत्पादन मात्र फार कमी आहे. सर्व लक्ष पर्यटन वाढविण्याकडे असल्यामुळे शेतीकडे शासनाचे संपूर्ण दुर्लक्षच झाले आहे. आज पर्वतीय भागामधील लाखो शेतकरी हरिद्वार, डेहराडूनमध्ये मोठमोठ्या शेतजमिनीवर व राइस मिलमध्ये मजूर म्हणून काम करतात. अनेक जण ऋषिमुनींच्या आश्रमात सेवा देतात आणि तिथेच गोपालन करतात. 

स्थलांतर हा वातावरण बदलाचा फार मोठा शाप आहे. शहरे फुगत आहेत आणि निसर्ग ओस पडत आहे. या भागामधील वातावरण बदलाचा अभ्यास करताना आपण सर्व प्रथम हिमालयास समजून घेतले पाहिजे. हिमालयाची निर्मिती मुरूम, माती, दगड, गोट्यापासून झाली आहे, येथील खडकसुद्धा ठिसूळ आहेत. म्हणूनच खडक कमकुवत झाला, की त्यावरचा प्रचंड मोठा बर्फाचा कडा म्हणजेच हिमनग खाली कोसळतो, तो जर नदीत कोसळला तर महापूर येतो. या महापुरामध्ये माती, दगड, गोटेच जास्त असतात. चामोलीच्या ‘तपोवन’ बोगद्यात ७ फेब्रुवारीस या ३० फूट गाळामध्येच अनेक मजुरांची प्रेते अडकलेली सापडली. माती, पोट आणि मृत्यू यांचा जवळचा संबंध आहे. हो, माती आणि मृत्यू याचाही संबंध असतो, हे आपणास चामोली येथे पाहावयास मिळाले. भविष्यामध्ये हिमालयाच्या मातीचा आणि तेथील शेतकऱ्यांचा सन्मान करणे गरजेचे आहे. त्यासाठीच त्यांचे हिमालयाच्या पायथ्याकडे होणारे स्थलांतर थांबावयास हवे. 

उत्तर ध्रुवावरचे बर्फ प्रतिवर्षी ०.३ अंश सेल्सिअस तापमान वाढल्यामुळे वितळत आहे, याचा आपण केवढा उदो उदो करतो. पण आपलाच हिमालय प्रतिवर्षी ०.६ अंश सेल्सिअस तापमान वाढून वेगाने वितळत आहे, याकडे मात्र आपले लक्ष नाही. बर्फ वितळला की उघडी पडलेली माती वाहून जाण्याची जास्त शक्यता असते. म्हणूनच शासनाच्या पुढाकाराने हा उघडा भाग शेत आणि वृक्ष लागवडीखाली आणणे गरजेचे आहे. यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करून त्यांचे स्थलांतर थांबवणे, त्यांच्या पारंपरिक शेतीचे रक्षण करून बळीपुत्रांना पुन्हा सन्मान देणे ही काळाची गरज आहे. मूळचा स्थानिक शेतकरी हाच खरा हिमालयाचा रक्षक ठरणार आहे.

- डॉ. नागेश टेकाळे,  ९८६९६१२५३१
(लेखक शेती प्रश्नांचे अभ्यासक आहेत.)


इतर ताज्या घडामोडी
पाच दिवसांत तब्बल ५० टन काजू बी खरेदी सिंधुदुर्गनगरी ः फळपीक बागायतदार संघाने गेल्या...
वाढत्या तापमानातील द्राक्ष बागेतील...प्रत्येक भागात सध्याच्या परिस्थितीचा विचार करता...
नगर : पीकविमा योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग...नगर : नैसर्गिक संकटाने तसेच अन्य कारणाने...
`दहिगाव उपसा सिंचन योजना सौरऊर्जेवर...सोलापूर ः करमाळा तालुक्यातील दहिगाव उपसा सिंचन...
पुणे बाजार समिती चक्राकार पद्धतीने सुरू...पुणे : कोरोना विषाणू बाधित रुग्णाच्या झपाट्याने...
देशी सीताफळाच्या बियाण्याची चोरीसोलापूर ः देशी सीताफळाच्या बियाण्याची चोरी...
पाण्याच्या उपलब्धतेमुळे उन्हाळी...पुणे : गेल्या वर्षी झालेल्या चांगल्या पावसामुळे...
हिंगोली ः सोयाबीनची अडीच लाख हेक्टरवर...हिंगोली ः जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात ३ लाख ५८...
अमरावतीत खरिपाचे ७ लाख हेक्टर क्षेत्र...अमरावती : कृषी विभागाच्या खरीप हंगाम २०२१...
नाशिक बाजार समितीच्या ‘त्या’ याचिका...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती...
बियाणे, खते, कीटकनाशक नियंत्रणासाठी...नाशिक : खरीप हंगामात बियाणे पेरणीचा कालावधी...
औरंगाबाद जिल्हाभरात फळे, भाजीपाला थेट...औरंगाबाद : शहरासह जिल्हाभरात राबविल्या जात...
लातूर जिल्ह्यात त्रेचाळीस हजार क्विंटल...लातूर: जिल्ह्यात कार्यान्वित १६ केंद्रांवरून २७५९...
अवैध दारू विक्रेत्यांना शासकीय योजनांचा...चंद्रपूर : अवैध दारू विक्रीमुळे सामाजिक स्वास्थ्य...
ऑक्सिजन प्रकल्प उभारणीचा अधिकार...मुंबई : कोरोना रुग्णांची वाढती संख्या व ऑक्सिजनची...
फळाचे ‘प्रमोशन’, मूल्यवर्धन होण्याची...चिकू बागायतदार संघाच्या वतीने राज्यातील चिकू...
अकोला जिल्हा परिषदेत खांदेपालटाची चर्चा अकोला : जिल्हा परिषदेत सत्तारूढ असलेल्या वंचित...
प्रक्रिया उद्योगाला चालना देणारनारळ लागवडीचे क्षेत्र वाढविताना शेतकऱ्यांच्या...
सामूहिक प्रयत्नातून काजू उत्पादकांची...जागतिक बाजारपेठेत वैशिष्ट्यपूर्ण चव असलेल्या...
क्षेत्र वाढ, प्रक्रियेसाठी सरकारी...देशात पेरू लागवडीचे सुमारे तीन लाख हेक्टर आणि...