शेती, वृक्षसंवर्धनातील महिला शक्ती

चिपको आंदोलनापासून प्रेरणा घेत अनेक संस्था, तरुण वर्ग हिमालयामधील पर्वत रांगांत काम करत आहेत. त्यातही महिलाशक्तीचा पुढाकार सुखावणारा आहे. शेतकऱ्यांसोबत सेंद्रिय शेती, जैवविविधता आणि पारंपरिक पद्धतीतून वातावरण बदलाला शाश्‍वत उत्तर देण्याचा प्रयत्न त्या करत आहेत.
छोट्या क्षेत्रातही अधिक जैवविविधता जपण्याचे डॉ. वंदना शिवा यांचे प्रारुप.
छोट्या क्षेत्रातही अधिक जैवविविधता जपण्याचे डॉ. वंदना शिवा यांचे प्रारुप.

चिपको आंदोलनापासून प्रेरणा घेत अनेक संस्था, तरुण वर्ग हिमालयामधील पर्वत रांगांत काम करत आहेत. त्यातही महिलाशक्तीचा पुढाकार सुखावणारा आहे. शेतकऱ्यांसोबत सेंद्रिय शेती, जैवविविधता आणि पारंपरिक पद्धतीतून वातावरण बदलाला शाश्‍वत उत्तर देण्याचा प्रयत्न त्या करत आहेत. चंडी प्रसाद भट्ट हे उत्तराखंडमधील पर्वतरांगामध्ये शेतकऱ्यांसाठी कार्य करणारे थोर सर्वोदयी आणि गांधी तत्त्वांचे पालन करणारे नेते. समाजकार्यासाठी त्यांना १९८२ चा मॅगसेसे, २००५ मध्ये पद्मभूषण आणि २०१३ मध्ये आंतरराष्ट्रीय गांधी शांतता पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. आजही वयाच्या नव्वदीमध्ये भट्ट जंगल रक्षण आणि शेतकऱ्यांसाठी काम करतात. पर्वतरांगांच्या उतारावर शेती करताना खडकांना आधार द्या, उतारावर वृक्ष लागवड करा, वृक्ष कापू नका तरच तुमची शेती शाश्‍वत होऊ शकते, हे त्यांनी शेतकऱ्यांना पटवून दिले. हिमालयातील ‘राख’ वृक्षांपासून खेळणी, संगीत वाद्ये व इतर टिकावू साहित्यनिर्मिती उद्योगास त्याचा कायम विरोध होता. या वृक्षामुळेच तेथील उतारावरील शेती सुरक्षित होती. माफियांना वृक्ष कापण्यापासून रोखण्यासाठी त्यांनी मोठे आंदोलन उभारले. स्थानिक हजारो स्त्रियांनी जिवाची पर्वा न करता वृक्षांना मिठ्या मारून त्यांचे रक्षण केले. हेच ते ‘चिपको’ आंदोलन. उत्तराखंडमधील पारंपारिक बियाण्यांचे रक्षण करत असताना त्यांनी मौल्यवान औषधी वनस्पतींही लोकसहभागामधून संरक्षण केले. २०१३ मध्ये आंतरराष्ट्रीय गांधी शांतता पुरस्कार स्वीकारताना त्यांनी उत्तराखंडमधील शेतकरी, तेथील वनक्षेत्र आणि भविष्यामधील वातावरण बदलाचा सामना करताना या राज्यावर होणारे आघात याबद्दल आपले विचार तळमळीने मांडले होते. ते म्हणतात “खालच्या पायरीवर विसावलेल्या सुखी माणसाने वरच्या पायरीवरील व्यक्तीच्या यातना, त्याची धडपड पाहताना त्यांना खाली न उतरवता स्वत: वर जाऊन तेथे त्याला आधार देणे गरजेचे आहे.” त्यांच्या बोलण्याचा रोख हिमालयाच्या पायथ्याशी असलेली सधन शेती आणि उंचीवरील अल्पभूधारकांची तोडकी मोडकी शेती, तरीही त्यांची जगण्याची, निसर्ग आणि पारंपरिक बियाणे वाचविण्याची धडपड याकडे होता. चंडी प्रसाद भट्ट यांच्या प्रेरणेमधून आज अनेक संस्था, तरुण वर्ग हिमालयामधील पर्वत रांगात काम करत आहेत. वातावरण बदलाच्या तडाख्यात सापडलेल्या शेतकऱ्यांना शहराकडे स्थलांतरित होण्याऐवजी स्थानिक परिस्थितीत कसा मार्ग काढावा, हे शिकवत आहेत.  उत्तराखंड हे गंगेचे उगमस्थान असूनही या राज्यामधील पर्वतराजीतील हजारो लहान गावांना आज पाणी नाही. हंडाभर पाणी मिळवण्यासाठी शेकडो महिला पूर्ण दिवस पाणी शोधण्यात घालवतात. पाण्यासाठी मुली शिक्षणापासून वंचित राहतात. ९० टक्के जनतेला पिण्याचे पाणी झऱ्यामधून, लहान मोठ्या मंदिराची जलकुंडांतून मिळते. वातावरण बदलामुळे ५० टक्के झरे कोरडे पडले आहेत. देवदेवतांची जलकुंडेही रिकामीच आहेत. सर्व शेती पावसांवरच अवलंबून. त्यातच २०२० मध्ये उत्तराखंडमध्ये कमी पाऊस झाला. सिंचनासाठी, पिण्यासाठी पाणी राहिले नाही. सध्या अनेक समाजसेवी संस्था लोकांना शाश्‍वत पाणी मिळवण्यासाठी काम करत आहेत. त्यात ‘चिराग’ ही संस्था आघाडीवर आहे. बहुतेक झरे उतारावर आहेत. संस्थेने झऱ्याच्या वरील बाजूस स्थानिक वृक्षांची मोठ्या प्रमाणात लागवड केली. त्याद्वारे अडलेले पाणी कोरड्या झऱ्यांना उपलब्ध झाले. तेथील ‘पाणी प्रकल्प’सुद्धा लोकांना वातावरण बदलामध्ये पाण्याचे महत्त्व समजावून देत आहे.  नूपुर अग्रवाल आणि अभिनव अहलुवालिया हे नागपूरचे उच्चशिक्षित तरुण डेहराडूनला गेले.तेथून हिमालयाच्या पर्वतरांगांतील शेतकऱ्यांच्या व्यथा जाणल्या. या शेतकऱ्यांना शेतामध्ये ‘प्लॅन्टेबल पेपर्स’द्वारे भाजीपाला लागवड शिकवली. येथे उत्पादित होणारा ताजा भाजीपाला हरिद्वार, डेहराडून येथील उच्चभ्रू वस्तीत विकण्याची पद्धत बसवली. यातून सुमारे २५० शेतकरी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाले. नजीकच्या भविष्यात ६० प्रकारची स्थानिक बी बियाणे, ६० खेड्यांमधील, ६० शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे. या शेतकऱ्यांची उत्पादने पुढे ६० शेतकरी बाजाराद्वारे ग्राहकांपर्यंत पोचवण्याचाही त्यांचा विचार आहे. अशा प्रकारे उत्पादित केलेल्या ताज्या भाज्या, औषधी वनस्पती, मसाले यांना शहरात मोठी मागणी आहे. ‘नको ती शेती’ म्हणून शहरात पडेल ते काम करण्यासाठी येऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना तेथेच रोखले. त्यांचा माल पोचवून स्थानिक ठिकाणीच उत्पन्नाचे साधन तयार केले. हा केवढा मोठा बदल!  उत्तरखंडमधील अनेक गावांत लोक सहभागामधून ‘बियाणे बँक’ स्थापन झाल्या आहेत. येथील अनेक शेतकऱ्यांनी वृक्षतोड बंद केली आहे. शेतातील कचरा कोणीही जाळत नाही. पूर्वी डोंगर भागात आदिवासी लोक तृणधान्यासाठी ‘राब’ भाजून बियाणे पेरत. मात्र ही पद्धती जमिनीसह पर्यावरणासाठी धोकादायक असल्याने बंद करण्याचे प्रयत्न सुरू आहे. अनेक सामाजिक संस्था लोकशिक्षणासाठी धडपडत आहेत. हिमालय, तेथील शेती आणि पर्यायाने शेतकऱ्यांचे रक्षण करणे हे आपणा सर्वांचेच कर्तव्य आहे. कारण वातावरण बदल हा कोणी एकट्याने सुटू शकेल, असा साधा प्रश्‍न नाही. हात आणि बोटे एकमेकांत व्यवस्थित गुंफली तरच फेर तयार  होतो. बारानाजा शेती पद्धती  कॅनडामधून पदार्थ विज्ञानात डॉक्टरेट मिळवलेल्या डॉ. वंदना शिवा याही उत्तराखंडमधील पर्वतराजींमध्ये शेती करणाऱ्या हजारो शेतकऱ्यांच्या वेदना कमी करण्यासाठी पोचल्या. १९८२ पासून त्या डेहराडून येथील त्यांच्या संस्थेद्वारे शेतकऱ्यांना वातावरण बदलाला सामोरे जात शाश्‍वत शेतीचे धडे देत आहेत. “शेती हा आमचा हक्क आहे, आम्हाला विस्थापित करू नका.” असे त्या आग्रहाने म्हणतात. सेंद्रिय शेती, पारंपारिक बियाणे आणि पीक पद्धती हेच वातावरण बदलास एकमेव उत्तर असल्याचे समजावून देतात. त्यांनी ‘नवधान्य’ या नावाने डेहराडून शहरात सेंद्रिय शेतीचे वेगवेगळे प्रयोग आणि पारंपरिक बीबियाणे बँक सुरू केली आहे. अनेक शेतकरी, शास्त्रज्ञ, विद्यार्थी त्यांच्या या शिक्षण केंद्रास आवर्जून भेट देतात. केवळ बीबियाणे नाही, म्हणून शेती पडीक ठेवू नका, त्यातून उत्पन्न घ्या. म्हणत बीबियाणे पुरवतात. मोकळी पडीक जमीन वातावरण बदलास नेहमीच मदत करते. तिला कायम सदाहरित ठेवा, हा त्यांचा संदेश लाखो शेतकरी प्रत्यक्ष अमलामध्ये आणत आहेत. हिमालयाच्या पायथ्याशी तसेच पर्वतराजींमध्ये अलमोरासारख्या सपाट भागात शेतकरी भुईमूग, वाटाणा, चवळी अशी ‘शेंगावर्गीय पिके’ घेतात व त्यानंतर गहू, तांदूळ याचे उत्पादन घेतात. सेंद्रिय शेतीवर भर असल्याने उत्पादन थोडे कमी राहिले तरी पोषणमूल्य उच्च दर्जाचे असते. डेहराडून बासमतीसह अन्य भात वाण आज जगप्रसिद्ध आहेत. वातावरण बदल आणि त्यास अनुसरून वाढणारे कीटक, पिकांचा होणारा संहार, कर्जबाजारीपणा, मानसिक ताणतणाव यावर प्रभावी उपाय म्हणून येथील शेतकरी शेतीची ‘बारानाजा’ ही पारंपरिक पद्धत वापरतात. यात एकाच जमिनीमध्ये १२ पिके एकदम घेतली जातात. यामुळे वर्षभर अन्नसुरक्षा मिळते. कारण प्रत्येक पीककाढणीचा वेळ आणि काळ वेगळा असतो. या पद्धतीमुळे एखादे पीक नष्ट झाले दुसऱ्या पिकातून शेतकरी तरून जातो. शेतामधील पिकांचे अवशेष सोने समजून पुन्हा त्याच शेतात परत घातले जातात.  उत्तराखंडमध्ये आज ही शेती पद्धती वातावरण बदलावर प्रभावी ठरत आहे. येथील शेतकरी शेतीसाठी पारंपरिक अवजारे वापरतात. शासनातर्फे आधुनिक कृषी अवजारांसाठी प्रोत्साहन दिले जात असले, तरी धूर ओकणाऱ्या मोठ्या कृषियंत्रांपासून दूर राहण्याचाच हे शेतकरी प्रयत्न करतात. उत्तराखंडमधील शेतकऱ्यांनी घेतलेल्या या सेंद्रिय उत्पादनास चार पट अधिक दर देणारे नियमित ग्राहकही (कोणत्याही मध्यस्थांशिवाय) तयार झालेले आहेत. हिमालयीन पर्वतराजींमध्ये जिथे पिण्यास स्वच्छ पाणी नाही, तेथे शेतीला कुठून पाणी देणार? पाऊसही कमी अशा अडचणीतूनही हे शेतकरी मार्ग काढतात. कमी पाण्यावर येणारी पिके घेतात.   औषधी वनस्पतींना पाण्याचा ताण बसला, की त्यांच्यामधील औषधी गुणधर्म अनेक पटीने वाढतात. या पारंपारिक ज्ञानाला वैज्ञानिक अधिष्ठान देत येथील शेतकरी औषधी वनस्पतींचे उत्पादन घेत आहे. कमी पाण्यावरील उत्तराखंडमधील बाजरी तिच्यामधील पौष्टिक गुणधर्मामुळे जागतिक पातळीवर प्रसिद्ध आहे. वातावरण बदलावर आपल्या साध्या पद्धतीने मार्ग काढणाऱ्या या शेतकऱ्यांकडून खूप काही शिकण्यासारखे आहे.  - डॉ. नागेश टेकाळे ९८६९६१२५३१ (लेखक शेती प्रश्नांचे अभ्यासक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com