agricultural news in marathi article by Dr. Nagesh tekale | Page 2 ||| Agrowon

काळ्या भाताची सोनेरी किनार...

- डॉ. नागेश टेकाळे
मंगळवार, 30 मार्च 2021

मणिपूरच्या शेतीक्षेत्रामध्ये हवामान बदलाच्या काळ्याकुट्ट ढगाला पीक पद्धतीतील आवश्यक तो शास्त्रीय बदल आणि पारंपरिक पीक जातींचे संवर्धन अशा काही सोनेरी किनार दिसून येतात. आरोग्यपूर्ण काळ्या भाताला सेंद्रिय पद्धतीमुळे अधिक लोकप्रियताही मिळत आहे.
 

मणिपूरच्या शेतीक्षेत्रामध्ये हवामान बदलाच्या काळ्याकुट्ट ढगाला पीक पद्धतीतील आवश्यक तो शास्त्रीय बदल आणि पारंपरिक पीक जातींचे संवर्धन अशा काही सोनेरी किनार दिसून येतात. आरोग्यपूर्ण काळ्या भाताला सेंद्रिय पद्धतीमुळे अधिक लोकप्रियताही मिळत आहे.

मणिपूर हे भारताच्या ईशान्यपूर्व भागामधील हवामान बदलास सामोरे जाणारे छोटे राज्य. नागालँड, मिझोराम, आसाम या राज्यांबरोबरच म्यानमार या राष्ट्राच्या सीमेला मणिपूर जोडलेले असल्याने तेथील कृषी क्षेत्रावर म्यानमारची छाप आढळते. जेमतेम २९ लाख लोकसंख्या. हे राज्य पारंपरिक बियाणे आणि टेकड्याच्या उतारावरील नैसर्गिक जंगलामधील वृक्ष शेतीवर जास्त अवलंबून आहे. हिमालयाच्या उतारावरून वेगाने वाहणाऱ्या अनेक नद्या या राज्याला समृद्ध करत. मात्र गेल्या दोन, तीन दशकांमधील विकासाचा वाढता वेग, त्यासाठी झालेली स्थानिक वृक्षतोड, उघडी पडलेली माती आणि वेगाने वितळणारा बर्फ यामुळे या नद्या वेगाने वाहून माती, दगड गोट्यासह खाली येतात. त्यातील काही ‘लोकटक’ या जगप्रसिद्ध सरोवरास मिळत असल्याने तो गाळाने भरत चालला आहे. आशियामधील सर्वांत मोठा आणि सुंदर असा हा तलाव आपल्या देशाचे भूषण आहे. त्याच बरोबर हवामान बदलाचा मापदंडही. मणिपूरमध्ये अंदाजे ९० टक्के जंगल असले, तरी ते सर्व मोठ्या वृक्षाचे नाही, तर त्यात चहा कॉफीचे मळे, बांबू, गवताळ कुरणे यांचाही समावेश आहे. बहुतांश शेतकरी अल्पभूधारक आहेत. बंगालच्या उपसागरामधून यांना मॉन्सूनचा पाऊस मिळतो त्यावर भात शेती होते. पुढे रब्बी हंगामात शेतकरी जंगलामधून संत्री, लिंबू, बांबू कोंब, कंदमुळे, औषधे आणि सुगंधी वनस्पती गोळा करतात. अलीकडे या राज्यात अननस, पपई, पॅशन फ्रूट, फ्लॉवर, प्लम, लिची आणि विलायची यांची शेती वाढत आहे. उत्तराखंडप्रमाणेच मणिपूरच्या शेती व शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या  संस्था पाहायला मिळाल्या. त्यांची हवामान बदलाशी असलेली सकारात्मक झुंज मला दोन वर्षांपूर्वी प्रत्यक्ष पाहता आली. सोबतच स्थानिक लोकांबरोबर चर्चाही करता आली. 

मणिपूरमध्ये हवामान बदलाचा सर्वांत जास्त परिणाम येथील शेती, जंगले आणि पाणथळ परिसंस्थावर झाला आहे. येथील डोंगर पर्वतरांगांच्या उतारावरील शेतीत पीकपद्धती ९० टक्के भातशेती असून, त्यावर वातावरण बदलाचा जास्त फटका बसला. हिमालयाची माती स्थानिक वृक्षामुळे मुबलक सेंद्रिय कर्बयुक्त असल्याने भाताची मुळे मूलद्रव्ये आणि पाण्याच्या शोधात सर्वत्र पसरतात. पिकाला व मातीलाही आधार देतात.

गेल्या तीन दशकांमध्ये स्थानिक वन संपत्तीत झपाट्याने बदल होत आहे. आक्रमक विदेशी झाडे बस्तान बसवत आहेत. जंगलामध्ये घाणेरीची बेसुमार वाढ आणि पाणथळ जागा जलपर्णीचे झाकून चालल्याने स्थानिक पर्यावरण बिघडत आहे. हा साधा मापदंड आहे, कारण या दोन्ही वनस्पतींवर हवामान बदलाचा काहीही परिणाम होत नाही. उलट त्या वेगाने वाढू लागतात. वातावरण बदलामुळे तापमानात वाढ होत असून, अशा स्थितीत जंगलातील बांबूला लवकर फुले आणि बिया येत आहेत. बांबू बेटाजवळ उंदरांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. त्यांच्या भीतीमुळे लोकांनी कंदमुळांची शेती जवळपास बंद केली आहे. पूर्वी बटाटे, रताळी, सुरण कंद यांची शेती करत असलेले हे शेतकरी आता राजधानी इंफाळ येथे पडेल ते काम करत आहेत. भारतीय कृषी संशोधन परिषदेने (आयसीएआर) मणिपूरमधील शेती, शेतकरी आणि त्यांच्यावरील वातावरण बदलाचा परिणाम यांचा सविस्तर अभ्यास करण्यात आला. त्याचा उपाय योजनेसह अहवाल केंद्र व राज्य शासनास २०१८ मध्ये सादर केला. अकरा प्रमुख शास्त्रज्ञांनी मणिपूरचा मागील ३० वर्षांचा पाऊस, तेथील तापमान आणि शेतीमध्ये झालेली स्थित्यंतरे यांचा केलेला हा अभ्यास शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरणारा आहे. १९५४ ते २०१४ या ६० वर्षांमध्ये मणिपूरचे तापमान प्रति दशक ०.१ अंश सेल्सिअसने वाढल्याचे दिसते. दक्षिणेकडील जिल्हे उत्तरेकडील जिल्ह्याच्या तुलनेत यापुढे अधिक तापणार आहेत. पर्यायाने पाऊस वाढणार असला तरी तो सलग पडण्याऐवजी काही दिवसातच मुसळधार पडून सरासरी पूर्ण करणार आहे. उत्तरेकडे पावसाचे प्रमाण वाढणार असल्याने त्यानुसार शेतकऱ्यांनी शेतीचे नियोजन करण्याची गरज अहवालात व्यक्त केली आहे. 

मणिपूर या राज्यात भात, मका, दाळवर्गीय पिके, कंदमुळे, आले, मिरची यांची अनेक स्थानिक वाणे आहेत. वातावरण बदलात हीच पारंपरिक स्थानिक वाण त्यांच्या जनुकीय गुणधर्मामुळे शेतकऱ्यांना सुरक्षित ठेवू शकतील, असेही हे शास्त्रज्ञ आग्रहाने मांडतात. या राज्यात आमरी (ऑर्किड) फुलांच्या ५०० जाती, औषधी वनस्पतींच्या १२०० प्रजाती आणि बांबूच्या ५३ जाती आजही या वातावरण बदलात टिकून आहेत. त्यांच्या संरक्षणासाठी शासन, स्थानिक शेतकरी आणि स्थानिक समाज सेवी संस्था यांनी प्रयत्न केले पाहिजेत.  

मणिपूरमध्ये शेकडो पाणथळ जमिनी आहेत. त्यातील पाणी आटून बाष्प तयार होत आहे. बाष्प म्हटले की ढगनिर्मिती आलीच, पण हा पाऊस तेथेच पडेल असे नाही. म्हणूनच या राज्यात काही ठिकाणी वेगाने पाऊस पडतो, तर उर्वरित भागात दीर्घ दुष्काळही. ‘लोकटक’ या मणिपूर येथील प्रचंड मोठे सरोवरामध्ये भाताची अनेक तरंगती बेटे आहेत. हे सरोवर गाळाने भरत असून, जलपर्णीची बेसुमार वाढ होत आहे. हे सुंदर सरोवर पूर्णपणे नष्ट होण्याची आपण वाट पाहणार का? 

भात पद्धतीत केले बदल
मणिपूरच्या शेतकऱ्यांना वातावरण बदलाची जाणीव करून देण्यासाठी अनेक सामाजिक संस्था आणि त्यांच्याशी जोडलेले मणिपुरी युवक काम करत आहेत. अशा परिस्थितीत शेतीमध्ये करावयाचे शास्त्रीय बदल सांगितले जात आहेत. या राज्यात सेंद्रिय शेती मोठ्या प्रमाणावर होते. भात हे मुख्य पीक आहे. पूर्वी ‘राब’ (जंगलामधील पाने गोळा करून त्यांना एका ठिकाणी जाळणे) पद्धतीने भात रोपे तयार केली जात. त्यांची शेतात लागवड करत. भात पिकासाठी पाऊस भरपूर गरजेचा. हवामान बदलामुळे मणिपूरमध्ये पावसाचे प्रमाण अनियमित झाल्याने भात शेतीवर परिणाम झाला आहे. यातूनच ‘एसआरआय’ ही भात लागवडीची पद्धत विकसित झाली. भाताचे २ किलो वाण एक बादली पाण्यात टाकून त्यात थोडे मीठ टाकून हलवल्यानंतर हलके बी वर तरंगून येते. ते काढून खाली बसलेले बी सकाळी एका पोत्यात घट्ट बांधून दिवसभर ठेवले जाते. दुसरे दिवशी ते मोड फुटलेले बी रोपवाटिकेतील शेणखतयुक्त गादीवाफ्यावर पसरले जातात. दहा ते बारा दिवसात भात रोपे लागवडीसाठी तयार होतात.

एका एकरासाठी एवढी रोपे पुरतात. या पद्धतीत पाणी कमी लागते. लागवडीवेळी एका जागी एकच रोप लावले जाते. त्याला ५० ते ६० फुटवे येऊन भरपूर उत्पादन मिळते. वातावरण बदलावर मात करणारी ही भात लागवड पद्धती या राज्यात लोकप्रिय होत आहे. मणिपूरमध्ये प्रत्येक गावात सर्व शेतकरी जोडलेला एक शेतकरी गट असतो, त्याला ‘फार्मर क्लब’ असे म्हणतात. या गटाला बँक कर्ज पुरवठा करते. बँकेला नाबार्डतर्फे आर्थिक मदत होते. शेतकरी गट सामूहिक पद्धतीने एका मोठ्या रोपवाटिकेमध्ये प्रत्येकासाठी (शेतकऱ्याचे नाव टाकून) भात रोपे तयार करतो. पुढे त्याचे वाटप होते. भात उत्पादन झाल्यानंतर स्वत:च्या आवश्यकतेइतके भात ठेऊन उर्वरित गटाला दिले जाते. गटामार्फत उद्योगसमूहांना विकले जाते. अलीकडे या सेंद्रिय भातासाठी परदेशी बाजारपेठही उपलब्ध होत आहे.

मणिपूरमधील भाताला औषधी गुणधर्म असल्यामुळे परदेशातही मागणी आहे. मणिपूरमधील भाताचे सर्व पारंपरिक देशी वाण या पद्धतीमुळे आजही टिकून आहेत. वातावरण बदलाविरुद्धच्या लढाईमध्ये एकटा शेतकरी जिंकू शकत नाही. येथे सकारात्मक विचाराचा समूह हवा, अख्खे गाव सोबत हवे. ‘एसआरआय’ पद्धतीचे एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे मणिपूरचा काळा भात. वातावरण बदलास प्रतिसाद देताना येथील शेतकऱ्यांनी काळ्या भाताची पारंपरिक व पर्यावरणास हानिकारक ठरू पाहणाऱ्या राब आणि लावणी पद्धती मोडीत काढल्या. आज हा सेंद्रिय भात परदेशात निर्यात होत असल्याने स्थानिक शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळत आहे. मणिपूरचे हे मौल्यवान काळे सोने पूर्वी राजेरवाड्यांमध्ये खिरीच्या वाटीत दिसत असे. आता ते गरिबांच्या झोपडीतही आढळते. ताटामधील वाटीभर काळा भात तुम्हाला कर्करोगमुक्त करत असल्याचे संशोधनातून पुढे येत आहे. 

 मणिपुरी भाताच्या प्रजातींचे संवर्धन
मणिपूर येथील शेतकरी देवकांत हे वातावरण बदलाचे अभ्यासक आहेत. आज त्यांच्या शेतावर मणिपुरी भाताच्या शंभर प्रजाती आहेत. त्यात या काळ्या भाताच्याही अनेक प्रजाती आहेत. एवढ्या सर्व काळ्या वाणांचे संरक्षण आणि संवर्धन केल्यामुळे त्यांना २०१२ चा बी बियाणे संवर्धन आणि संरक्षणाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. आज केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रयत्नांमधून मणिपूरमध्ये या भाताच्या वाणाचे मोठ्या प्रमाणावर संवर्धन होत आहे. हवामान बदलाच्या काळ्या कुट्ट ढगामधील हा एक आशेचा किरणच नव्हे काय?

- डॉ. नागेश टेकाळे, ९८६९६१२५३१
(लेखक शेती प्रश्नांचे अभ्यासक आहेत.)


इतर ताज्या घडामोडी
हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूभुसावळ, जि. जळगाव : तालुक्यातील हतनूर धरणात...
संगणकीय सातबारावर कुळांची नावे नोंद करागडहिंग्लज, जि. कोल्हापूर : हस्तलिखित सातबारा...
पावसाचा २७ हजार हेक्टरला फटकानाशिक : नांदगाव तालुक्यातील झालेल्या...
सहा हजार क्विंटल धान्याचे होणार कंपोस्ट...भंडारा : वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे गेल्या...
शेतकरी पुरस्कारासाठी दाखल केलेले...अकोला : शेतीत विविध प्रयोग करणाऱ्या, उत्पादन...
एकरकमी ‘एफआरपी’साठी ‘मिस कॉल’ मोहीमकोल्हापूर : केंद्र सरकारने ‘एफआरपी’चे तुकडे...
पीकविमा योजना शासनाने चालवावी : भारत...अकोला : हजारो कोटी रुपये कमाई करणाऱ्या...
खानदेशात केळी दरांवर दबावजळगाव : खानदेशात केळीची आवक गेल्या पाच-सहा...
कृषी कायद्यांबाबतचा अहवाल खुला करावा :...अकोला : केंद्र सरकारच्या कृषिविषयक कायद्यांना...
सागर खोतकडून ‘स्वाभिमानी’च्या...नेर्ले, जि. सांगली : आमदार सदाभाऊ खोत यांचा मुलगा...
जालन्यात रेशीम कोषाला उच्चांकी ५१...जालना : जालना कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत...
खडसे, महाजन यांना सहकारात एकत्र...जळगाव : राज्याच्या राजकारणात माजी मंत्री एकनाथ...
फुंडकर फळबाग योजनेत शेतकऱ्यांचे ७५ लाख...नांदेड : रोजगार हमी योजनेत पात्र ठरु शकत नाहीत...
नाशिक बाजार समिती गैरव्यवहार प्रकरणी...नाशिक : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २६ ऑक्टोबर...
जमनालाल बजाज पुरस्कार बी. बी. ठोंबरे...लातूर : कौन्सिल फॉर फेअर बिझनेस प्रॅक्टिसकडून...
अज्ञाताने फवारले कांद्यावर तणनाशक; ...भुसावळ, जि. जळगाव : तळवेल (ता. भुसावळ) येथील...
पंजशीरवर तालिबानचा ताबा; गर्व्हनर...काबूल : अफगाणिस्तानातील सर्वात कठिण मानला...
शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या संपूर्ण...अकोला : शरद जोशी यांनी शेतकऱ्यांच्या पायातील सर्व...
काथ्या उद्योगवृद्धीसाठी सर्वतोपरी...सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यात काथ्या उद्योग...
चांदूर बाजार तालुक्यात ४२ टक्‍क्‍यांनी...अमरावती : शेती कामाकरिता बैलांचा वापर होत...