घोंघावत आहे कर्ब वायूचे संकट ...

पूर्वी फक्त कडक हिवाळ्यामध्ये शेतामधील गोठ्याजवळ शेकोटी दिसत असे, आज पिकांचे अवशेष जमिनीत गाडण्याऐवजी किंवा त्यांचे खत करण्याऐवजी सर्रास पेटवून दिले जातात. केवढा तरी कर्ब वायू वातावरणात जातो. त्याचे परिणाम आता मोठ्या प्रमाणात दिसू लागले आहेत.
Rising temperatures has led to increase melting of icebergs.
Rising temperatures has led to increase melting of icebergs.

पूर्वी फक्त कडक हिवाळ्यामध्ये शेतामधील गोठ्याजवळ शेकोटी दिसत असे, आज पिकांचे अवशेष जमिनीत गाडण्याऐवजी किंवा त्यांचे खत करण्याऐवजी सर्रास पेटवून दिले जातात. केवढा तरी कर्ब वायू वातावरणात जातो. त्याचे परिणाम आता मोठ्या प्रमाणात दिसू लागले आहेत. अवघ्या विश्वावर घोंघावत असलेल्या हवामान बदलाच्या वादळी झंझावातास मुख्य कारणीभूत आहे तो वातावरणामधील सध्या सातत्याने वाढत असलेला कर्ब वायू. वास्तविक हा वायू सभोवतीच्या हवेमध्ये योग्य प्रमाणात असेल तर वातावरणामध्ये उबदारपणा येतो. प्रत्येक जैविक घटकाच्या सुदृढ निरोगी वाढीसाठी हा उबदारपणा आवश्यक असतो, म्हणूनच तर कर्ब वायूला मानवाचा मित्र म्हटलेले आहे. मात्र हा वायू रुपामधील मित्र जेंव्हा आपली मर्यादा ओलांडून वाहू लागतो, तेव्हा तो शत्रूच्या जागी गेलेला असतो. अरब, त्याचा तंबू आणि उंटाची गोष्ट आपणास माहिती आहेच. वाळवंटामधून एक अरब त्याच्या उंटासह प्रवास करत असतो, रात्र झाली तशी थंडी वाढू लागली म्हणून त्या अरबाने वाळवंटात तंबू उभारला आणि आत जाऊन शांत झोपी गेला. उंट बाहेर प्रचंड थंडीमध्ये काकडत होता. त्याने मालकाला विनंती केली, “बाहेर खूप थंडी आहे, मी माझा चेहरा तंबूमध्ये घेतो,” अरबाने परवानगी दिली आणि उंटाच्या गरम श्वासामुळे तंबू अजून जास्त उबदार झाला. उंट म्हणाला, “मालक, माझी मान आणि पुढचे दोन पाय देखील तंबूत घेऊ का?” अरबाने आनंदाने परवानगी दिली आणि शांत झोपी गेला. उंटाने पुन्हा त्याला जागे केले, “मालक माझे मागचे दोन्हीही पाय खूप काकडले आहेत, त्यांना तंबूत घेतले नाही तर उद्या आपणास प्रवासच करता येणार नाही” अरबाला ते पटले, उंट तंबूमध्ये आला आणि अरब बिचारा तंबू बाहेर फेकला गेला. हवामान बदलाचा शेतीवर होणाऱ्या परिणामाचा अभ्यास करण्यापूर्वी प्रत्येक शेतकऱ्याने ही गोष्ट समजून घेणे गरजेचे आहे. अरब हा शेतकरी, तंबू म्हणजे त्याचे वावर आणि कर्ब वायू हा उंट आहे. याला मित्राच्या ठिकाणीच ठेवणे योग्य आहे, त्याचे लाड करून स्वत:च्या स्वार्थासाठी त्याला मोठे करण्याचा प्रयत्न केल्यास वावर आणि ते कसणारा शेतकरी उध्वस्त होणार आहेत. निसर्गाचा नाश करून विकासाची इमले उभारणाऱ्या प्रत्येक विकसनशील राष्ट्रांमध्ये आज आपणास हेच चित्र पहावयास मिळत आहे. आपल्या शेताचेच उदाहरण घ्या. रासायनिक खते मर्यादित वापरली तर भरपूर उत्पादन मिळते, अजून थोडा हात सैल केला की, पुन्हा उत्पादन वाढते. त्यानंतर त्याचा अनियंत्रित भरमसाट वापर केला की, त्याचा उंट होतो. शेत आणि शेतकरी दोघेही उध्वस्त होतात. अनियंत्रित पाण्याचा आणि कीटकनाशकांचा वापर नेहमीच या गोष्टीमधील उंटाप्रमाणे असतो. वातावरणात वाढतोय कर्ब वायू  सूर्याची किरणे जेंव्हा पृथ्वीच्या भूपृष्ठावर पडतात तेव्हा ती परावर्तित होतात. या किरणामधील उष्णता वातावरणामधील कर्ब वायू अडवतो आणि आपणास उबदारपणा जाणवतो. जेंव्हा हाच कर्ब वायू प्रमाणाबाहेर वाढू लागतो, तेव्हाही कर्ब वायू त्याच्या मूलभूत गुणधर्माचेच पालन करत असतो मात्र आता उबेची जागा उष्णता घेऊ लागलेली असते. त्यामुळे सुसह्य वातावरण असह्य होऊ लागते. स्वयंचलित वाहनाच्या माध्यमातून जीवाश्म इंधन मोठया प्रमाणावर जाळले जाते, त्याच बरोबर शेतामधील पिकांचे अवशेष जाळणे, जैविक कचरा उघड्यावर टाकणे या आणि अशा विविध कारणामुळे वातावरणामध्ये कर्ब वायू वाढू लागतो. पूर्वीचे म्हणजे पाच दशकापूर्वी वातावरणामध्ये कर्ब वायू बऱ्यापैकी योग्य प्रमाणात होता. म्हणूनच पाऊस वेळेवर तो सुद्धा रिमझिम, गुलाबी थंडी आणि काही भौगोलिक ठिकाणांचा अपवाद वगळता उन्हाळा आणि उन्हाळ्याची सुट्टी सर्वांनाच हवीहवीशी वाटत असे. त्यावेळी रस्त्यावर सध्याच्या वाहनाच्या संख्येच्या तुलनेत दहा टक्के सुद्धा वाहने नव्हती. गावांना एकमेकांशी जोडण्यासाठी बैलगाडी हेच एकमेव वाहन होते, सावकाराकडे घोडा तर नोकरदाराकडे सायकल. बऱ्यापैकी मोठ्या गावात एक-दोन एसटी येत असे. आम्ही शाळकरी मुले बस दुरून दिसली की, रस्त्याच्या कडेला रांगेत उभे राहून वाहकाला हात वर करून सलाम करत असायचो, आज याच गावात दिवसभरात ६० ते ७० बस गाड्या येतात. सर्व गाड्या खचाखच भरून तालुका, जिल्ह्याच्या ठिकाणी जातात. काय करतात लोक तेथे जाऊन? माझ्या लहानपणी गावात एक फटफटी आली होती. तेव्हा अवघे गाव तिला पाहण्यासाठी लोटले होते. तिला हात लावण्यासाठी माझ्या बरोबर अनेक मुलांची धडपड सुरु होती, आज ग्रामीण भागात जवळपास घरोघरी ती आहे आणि कसलेही कारण नसतानाही अर्धा लिटर, एक लिटर पेट्रोल टाकून गावभर फिरवली जाते. हे अवखळ श्रीमंतीचे प्रदर्शन की किमती जीवाश्म इंधनाची उधळण? यालाच विकास म्हणावयाचे की पीछेहाट? पीक अवशेष जाळण्याचे परिणाम  पूर्वी फक्त कडक हिवाळ्यामध्ये शेतामधील गोठ्याजवळ शेकोटी दिसत असे, आज पिकांचे अवशेष जमिनीत गाडण्याऐवजी अथवा त्यांचे खत करण्याऐवजी सर्रास पेटवून दिली जातात. केवढा तरी कर्ब वायू वातावरणात जातो. पंजाब, हरियाना, मध्य प्रदेशात शेकडो एकरावर भात अवशेष पेटवून रब्बीच्या गव्हासाठी रान तयार केले जाते. कडक हिवाळ्यात राजधानी दिल्लीमध्ये सकाळच्या रामप्रहरी दोन-तीन फुटावरचा माणूस सुद्धा दिसत नाही एवढे हे काळसर धुरके हवेत पसरलेले असते. पूर्वी घराबाहेर कोपऱ्यात व्यवस्थित खड्डा करून तयार केलेला सेंद्रिय उकिरडा ही आमची श्रीमंती होती. गाव स्वच्छतेमध्ये ही श्रीमंती आता घंटागाडीच्या आवाजात विरून गेली आणि असे असूनही आम्ही ओला कचरा, आजही उघड्यावर सर्वत्र फेकत असतो. त्यातून केवढा तरी कर्ब वायू वातावरणामध्ये प्रवेश करतो, याची आम्हाला काहीच माहिती नसते. वृक्ष तोडीला आळा आवश्यक  वातावरणामधील वाढत्या कर्बवायूला पकडून त्यास स्थिर करण्याचे महत्त्वाचे कार्य वृक्ष करत असतात. याच वृक्षांना आज आम्ही तोडून शेतीसाठी नवीन जागा निर्माण करत आहोत. वृक्ष तोडून त्याच्या शांत शीतल सावलीची जमीन शेतीसाठी वापरणे म्हणजेच ‘स्मशान शेती’ असे जेंव्हा निसर्गावर प्रेम करणारे, त्याच्या संवर्धनाचा संदेश देणारे एक दाक्षिणात्य आध्यात्मिक गुरू म्हणतात तेव्हा त्याचे आश्चर्य ते काय? जंगल नष्ट करणे, वृक्षांना तोडणे यामुळे कर्बपद चिन्हे वाढण्याऐवजी तो वायू वातावरणात मुक्त होत आहे. याचा सर्व परिणाम शेतीवर वाढत्या उष्णतेच्या रूपाने होत आहे. कर्ब वायूचे संकट  हवेमधील वाढत्या कर्ब वायूच्या संकटास सर्वप्रथम निसर्गामधील दोन महत्त्वाच्या घटकांना सामोरे जावे लागते, त्यातील एक आहे उंच बर्फाच्छादित हिम शिखरे आणि दुसरा म्हणजे समुद्र. कर्ब वायूच्या उबदारपणाचे जेंव्हा उष्णतेमध्ये रूपांतर होते, तेव्हा त्याचा पहिला आघात हा हजारो वर्षापासून साठलेल्या बर्फावर होतो, बर्फ वितळू लागतो. हा वितळलेला बर्फ एक तर समुद्रामध्ये मोठमोठ्या हिमनगांच्या रूपाने प्रवेश करतो किंवा जेथे वितळतो तेथेच हिम तलाव तयार होतात. ज्याप्रमाणे हिमनगामुळे समुद्रपातळी वाढू लागते त्याच प्रमाणे हिम तलावामध्ये सुद्धा बर्फ वितळून पाण्याची पातळी वाढू लागते, असे तलाव कधीही फुटू शकतात. भूतान हा सुंदर निसर्गरम्य आनंदी शेतकऱ्यांचा देश आज हिम तलावांच्या काठावरच वसलेला आहे. कशी झोप येत असेल तेथील शेतकऱ्यांना? या विश्वामधील सर्व पर्वतांचा राजा हिमालय आणि त्याच्या कुशीमधील भूतान त्याच बरोबर भारताच्या उत्तरपूर्वेकडील आपल्या सात राजकन्या आणि त्यांचा लहान भाऊ सिक्किम हे आज याच हवामान बदलास प्रत्यक्ष सामोरे जाऊन ते आव्हान भविष्यात समर्थपणे पेलण्याचा प्रयत्न करत आहेत. या आठ राज्यांची चार पाच दशकांपूर्वीची परिस्थिती, सध्या हिमालयीन वातावरणाचा त्यांच्यावर होत असलेला परिणाम, त्यास सामोरे जात असताना शेतकऱ्यांना बरोबर घेऊन स्थानिक प्रशासनाचे सुरु असलेले प्रयत्न आणि त्यातून आपणास काय शिकता येईल, कोणता बोध घेता येईल हे पाहणे, अनुभवणे जास्त महत्त्वाचे आहे. भारताच्या सीमेवरील ही चिमुकली राज्ये वातावरण बदलाच्या लढाईमधील खरे योद्धे आहेत. तेथील शेतकऱ्यांनी हिमालयाच्या सावलीमध्येच वृक्षांच्या सहवासात, पारंपारिक शेतीला विज्ञानाची साथ देऊन शेती करावी. सर्व शेतीवाडी सोडून शहरामध्ये स्थलांतर हा त्यावर उपाय नाही हे शेतकऱ्यांना समजावून, प्रत्यक्ष कृतीमधून सांगण्याचा तेथील शासनाचा, समाजसेवी संस्था आणि शास्त्रज्ञांचा प्रयत्न सुरु आहे. म्हणूनच ‘पाऊल पडती पुढे म्हणत तेथील विविध लहान मोठ्या पथदर्शक प्रयोगांची यशोगाथा पाहताना पदोपदी त्याची सत्यता अनुभवण्यास मिळते. (लेखक शेती प्रश्नांचे अभ्यासक आहेत)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com