agricultural news in marathi article by Dr. Nagesh tekale | Agrowon

देवराई संवर्धनातून आदिवासींसाठी उत्पन्नाचे स्रोत

डॉ. नागेश टेकाळे
सोमवार, 19 एप्रिल 2021

मेघालयामध्ये देवराई संरक्षण आणि संवर्धनाला पर्यटनाची जोड देतानाच आदिवासी उत्पन्नाचे स्रोतही विकसित केले गेले. आपल्या कोकणामध्ये असलेल्या देवरायांकडे आपण दुर्लक्षच करत आहोत.
 

मेघालयामध्ये देवराई संरक्षण आणि संवर्धनाला पर्यटनाची जोड देतानाच आदिवासी उत्पन्नाचे स्रोतही विकसित केले गेले. आपल्या कोकणामध्ये असलेल्या देवरायांकडे आपण दुर्लक्षच करत आहोत.

जगामधील बर्फाच्छादित हिम शिखरे आणि त्यांच्या छायेखालील लोकवस्ती, उत्तर आणि दक्षिण गोलार्धाच्या परिसरामधील राष्ट्रे आणि समुद्र किनाऱ्‍यांच्या लगतची गावे, शहरे सर्वप्रथम हवामान बदलाच्या तडाख्यात सापडतात. आपल्या देशातील उदाहरण घ्यावयाचे ठरविले, तर सर्वप्रथम समोर येतो तो समुद्राला जवळ असणारा तमिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश आणि ओडिशासोबत आपल्या महाराष्ट्राचा कोकणचा भाग सुद्धा. या राज्यांच्या समुद्र किनाऱ्‍यांवर कायम उंच लाटा, चक्रीवादळे यांचा इशारा देणारे लाल झेंडे लावलेले असतात. गेली दोन, तीन दशके हिमालयाच्या डोंगर रांगामध्ये वसलेल्या ईशान्य पूर्व उत्तरेकडील राज्यांमध्ये हवामान बदलाचे परिणाम प्रकर्षाने दिसत आहेत. दक्षिणेकडील राज्ये आणि ओडिशामध्ये समुद्रकिनाऱ्‍यालगतची लोकसंख्या व तेथील शेती आज जास्त प्रभावित होत आहे. उत्तरपूर्वेकडील सर्व राज्येच या प्रभावाखाली येतात.

मेघालय हे असेच उत्तर पूर्वेकडील आसाम आणि बांगलादेश यांच्या सीमांना जोडलेले जेमतेम ३२ लाख लोकसंख्येचे छोटे राज्य. राज्याचा ८० टक्के भाग जंगलाने व्यापलेला असला तरी सुदृढ जंगल जेमतेम ६० टक्केच आहे. सर्व लोकसंख्या अदिवासी असून, शेती आणि जंगलावरच अवलंबून. राज्यातील ७० टक्के लोक शेती व्यवसायामध्ये असले, तरी शेतीखालील क्षेत्र जेमतेम १० टक्के सुद्धा नाही. मेघालय म्हणजे पाण्याने भरलेल्या नभांचा प्रदेश. त्याचमुळे जगामधील एकमेव वर्षभर भिजलेला भूभाग म्हणून याची ओळख आजही कायम आहे.

जगामधील सर्वांत जास्त पाऊस पडणारे ‘चेरापुंजी’ हे ठिकाण याच राज्यात आहे. येथे तब्बल ४५० ते ५०० इंच पाऊस पडतो. मात्र उन्हाळ्यात लोकांना पिण्याचे पाणी आणण्यासाठी ४-५ कि.मी डोंगर उतरून खाली यावे लागते. लहान मुले, मुली आपल्या आईला मदत करण्यासाठी डोक्यावर पाण्याचा हंडा, घागर घेऊन डोंगर चढताना दिसतात, तेव्हा डोळ्यांतून पाणी वाहू लागते. एवढा प्रचंड पाऊस पडणाऱ्‍या या गावात उन्हाळ्यामध्ये १५ रु. एक बकेट पाणी मिळते. येथील नळाला येणारे पाणी जेमतेम १५००० लोकवस्तीला पुरेल एवढेच असते. पन्नास वर्षांपूर्वी चेरापुंजीची लोकसंख्या ७००० होती, आज ती ७०००० आहे. वाढत्या लोकसंख्येस जागा देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाली. आज येथील पावसाचे प्रमाण २२००० मि.मी. वरून अर्ध्यावर म्हणजे ११००० मि.मी.वर आले. लोकांचा वेळ पाणी भरण्यात आणि साठवण करण्यामध्ये जातो, मग शेती कधी करणार?

२०१६ मध्ये पॅरीस येथील आंतरराष्ट्रीय हवामान परिषदेमध्ये भारतीय दालनात चेरापुंजीच्या या दृश्‍यासोबत चेन्नईला आलेली सुनामी यांतून होत असलेला हवामान बदलाचा परिणाम जगाला दाखवला जात होता. प्रत्येक राष्ट्राच्या दालनात अशाच कथा आणि व्यथा होत्या. त्यास जबाबदार असणारी राष्ट्रे एकमेकांवर मोठमोठ्या डिजिटल माध्यमाच्या सादरीकरणामधून “तू तू, मैं मैं” करत होती.

मेघालयास मी तीन वेळा भेट दिली, उद्देश होता, तेथील देवराया आणि आमरीच्या फुलांचा अभ्यास. मला खरेतर महाराष्ट्रात पाच वर्षांखालील मुलांचे कुपोषणामुळे होणारे मृत्यू वाढत असताना या राज्यामधील बालके एवढी गुटगुटीत आणि निरोगी कशी हे पाहायचे होते.

मेघालय हे राज्य पृथ्वीवरील सर्वांत जास्त हरित प्रदेश म्हणून ओळखले जाते. ते तेथील २०० पेक्षा जास्त मोठमोठ्या घनदाट देवरायामुळे. अर्धा हेक्टर ते ९००० हेक्टरपर्यंत आकार असलेल्या अनेक देवरायामध्ये पाण्याचे धबधबे, नैसर्गिक पाणी साठे आहेत. पाण्याचे मधूर संगीत आणि पक्ष्यांचे मंजूळ आवाज याशिवाय तेथे कुठलाही आवाज नसतो, म्हणून प्रतिवर्षी लाखो पर्यटक मेघालयात या देवराया आणि त्यामधील आमरीची फुले पाहण्यास येतात.

वातावरण बदलाच्या संकटामध्येही तेथील देवराया संरक्षित करून हजारो तरुणांना माहितीचा स्रोत पुरवून त्यांना देवराई मार्गदर्शक करण्यात आले. येथे येणाऱ्या पर्यटकांना अदिवासींच्या घरात पारंपरिक पद्धतीमध्ये योग्य त्या सुविधा देऊन त्यांचा निवास सुखद करण्यासोबतच आदिवासींना उत्पन्नाचे साधन तयार करण्यात आले. हे सारे करणाऱ्या अदिवासी नेते लिंगडोह यांचा येथे मुद्दाम उल्लेख करावयास हवा. या नेत्यानेच देवरायांच्या संवर्धनाचे धडे हजारो अदिवासींना देऊन त्यांना शाश्‍वत उत्पन्न मिळवून दिले. पारंपरिक जंगलाचे संवर्धनसुद्धा केले आहे. हवामान बदलापासून नैसर्गिक साधन संपत्तीचे रक्षण करणारे असे अनेक शिलेदार जगात विखुरलेले आहेत.

आदिवासी नेते बाह तामबोर लिंगडोह
हवामान बदलामध्ये जंगल सांभाळणे, ते राखणे आणि त्याला संरक्षित करणे यास यापुढे फार महत्त्व असणार आहे. मेघालयामधील ‘पूर्व खासी’ भागामधील अदिवासी नेते लिंगडोह आज हेच जंगल राखण्याचे, देवराया संभाळण्याचे मोलाचे कार्य करत आहेत. त्यांच्या मॉवप्लाँग गावाजवळ एक मोठी देवराई होती. त्यांचे बालपण त्याच देवराईत गेले होते. नंतर मात्र केवळ इंधनासाठी, लाकूड गोळा करण्यासाठी तेथे वृक्षतोड सुरू झाली. लिंगडोह यांनी ती देवराई वाचवण्याचे ठरविले. स्थानिक तरुणांना जंगल, वृक्ष आणि देवरायांचे महत्त्व त्यांनी समजावून दिले. त्यांच्या या संवर्धनाच्या कार्यास ‘यूनो’चे अर्थसाह्य मिळाले. २००७ मध्ये सुरू झालेला हा संरक्षणाचा प्रकल्प आज २७००० हेक्टर वर पसरलेला आहे.

जगामधील या सर्वांत मोठ्या घनदाट देवराईला पाहण्यासाठी प्रतिवर्षी लाखो देशी विदेशी पर्यटक येथे येतात. जंगल लागवडीच्या माध्यमातून वातावरणामधील कर्ब वायू कमी करण्याचा यूनोचा हा ‘रिड’ (REDD) प्रकल्प भारतातील एकमेव असा आहे. तो एका जंगल राखणाऱ्‍या अदिवासीला मिळाला आहे, हे महत्त्वाचे. याच जंगलामध्ये असलेल्या प्रचंड मोठ्या देवराईमधील पाण्याचा साठा त्यांनी नैसर्गिक मार्गानेच मूळ स्रोतास धक्का न लावता बाहेर आणून शेकडो हेक्टर जमिनीवरील शेतीला जीवदान दिले. त्यामुळे हिवाळ्यात आणि काही प्रमाणात उन्हाळ्यातही पिक घेणे शक्य होऊ लागले. लिंगडोह यांच्या या देवराई संवर्धनाच्या प्रयत्नामुळे आणि पर्यटनामुळे आज त्या परिसरामधील ७२ गावे स्वयंपूर्ण झाली आहेत. सभोवतालचे जंगल सुदृढ असेल, तरच गाव स्वयंपूर्ण होऊ शकते, हाच एक सकारात्मक संदेश लिंगडोह यांच्या या महान कार्यामधून आपणास मिळतो.

आपण कधी सुधारणार?
मेघालयातील देवराईप्रमाणेच आपल्या राज्यातील ‘देवराई’ हा जंगलाचा एक घटक आणि आपल्या राज्याच्या अर्थाजनाचा एक अविभाज्य घटक होऊ शकतो, हे मेघालयाने आम्हाला दाखविले आहे. आम्ही आमच्या सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या हजारो देवरायांसाठी काय केले, हा प्रश्‍न उभा राहतो. आज या देवराया आकुंचन पावत आहेत, कितीतरी दुर्लक्षित आहेत, त्यांच्या आजूबाजूचे जंगल तोडून त्यांना एकटे पाडले जात आहे, असे एकटे पडलेले घनदाट निसर्ग ठिपके हवामान बदलास लगेच बळी पडतात. वातावरण बदलाच्या संकटामध्ये सुद्धा जंगलामधील देवराई ही शहरी लोकांना निसर्गाच्या समीप घेऊन जाण्याचे एक साधन ठरू शकते. त्यासाठी पर्यटन आणि स्थानिक रोजगाराला चालना मिळू शकते, यावर आपण विश्‍वासच ठेवायला तयार नाही. हीच खरी शोकांतिका आहे. अर्थात, आपल्याकडील देवराया वनविभागाच्या अधिपत्याखाली येतात आणि मेघालयात त्यांच्यावर अदिवासींचे राज्य आहे हा फरक इथे लक्षात घेणे आवश्यक आहे. मेघालय शासनाचा स्वत:चा स्वतंत्र जैवविविधता विभाग आहे. त्याच्या माध्यमाधून सर्व देवरायांचे नियंत्रण होते. मेघालय पर्यटन विभागाकडे देवराई पर्यटनाचा स्वतंत्र कक्ष आहे. या कक्षामार्फत देशी विदेशी पर्यटकांचा देवराया दाखविण्यासाठी सहली काढल्या जातात. या सहलीमध्ये प्रत्येक पर्यटकाच्या हातात त्या देवराईमधील वनस्पतींची माहिती, त्यांचे महत्त्व, तेथील देवदेवतांची आणि त्यावरील लोक श्रद्धां यांची माहिती दिलेली असते. आपल्या देवराई संवर्धनाबाबत, पर्यटनाबाबत आपण कधी जागे होणार, हाच खरा प्रश्‍न आहे.


इतर ताज्या घडामोडी
लाभार्थी शेतकऱ्यांचे अनुदान तातडीने अदा...बुलडाणा : शासन शेतकऱ्यांचा जीवनस्तर उंचविण्यासाठी...
‘कस्तुरी’चा दरवळ मृत्यूनंतरही कायमकोल्हापूर : गेल्या सत्तावीस वर्षांपासून तिने...
ट्रायकोडर्मा वापरण्याच्या पद्धतीट्रायकोडर्मा ही उपयुक्त बुरशी असून, ती रोपांच्या...
जनावरांचे पावसाळ्यातील व्यवस्थापनपावसाळ्यात होणाऱ्या वातावरणातील अचानक बदलामुळे...
खानदेशात अत्यल्प पेरणीजळगाव ः खानदेशात या महिन्यात अपवाद वगळता हवा तसा...
नांदेडमध्ये सोयाबीनचे क्षेत्र वाढण्याची...नांदेड : जिल्ह्यात यंदा चार लाख हेक्टरवर...
परभणीत १२.६४ टक्के पेरणीपरभणी ः जिल्ह्यात यंदाच्या (२०२१) खरीप हंगामात...
देशात वीज पडून दरवर्षी दोन हजार...पुणे : हरिताच्छादन कमी झाल्याने होणारी तापमान वाढ...
कांदा उत्पादक शेतकऱ्याचा प्रामणिकपणानाशिक : जगात प्रामाणिकपणा लोप पावत चालला असल्याची...
अन्नद्रव्यांवरून खतांचे व्यवस्थापन...गेवराई, जि. बीड : जमिनीतील उपलब्ध...
आंबेओहळ प्रकल्पात  ३० टक्के पाणीसाठाकोल्हापूर : आजरा तालुक्यात असलेल्या आंबेओहळ...
वनौषधी पानपिंपरीचे दर वाढल्याने...अकोला ः जिल्ह्यात सातपुड्याच्या पायथ्याशी अकोट,...
नुकसान टाळण्यासाठी  मिश्र पिकांवर भरराळेगाव, जि. यवतमाळ : गेल्या वर्षी कपाशीवर आलेली...
यवतमाळमध्ये अनधिकृत खतांचा साठा जप्तयवतमाळ : परवान्यात नसतानाही खतांचा अनधिकृतपणे...
सांगली जिल्ह्यात खरिपाची २५ टक्के...सांगली : जिल्ह्यात खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र २...
सूक्ष्म खाद्य उन्नयन योजनेसाठी अर्ज...वाशीम : जिल्ह्यात २०२०-२१ ते २०२४-२५ या...
पुण्याचा पर्यटन विकास आराखडा तयार करा पुणे : जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी सविस्तर...
प्रताप सरनाईकांचे ठाकरेंना पत्र; ...मुंबई : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी...
काळानुरूप बदल स्वीकारा : नितीन गडकरीवर्धा : बाजार समित्यांनी केवळ शेतमाल खरेदी विक्री...
संत्रा आयात शुल्कप्रकरणी बांगलादेशशी...अमरावती : नागपुरी संत्र्याचा सर्वात मोठा आयातदार...