ब्रह्मपुत्रा, बराक नद्यांच्या क्रोधाचा आसामला फटका

हिमालय पर्वतराजीमध्ये होत असलेल्या बदलांमुळे भारताच्या ईशान्येकडील अनेक लहान मोठ्या राज्यांवर वातावरण बदलाचा प्रभाव जाणवतो. आसाम हे असेच एक राज्य. केवळ हिमालयाच्याच नव्हे, तर ब्रह्मपुत्रा व बराक या नद्यांच्या तडाख्यातही सापडलेले आहे.
People have to migrate due to the floods that come every year.
People have to migrate due to the floods that come every year.

हिमालय पर्वतराजीमध्ये होत असलेल्या बदलांमुळे भारताच्या ईशान्येकडील अनेक लहान मोठ्या राज्यांवर वातावरण बदलाचा प्रभाव जाणवतो. आसाम हे असेच एक राज्य. केवळ हिमालयाच्याच नव्हे, तर ब्रह्मपुत्रा व बराक या नद्यांच्या तडाख्यातही सापडलेले आहे. बर्फाच्छादित हिमशिखरे, नद्यांना येणारे महापूर आणि नदीच्या विशाल पात्रात असलेली मनुष्य बेटे आणि त्यांचा अस्तंगताकडे होणारा प्रवास हे तीनही मापदंडे आसाम राज्यासाठी लागू पडतात.  आसामची सीमा भूतान आणि बांगलादेश या राष्ट्रांबरोबरच नागालँड, मणिपूर, मेघालय आणि मिझोराम या राज्यांशी जोडलेली आहे. वातावरण बदलाचा परिमाण आसाममध्ये दिसू लागला की त्याचे पडघम या लहान राज्यामध्ये आणि बांगलादेशात जोरजोरात वाजू लागतात. ही सर्व छोटी राज्ये आज एकत्र येऊन निसर्गाला बरोबर घेत, त्याचा सन्मान ठेवत वातावरण बदलाशी लढताना दिसतात. मात्र ब्रह्मपुत्रेच्या क्रोधामुळे आसाम मागे पडते. आसाम राज्य हे ब्रह्मपुत्रा आणि बराक या दोन नद्यांच्या विशाल खोऱ्यामुळे कृषी क्षेत्रात सात दशकांपूर्वी अतिशय संपन्न होते. अंदाजे ६० टक्के लोकसंख्या या दोन खोऱ्यांमध्येच राहते. ब्रह्मपुत्रा ही तिबेटमधील मानस सरोवरामधून उगम पावून, भारतामधील ईशान्येकडील राज्यांमधून प्रवास करत बांगलादेशात प्रवेश करते. जगामधील सर्वांत मोठ्या नद्यांमध्ये ही नदी नवव्या क्रमांकावर आहे. मात्र ती पर्यावरण आणि वातावरण बदलाचा कृषी आणि मानवी वस्तीच्या हानीबद्दल प्रथम क्रमांकावर आहे. या नदीला सातत्याने महापूर येण्यामागे तिबेटमध्ये वितळत असलेला बर्फ आणि विस्कळीत मॉन्सून. बराक नदीही आसामचे कृषी क्षेत्र उध्वस्त करत आहे. ही नदी भारतामधून बांगलादेशात प्रवेश करते. तिथे गंगा आणि यमुनेशी मिळून तिची मेघना नदी तयार होते. या नदीनेही बांगलादेशला एक दशकापूर्वी पूर्ण उद्ध्वस्त केले होते. मेघना नदीचे रौद्ररूप मी माझ्या बांगलादेश भेटीत अगदी जवळून पाहिले आहे. वातावरण बदलाच्या वाढत्या संभाव्य धोक्याची जाणीव झाल्यावर या राष्ट्राने या नदीच्या महापुरावर हळूहळू नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली आहे. मात्र आजही आपण ब्रह्मपुत्रेच्या क्रोधापासून आसामला वाचवू शकत नाही.  आसाममध्ये ८६ टक्के लोक शेती करतात. उर्वरित १४ टक्के शहरात राहतात. प्रत्यक्षात या दोन्ही नद्यांच्या काठावरील शेत जमिनी प्रतिवर्षी पुरामध्ये वाहून जात असल्याने नाइलाजाने लाखो शेतकरी शहरात स्थलांतरित होतात. अनेक शेतकरी चहा मळ्यात मजूर करणे पसंत करतात. वातावरण बदलाची ही शोकांतिकाच नव्हे काय? आसामचे जंगल क्षेत्र ३४ टक्के आहे. वास्तविक अन्य ईशान्येकडील राज्यांप्रमाणे ते ६० ते ७० टक्के असायला हवे. मात्र ‘आसाम टी’ने रोजगारनिर्मिती केली असली तरी स्थानिक जंगलावर आक्रमणही केलेले आहे. हवामान बदलाला सामोरे जाण्यासाठी स्थानिक वृक्षांचे घनदाट जंगल उपयुक्त ठरते, याचा लोकांना  विसर पडला.  आसामचे एकूण कृषी क्षेत्र सुमारे २८ लाख हेक्टर असून, त्यातील सुमारे २५ लाख हेक्टर (९० टक्के) क्षेत्रावर भातशेती केली जाते, त्यातून ५० लाख मे. टन उत्पादन मिळते. आसामची भाताची गरज १२० लाख मे. टन असून, उर्वरित गरज ही पंजाबकडून पूर्ण केली जाते. वातावरण बदलाचा भात उत्पादनावर परिमाण झाल्याचे स्थानिक शेतकरी मान्य करतात. यावर मार्ग काढण्यासाठी जागरूक असलेल्या शेतकऱ्यांचे प्रमाण अत्यल्प आहे. बहुतांश रेशनवर कमी किमतीमध्ये उपलब्ध भाताला प्राधान्य देतात. या राज्यात भाताचे तब्बल ३०० वाण आजही तग धरून आहेत. या राज्याची लोकसंख्या ३४ दशलक्ष असून, ती ११५ आदिवासी जातीजमातींमध्ये आणि ३३ जिल्ह्यांमध्ये विखुरलेली आहे. ब्रह्मपुत्रा आणि बराक या दोन नद्यामुळे यातील ३५% म्हणजेच सुमारे ४ दशलक्ष लोकसंख्या आपल्या गुराढोरांसह विस्थापित होते. हे विस्थापनाचे प्रमाण पूर्वी अल्प असल्याचे राज्यातील वयोवृद्ध सांगतात. अभ्यास आणि त्याचे निष्कर्ष    पुण्यातील आयआयटीएम या संस्थेने आसामच्या हवामान बदलाचा सविस्तर अभ्यास करून त्याचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार १८६१ ते २०१६ या प्रदीर्घ काल खंडात पाऊस सरासरी ०.७६ मि.मी.ने कमी झाला होता. मात्र १९८१ ते २०१६ या काळात तो ५.९५ मि.मी. ने कमी झाला आहे. जून ते सप्टेंबरमध्ये पडणाऱ्या पावसातील सर्वांत जास्त पाऊस जुलै महिन्यात कोसळतो. हे प्रमाण सातत्याने वाढत आहे. जुलै महिन्यामध्ये साधारण पेरण्या संपून, भात उगवलेले असते. जुलैच्या पावसामुळे आलेल्या ब्रह्मपुत्रेच्या महापुरात वाहून जाते. आसाम हे राज्य बटाटे, रताळी, केळी, पपई, सुपारी, हळद या कृषी उत्पादनाबरोबरच आसाम रेशीम, आसाम चहा आणि तेलासाठी प्रसिद्ध आहे. भारतामधील सर्वांत जास्त पाऊस पडणारे राज्य अशी याची ओळख असली, तरी या पर्जन्यवृष्टीचा राज्याला फारसा फायदा होत नाही. कारण पडणारा पाऊस ब्रह्मपुत्रेमधून वाहून जातो.    एका ताज्या कृषी अहवालानुसार २००१ पर्यंत आसाममधील भात उत्पादन १९५० किलो प्रति हेक्टर होते. २०१९ मध्ये ते घटून १५०० किलो प्रति हेक्टर झाले. तुलनेसाठी जपानमध्ये २००१ मध्ये हेच भात उत्पादन ६६५० किलो प्रति हेक्टर होते, तर चीनमध्ये ६१५० प्रति किलो हेक्टर होते. चीनमधील भात उत्पादन यांगात्सी नदीच्या खोऱ्यात होते. यांगात्सी आणि ब्रह्मपुत्रा या नद्यामध्ये फारसा फरक नाही. मात्र तेथील शेतकऱ्यांनी पूरपरिस्थितीवर केवळ मात केली असे नाही, तर भाताचे उत्पादनही वाढवले. दुर्दैवाने आपल्या शेतकऱ्यांना ब्रह्मपुत्रेच्या पुरामध्ये शेत तसेच सोडून विस्थापित व्हावे लागते. आसाममधील ७ % सुपीक माती ब्रह्मपुत्रा प्रतिवर्षी गिळंकृत करते. महापूर, विस्थापन यात शासनाकडून मदत होत असली तरी पूर नियंत्रणाच्या दृष्टीने शास्त्रीय प्रयोग, प्रयत्न होताना दिसत नाहीत. गेल्या आठ, दहा वर्षांपासून चीन आणि भूतानमध्ये होणाऱ्या पर्जन्यवृष्टीमुळे  ब्रह्मपुत्रेचे पाणी वाढून आसामवर नकारात्मक परिणाम होत आहे. या नदीच्या उगमक्षेत्रात म्हणजेच तिबेटमध्ये सुरू असलेली विकास कामे या विनाशासाठी कारणीभूत ठरत असल्याचे दिसते. विकास हा नेहमी निसर्गाच्या सोबतीने करायचा असतो. त्याच्यावर कुरघोडी करून केलेली प्रगती ही विनाशाला आमंत्रित करते.    शास्त्रज्ञांनी ब्रह्मपुत्रेच्या पुराचा मागील ७०० वर्षांचा इतिहास नदी खोऱ्यातील महाकाय वृक्षांच्या खोडामधील वाढ चक्राच्या आधारे अभ्यास केला. त्यानुसार १३०० ते १९५० पर्यंत मॉन्सूनचे प्रमाण योग्य होते. पाऊस भरपूर असला तरी त्याचे सर्व महिन्यांतील वितरण सम प्रमाणात असल्याचे स्पष्ट  होते. १९५० नंतर पावसाचे तंत्र बिघडले असून त्यामुळे नदीला वारंवार पूर येत आहेत. ते प्रमाण जुलै महिन्यात जास्त वाढले आहे. परिणामी, शेतकरी पूर्ण उद्ध्वस्त झाला आहे. यास मुख्य कारण म्हणजे बंगालच्या उपसागरामध्ये समुद्र जास्त तापल्यामुळे होणारी ढगनिर्मिती. हे सर्व पाण्याने भरलेले ढग ब्रह्मपुत्रेत रिकामे होतात. वातावरण बदलामुळे एका बाजूला समुद्र तापतो, तर दुसऱ्या बाजूला हिमालय विरघळतो. या दोन्ही क्रिया समजून घेतल्या तरच वातावरण बदलावर मात करता येऊ शकते. - डॉ. नागेश टेकाळे,  ९८६९६१२५३१ (लेखक शेती प्रश्नांचे अभ्यासक आहेत)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com