ओडिशा ः भय इथले संपत नाही...

भारतातील नऊ राज्यांना सुमारे ७५०० चौ.किमी. समुद्र किनारे लाभलेले आहेत. एकेकाळी मासेमारी, पर्यटनामुळे समृद्ध असलेले हे किनारे सध्या वाढत असलेल्या चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे भीतिग्रस्त झाले आहेत. एका पाठोपाठ एक अशा वाढत्या वारंवारितेमुळे लोकांच्या मनातील भय संपायची चिन्हे नाहीत.
आपल्या पश्चिम घाटाप्रमाणेच ओडिशातील पूर्वघाटही जैवविविधता आणि जंगलांनी समृद्ध आहे.
आपल्या पश्चिम घाटाप्रमाणेच ओडिशातील पूर्वघाटही जैवविविधता आणि जंगलांनी समृद्ध आहे.

भारतातील नऊ राज्यांना सुमारे ७५०० चौ.किमी. समुद्र किनारे लाभलेले आहेत. एकेकाळी मासेमारी, पर्यटनामुळे समृद्ध असलेले हे किनारे सध्या वाढत असलेल्या चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे भीतिग्रस्त झाले आहेत. एका पाठोपाठ एक अशा वाढत्या वारंवारितेमुळे लोकांच्या मनातील भय संपायची चिन्हे नाहीत. आपल्या देशाला सात समुद्रांपैकी तिघांचा आशीर्वाद आहे, पूर्वेकडे बंगालचा उपसागर, पश्‍चिमेला अरबी समुद्र आणि दक्षिणेस हिंदी महासागर. भारताला ७५०० चौ.किमी. समुद्र किनारा मिळाला आहे. याशिवाय ५२०० चौ. किमी. बेटाचा भाग निराळाच. देशामधील ९ राज्ये, अंदमान, निकोबार बेटे आणि यामधील ७० जिल्हे आणि ५ कोटी ६० लाख लोकसंख्या या तीन समुद्रांशी निगडित आहे. मासेमारी, जल पर्यटन, खारफुटी संवर्धन हे यांचे उपजीविकेचे मार्ग. हवामान बदलामुळे चक्रीवादळांची वारंवारिता वाढल्याने हे तीन समुद्र आपल्या देशाला आशीर्वाद देतात की क्रोधित झाले आहेत, हेच कळेनासे झाले आहे.  काही दिवसांपूर्वी अरबी समुद्रामधील ‘तौक्ते’ चक्रीवादळाने कोकणसह गुजरातवर केलेला आघात आणि आता बंगालच्या उपसागरामध्ये जन्मलेल्या ‘यास’ या वादळाने ओडिशा आणि प. बंगालवर केलेला हल्ला ही महासागरांच्या क्रोधाचीच झलक नव्हे काय? ‘‘रुपेरी वाळूत, माडाच्या बनात ये ना’’ हे समुद्र किनाऱ्याचे सौंदर्य या आक्रमणामुळे नष्ट होत आहे. मच्छीमार उद्‍ध्वस्त होत आहेत, किनाऱ्यालगतची शेती मागे हटत आहे, या ठिकाणी मानवी स्थलांतराचा फार मोठा प्रश्‍न उभा ठाकला आहे. याची झळ आपल्या देशामधील आंध्र, प. बंगाल आणि ओडिशा या तीन राज्यांना जास्त बसत आहे.  ओडिशा हे पूर्वेकडील तसे आदिवासी लोकसंख्येचे राज्य. आपल्याकडे जसा पश्‍चिम घाट आहे तसा त्यांच्याकडे पूर्व घाट आहे. या घाटाची अवस्था आपल्याप्रमाणेच आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात ओडिशाचे जंगल ७० टक्के होते, ते आज अर्ध्यापेक्षाही कमी म्हणजे जेमतेम ३१ टक्केच उरलेले आहे. वातावरण बदलास जास्तीत जास्त सामोरे जाणारे आणि तेवढ्याच प्रमाणात नुकसानीची झळ सोसणारे राज्य म्हणजे ओडिशा. या राज्याचे अर्ध्यापेक्षा जास्त बजेट वातावरण बदलाच्या समस्येवर मात करण्यामध्येच खर्च होते. राज्याच्या आर्थिक विकासामध्ये अशा समस्येचा प्रतिवर्षी अडथळा येत आहे. आजही हे राज्य ‘यास’ या चक्रीवादळाचा सामना करत आहे. पूर्वी म्हणजे चार-पाच दशकापर्यंत बंगालचा उपसागर, ईशान्येकडील सात राज्ये आणि ओडिशाला मॉन्सूनचा भरपूर पाऊस तोही नियमित देत असे. आता हे चित्र बदलले आहे. एप्रिलमध्ये चक्रीवादळे मुसळधार पाऊस घेऊन येतात. जूनमध्ये शेतकरी भाताची पेरणी करतात आणि जुलैमध्ये पुन्हा आलेल्या प्रचंड पावसाने पेरलेले, उगवलेले सर्व वाहून जाते. शेतकऱ्यांच्या या समस्येवर उत्तर शोधण्याचा प्रयत्न सध्या कटक येथील ‘सेन्ट्रल राइस रिसर्च इन्स्टिट्यूट’,  भुवनेश्‍वर येथील ओडिशा कृषी विद्यापीठ करत आहे.  ओडिशामधील भात संशोधन केंद्रात आज जगामधील भाताच्या हजारो दुर्मीळ वाणांचा जनुकीय संग्रह आहे. जागतिक अन्न संघटनेचे यामध्ये मोलाचे सहकार्य आहे. भात हेच येथील आदिवासींचे मुख्य अन्न आहे. हवामान बदल आणि मॉन्सूनची अवेळी बेफाम वृष्टी यामुळे या भूमिपुत्रांना दोन वेळचे अन्नसुद्धा पुरेसे मिळत नाही. लहान मुलांमधील कुपोषण आणि बालमृत्यू हा राज्याला मिळालेला शाप आहे. या शापाचे परिणाम कमी करण्याचे अतिशय मोलाचे कार्य ही भात संशोधन संस्था करत आहे. मी अनेक वेळा या संस्थेला भेट दिली आहे. संस्थेकडून गरीब आदिवासी शेतकऱ्यांना बहुमोल बियाणे पुरवले जाते. त्यांचे संवर्धन करून पुन्हा वाढवले जाते. यातील अनेक वाण जीवनसत्त्व ‘अ’, झिंक, लोह यांनी परिपूर्ण आहेत. त्यांचा आहारात वापर होऊ लागल्यामुळे ओडिशामधील बालमृत्यूचे प्रमाण आता झपाट्याने कमी होत आहे. यामुळेच ही संस्था मला आदिवासींचे देवालयच वाटते. हवामान बदलाचा पहिला झटका चराऊ कुरणांना ओडिशाचा ३/४ भाग पूर्व घाटाने व्यापलेला आहे. या घाटामधून सुवर्णरेखा, बुद्धबलंगा, बैताराणी, ब्राम्हीणी, ऋषिकुल आणि महानदी या सहा नद्या उगम पावतात. पुढे राज्याला समृद्ध करून बंगालच्या  उपसागरास मिळतात. ‘समृद्ध’ हा शब्द अर्थात पाच सहा दशके जुना आहे. कारण पूर्वी या नद्या बारमाही दुथडी भरून वाहत. राज्याची ९० टक्के भात शेती या नद्यांच्या प्रदेशात होत होती. आता मात्र महानदीचा अपवाद वगळता इतर नद्यांचे पाणी खूपच कमी झाले आहे. त्याला कारण म्हणजे उगमाजवळचे घसरलेले जंगल क्षेत्र. या नद्यामुळेच ओडिशामध्ये सपाट भागावर विपुल गाळाचे क्षेत्र आहे. येथेच शेती केली जाते. मौल्यवान लाकडाची चोरी आणि खाण उद्योगामुळे जंगल नष्ट होत चालले आहे. ओडिशामधील खाण उद्योगाने जंगलामधील हजारो आदिवासींना त्यांच्या शेतीसह विस्थापित केले आहे.  ओडिशाच्या जंगलाचे मुख्य आकर्षण म्हणजे येथे उपलब्ध असलेले चराऊ क्षेत्र. हवामान बदलाचा पहिला दृश्‍य परिणाम जंगलामधील चराऊ कुरणावर होतो, हे ऑस्ट्रेलियामधील टास्मानिया विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी सिद्ध केले आहे. चराऊ कुरण नष्ट झाल्याने तृणाहारी प्राण्यांची उपासमार होते, त्यांचे स्थलांतर होते. अनेक कंद वनस्पती या गवतात सुरक्षित वाढत असतात. ते रानडुकराचे अन्न आहे. हत्ती, हरणाचे कळप, रानडुकरांच्या झुंडी, नीलगायी शेतकऱ्यांना का त्रास देतात, याचे उत्तर या हवामान बदलात आहे. पूर्वी या राज्याच्या जंगलात तब्बल २०४४ हत्ती होते. आज या चराऊ कुरणांचा नाश झाल्यामुळे हत्तींची संख्यासुद्धा रोडावली आहे. भारतामधील फक्त हत्तींसाठी राखीव असलेले ‘चांडक अभयारण्य’ याच राज्यात राजधानी भुवनेश्‍वरपासून जवळ आहे. पूर्वी १९० चौ. किमी. क्षेत्रात पसरलेल्या या अभयारण्यात ८० हत्ती होते, आज २०२० मध्ये ही संख्या जेमतेम ५ आहे. हत्ती हा शाकाहारी प्राणी सतत एका जंगलामधून दुसऱ्या जंगलामध्ये ‘ग्रीन कॉरिडॉर’मधून स्थलांतर करत असतो. आज या राज्यात असे कॉरिडॉर शिल्लक राहिलेले नाहीत. स्थलांतर करताना अनेक हत्ती रेल्वे रुळावर अडखळून मृत्युमुखी पडले. जंगलामधील चारा नष्ट झाल्याने भुकेमुळे अनेक लहान पिलांचा मृत्यू झाला. काही हस्तिदंतासाठी शिकार झाले तर काही शेतकऱ्यांशी झगडताना, विजेच्या शॉकमुळे मृत्यू पावले. आज जे चार, पाच उरले आहेत, ते सर्व वृद्ध, नैसर्गिक मृत्यूकडे प्रवास करणारे आहेत. हत्तीच्या डोळ्यांतून ओघळणारे अश्रू याच ठिकाणी मी प्रथम पाहिले. आज या अभयारण्याला भुवनेश्‍वर शहराच्या लांबी-रुंदीने वेढलेले आहे. अनेक शासकीय प्रकल्प परिसरातच सुरू आहेत. परिस्थिती अशीच राहिली तर जगामधील प्राणी नसलेले एकमेव अभयारण्य, अशी याची लाजिरवाणी नोंद होण्यास जास्त वर्षे लागणार नाही. जंगल नष्ट, चारा नष्ट झाल्यावर त्यावर अवलंबून असलेले तृणाहारी आणि त्यावर अवलंबून असलेले मांसाहारी प्राणीसुद्धा नष्ट होण्यास वेळ लागत नाही. हे मानवनिर्मित संकटच हवामान बदलास आमंत्रित करते. ‘‘या निसर्गात जे काही आहे, ते फक्त माझेच आहे’’ या मानवी हव्यासामधून आज आपल्यामागे हवामान बदलाचे भूत लागले आहे. धावताना या भुताची मोठी सावली आपल्याही पुढे पडत असूनही आपण मागे वळून पाहत नाही, हीच शोकांतिका. शेतकऱ्यांनी हवामान बदलाशी लढा देत असताना मागे वळून अभ्यास करणे गरजेचे आहे. (लेखक शेती प्रश्नांचे अभ्यासक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com