कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे...

वाढत्या पाणी पातळीमुळे संपूर्ण सुंदरबन या शतकाअखेरीस पूर्णपणे बुडून जाणार असल्याचा अंदाज तज्ज्ञ मांडतात. त्यासोबत साडेचार दशलक्ष शेतकरी, बंगाली वाघ आणि त्या त्रिभुज प्रदेशातील बहुमोल जैवविविधताही वाऱ्यावर जाणार.
सुंदरबनासोबतच बंगाली वाघ आणि अन्य जैवविविधताही नष्ट होण्याचा धोका आहे.
सुंदरबनासोबतच बंगाली वाघ आणि अन्य जैवविविधताही नष्ट होण्याचा धोका आहे.

वाढत्या पाणी पातळीमुळे संपूर्ण सुंदरबन या शतकाअखेरीस पूर्णपणे बुडून जाणार असल्याचा अंदाज तज्ज्ञ मांडतात. त्यासोबत साडेचार दशलक्ष शेतकरी, बंगाली वाघ आणि त्या त्रिभुज प्रदेशातील बहुमोल जैवविविधताही वाऱ्यावर जाणार. विकासाची फळे चाखणारा एक भाग, त्यांचे ओझे विनाकारण खांद्यावर आलेला शेतकरी व सामान्य माणूस वातावरण बदलाने उघड्यावर पडणार. हाडामांसाच्या माणसांच्या वेदना आपण जाणणार का?  भारतात १५ कृषी हवामान विभाग आहेत. त्यापैकी तीन प. बंगालमध्ये आहेत. ते म्हणजे दार्जिलिंग, गंगाखोरे आणि डोंगर टेकड्यांचा भाग. या प्रत्येकाचा वातावरण बदलाशी स्वतंत्र लढा चालू आहे. दार्जिलिंग जिल्हा हा पूर्व हिमालयाचा उंचीवरचा भाग जेथे २५० सें.मी. पेक्षा जास्त पाऊस पडतो. येथील जमीन आम्लधर्मीय आहे. प. बंगालचा हा जिल्हा चहाच्या मळ्यासाठी प्रसिद्ध असून, आता तो वातावरण बदलाच्या तडाख्यात सापडला आहे. पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी या ठिकाणी हॉटेल व्यवसाय वाढला. चहाला संरक्षण देणारे नैसर्गिक जंगल संपुष्टात येत गेल्याने जमिनीचा वरचा कसदार थर तर नष्ट  झालाच, पण कडे कोसळण्याचे प्रमाण सुद्धा जास्त वाढले आहे. तापमान वाढणे, बर्फ वितळणे याचबरोबर चहा मळ्यामध्ये नवीन किडींचा प्रादुर्भाव आता पहावयास मिळत आहे. पूर्वी आठ महिने पाने तोडण्याची प्रक्रिया चाले, ती आता हवामानाच्या अस्थिरपणामुळे सहा महिन्यावर आली आहे. ३० वर्षापूर्वी १६ दशलक्ष किलोची चहा उत्पादन क्षमता २०२० मध्ये आठ दशलक्ष किलोपर्यंत कमी झाली आहे. दार्जिलिंग हे जगामधील एक असे ठिकाण आहे, की जेथे चार ऋतूंमध्ये वेगवेगळ्या स्वादाचा उत्कृष्ट चहा मिळतो. मात्र गेली एक-दोन दशके या ऋतूंची साखळी वातावरण बदलामुळे विस्कळित झाली आहे. याचा नकारात्मक परिणाम स्थानिक रोजगार व चहा निर्यात क्षेत्रावरही झाला आहे. वातावरण बदलास तोंड देण्यासाठी प्रत्येक चहाच्या मळ्यास किमान ५० टक्के तरी नैसर्गिक जंगलाचे छत्र प्राप्त करण्याचे मोठे आव्हान या क्षेत्रासमोर उभे आहे. वातावरण बदलामुळे पूर्णपणे नष्ट होण्याच्या मार्गावर असलेला जगामधील एकमेव भूभाग म्हणजे प. बंगालमधील सुंदरबनचा त्रिभुज प्रदेश. गंगा, मेघना, ब्रह्मपूत्रा या तीन नद्यांनी तयार झालेला बंगालच्या उपसागराच्या मुखावरील हा त्रिभुज प्रदेश सुंद्री या वृक्षांनी पूर्णपणे व्यापलेला आहे. १,०२,०० चौ.कि.मी. क्षेत्रावर पसरलेल्या सुंदरबनचा ७० टक्के भूभाग बांगला देशात तर, ३० टक्के भारतात आहे. थोडक्यात ४२०० चौ.कि.मी. भाग भारतामधील प. बंगाल या राज्यात आहे. या भागात तब्बल १०२ बेटे असून, त्यापैकी ५४ बेटांवर मानवी वस्ती आहे. उरलेल्या बेटावर सुंद्रीचे घनदाट जंगल आहे. कोलकत्तापासून १३० कि.मी. अंतरावरील सुंदरबन हे दक्षिण २४ परगणा जिल्ह्यामध्ये आहे. १९८७ मध्ये युनेस्कोने हे वारसा स्थळ म्हणून जाहीर केले. संरक्षण करण्याचा प्रयत्न करूनही प्रति वर्ष शेकडो चौ.कि.मी. भूभाग वातावरण बदलामुळे पाण्यात गडप होत आहे. सुंदरबनामध्ये ४.५ दशलक्ष लोक राहतात. हे सर्व अतिशय गरीब शेतकरी आहे. ‘गोसबा’ हे येथील मोठे बेट आणि व्यापारी केंद्र आहे. या बेटावर ४० टक्के सुंदरबन वसलेले आहे. येथेच ते घनदाट सुंद्रीचे राष्ट्रीय जंगल असून, हजारो वर्षापासून बंगाली वाघांची वस्ती आहे. सुंदरबनमध्ये दिवसातून दोन वेळा भरती ओहोटी येते. भरतीच्या वेळी ८ ते १० फूट पाणी आत येते आणि ओहोटीच्या वेळी सर्व परत जाते. मागे राहतो तो फक्त गुडघ्याएवढा चिखल. याच चिखलात संपूर्ण शेती उद्ध्वस्त झालेले निराधार शेतकरी प्राणाची बाजी लावून फक्त केवळ जगण्यासाठी अन्न हवे, या उद्देशाने दिवसभर मासे, खेकडे, शिंपले यासारखे अनेक समुद्री जीव शोधत असतात. त्यासाठी त्यांना बंगाल वाघांबरोबरच खाडीमधील महाकाय मगरीबरोबर कायम स्पर्धा करावी लागते. कारण त्यांचे सुद्धा हेच अन्न असते. आज या वन्य प्राण्यापुढे येथील मानवी वस्ती पूर्णपणे पराजित आहे. याच बेटावर जेथून घनदाट संरक्षित जंगलास सुरुवात होते तेथे एक गाव आहे. या गावात फक्त विधवा स्त्रिया  आणि त्यांची मुले राहतात. घरामधील कर्ते पुरुष बंगाली वाघांचे भक्ष्य झाले आहेत. या गावाला मी भेट दिली, तेव्हा माझ्या डोळ्यातील पाणी थांबत नव्हते.  ज्या तीन नद्यापासून हा त्रिभुज प्रदेश तयार होतो, त्या नद्या कोलकत्यापासूनच प्रदूषित झाल्या आहेत. परिणामी सुंदरबन खाडीमध्ये क्षाराचे प्रमाण वाढून सुंद्रीचे बन नष्ट होतेय. येथील शेतकऱ्यांची थोडीफार शेतीही क्षारपड जमिनीमुळे आता थांबली आहे. पिण्याच्या पाण्यातसुद्धा क्षार वाढत आहेत. म्हणजेच येथील शेतकऱ्यांना अन्न नाही, पाणी नाही अशी अवस्था झाली आहे. सर्व काही जहाजामार्गे कोलकत्याहून येथे पोचविले जाते. शेती उजाडली... पूर्वी म्हणजे ३-४ दशकापूर्वी सुंदबनच्या एकूण ४२०० चौ. कि. भूभागापैकी अर्धा भाग घनदाट जंगलाने व्यापला होता आणि उरलेल्या भागावर शेती केली जात असे. आज शेतीचे क्षेत्र जवळपास ३० टक्क्यांनी कमी होऊन केवळ १६९१ चौ.कि. राहिले आहे. पूर्वी येथील शेतकऱ्यांचे भात उत्पादन एकरी २ क्विंटल होते, तेच आता केवळ एकरी ५८ ते ६५ किलो आले आहे. विश्वास बसणार नाही, पण येथील शेतकरी अर्ध पोटी झोपत आहेत. प्रदूषणामुळे वाढलेले क्षारांचे प्रमाण यास जबाबदार आहे. शेतकऱ्यांची अवस्था पोट भरेना आणि घर सोडवेना अशी झाली आहे. आपले पोट भागत नाही, या त्यांना समजलेल्या कारणामुळे (खरेतर वातावरण बदलामुळे) येथील  अनेक शेतकरी घरदार, शेती सोडून जवळच्या कोलकत्ता शहरात मोलमजुरी करत आहेत. 

  • जंगलाजवळच्या काही बेटावर अजूनही ‘बंगाल पाना’ची शेती होते. ती जीव मुठीत धरूनच करावी लागते. कारण ‘बंगाल टायगर’चे लालभडक डोळे त्यांच्यावर कायम नजर ठेऊन असतात. बंगाली पानाच्या लाल मुखरसाचा आस्वाद घेताना येथील शेतकऱ्यांचे त्यामागील श्रम थोडे जरी आपल्याला समजले तरी पुरे. 
  • सुंदरबनामध्ये थंडी जवळपास राहिलीच नाही. त्यामुळे रब्बीला जो गहू पिकत होता तो आता थांबला आहे. 
  • भरती ओहोटीच्या वाढत्या सीमा, बंगालच्या उपसागरात वारंवार निर्माण होणारी लहानमोठी चक्रीवादळे, शेतकऱ्यांना नकोसे जीवन करतात. भात शेती पुरेशी नाही म्हणून अनेक शेतकरी त्यांच्या घराभोवती भाजीपाला, कंदमुळे, फळशेती करतात. मात्र आकस्मात येणारे चक्रीवादळ घरासह त्यांची ही पिकेही भिरकावून देते. 
  • मौसुनी’ हे असेच शेतकऱ्याचे छोटे बेट. या बेटावरचे प्रत्येक घर २००९ पासून आजपर्यंत कमीत-कमी सात वेळा बांधलेले आहे. -‘पोहचारा’ हे सुंदरबन राष्ट्रीय उद्यानाजवळचे बेट १९८० मध्ये समुद्रात बुडून गेले. येथील ६००० लोकवस्ती जीव वाचवून दुसऱ्या बेटावर गेली. 
  • ‘सुपारीबांगा’, ‘काबासगडी’ हे सुद्धा या तीन नद्यांच्या पुरामध्ये बुडून गेले. 
  •  ‘दक्षिण तालपट्टी’ हे बेट कुणाच्या मालकीचे यावरून भारत आणि बांगला देशात वाद सुरू होता. आता हे बेटच बुडून गेल्यामुळे वादच मिटला. मात्र त्या बेटावरील शेतकरी, त्याची जमीन उद्ध्वस्त झाल्याचा कोणत्याही राजकीय पटलावर खबर उमटली नाही, की चर्चा झाली नाही.
  • वातावरण बदलाचा अभ्यास करणारे जागतिक पातळीवरील शास्त्रज्ञ म्हणतात की, संपूर्ण सुंदरबन या शतकाअखेरीस पूर्णपणे बुडून जाणार आहे. मग तेथील साडेचार दशलक्ष शेतकरी, बंगाली 
  • वाघ आणि त्या त्रिभुज प्रदेशातील बहुमोल जैवविविधतेचे काय? या साऱ्यांच्या अश्रूंचे आपण इतिहासात रूपांतर करणार की, सुंदरबनला वाचवण्याचा प्रयत्न करणार? दिशाहीन विकासामुळे निर्माण झालेली हवामान बदलाची कटूफळे आज माझ्या निष्पाप शेतकऱ्यांच्या फाटक्या झोळीत टाकली जात आहेत. सुंदरबनमधील शेतकऱ्यांची यात चूक काय? वातावरण बदलास त्यांनी कुठे हातभार लावलाय? तरीही त्यांना ही शिक्षा का? म्हणतात ना- “कुणाच्या खांद्यावर, कुणाचे ओझे, कुणाचे ओझे!”
  • - डॉ. नागेश टेकाळे, nstekale@gmail.com (लेखक शेती प्रश्नांचे अभ्यासक आहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com