देवभूमीवर देव रुसलाय का?

भारताच्या एकदम दक्षिणेकडील आणि मॉन्सूनचे प्रवेशद्वार असे हे केरळ राज्य. वातावरण बदलांचा अंदाज अद्याप नेमका येत नसला तरी भातशेती गायब होऊन रबर शेती वाढत आहे. पडणारा पाऊस अडवणाऱ्या पाणथळ जागा कमी झाल्याने महापुराचे प्रमाण वाढत आहे. अगदी देवभूमीवर देव रुसलाय, असे वाटावे अशी स्थिती निर्माण होत आहे.
Rubber farming is growing rapidly, while traditional paddy farming is declining.
Rubber farming is growing rapidly, while traditional paddy farming is declining.

भारताच्या एकदम दक्षिणेकडील आणि मॉन्सूनचे प्रवेशद्वार असे हे केरळ राज्य. वातावरण बदलांचा अंदाज अद्याप नेमका येत नसला तरी भातशेती गायब होऊन रबर शेती वाढत आहे. पडणारा पाऊस अडवणाऱ्या पाणथळ जागा कमी झाल्याने महापुराचे प्रमाण वाढत आहे. अगदी देवभूमीवर देव रुसलाय, असे वाटावे अशी स्थिती निर्माण होत आहे. एका बाजूला ६०० किमी लांबीचा अरबी समुद्र तर त्याच्या विरुद्ध बाजूस पश्‍चिम घाटासह कर्नाटक, तमिळनाडू या राज्याच्या सीमा असलेले हे केरळ राज्य शैक्षणिक क्षेत्राबरोबरच वृक्ष, कृषी क्षेत्रातही आघाडीवर आहे. केरळमध्ये लवंग, नारळ, विलायची, मिरे, सुपारी, दालचिनी, रबर, कॉफी, कोको, जायफळ, व्हॅनिला, चहा यांची शेती मोठ्या प्रमाणावर असून, निर्यातही चांगली आहे. फक्त विलायची पिकाचा अपवाद वगळता अद्यापपावेतो वृक्ष शेतीवर वातावरण बदलाचा फारसा परिणाम जाणवत नाही. यास मुख्य कारण आहे पश्‍चिम घाटाचे विस्तीर्ण जंगल. भात आणि केळी ही पारंपरिक पिके. शेकडो वर्षांपासून पिढीजात पद्धतीने केळीच्या मधूर, गोड वाणाचे उत्पादन घेतात. ही औषधी केळी अनेक मंदिरात प्रसाद म्हणून श्रद्धेने वाटली जातात. भक्ती आणि पारंपरिक संस्कारामुळे येथील बहुतांश केळीबागा संकरित वाणांपासून दूर आहेत. केरळचे खरे वैभव म्हणजे तेथील निसर्गरम्य पश्‍चिम घाट. याच घाटातून वाहणाऱ्या तब्बल ४४ नद्यांनी केरळला सुजलाम् सुफलाम् केले आहे.  भात हेच केरळचे मुख्य पीक. एकाच शेतामधून वर्षातून ३ ते ४ वेळेस भाताचे उत्पादन घेतात. हरितक्रांतीपूर्वी केरळमध्ये तब्बल २ हजार प्रकारचे भात वाण होते. त्यातील अनेक जाती सुगंधी, औषधी व अन्य गुणधर्माच्या होत्या. संकरित वाणांच्या आक्रमणापुढे बहुतांश वाण जवळपास नष्ट झाले आहेत. गेल्या काही वर्षांपासून ‘केरळ जैवविविधता बोर्ड’ आणि ‘ट्रॉपिकल बोटॅनिकल गार्डन’ या बियाण्यांची बँक करण्याच्या प्रयत्नात आहे. केंद्र शासनाच्या या उपक्रमास अनेक वयोवृद्ध शेतकरी त्यांच्या घरात अनेक पिढ्यांपासून जपलेल्या पारंपरिक भात वाणांचे ओंजळभर भात बियाणे देऊन मदत करत आहेत. अजूनही मला तो एक दशकापूर्वीचा प्रसंग आठवतो. केरळमधील तिरुअनंतपुरम येथील ‘ट्रॉपिकल बोटॅनिकल गार्डन’ला मी भेट देण्यास गेलो होतो, तेव्हा त्या इमारतीबाहेर एक वृद्ध शेतकरी सकाळपासून कापडात बांधलेली एक पुरचुंडी घेऊन बसला होता. अंदाजे २०० किमी दूर अंतरावरील एक लहान खेड्यामधून तो आला होता. कारण काय तर त्याला त्याच्याकडील चार पिढ्यांपासून जपलेले, आजही शेतीत पेरले जाणारे भात बियाणे संग्रहासाठी द्यायचे होते. दुपारी शास्त्रज्ञांना ते कळाले. त्याच्या जवळची पुरचुंडी प्रेमाने घेऊन स्वतः शास्त्रज्ञांनी त्यास सन्मान देत संपूर्ण जनुकीय बँक फिरून दाखवली. या जगप्रसिद्ध जनुकीय बँकेत विविध पिकांचे हजारो पारंपरिक वाण बियाणे व त्यांच्या जनुकांच्या रूपात साठवलेले आहेत. येऊ घातलेल्या वातावरण बदलाच्या संकटात हीच जनुकीय बँक कृषी क्षेत्रास नक्कीच वाचवणार आहे. पारंपरिक बियाण्यासह २०० किमी अंतरावरून आलेला गरीब, ९० वर्षांचा शेतकरी केवळ जनुकीय बॅंकेसाठीच नव्हे, कृषी क्षेत्रासंदर्भात आस्था असणाऱ्या सर्वांसाठी प्रेरणादायक ठरतो. दक्षिण पश्‍चिमेकडून मॉन्सून सर्व प्रथम केरळमध्ये शिरतो. एक जूनपासून मनमुराद बरसून पुढे कोकणात, तेथून मुंबई आणि घाट माथ्याकडे सरकतो. शेकडो वर्षांपासूनचे हे निसर्ग चक्र मागील दोन दशकांपासून बदललेले आहे. मॉन्सून हा केरळमध्ये आठवड्यापेक्षाही जास्त उशिरा व कमी प्रमाणात येत आहे. मात्र परतीचा मॉन्सून धोधो बरसत आहे. हा वातावरण बदलाचाच परिणाम. वास्तविक भात पेरणीसाठी मॉन्सूनचे जबरदस्त आगमन हवे आणि काढणीच्या वेळी त्याचा लहानसा निरोप समारंभ असावा, हे खरे कृषीचे शाश्‍वत गणित. मात्र हे चित्र उलटे झाल्याने केरळची भात शेती आज जवळपास उद्‍ध्वस्त होत आहे. जेमतेम ३० टक्के लोक भात शेती करतात. उर्वरित देवभूमीची मागणी आंध्र आणि तेलंगणाकडून पुरवली जाते.  भात शेती कुठे गेली? भात शेतीचे आगार असलेले हे राज्य भाताऐवजी आता रबर शेतीला प्राधान्य देत आहे. केरळच्या पश्‍चिम घाटामध्ये शेकडो एकरांवर रबर शेती पसरलेली आहे. जिकडे तिकडे रबर शेती, प्राणी खाणार काय? म्हणूनच हत्तींच्या झुंडी पिकांकडे वळतात. भात शेतीचे प्रमाण कमी झालेले, त्यातच मॉन्सून आगमनाचे आणि स्थिरावण्याचे गणित बिघडलेले. केरळचा दमट हवामानाचा दर्शक ‘ब ४’ वरून ‘ब ३’ वर घसरला आहे. याचाच अर्थ हे राज्य दमट, ओलसरपणापासून कोरड्या हवामानाकडे सरकू लागले आहे. ही धोक्याची घंटा आहे. पश्‍चिम घाटामधील तापमानात गेल्या एक दशकात सरासरी १.४६ अंश सेल्सिअसने वाढ झाली, तर समुद्र किनारी भागातली वाढ १.०९ अंश सेल्सिअस एवढी आहे. हे वाढते तापमान भात शेतीस योग्य नाही. भौगोलिकदृष्ट्या केरळचे पश्‍चिम घाट, समुद्र किनारा आणि या दोन्हींमधील मध्य पट्टा असे तीन भाग पडतात. वातावरण बदलाचा सर्वाधिक परिणाम पश्‍चिम घाट आणि समुद्र किनाऱ्यावर झाला असून, सर्वाधिक मानवी स्थलांतर मध्य पट्ट्यामध्ये होत आहे. भारताचे सरासरी पर्जन्यमान १२०० मिमी असते, तेव्हा केरळचे ३१०० मिमी एवढे असते. एवढा प्रचंड पाऊस पडूनही पाणी साठवणाऱ्या पाणथळ जागाच आज शिल्लकच नाहीत. पाणथळ जागा, म्हणजेच पाण्याने भरलेली भात शेती ही केरळची खरी श्रीमंती होती. यातील ७० टक्के वैभव नष्ट झाल्याने नद्यांना महाभयंकर पूर वाढले आहेत. पाण्याच्या लोंढ्याबरोबरच पिकलेले कृषी क्षेत्र अरबी समुद्रात जाते. निसर्गरम्य घाटात पर्यटनासाठी मोठमोठे रिसॉर्ट बांधताना केलेल्या उलथापालथीमध्ये अनेक प्रवाहांची, नद्यांची पात्रे बदलली आहेत. शेती व शेतकरी उद्‍ध्वस्त होऊन तिथेच रिसॉर्टमध्ये हरकाम्या बनले आहेत. वायनाड भागात पूर्वी फक्त भात शेतीच होती. त्याची जागा केळीनी घेतली आहे. ‘‘भात शेती कुठे गेली?’’ याचे उत्तर शोधताना शेतकरी सांगतात, ‘‘जर आम्ही पिकवलेला तांदूळ शासनातर्फे २ रु. किलो अथवा मोफत वाटला जाणार असेल, आम्हाला दर काय मिळणार? त्यापेक्षा शेतामधील केळीचा चौथा हिस्सा मंदिरांना दिला, तर पुण्य तरी प्राप्त होईल.’’ ५२ भातजातींचे संवर्धन करणारा अल्पभूधारक एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीस केरळमध्ये अनेक संकरित भात वाण आले. मुबलक रासायनिक खते वापरली जाऊ लागली. वाढणाऱ्या उत्पादनाच्या आशेने जैवविविधता लयाला गेली. अशा विपरीत स्थितीतही या देवभूमीमधील काही शेतकरी पिढ्यांनी पिढ्या जपलेल्या भात वाणांचे संरक्षण आणि संवर्धन करत आहेत. वायनाड जिल्ह्यातील कामन्ना (ता. मन्नथावडी) येथील चेरूव्यायल रामन या आदिवासी शेतकऱ्याचे नाव सन्मानाने घ्यावे वाटते. या अल्पभूधारक शेतकऱ्याने तीन एकर शेतीत तब्बल ५२ पारंपरिक भाताचे जतन केले आहे. प्रतिवर्षी शेताचे ५२ भाग करून हे भात वाण पेरतात. प्रसारासाठी येणारे उत्पादन इच्छुकांना बियाणे म्हणून प्रत्येकी दोन किलो मोफत वाटतात. अट एकच असते, ती म्हणजे भाताचे उत्पादन घेऊन त्यातून बियाण्यांचा हिस्सा परत करावा. रामन यांच्या या शेतामधील ३० वाणांचे कोइमतूर कृषी विद्यापीठाच्या जनुकीय प्रयोगशाळेत आज संवर्धन केलेले आहे. या गरीब शेतकऱ्याचा ‘जिवंत जनुकीय बँक’ म्हणून गौरव केला. २०१६ मध्ये भारत सरकारतर्फे त्यांच्या पारंपरिक पिकाच्या संवर्धनासाठीच्या महान कार्याचा एक लाख रुपयांचे पारितोषिक देत गौरव केला गेला. रामन म्हणतात, ‘‘वातावरण बदलामध्ये शाश्‍वत शेती करण्यासाठी शेतकऱ्यांनी काळाची पावले ओळखून स्वतःमध्ये बदल केला पाहिजे. शासनावर अवलंबून हा प्रश्‍न कधीही सुटणार नाही. हे खरे असले तरी प्रोत्साहन म्हणून पारंपरिक बियाण्यांच्या संवर्धन व प्रसारासाठी कार्यरत देशभरातील शेतकऱ्यांना शासनाने दरमहा ठरावीक रक्कम द्यावी. अनेक छोटे शेतकरी सेंद्रिय शेतीसह बी-बियाण्यांचे संवर्धनार्थ पुढे येतील.’’ खरेच आहे, वातावरण बदलाच्या लढाईमध्ये शासनाने प्रत्येक अल्पभूधारक शेतकऱ्यांहाती आर्थिक ढाल दिली तर असे कितीतरी रामन तयार होतील. हे युद्ध जिंकण्याची शक्यता वाढेल. या देवभूमीमधील खरा देव मला मंदिरांपेक्षाही अशा पारंपरिक भात शेतीमध्ये रमणाऱ्या रामनच्या रूपात दिसला. (लेखक शेती प्रश्नांचे अभ्यासक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com