तीन शेतकरी... तीन दिशा

गुजरातमधील शेतकरीही धडाडीचे... आलेल्या संकटाशी दोन हात करण्याची, त्यातही आपला फायदा साधण्याची त्यांची जिगरबाज वृत्ती त्यांना वातावरण बदलासारख्या महाकाय संकटातही तारून नेते. आजच्या या भागात तीन शेतकऱ्यांच्या वरवर तीन दिशेने जाणाऱ्या यशकथा भविष्यातील शाश्वततेचा मार्ग दाखवतात, हे नक्की.
Siddhapara's organic farming and Anandbhai Patel's date farming.
Siddhapara's organic farming and Anandbhai Patel's date farming.

गुजरातमधील शेतकरीही धडाडीचे... आलेल्या संकटाशी दोन हात करण्याची, त्यातही आपला फायदा साधण्याची त्यांची जिगरबाज वृत्ती त्यांना वातावरण बदलासारख्या महाकाय संकटातही तारून नेते. आजच्या या भागात तीन शेतकऱ्यांच्या वरवर तीन दिशेने जाणाऱ्या यशकथा भविष्यातील शाश्वततेचा मार्ग दाखवतात, हे नक्की. नैसर्गिक वृक्षशेतीला सेंद्रियची जोड  पुरुषोत्तम सिद्धपारा या शेतकऱ्याची यशोगाथा तर आज साता समुद्रापार पोहोचली आहे. वयाच्या १८ व्या वर्षापासून ते वडिलांबरोबर ‘जमका’ या जुनागढ जिल्ह्यामधील गावात रासायनिक शेती करत होते. सेंद्रिय शेती करण्याची इच्छा असली तरी वडिलांच्या आग्रहासमोर काहीच चालत नव्हते. त्यांच्या १५ एकर जमिनीत काम करणाऱ्या मजुरापेक्षाही त्यांचे आणि वडिलांचे शेतमालक म्हणून उत्पन्न कमी होते. शेवटी वडिलांना पटवून देत, समजूत घालत हळूहळू त्यांनी शेतीत बदल केले.  रासायनिक खते, कीटकनाशकांचा वापर थांबवत सेंद्रिय पद्धतीने वृक्ष लागवड सुरू केली. त्यांनी जंगलाचे मॉडेल वापरले. म्हणजेच माणसांच्या हस्तक्षेपाविना झाडांची नैसर्गिक वाढ होऊ दिली. यात त्यांनी सीताफळ, आंबा, नारळ, पपया याची शेती केली. त्यांच्यामध्ये ज्वारी, बाजरी, कोथिंबीर, जिरे, बडीशेप, मिरची, कढीपत्ता, गवती चहा ही आंतरपिके घेतली. झाडांमुळे सूर्याची प्रखरता कमी झाली, वृक्षांना व त्याच्या अवतीभवती असलेल्या पिकांनाही कमी पाणी लागले. जुनागढ भागात उष्णता आणि पाण्याची प्रचंड टंचाई असल्यामुळे पूर्ण शेतात पिकांच्या अवशेषांचे ‘मल्चिंग’ केले आहे. एकही अवशेष शेताबाहेर जाऊ देत नाहीत. त्यांच्याकडे वडिलोपार्जित दुभत्या गाई होत्या. पूर्वी सर्व शेण साठवून वर्षातून एकदा खत वावरात फेकून देत. सिद्धपारा यांनी ताजे शेण गूळ व ताकासोबत एकत्र केले. त्यात तांदूळ भिजवलेले पाणी टाकून आंबवले. या आंबवलेल्या मिश्रणाचा वृक्षांच्या मुळाजवळ फवारणीद्वारे वापर सुरू केला. या द्रवरूप खताचा पिकासोबत या अवशेषांच्या कुजवणीसाठी आणि जिवाणूंच्या वाढीसाठी फायदा होऊ लागला.   एकूण सगळा दुष्काळग्रस्त भाग. १९९९ पासून पडलेल्या दीर्घ दुष्काळामुळे गावकरी स्थलांतर करू इच्छित होते. सिद्धपारा यांनी या सर्व गावकऱ्यांना एकत्र आणले. वर्गणी आणि श्रमदानातून गाव परिसरात ५५ छोटे डॅम आणि ५ तळी तयार केली. दुष्काळानंतर पडलेल्या पहिल्याच पावसाने हे सर्व डॅम आणि तळी पाण्याने भरली. भूगर्भामधील पाणी पातळी ५०० फुटापासून ५० फुटावर आली. ३ हजार लोकवस्तीच्या गावात कायम पाणी उपलब्ध झाले. गुजरात शासनानेही ‘जमका’ मॉडेल स्वीकारले असून, दुष्काळग्रस्त भागात त्याचा यशस्वी प्रसार केला. आजही अनेक तज्ज्ञ, विद्यार्थी, जल अभ्यासक, पत्रकार ही जलक्रांती पाहण्यासाठी या गावाला आवर्जून भेट देतात. पाण्याची शाश्वत उपलब्धता झाल्यानंतर पुरुषोत्तम यांनी पाणी बचतीचे सर्व मार्ग अवलंबण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले. त्यांनी स्वतः प्रथम ठिबक सिंचन प्रणाली बसवून घेतली. आज त्यांच्या शेतामध्ये शहाळ्याबरोबरच विविध प्रकारची सेंद्रिय फळे, भाज्या, मसाल्याचे पदार्थ, धान्य, डाळी असे सर्व काही पिकते. गेली १८ वर्ष त्यांच्या शेतावर देशी विदेशी पर्यटक गर्दी करतात. कसलीही जाहिरात न करता फक्त ‘अतिथी देवो भव’ या भारतीय संस्कृतीने ते पर्यटकांना शेतावर आमंत्रित करतात. शिवार फेरी करून सर्व प्रत्यक्ष दाखवतात. त्यांना प्रत्यक्ष अनुभवण्यास सांगतात, शेतातील फळे, भाज्या, धान्य, डाळी, मसाले, दूध, तूप, तेल यांचा वापर करून त्यांना उत्कृष्ट सॅलडबरोबर स्वादिष्ट भोजन देतात, तेही निःशुल्क! हे पर्यटकांना त्यांच्या सेंद्रिय शेतीची खात्री पटते. जाताना तेही आपली  शेतीमालाची मागणी नोंदवूनच परत जातात. कोणीही मागणी केलेल्या धान्ये किंवा फळे वाढीच्या कोणत्या टप्प्यात आहेत, त्यासाठी सध्या आपण कोणते प्रयोग करतोय, याची सर्व प्रगती ते व्हॉट्सअॅप मार्फत गिऱ्हाइकांना पाठवत असतात. त्यांतून त्यांची सचोटी आणि विश्वास ग्राहकांपर्यंत पोचते. आज पुरुषोत्तम सिद्धपारा यांच्या शेतीची वार्षिक उलाढाल दोन कोटीपेक्षाही जास्त आहे. आज त्यांच्या शेतावर तेलाचा घाणा, पिठाची गिरणी आहे. तयार लोणची, विविध चटण्या, गाईचे शुद्ध तूप हे सर्व तुमच्या समोर तयार करून तुम्हाला दिले जाते. जाहिरातीवर एक पैसाही खर्च न करता त्यांच्या शेतावर अमेरिका, इंग्लंड, नॉर्वे, जर्मनी, दुबई, आफ्रिका येथील पर्यटक नियमित येतात. भारतीय पर्यटकांची तर नेहमीच गर्दी असते. वातावरण बदलामध्ये सेंद्रिय शेती कशी करावी, शाश्वत उत्पन्न कसे घ्यावे, याचे हे सुंदर प्रारूप आहे. जिद्द दाखवा, संकटच करेल मैत्रीचा हात पुढे आनंदभाई भीमजीभाई पटेल या बनासकांठा जिल्ह्यामधील बुधानपूर गावामधील शेतकऱ्याची यशोगाथा वेगळीच आहे. त्याची बटाटा शेती वातावरण बदलाच्या तडाख्यात सापडली होती. प्रतिवर्षी अतिशय नुकसान होत होते. शासनाच्या आवाहन आणि अनुदान यांना प्रतिसाद देत त्यांनी बटाटा ऐवजी वृक्ष शेतीकडे वळण्याचे ठरविले. तब्बल ४० एकरवर वृक्ष शेती करणार म्हटल्यावर गावातल्या इतरांनी त्यांना वेड्यातच काढले. येथे वृक्षशेतीसाठी अनुदान घ्यायचे असल्यास शेतकऱ्यांना कृषी विद्यापीठांची मदत घ्यावी, अशी शासनाची अट होती. मग पटेल यांनी दांतीवाडा सरदार कृषी विद्यापीठास भेट देत आपल्या शेतीची समस्या मांडली. त्यांनीही आनंदभाईंच्या शेतीची पाहणी करून इस्राईल येथील खजुराची टिश्यू कल्चर रोपे लावण्याचा सल्ला दिला. विद्यापीठांतूनच ३८०० रु. प्रति रोप प्रमाणे ३०० रोपे खरेदी केली. त्यासाठी शासनातर्फे १२५० रु. प्रति रोप अनुदान मिळाले. शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाप्रमाणे ४ बाय ३ फूट आकाराचे खड्डे करून त्यात रोपे लावली. ठिबक सिंचन केले. झाडे भराभर वाढून उत्पन्न सुरू झाले. आज ६० ते ८० रु. किलोप्रमाणे जागेवरच खजूर विकले जातात. त्यातून प्रति वर्ष २५ लाखापर्यंत फायदा मिळतो. या वृक्षशेतीबरोबरच त्यांनी डाळिंब, ॲपलबेर, पपया ही आंतरपिके घेतली आहेत. वातावरण बदलाने पटेल यांना उद्ध्वस्त केले होते, मात्र थोडासा मार्ग बदलत धाडस करत वृक्षशेतीचा अवलंब केल्याने जीवनच बदलून   गेले आहे. आता ‘‘वातावरण बदलास सामोरे जावयाचे असेल तर वृक्ष शेतीचा स्वीकार करा’’ हेच शासकीय घोषवाक्य प्रत्येकाने कृतीत आणले पाहिजे, याचा ते स्वतः घोष लावतात.  संकटात डोक्याला हात लावून बसणे, हाती मदतीचा कटोरा घेणे अथवा घाबरून पळ काढण्यापेक्षा संकटाला सामोरे जाण्याची जिद्द दाखविल्यास तेच संकट तुमच्याशी मैत्री करते, हेच या प्रयोगावरून सिद्ध होते. आर्थिक पाठबळावर आधुनिक शेती देते साथ गुजरात शासनाच्या वातावरण बदलाचे शेतीवरील दुष्परिणाम कमी राखण्यासाठी राज्यपातळीवर होत असलेल्या प्रयत्नांना शेतकऱ्यांचीही तितकीच साथ मिळत आहे. साबरकांथा जिल्ह्यामधील रुपलकंपा (ता. हिंमतनगर) येथील चंद्रकांतभाई पटेल या सुशिक्षित शेतकऱ्याने आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून समस्येवर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी आपल्या अल्प  जमिनीवर अतिशय कमी पाण्यामध्ये इस्रायली तंत्रज्ञानाचा वापर करत हळदीची शेती केली आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे नापिक जमिनीवर हरितगृह उभारून हळदीची सहा मजल्याची शेती (व्हर्टिकल फार्मिंग) केली आहे. त्यासाठी अॅल्युमिनिअमचे ट्रे केले आहेत. या प्रयोगाचे पहिलेच वर्ष असून, अद्याप उत्पादन हाती आलेले नाही. मात्र, सामान्य उत्पादनाच्या सहा ते आठ पट उत्पादन हाती येण्याचा विश्वास चंद्रकांतभाईंना आहे. त्यांच्याकडून प्रेरणा घेत अनेक शेतकरीही हळदीकडे वळल्याने आज रुपलकंपा हे हळदीचे गाव म्हणून ओळखले जाते. या आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शेतीमध्ये प्रारंभिक खर्च अधिक असून, पुढील व्यवस्थापनामध्ये मजूर, खत आणि पाण्यावरील खर्च अतिशय कमी राहतो. या खर्चिक शेतीला शासनाकडून पाठबळाची आवश्यकता असल्याचे मत हे शेतकरी मांडतात. ज्यांच्याकडे आर्थिक पाठबळ आहे, अशा अल्पभूधारक शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान आणि शेतीची कास धरायला हरकत नसल्याचेच या यशोगाथेतून सिद्ध होते. मात्र, ज्या अल्पभूधारकांकडे पैशाचे पाठबळ नाही, त्यांनी सेंद्रिय शेतीची कास धरावी, हेच उचित! (लेखक शेती प्रश्नांचे अभ्यासक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com