नंदनवनातील शेती केवळ मॉन्सून, उन्हाळी

बादशाह जहांगीरने काश्मीरबाबत बोलताना म्हटले होते, की जमिनीवर कुठे स्वर्ग असेल, तो इथे आहे, इथेच आहे आणि फक्त इथेच आहे. (मूळ फारसी शब्द - ‘गर फिरदौस बर रुए ज़मीं अस्त, हमीं अस्तो, हमीं अस्तो, हमीं अस्त’) पण १९४७ नंतरच्या स्वातंत्र्यप्राप्ती आणि घडामोडींमध्ये या नंदनवनाचे रूपांतर दहशतवाद, रक्तपात आणि अशांततेत झाले.
Tulip flower gardens are a major tourist attraction. But overall, agriculture in Kashmir is becoming economically self-sufficient due to floriculture.
Tulip flower gardens are a major tourist attraction. But overall, agriculture in Kashmir is becoming economically self-sufficient due to floriculture.

बादशाह जहांगीरने काश्मीरबाबत बोलताना म्हटले होते, की जमिनीवर कुठे स्वर्ग असेल, तो इथे आहे, इथेच आहे आणि फक्त इथेच आहे. (मूळ फारसी शब्द - ‘गर फिरदौस बर रुए ज़मीं अस्त, हमीं अस्तो, हमीं अस्तो, हमीं अस्त’) पण १९४७ नंतरच्या स्वातंत्र्यप्राप्ती आणि घडामोडींमध्ये या नंदनवनाचे रूपांतर दहशतवाद, रक्तपात आणि अशांततेत झाले. अशा अडचणीतही काश्मिरींचे दैनंदिन जीवन आणि त्यांची शेती कशी फुलते, हे खरेतर पाहण्यासारखे आहे. लहानपणी शालेय पाठ्यपुस्तकात भूगोलाच्या धड्याखाली एक प्रश्‍न अवश्य असे, तो म्हणजे भारताचे नंदनवन कोणते? आम्ही डोळे झाकून त्याचे उत्तर लिहीत असू - ‘काश्मीर’. बस्स...काश्मीरशी आमची तेवढीच ओळख. पुढे चाचा नेहरूंच्या पांढऱ्याशुभ्र पोशाखामध्ये खिशामधील दिमाखाने मिरवणारा गुलाब हा काश्मीरचाच, ही अजून जास्तीची ओळख. बाकी काश्मीर म्हणजे अशांत, अतिरेकी, रक्त गोठवणारी थंडी, रस्त्यावर सर्वत्र बर्फच बर्फ अशा वेगळ्या ओळखीही होत गेल्या. पर्यटक काश्मीरला जातात ते बर्फाचा, थंडीचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी, सर्वत्र डोंगर उतारावर बर्फाच्या राशी आणि त्या बर्फाळ प्रदेशावर पर्यटकांना बर्फावर चालणाऱ्या गाडीत बसवून आपल्या दोन्ही बाहूंत जाड दोरी बांधून बर्फ कापत घेऊन जाणारा, गळ्यात उबदार कपड्याच्या आत कोळशाची शेगडी ठेवणारा माणूस आपण पाहतो. पण त्याची ओळख एका गाडीवानापेक्षाही अधिक म्हणजे एक शेतकरी असू शकते, हे कळाल्यावर आश्‍चर्य वाटावयास नको. काश्मीरमध्ये हिवाळ्यात सर्व जमीन, घरे, दारे, रस्ते बर्फाच्या चादरीत झाकले जातात. रब्बी हंगाम बर्फातच संपतो म्हणूनच कुटुंबास आर्थिक मदत करण्यासाठी युवा शेतकरीवर्ग पर्यटन क्षेत्रात अनेक छोटी मोठी कामे करतात. काश्मीर हा भारताच्या हिमालयाच्या कुशीमधील उत्तरेकडील भूभाग. पाकिस्तानच्या सीमेशी जोडलेला आणि देशांतर्गत पातळीवर हिमाचल प्रदेश, पंजाब यांची जोडलेले हे राज्य. ३१ ऑक्टोबर २०१९ रोजी कलम ३७० हटवणे आणि जम्मू-काश्मीर आणि लडाख हे दोन केंद्रशासित प्रदेश असलेल्या राज्य म्हणून घोषणा झाल्यानंतर पुन्हा राज्य चर्चेत आले. काश्मीरला भारताचे नंदनवन म्हणतात, ते केवळ तेथील गुलाब, पाइन वृक्ष, बर्फाच्या झालरी आणि ट्युलिपच्या बागांमुळे नाही, तर तेथील शेतीमुळे. मला काश्मीरला जाण्याचा ५-६ वेळा योग आला. माझ्यासोबतची मित्रमंडळी तेथील विस्तीर्ण गुलाब बागा, उंच सूचीपर्णी वृक्ष, ट्युलिपच्या बागा आणि भुरभूरणारा बर्फ पाहून स्वर्गीय नंदनवनात आलो असे म्हणत होते. आणि मी मात्र तेथील केशराच्या शेतीत, मोहरीच्या पिवळ्या फुलात, सफरचंद, चेरी, पिअर, वॉलनटच्या बागांमध्ये माझे नंदनवन शोधत होतो. वातावरण बदलाच्या तडाख्यात हे नंदनवन कसे टिकणार, हे माहीत नाही. मात्र माझा तेथील कृषी विद्यापीठ आणि त्यास जोडलेल्या हजारो शेतकऱ्यांच्या प्रयत्नांवर विश्‍वास आहे. हा अंदाजे बेचाळीस हजार चौ.कि.मी.चा भूभाग २० जिल्ह्यांत विभागला जातो. मुख्य तीन भाग म्हणजे जम्मू, काश्मीर आणि लडाख या भागाचा ९२ टक्के प्रदेश पर्वतराजींमध्ये समाविष्ट होतो. जेमतेम ५ टक्के भूभागच येथे शेतीसाठी उपलब्ध आहे. उरलेल्या दोन टक्के भागावर विस्तीर्ण चराऊ कुरणे आहेत. या राज्यामधील शेतकऱ्यांची श्रीमंती त्यांच्याकडील पाळीव प्राण्याच्या संख्येवर ठरते. पर्वतीय भागामधील गाई, शेळ्या, मेंढ्या, खेचरे, घोडे हे प्रत्येक शेतकऱ्यांकडे असतातच. पण पाळीव प्राण्यांचे सर्वाधिक प्रमाण लडाखमध्ये जास्त आहे. या प्राण्यांच्या केस, लोकरीपासून गरम कपडे तयार करणे, हा एक महत्त्वाचा शेतीपूरक व्यवसाय आहे. शिवाय शेतीमालाच्या वाहतुकीसाठी घोडे, खेचरे हे प्राणी शेतकऱ्यांनी उपयोगी ठरतात. परिणामी, जीवाश्म इंधनाचा (पेट्रोल, डिझेल इ.) वापर जवळपास शून्य आहे. येथील चराऊ कुरणातील माती एकदम उत्कृष्ट दर्जाची सेंद्रिय आहे. एवढी पाळीव जनावरे असूनही मिथेनचे उत्सर्जन नगण्य आहे. अलीकडे कृषी विद्यापीठातर्फे दिल्या जाणाऱ्या विविध प्रशिक्षणांमध्ये वातावरण बदलाचा अंतर्भाव केला जात आहे. अनेक वेळा शासनातर्फे शेतकऱ्यांना पशुआहार मोफत दिला जातो. शेती आणि त्यावरील परिणाम  जम्मू, काश्मीर आणि लडाखमधील ७० टक्के जनता शेती अथवा शेतीला निगडित व्यवसायाशी जोडलेली आहे. या ७० टक्क्यांमधील ७४ टक्के शेतकरी एक हेक्टर किंवा त्यापेक्षाही कमी जमिनीचे मालक आहेत. कमी क्षेत्र, त्याही हिवाळ्यात सर्वत्र बर्फ, तापमान शून्याच्या खाली असल्याने येथे रब्बीचा हंगामच नाही, अशी स्थिती. तशी गरीबी पाचवीलाच पुजलेली, मात्र पर्यटन आणि शेतीला जोडून अन्य कृषिपूरक व्यवसाय यातून शेतकरी खाऊनपिऊन सुखी आहेत. जम्मूचा भाग तुलनेने सपाट असल्याने बासमती तांदूळ आणि राजमा यांचे उत्पादन होते. काश्मीर खोरे, टावी खोरे, चिनाब खोरे, पुंछ, सिंध आणि लिडर खोरे इ. प्रत्येक खोऱ्यातील भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे. त्यातही काश्मीर खोरे हवामान बदलास जास्त संवेदनशील आहे. या भागात रेशीम उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. मात्र वातावरण बदलाचा परिणाम, वाढलेली बर्फवृष्टी यामुळे कोष निर्मिती अतिशय कमी होत असल्याचे येथील शेतकरी म्हणतात. अति थंडी आणि तिच्या वाढलेल्या प्रमाणाचे परिणाम रेशीम धाग्याच्या बळकटीवरसुद्धा होत आहेत. काश्मीर खोऱ्यामध्ये बर्फ पडत असल्यामुळे रब्बी हंगाम होत नाही. मात्र या भागात अनेक तलाव, सरोवर, वाहत्या नद्या असल्याने येथील शेतकरी गोड्या पाण्यामधील मत्स्यपालन करतात. त्यांचा वापर आहारात केला जातो. येथे मोहरीचे उत्पादन चांगले होत असल्याने याच तेलाचा वापर आहारात अधिक असतो. दिवसातून अनेक वेळा डोंगर चढणे, उतरणे यासाठी सांध्यामध्ये हवा असणारा लवचिकपणा या मोहरीच्या तेलापासून मिळत असल्याचे ते सांगतात. मात्र गेल्या आठ दहा वर्षापासून सलग व भरपूर होत असलेल्या बर्फवृष्टीमुळे खोऱ्यातील मोहरी उत्पादनावरही परिणाम झाला आहे. लहान तलाव, पाणी साठे, नद्या याही तीन, चार महिने गोठून जात असल्याने मासेमारीवरही परिणाम झाला आहे. मासे आणि मोहरी तेल हे आमच्या अन्नांचा महत्त्वाचा भाग, पण त्यांची उपलब्धता कमी झाली आहे. बाहेरून विकत घेऊन खाणे मोजके लोक सोडता कोणालाही परवडत नाही. संयुक्त राष्ट्राचा ‘हवामान बदल ः कृषी आणि आहार’ या विषयावरील वार्षिक अहवालानुसार, २०५० पर्यंत कृषी उत्पादन कमी होणार असून, त्याच्याशी निगडित अनेक जोडव्यवसायही थांबतील. लोकांच्या आहारावर परिणाम होईल. गरिबांना निकृष्ट अन्न घ्यावे लागल्याने कुपोषणाचे प्रमाण वाढेलच, पण भूकबळी जाण्याचीही दाट शक्यता आहे. या अहवालाची एक छोटीशी झलकच या राज्यात दिसते. सध्यातरी यावर इतर कोणताही पर्याय दृष्टिक्षेपात नाही.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com