जगातील आनंदमयी स्वर्गाचा निरोप घेताना 

स्वच्छ हवा, समृद्ध निसर्ग यांचा मुक्त आस्वाद घेत असतानाच निरोप घेण्याचा दिवस उजाडला. आजवर कधीही कुणाचाही गुलाम न राहिलेल्या या देशातून युनिफॉर्मसारखा राष्ट्रीय वेश घालणाऱ्या आनंदी लोकांचा निरोप घेताना मन जड झालं.
Bhutan;s National Sports is Archery and national animal is Takin goat
Bhutan;s National Sports is Archery and national animal is Takin goat

स्वच्छ हवा, समृद्ध निसर्ग यांचा मुक्त आस्वाद घेत असतानाच निरोप घेण्याचा दिवस उजाडला. आजवर कधीही कुणाचाही गुलाम न राहिलेल्या या देशातून युनिफॉर्मसारखा राष्ट्रीय वेश घालणाऱ्या आनंदी लोकांचा निरोप घेताना मन जड झालं. तानमधील आज शेवटचा दिवस. जाता जाता पंचेंद्रियांच्या सेन्सरमधून जेवढा भूतान माझ्यात सामावून घेता येईल तेवढा घेतोय. येथील मुक्त वातावरण मनावर गारुड घालतंय. ही मुक्तता भूतानच्या रक्तातच आहे. निसर्गाचं देणं मुक्त हस्ते मिळालेल्या आणि अंतर्बाह्य स्वतंत्र असलेल्या या देशाने आजपर्यंत आपलं स्वातंत्र्य कधीही गमावलं नाहीये. हिमालयातील पर्वतराजींमध्ये दुर्गम स्थानी, निबिड अरण्यामध्ये लपलेल्या या देशाच्या राजांनी इंग्रजांबरोबर ठेवलेल्या मुत्सद्दी संबंधामुळेच भूतानचा पक्षी इंग्रजी शिकाऱ्यापासून वाचला.  इंग्रजांच्या वाकड्या नजरेतून सुटलेल्या देशाबाबत संपूर्ण जगही अनभिज्ञच होते. १९७४ पर्यंत हा देश विलुप्त होता. भूतानचं अस्तित्व जगाला पहिल्यांदा जाणवलं, ते १९७४ मध्ये. येथील राजाचा राज्याभिषेक सोहळा कव्हर करण्यासाठी आंतरराष्ट्रीय मीडियाला परवानगी मिळाली तेव्हाच पहिल्यांदा भूतान बाहेरील जगाच्या संपर्कात आला. एखाद्या जादुई गोलातील अनोखे जग सर्वांसमोर खुलं झालं.  भविष्याचा नेमका वेध घेणाऱ्या भूतानच्या ‘राजा सींगये वांगचुक’ यांनी २००५ मध्ये स्वतः राजेशाही सोडून निवडणुका लावल्या आणि संविधानवादी राजसत्ता अंमलात आणली. जगभरामध्ये दुसऱ्याच्या बुडाखालील खुर्ची ओढून घेणाऱ्या, रातोरात मंत्रीसंत्री बदलून हातचलाखी करणाऱ्यांच्या जगात, स्वतःहून राजगादी सोडणारा धन्य तो राजा! म्हणूनच येथील लोक या राजा माणसावर मनापासून प्रेम करतात.  येथील अनोख्या गोष्टींच्या भांडारात एक गोष्ट प्रामुख्याने नमूद करावीशी वाटते, ते म्हणजे इथं सर्व देशांतील लोकांचा वाढदिवस एकाच दिवशी असतो. आल्या ना डोक्याला मुंग्या? मग मुंग्या झटकून ऐका! इथं नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी प्रत्येक माणसाच्या आयुष्यात एक वर्षाची भर पडते. दुसऱ्या अर्थाने, सर्वांचा वाढदिवस एकाच दिवशी असतो. हे तर एकाच मांडवात सामुदायिक विवाहसोहळा उरकण्यासारखं झालं. यांचं नवीन वर्ष तिबेटियन कॅलेंडर नुसार असतं. गेल्या वर्षी समग्र देशवासीयांचा वाढदिवस २४ फेब्रुवारीला होता. एक बरं झालं वर्षभर ‘हॅपी बर्थडे’ म्हणत गिफ्ट वाटण्यापेक्षा एकाच दिवशी ‘टीटीएमएम’ (तुझं तू, माझं मी...चा शॉर्ट फॉर्म) करून शुभेच्छा देऊन मोकळं व्हावं.  रस्त्यावरून जाताना रंगीबेरंगी पारंपरिक कपडे घालून लोक फिरताना दिसत होते. काहीतरी सांस्कृतिक कार्यक्रम असेल असं सुरुवातीला वाटलं. पण भूतानमध्ये राष्ट्रीय पोशाख घालणं कम्पल्सरी आहे असं नंतर कळलं. त्यामुळं आख्खा देश युनिफार्ममध्ये असल्यासारखा वाटतो. बाइक वरून फिरताना आजूबाजूला बऱ्याच घरांवर लिंगाची मोठमोठी चित्रं रंगवलेली दिसताहेत. ही चित्रं शुभचिन्ह म्हणून आणि पुत्रप्राप्ती व्हावी म्हणून घरावर काढली जातात. एक तरी भूतानी गुबगुबीत पुत्र होऊ दे, असं लिंगाप्पाला साकडं घालत घरावर ही चित्रं रंगवतात. आपल्याकडील पिंडीत असणारं लिंग इथं ब्रह्मांडी अवतरल्याचा भास होतो.  बुद्धांच्या मार्गाने चालणाऱ्या या देशात गुन्हेगारीचं प्रमाण फारच नगण्य आहे. किरकोळ गुन्हे वगळता खून, दरोड्यासारखे गुन्हे इथं घडत नाही. गुन्हेच काय पण, संप आणि बंदसुद्धा होत नाहीत. हो ! इथं बंद होत नाहीत, पण बऱ्याच गोष्टींवर बंदी आहे. सगळ्यात पहिली बंदी म्हणजे ‘प्लॅस्टिकबंदी’. इथं संपूर्ण प्लॅस्टिकबंदी आहे आणि ती सर्वत्र प्रामाणिकपणे अंमलात आणली जाते.  भूतानमध्ये सार्वजनिक जागेवर धूम्रपानास बंदी आहे. बिडीकाडीवाल्यांसाठी विशिष्ट जागा दिल्या आहेत. तिथं जाऊनच आपली फुकणी फुंकायची. एवढंच नाही तर तंबाखूची लागवड, काढणी आणि विक्रीवरही बंदी आहे. तंबाखू फक्त आयात होतो आणि त्यावरही भरभक्कम टॅक्स लावले जातात. एखाद्या फुकणीच्याने जर हा नियम मोडला तर मात्र त्याला ३ ते ५ वर्षांची सजा होऊ शकते. इथली अहिंसक बंदी म्हणजे, कोणत्याही पक्षी किंवा प्राण्याला मारायला इथं बंदी आहे. बुद्धांच्या शिकवणीनुसार प्राणी मारणे वर्ज्य असल्याने हा निर्णय घेतला गेला. इथं तर मोठ्या प्रमाणात मांस खाल्लं जात! मग हे मांस येतं कुठून हा प्रश्‍न पडला? तेव्हा कळलं, की भूतान हे सर्व मांस आयात करतो. सरकार पूर्णपणे मांसभक्षणावर बंदी आणायचा विचार करत असल्याचंही समजलं. म्हणजे, ‘ना रहेगा मांस और ना करेंगे मांसाहार’. अजून एक अनोखी बंदी इथं आहे ती म्हणजे चढाईबंदी. १९८७ नंतर भूतानने देशातील पर्वतांवर चढाईबंदी केली. त्यामुळे जगात कधीही सर न केला गेलेला ‘गांखार पुइंसूम’ पर्वत, ‘हिम्मत असेल तर चढून दाखवा’ असं म्हणत जगातील सर्व गिर्यारोहकांना वाकुल्या दाखवत दिमाखात उभा आहे.   इतर सर्व बाबतींत पहिला नंबर असणाऱ्या या विद्यार्थ्यांचा एका बाबतीत मात्र सर्वांत शेवटचा नंबर लागतो. भूतान हा जगातील सर्वांत शेवटी टीव्हीचा स्वीकार करणारा देश ठरला. सख्खा शेजारी भारतात १९५९ मध्ये काड्यांचा अँटेना मिरवत कृष्णधवल, वळवळणाऱ्या मुंग्यांचा टीव्ही अवतरला. पण मुंग्यांची ही साथ भूतानमध्ये पोहोचायला पुढची चाळीस वर्षे गेली. १९९९ मध्ये इथं पहिल्यांदा टेलिव्हिजन आला. या वेडपट डब्यामुळे (इडियट बॉक्स) देशातील सांस्कृतिक वातावरणावर विपरीत परिणाम होतील, अशी त्यांना भीती होती.   माझी बुलेट तर या देशातून नाराजीने का होईना, पण बाहेर पडतेय. पण जाता जाता इथं पोहोचायचा मार्ग तुम्हाला सांगून जातोय. पृथ्वीवरील या स्वर्गात जायचं कसं? रस्त्यानं जायचं असेल, तर गेलेफु, साम्द्रूप जोंखार आणि जयगाव अशा तीन ठिकाणांतून प्रवेश करता येतो. पण सर्वांना जयगाव जास्त सोयीचं पडतं. विमानानं जायचं असेल तर एकमेव आंतरराष्ट्रीय विमानतळ ‘पारो’ ला जायचं. पारो हे तसं धोकादायक विमानतळ म्हणून गणलं जातं. त्यामुळे फक्त ८ पायलटना इथून उड्डाण करायला परवानगी आहे. हो आणि आमच्यासारखं मोटरसायकलनं जायचं असल्यास, सरळ सिलिगुडीमार्गे जयगावला पोहोचा. बॉर्डरवर ‘आरटीओ’ची परवानगी घ्या आणि बुंगाट बाइक चालवत या आनंदी देशात फिरण्याचा आनंद घ्या. महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतीयांना इथं व्हिसाची गरज नाहीये. इतर देशांतील लोकांना भूतानमध्ये फिरण्यासाठी दररोज १८००० रुपये मोजावे लागतात. आपल्या भारतीयांसाठी ते ‘चकटफू’ आहे. तेव्हा उचला बॅग आणि लावा पाठीला! ऑल द बेस्ट! राष्ट्रीय प्राणी ‘ताकिन’ बकरी ‘वाघ’ राष्ट्रीय प्राणी असणाऱ्या भारताच्या या शेजाऱ्याचा राष्ट्रीय प्राणी आहे ‘बकरी’. हो!  ‘ताकिन’ ही बकरी येथील राष्ट्रीय प्राणी आहे. भारत- भूतान मैत्रीचा असा हा चमत्कारिक विरोधाभासी ‘वाघबकरी’ शेजार आहे. येथील राष्ट्रीय खेळ आहे धनुर्विद्या. भूतानची धनुर्विद्येची ऑलिम्पिक टीमदेखील आहे. मजेदार गोष्ट म्हणावे हिमालयात ‘येति’ हा महामानव अस्तित्वात असून, तो डोंगरदऱ्यांत हिंडत असतो असा येथील लोकांचा विश्‍वास आहे. मात्र भविष्यात ‘येति’चे पुरावे जेव्हा समोर ‘येती’ल तेव्हाच या विश्‍वासाचं पुष्टीकरण होईल.  संपर्कः डॉ. सतीलाल पाटील, ९९२२४५९७८४ contact@drsatilalpatil.com, (लेखक ‘ग्रीन-व्हिजन लाइफ सायन्सेस प्रा. लि.’ कंपनीचे संचालक आणि ‘ड्रीमर अँड डुअर्स’ या पुस्तकाचे लेखक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com