...आणि आम्ही वाममार्गावरून ढळलो

भारताप्रमाणेच ब्रिटिशांच्या गुलामीतून एकाच काळात स्वातंत्र्य मिळालेल्या बर्माच्या सीमा तशा भारतीयांना खुल्या आहेत. अनेक बाबतींमध्ये मैत्रीचा दुवा सांधलेला असला तरी वाहतुकीच्या बाबतीत मात्र या देशाने अचानक वेगळा मार्ग स्वीकारला. या उजव्या वाहतुकीमुळे आमच्
Houses in Myanmar
Houses in Myanmar

भारताप्रमाणेच ब्रिटिशांच्या  गुलामीतून एकाच काळात स्वातंत्र्य मिळालेल्या बर्माच्या सीमा तशा भारतीयांना खुल्या आहेत. अनेक बाबतींमध्ये मैत्रीचा दुवा सांधलेला असला तरी वाहतुकीच्या बाबतीत मात्र या देशाने अचानक वेगळा मार्ग स्वीकारला. या उजव्या वाहतुकीमुळे आमच्यासारखे ‘वाममार्गी’ लोकही कधी उजवे होत गेलो. धाडऽऽ धाडऽऽ धाडऽऽ धाडऽऽ असा आवाज करत आमच्या बाईक त्या लोखंडी पुलावर चढल्या आणि पाचही बाइकच्या आवाजाने तो थरारला. भारत आणि बर्माला जोडणारा सीमेवरील तो पूल होता. बर्मा हे जुनं नाव आपल्या देशवासीयांना माहीत असलं तरी आता हा देश ब्रह्मदेश ऊर्फ म्यानमार म्हणून ओळखला जातो. या सीमेवर ना कुठले कुंपण ना सीमा भिंत. दोन्ही देशांतून वाहणारी नदी हीच सीमा आहे. नदीच्या पात्रात रोवलेले राकट पोलादी खांब, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना भक्कम लोखंडी पट्ट्याची भिंत. एखाद्या लोखंडी बोगद्यात बाइक चालविल्याचा फिल येतोय.  भारत-सिंगापूर-भारत अशा २० हजार किलोमीटरच्या दुचाकी मोहिमेदरम्यानच्या प्रवासात आम्ही या आंतरराष्ट्रीय सीमेवर येऊन पोहोचलो होतो. भूताननंतर या मोहिमेतील हा दुसरा देश. माप ओलांडायच्या आविर्भावात आम्ही दुसरी आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडत त्याचे आवताण स्वीकारलं. मोरेह हे भारतातलं आणि तामू हे म्यानमारमधलं गाव या पुलाच्या भरवशावर एकमेकांशी संबंध राखून आहे. या पुलाला ‘भारत- म्यानमार मैत्री पूल’ असं नाव आहे. दोन्ही देशांच्या सीमांना सांधत हा पोलादी मैत्रीचा दुवा उभा आहे. भारत- म्यानमार व्यापार याच रस्त्याने होतो. आम्ही म्यानमारमध्ये यावं असं तो पूल प्रेमाने खुणावतोय. आम्हीही त्याच्या प्रेमाने ‘पुल’कित होऊन दुचाक्या पुढे दामटल्या.   ‘म्यानमारमध्ये आपलं स्वागत आहे’ असं म्हणत पिवळ्या सरकारी बोर्डानं आमचं स्वागत केलं. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या गोल चेहऱ्याच्या म्यानमारी सैनिकाने आमच्या बाइककडे त्याच्या बारीक नजरेनं निरखून पाहिलं. अगोदरच बारीक असलेले त्याचे डोळे विना चष्म्याने वाचण्याचा प्रयत्न करणाऱ्या चष्मेबहाद्दरासारखे वाटत होते. पुढे ‘उजव्या बाजूला गाडी चालवा’ अशी पाटी दिसली आणि डोक्यात प्रकाश पडला. अरे, इथं उजवीकडे बाइक चालवायचीय. आयुष्यभर धुत्या हाताला गाडी चालवणाऱ्या आम्हा बाइकर्सला आता खात्या हाताला गाडी चालवावी लागणार होती. बॉर्डरवरचे सरकारी सोपस्कार आवरून रस्त्याला लागलो. रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या शेतात नुकतंच कापलेलं भाताचं पीक खुंटांद्वारे आपलं अस्तित्व दाखवत होतं. मोकळ्या शेतातून गुरं हिरवळीच्या शोधात फिरत होती. म्यानमारी लोकांची घरं रस्त्याच्या कडेला आपल्या शेताचं राखण करत उभी होती. ही घरं जमिनीपासून चांगली ४-५ फूट उंच लाकडी खांबावर बांधली जातात. म्हणजे भरभक्कम लाकडी खांब जमिनीत रोवून त्यावर लाकडी फळ्या ठोकून बांधलेली ही घरं. इकडे पावसाचं प्रमाण जास्त आहे. इथं वर्षभरात तब्बल २२०० मिलिमीटर पाऊस कोसळतो. म्हणजे आपल्यापेक्षा जवळपास तिप्पट. म्हणून इथली लोकं जमिनीपासून उंच घरं बांधत असावीत. नवीन देशातील शेती आणि शेतकऱ्याची घरं, गावं न्याहाळत आरामात बाइक चालवत पुढे निघालो. ‘रास्ता बराय’ हा हायवे भारतानेच बांधलाय. अधूनमधून लाकडी पूल गाडीला पैलतीरावर घेऊन जातोय. आतापर्यंत रस्त्यात भेटलेले सर्व पूल लाकडीच होते. सिमेंटचा एकही पूल दिसला नाही. रस्त्यावरून धाकधकत बाईक निघाल्यात. आयुष्यभर व्यसनाला चिकटलेल्या दारुड्याची पावले दारू सोडल्यावरसुद्धा गुत्त्याकडे आपोआपच वळावीत, तसेच आमच्या वामांगी बाइकर्सच्या बाइकची चाके डावीकडे ओढली जात होती. मग समोरून येणारं वाहन आम्हाला आमची जागा दाखवून देत, हॉर्नारव करत निघून जात होतं. तो ट्रक ड्रायव्हर कदाचित म्यानमारी भाषेत शिवीही हाणत असेल. एकतर आम्हाला त्याची भाषा कळत नव्हती आणि बाइक, ट्रकच्या आवाजात काही ऐकूही येत नव्हतं. त्यामुळे त्याचे ओठ आमच्या प्रशंसेत हालताहेत अशी समजूत करून घेत पुढे निघालो. म्यानमारी शिव्या आमच्यासाठी ओव्या करून घेतल्या.   रस्त्यावर अजून एक विचित्र गोष्ट पाहायला मिळाली. ती म्हणजे म्यानमारमध्ये उजवीकडे आणि डावीकडे स्टिअरिंग असलेली वाहनं दिसतात. रस्त्याच्या उजव्या बाजूने गाडी चालवण्याचा नियम असणाऱ्या देशात उजवीकडे आणि डावीकडे अशा दोन्ही बाजूंना ड्रायव्हिंग सीट आणि स्टिअरिंग असलेली वाहने कशी, हा प्रश्‍न पडला. थोडे खोदून काढल्यावर मनोरंजक माहिती समोर आली. या देशाला १९४८ मध्ये इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळालं. नामांतराच्या लाटेत ते बर्माचं म्यानमार झालं. १९७० पर्यंत इथं भारतासारखी म्हणजेच रस्त्याच्या डाव्या बाजूनं वाहनं चालायची. पण १९७० मध्ये सत्तेवर आलेल्या ‘जनरल वीन ने’ला उपरती झाली आणि त्यांनी तडकाफडकी निर्णय घेऊन ६ डिसेंबर १९७० ला संपूर्ण देशात रस्त्याच्या उजवीकडून वाहनं चालवायचा वटहुकूम काढला. इथे मिलिटरीराज असल्याने त्याची अंमलबजावणीही त्वरित झाली. ‘वीन ने’ साहेब, या खात्या-हाताला वाहनं चालवायच्या कल्पनेमागे हात धुऊन का लागले, याबाबतच्या काही आख्यायिका सांगितल्या जातात. लोकं म्हणतात, की जनरल साहेब देशविदेशांत फिरले आणि त्यांना आढळून आलं, की बहुतेक देशात उजव्या बाजूला वाहतूक आहे. मग आपल्या देशाची वाहतूक ही आंतरराष्ट्रीय पद्धतीशी मिळतीजुळती असावी असा विचार करून त्यांनी हा निर्णय घेतला. पण काही लोकांच्या मते ‘वीन ने’ साहेबांच्या बायकोला ज्योतिषशास्त्राची आवड होती. आणि उजवं ट्रॅफिक देशाच्या भविष्यासाठी उजवं ठरेल असं तिचं ज्योतिषशास्त्र सांगत होतं. ही शक्यता नाकारता येत नाही. कारण म्यानमारमध्ये लोकांचा ज्योतिषावर भरपूर विश्‍वास आहे. लग्नकार्य सोडाच, पण अगदी छोट्या छोट्या गोष्टींही तिथे ज्योतिषाच्या सल्ल्याने होतात. पण काहींच्या मते जनरल साहेबांना एके दिवशी स्वप्न पडलं आणि त्यानुसार त्यांनी हा ‘उजवा कौल’ दिला.   आख्यायिका काहीही असोत, पण या निर्णयाने म्यानमारी लोकांची आणि वाहनं निर्माण करणाऱ्या कंपन्यांची झोप उडाली होती हे मात्र खरं. डाव्या बाजूला चालवण्यासाठी बनवलेली वाहने एकदम उजव्या बाजूला चालवावी लागली. वाहनचालक गोंधळले. रस्त्यावरच्या ट्रॅफिकचा पार बोजवारा उडाला. आजही रंगूनसारख्या शहरात डावीकडील ट्रॅफिकचे रस्त्यावरील फलक जुन्या वाममार्गीय वाहतुकीची आठवण करून देत उभे आहेत. मध्यंतरी या गोंधळामुळे अपघात वाढलेत याच्या तक्रारी वाढल्या. पण या अपघातवाढीला उजवी वाहतूक पद्धती जबाबदार नसल्याचं सांगत सरकारने सारवासारव केली.  म्यानमारमध्ये वाहन उत्पादन होत नव्हतं. जास्त करून जपानवरून वाहनं आयात केली जायची. मग सरकारनं ‘नवीन वाहन आयात कायदा’ करून, वाहन कंपन्यांना नवीन गाड्या उजव्या बाजूला चालवण्यालायक बनवण्यासाठी फर्मावलं. जुनी वाहनं डावी आणि नवी उजवी असा डाव्या-उजव्याचा गोंधळ संसदेप्रमाणेच रस्त्यावरही सुरू झाला. डाव्या-उजव्यांच्या या रस्त्यावर आम्ही उजव्यांच्या पक्षात टिकून राहायचा प्रयत्न करत होतो, पण स्वभावधर्मानुसार आमच्यातील काही बाइकर अजाणता डावीकडे पक्षांतर करायचे, तर काहीजण अपक्षाच्या मध्यम मार्गाकडे कलायचे. अशा वेळी योग्य मार्गावरील वर्तमानात बाइक चालवणाऱ्या बाइकरने ओरडून किंवा हॉर्न वाजवून त्यांना स्वपक्षात परत आणून परिस्थितीची जाणीव करून द्यायची. २-३ दिवसांच्या म्यानमारी सरावाने मात्र उजवीकडचं बाइकिंग जमू लागलं. पण अशा पद्धतीने आयुष्यभर वाममार्गाने चालणारे पापभीरू बाइकर्स मात्र या मार्गावरून ढळले होते! - डॉ. सतीलाल पाटील, ९९२२४५९७८४ (लेखक हे ग्रीन-व्हिजन लाइफ सायन्सेस प्रा. ली. कंपनीचे संचालक आणि ‘ड्रीमर अँड डुअर्स’ पुस्तकाचे लेखक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com