खईके पान ‘बर्मा’वाला...

आपल्याकडे ‘डॉन’ बनलेला अमिताभ ज्या प्रमाणे ‘खईके पान बनारसवाला’ असे म्हणून मैफलीमध्ये रंग भरतो, त्याच प्रमाणे म्यानमारमध्ये अस्सल पानखाऊ ‘ताऊन्गू’ येथे पिकवल्या जाणाऱ्या पानांचं कौतुक करतो. अशा वैशिष्ट्यपूर्ण पानांच्या निर्यातीतूनही येथील शेतकरी चांगल्या प्रकारे परकीय चलन मिळवतो.
आपल्यासारख्या पारंपरिक पानमळ्याप्रमाणे पानमळे असले तरी इथे शेडनेटमध्ये व्यवस्थित मांडवाचा आधार दिलेले आधुनिक पानमळेही मोठ्या प्रमाणात दिसतात.
आपल्यासारख्या पारंपरिक पानमळ्याप्रमाणे पानमळे असले तरी इथे शेडनेटमध्ये व्यवस्थित मांडवाचा आधार दिलेले आधुनिक पानमळेही मोठ्या प्रमाणात दिसतात.

आपल्याकडे ‘डॉन’ बनलेला अमिताभ ज्या प्रमाणे ‘खईके पान बनारसवाला’ असे म्हणून मैफलीमध्ये रंग भरतो, त्याच प्रमाणे म्यानमारमध्ये अस्सल पानखाऊ ‘ताऊन्गू’ येथे पिकवल्या जाणाऱ्या पानांचं कौतुक करतो. अशा वैशिष्ट्यपूर्ण पानांच्या निर्यातीतूनही येथील शेतकरी चांगल्या प्रकारे परकीय चलन मिळवतो.  म्यानमारच्या खेड्यापाड्यातून मी फिरत होतो. रस्त्याच्या आजूबाजूला लुंगीवाले लोक फिरताना दिसत. गैरसमज करून घेऊ नका, कारण म्यानमारचा राष्ट्रीय पोशाख हाच मुळी लुंगी हा आहे! तमिळनाडूसारख्या पांढऱ्याशुभ्र लुंग्या नसतात इकडे. राजाबाबूसारख्या चांगल्या भडक, रंगीबेरंगी, चट्ट्यापट्ट्याच्या नक्षीदार लुंग्या नेसून लोक सगळीकडे फिरत असतात. ऑफिस, लग्न समारंभातसुद्धा त्यांचा हा ‘लुंगी डान्स’ सुरू असतो.  आताशा बाइक आणि बाइकर दोघांच्या पोटात म्यानमारी कावळे पोटतिडकीने ओरडायला लागले होते. शेवटी रस्त्याच्या कडेला थांबलो. मस्तपैकी गावरान जेवणावर ताव मारला. बिल देऊन रेस्टॉरंट बाहेर येऊन पाहतो तर काय? एका टपरीवजा दुकानाशेजारी आठ दहा लुंगीधारींचा घोळका दिसला. आगाऊ कुतूहल शांत बसू देत नव्हतं. पुढे जाऊन काय भानगड आहे, हे पाहिल्यावर, एका फळकुटावर ४०-५० पानं मांडून ठेवली होती. दोन विडामग्न बायका पानावर सुपारीचे भलेमोठे तुकडे ठेवून भराभर विडे बांधत गिऱ्हाइकाच्या हातात ठेवत होत्या. विचारपूस केल्यावर या देशातील पानशौकाची गोष्ट समजली. रस्त्यात दिसलेल्या जागोजागी, भिंतीभिंतीवर सजलेल्या लालेलाल नक्षीची उकल झाली.    म्यानमारमध्ये मोठ्या प्रमाणात पान खाण्याचा रिवाज आहे. म्हणूनच पानमळ्यांची आणि सुपारीच्या मळ्यांची संख्याही बरीच आहे. मोठ्या प्रमाणात पान-सुपारी पिकवणारे शेतकरी इथं आहेत. विशेषतः दक्षिण म्यानमारमध्ये त्यांची संख्या जास्त आहे. जगभरात विड्याच्या पानाच्या सुमारे १०० जाती आहेत. पानाचा आकार, जाडी, चव यानुसार त्यांचं वर्गीकरण केलं जातं. म्यानमारी पान भलंमोठं, गर्द हिरवं आणि जाडजूड असतं. हृदयाच्या आकाराच्या या पानाने जगभरातील लोकांची मने जिंकली आहेत. परदेशातून या पानांना चांगली मागणी असते. दरवर्षी करोडो रुपयांची पानं फक्त युरोपात निर्यात केली जातात. उत्तम प्रतीची पाने निर्यात करून गोऱ्या साहेबांच्या तोंडाला पाने न पुसता येथील शेतकरी घसघशीत युरो पदरात पाडून घेतो.   येथील पानमळ्यांचा आकार तसा अंमळ लहानच. अगदी काही वर्गफुटापासून ते अर्ध्या एकरापर्यंतचं क्षेत्र. मॉन्सूनच्या आधी शेत तयार करायचं. शेतात नारळाच्या झावळ्या आणि बांबू रोवून कारल्या-दोडक्या सारखा मांडव घालायचा, आणि मग रोपांमध्ये दोन फुटांचं अंतर ठेवून निरोगी रोपांची लागवड करायची. प्रत्येक वेलीला एका बांबूचा आधार द्यायचा. प्रखर सूर्यापासून संरक्षण, योग्य पाणी आणि खत मिळालं की मग हा ‘पानवेलू’ आपल्या आधारस्तंभाला पकडून आकाशाकडील प्रवासाला जोमात सुरुवात करतो. उन्हाळ्यात बागेची जरा जास्त काळजी घ्यावी लागते. साधारणतः एका वर्षानी ही मांडवातील पानवेली वयात येतात. सोन्याचं अंडं देणाऱ्या कोंबडीसारखा वर्षानुवर्षे हा पानमळा शेतकऱ्याचा उत्पन्नाचा स्रोत  बनतो. इथल्या पानमळ्यात किडीचा-अळीचा तसा जास्त त्रास नाहीये. कदाचित म्यानमारी अळ्यांमध्ये पानसुपारीचं व्यसन नसावं, म्हणूनच ते या पानाला तोंड लावत नाहीत. असो. पण पानमळ्यात आर्द्रता जास्त असल्याने बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. जसे सुंदर चंद्रावर डाग असतात, तसेच या सुकुमार पानवेलीवर फ्युजॅरियम बुरशीचे डाग येतात. मूळकूज, खोडकूज आणि पानावरील डाग ही या फ्युजॅरियम बुरशी रोगाची लक्षणं. सुरुवातीला पिवळा असणारा वाटोळा डाग हळूहळू काळा पडायला लागतो आणि शेवटी संपूर्ण पानाचं वाटोळं करतो. इथं ‘दाग अच्छे है’ असं म्हणून चालत नाही. ते आटोक्यात ठेवण्यासाठी बुरशीनाशकांचे डबे उघडले जातात.  म्यानमारमध्ये बरीच वर्षे मिलिटरी राज होतं. परिणामी, बाहेरील देशांचा हस्तक्षेप तसा कमीच होता. यामुळे का असेना पण इथली जंगलं टिकली. शासन आधुनिक शेतीचा अजेंडा जोरात राबवतंय. या रेट्यात इथला शेतकरीही रूप पालटतोय. जंगलाचा लचका तोडून रबर, पाम, पानमळे यांसारखी पिकेही वाढलीत. जुनी राजधानी रंगूनजवळ पानमळ्यांची शेती जास्त रंगलीय. पण ‘ताऊन्गू’ या ठिकाणी म्यानमार मधलं सर्वांत चांगल्या प्रतीचे पान पिकवलं जातं. हे ठिकाण पानाच्या गुणवत्तेसाठी प्रसिद्ध आहे. म्हणूनच ‘पान प्रेमी..  ताऊन्गूच्या वाटेला’ अशा अर्थाची म्हण इथं प्रसिद्ध आहे.  भारतासह संपूर्ण दक्षिण आशियायी देशात पानाचा तोबरा भरला जातो, पण खरे पानाचे शौकीन म्यानमारीच असं मी म्हणेन. अगदी सण, समारंभापासून ते लग्नकार्यापर्यंत यांचं विड्याच्या पानाशिवाय पान हलत नाही. म्यानमारी भाषेत पानाला ‘क्वऊन - या’ असं म्हणतात. इथं जागोजागी पानाच्या टपऱ्या दिसतात. आपल्याकडे पानवाला भैया असतो. पण इकडे बहुतांश ठिकाणी ‘पानवाली बहेना’ दिसल्या. ‘विडा घ्या हो नारायणा’ हे पद आळवत या म्यानमारी लक्ष्म्या टपऱ्याटपऱ्यांवर उभ्या असतात. हिरव्याकंच बदामी पानावर पांढऱ्या शुभ्र चुन्याचं लोणी आणि कात लावून, त्यावर सुपारीचे तुकडे, काही सुगंधी पदार्थ आणि खास गिऱ्हाइकाला तंबाखू टाकून विडा बनवला जातो. मग तो लुंगीधारी पानवीर, देश रंगवायचा विडा उचलत तो तोंडात कोंबतो. हिरव्यांच्या पार्टीतील पान, पांढऱ्या चुण्या आणि विटकरी कात सोबत युती करून लालभडक राजमार्गावर प्रवासासाठी तयार होतो. निसर्गाने कर्बयुक्त अन्न पचवायला दिलेल्या लाळेसोबत विड्याला घोळवत ही तांबूल पीकदाणी गच्च भरवतो. अगदी बोलतानासुद्धा हा पानार्क तोंडाच्या टाकीतून ओघळणार नाही, याची काळजी घेत लहान बाळागत बोबडं बोलत गप्पा मारत असतो. ही रसभरीत चर्चा, तोंड मुखरसभरित होईपर्यंत चालते. शेवट टाकी ओव्हरफ्लो व्हायच्या बेतात आल्यावर मुखरसाची लाल पिंक मिळेल त्या जागेवर टाकून तो मोकळा होतो. म्यानमारमध्ये हे पानसडे सर्वत्र दिसतात. आपली ही मॉडर्न-आर्ट चितारत हे अज्ञात चित्रकार सर्वत्र फिरत असतात. पानाने लाल झालेले दात दाखवणारे लोक इथं जागोजागी दिसतात.  मलाही या म्यानमारी पानाची चव चाखून पाहिल्याशिवाय राहवले नाही. म्हणून एक बिनसुपारीचा विडा घेतला आणि देश रंगवणार नाही, अशी प्रतिज्ञा करत तोंडात कोंबला. तोंडात तुंबलेला विडा आणि डोक्यात तुंबलेले विचार घेऊन बाइकला किक मारली. ऐतिहासिक प्रथा पानसुपारी खाण्याची प्रथा ऐतिहासिक आहे. इथं पानाशिवाय लोकांचं पान हालत नाही. प्रत्येक घरात पानाचा डब्बा असतो. त्याला इथं ‘कुन-इट’ असं म्हणतात. जसं आपल्याकडे पाहुण्याला चहापाणी केलं जातं, तसं इथं ग्रीन टी आणि पानाचा विडा देऊन खऱ्या अर्थाने ‘चहा-पान’ करतात. लहान पोरंही गोड पान खातात. वयानं मोठे मात्र वेलची, लवंग आणि तंबाखूयुक्त पान पसंद करतात. पान, सुपारी आणि लाफेट (चहाच्या पानाचं लोणचं) या इथल्या संस्कृतीतल्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. लग्न झाल्यावर नववधू आपल्याबरोबर नक्षीदार पानाचा डबा नेते. इथं अजून एक विचित्र जुनी प्रथा आहे, ती अशी की शत्रूला मारण्याआधी त्याला पान आणि पाणी हवंय का? असं उपहासानं विचारलं जातं. अशा या सेलिब्रिटी पानाने मात्र माणसांच्या आरोग्याला पानं पुसलीयेत. या देशातील ४० टक्के माणसं आणि २० टक्के बायकांना पानसुपारीचं व्यसन आहे. २००७ च्या सर्व्हेनुसार सर्वसामान्य रोगांच्या यादीत तोंडाच्या कॅन्सरचा नंबर माणसांमध्ये ६ वा आणि महिलांमध्ये १० वा आहे. कॅन्सरच्या रुग्णांमध्ये पानसुपारी खाणाऱ्यांचं प्रमाण आहे तब्बल ३६ टक्के. वेगवेगळ्या संशोधनात समोर आलंय की पानसुपारीमुळे तोंडाच्या कॅन्सरची शक्यता ९ टक्क्यांनी वाढते. २००९ मध्ये १० देशांतील शास्त्रज्ञांनी एकत्र केलेल्या संशोधनांती सिद्ध केलं की बिना तंबाखूच्या पानानेसुद्धा कॅन्सर होऊ शकतो. शासनाने बरेच प्रयत्न करूनदेखील हे व्यसन कमी होत नाही. याच्या जोडीला गुटखादेखील आहे. काही करता कमी होणार नाही इतकं हेही व्यसन निर्ढावलंय. - डॉ. सतीलाल पाटील,  ९९२२४५९७८४ (लेखक हे ग्रीन-व्हिजन लाइफ सायन्सेस प्रा. ली. कंपनीचे संचालक आणि ‘ड्रीमर अँड डुअर्स’ पुस्तकाचे लेखक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com