‘थनाकाचं’ चंदन... घिस मेरे नंदन

मुराय्या झाडांपासून सूर्यप्रकाशापासून त्वचेच्या संरक्षणासाठी नैसर्गिक थनाका (लेप) बनवला जातो. आपल्याकडील चंदनाप्रमाणे शरीरावर, चेहऱ्यावर त्याचा लेप लावला जातो. दक्षिणपूर्व आशियातील देशांमध्ये विविध रोगांवरील उपचारांमध्ये थनाकाचा वापर सांगितलेला असला, तरी म्यानमारमध्ये सौदर्यप्रसाधन म्हणून मोठ्या प्रमाणात वापर होतो.
बाजारपेठेमध्ये अनेक ठिकाणी थनाकासाठी खोडांची विक्री सुरू असते
बाजारपेठेमध्ये अनेक ठिकाणी थनाकासाठी खोडांची विक्री सुरू असते

मुराय्या झाडांपासून सूर्यप्रकाशापासून त्वचेच्या संरक्षणासाठी नैसर्गिक थनाका (लेप) बनवला जातो. आपल्याकडील चंदनाप्रमाणे शरीरावर, चेहऱ्यावर त्याचा लेप लावला जातो. दक्षिणपूर्व आशियातील देशांमध्ये विविध रोगांवरील उपचारांमध्ये थनाकाचा वापर सांगितलेला असला, तरी म्यानमारमध्ये सौदर्यप्रसाधन म्हणून मोठ्या प्रमाणात वापर होतो.  स काळचा कोवळा सूर्य थायलंडच्या बाजूने आकाशात वर चढत म्यानमारवर सोनेरी झालर झळकवत होता. खेड्यापाड्यात लोकांची रोजच्या कामाची लगबग सुरू होती. गोल म्यानमारी टोपी घालून बायका, माणसं शेतकामाला निघाली होती. गुरांचा आवाज आणि त्यांच्या शेणमूत्राचा वास आसमंतात भरला होता. बायका आणि पोरांच्या चेहऱ्यावर पांढऱ्या रंगाची पावडर फासलेली दिसत होती. आज म्यानमारमध्ये रंगपंचमी आहे की काय, असा एक रंगीत प्रश्न डोक्यात चमकून गेला. ब्रम्हदेशातून फिरताना एक वेगळी गोष्ट पाहायला मिळाली, ती म्हणजे इथं जवळपास प्रत्येक बाईच्या चेहऱ्यावर लावलेला लेप. चंदनाच्या लेपासारखा हा लेप गालावर, नाकावर, कपाळावर तर काहींच्या दंडावर देखील लावलेला दिसतो. जणू सकाळीसकाळी होळीचा रंग लावून सर्वजण निघालेत असं वाटतं. हा काय प्रकार आहे हे जाणून घेण्यासाठी शासकीय टूर गाईड ‘श्री. म्याव’ यांच्यासोबत प्रश्नांची म्यावम्याव सुरू केली.  या लेपाला ‘थनाका’ किंवा ‘थनाखा’ म्हणतात. ‘मुराय्या’ च्या झाडापासून थनाका बनवतात. मात्र, कवठाच्या जातीच्या लिमोनिया आणि हेस्पेरेथूसा यासारख्या झाडांचाही थनाकासाठी उपयोग केला जातो. थनाका लेप बनविण्यासाठी या झाडांची साल आणि मुळे वापरतात. आपल्याकडील चंदनाच्या लाकडाप्रमाणं दगडावर पाण्यासोबत घासतात. मग हा लगदा सनस्क्रिन म्हणून वापरला जातो. चंदनासारखे थनाकाचे लाकडी ठोकळे बाजारात विकायला येतात. थनाक पावडर किंवा पेस्टही मिळते. थनाकाची ही प्रथा पार थायलॅंडपर्यंत पसरलेली दिसते.  थनाकाच्या झाडांचा उपयोग दक्षिणपूर्व देशात मलेरिया, हृदयरोग, अपस्मार आणि कुष्ठरोगावर केल्याचे दाखले आहेत. पण याचा सौंदर्यप्रसाधन म्हणून उपयोग फक्त म्यानमारी लोकच करतात. इथं थनाका २००० वर्षांपासून वापरलं जातंय. थनाका हे वेदनाशामक, अँटिऑक्सिडंट आणि सौम्य जिवाणूनाशक आहे. याचा थंडावा आणि वास अगदी चंदनासारखा आहे. चंदनासारख्या सुगंधामुळे आणि सनबर्निंगपासून संरक्षण व थंडावा देण्याच्या गुणधर्मामुळे थनाका प्रसिद्ध आहे. अगदी किड्याच्या दंशावरही थनाका लावतात. आपली साल देऊन सूर्यपुत्र कर्णासारखा कवचकुंडले दान करणारा हा दानवीर थनाका सनबर्निंग पासून संरक्षण करत सूर्याबरोबर झगडत असतो. म्यानमारी बायका रोज सकाळी आंघोळीनंतर आणि रात्री झोपायच्या अगोदर थनाका चेहऱ्यावर लावतात. काही शाळांमध्ये थनाका गणवेशाचाच भाग आहे. शाळेत येताना सर्व विद्यार्थ्यांनी चेहरा रंगवून यायचं. म्यानमारी नववर्षाला जलोत्सव होतो. संपूर्ण देशात पाण्याची रंगपंचमी खेळली जाते. या पाण्यातही थनाका वापरतात.   चांगल्या प्रतीच्या थनाकासाठी झाडाचं वय ३५ वर्ष असणं आवश्यक आहे असं म्हणतात. पण काहीजण ते १५ वर्षाहून जास्त असणं आवश्यक असल्याचंही सांगतात. एक गोष्ट मात्र खरी की सौंदर्यवतीचं सौंदर्य फुलवणारं झाड परिपक्व हवं. नाबालीक झाड थनाकासाठी चालत नाही. या झाडाची वाढ तशी मंद असते. दोन इंचापर्यंत खोड भरायला १० वर्ष वाट पाहावी लागते. एकदा का झाड परिपक्व झालं की त्याची साल किवा मूळ पावडर बनवण्यासाठी किंवा उजळण्यासाठी काढतात.  पारंपरिक पद्धतीनुसार चंदनासारखा लाकडाचा ठोकळा बाजारात विकला जातो. त्याला सहाणीवर पाण्यासोबत उगाळून वापरतात. पण आधुनिक सौंदर्यप्रसाधनांच्या शर्यतीत टिकण्यासाठी थनाकाची पावडर बनवून डब्यांमध्ये लेबल लावून किंवा पाउचमध्ये विकली जाते.  शॉर्टकट. ‘काटो, घोलो और लगालो...’  शाश्वत वनशेतीद्वारे उगवल्या गेलेल्या थनाकाच्या झाडांपासून बनवलेली म्यानमारची ही सनस्क्रिन खऱ्या अर्थाने सेंद्रिय आहे. ना कुठले रसायन ना खत-कीटकनाशक.  थनाका लावायच्या पद्धतीही वेगवेगळ्या आहेत. कधी गालावर, कपाळावर, दंडावर तर कधी पायापासून ते चेहऱ्यापर्यंत सर्वांगाला. अगदी रागासारखं नाकाच्या शेंड्यावरही ते चढून बसतं. कुणी फक्त बोटाने ठिपका लावतं, रेघोट्या काढतं तर कुणी छानपैकी मेंदीसारखी नक्षी काढतं. गल्लीगल्लीत हा सेंद्रिय लेप मिरवत म्याममारी सुंदरी फिरत असतात. कुसुबां म्हणजेच करडई तेल आणि थनाका यांचं मिश्रण अंगावरचे नको असलेले केस कायमस्वरूपी घालवण्यासाठी वापरतात. केस घालवायच्या रसायनांच्या पार्शवभूमीवर या नैसर्गिक उत्पादनाबद्दल मी पहिल्यांदाच ऐकत होतो.  भर दुपारी, खडबडीत रस्त्यावर, म्यानमारी टोपी घालून डोक्याचं आणि गालावर थनाकाचं नैसर्गिक सनस्क्रीन लावून चेहऱ्याचं सूर्यापासून संरक्षण करत महिला कामगार देशाच्या प्रगतीचा मार्ग प्रशस्त करण्याच्या कार्यात व्यस्त आहेत. देशाच्या कल्याणासाठी झटणाऱ्या या नारीशक्तीला आणि तिच्या संरक्षणासाठी झिजणाऱ्या महावृक्षाला मनोमन प्रणाम करत पुढे निघालो. थनाका उत्पादनातील संधी आणि अडचणी म्यानमारच्या तीन प्रभागात थनाकाची झाडं आढळतात. पण ‘आयदौ’ मधलं थनाका जरा जास्तच प्रसिद्ध आहे. पूर्वी सुप्रसिद्ध ‘आयदौ थनाका’ फक्त आयदौ मध्येच सापडायचं. पण आता ते सर्वत्र मिळतंय. थनाका हे विषववृत्तीय वातावरणात वाढणारं झाड आहे. ‘आयदौ’ मध्ये थनाकाच्या रोपवाटिका आहेत. या झाडाच्या बियांपासून रोपं तयार करतात. ही रोपं साधारणतः ४५ दिवसात तयार होतात. त्यानंतर फळाची अपेक्षा न करता फक्त खतपाणी घालत राहायचं. मग कुठं ५ ते ७ वर्षानंतर ते झाड विकण्याजोगं होतं.  ‘बर्मीज कॅलेंडर’ नुसार चवथ्या महिन्यात पिकल्यापिकल्या बियांची विक्री केली जाते. बियांचा धंदा चांगलाच तेजीत आहे. रोपं मे ते ऑक्टोबर महिन्यात वाढतात. पाणी असेल तर हा हंगाम डिसेंबरपर्यंत ताणला जातो. देशातील इतर भागात ७-८ वर्षाची झाडं ‘आयदौ’ मधून विकत नेली जाताहेत. एका रोपाची किंमत २०० कॅट म्हणजे १० रुपये असते. बिया विकत घ्यायच्या असतील तर, दुधाच्या डबाभर बियांसाठी १० ते ५० हजार कॅट म्हणजे ५०० ते २५०० रुपये मोजावे लागतात. सागाइंग प्रभागातील विषूववृत्तीय वातावरणात थनाकाची रोपं चांगली वाढतात. एकदा का ही रोपं वाढली की मग मँगवे आणि मंडालेच्या खेड्यापाड्यात हे रोपं पोहोचतात. एखाद्या नवख्या शेतकऱ्याला मदत हवी असल्यास, येथील शेतकरी एक दुसऱ्याच्या शेतात जाऊन थनाकाची लागवड कशी करावी, याचं मार्गदर्शन करतात.   संपूर्ण म्यानमारमध्ये साधारणतः सव्वा लाख हेक्टर क्षेत्रावर सौंदर्यप्रसाधनाचं पीक डोलतंय. युरोपमध्ये उत्पादन तपासली जाऊन त्यांची उपयुक्तता सिद्ध झालीय. निर्यातीसाठी चांगल्या संधी निर्माण होतील, अशा आशा आहे. या व्यवसायात असणाऱ्या शेतकरी आणि कंपन्यांनी मिळून ‘थनाका प्लॅंटर्स अँड प्रोड्यूसर असोशिएशन’ बनवली आहे. थनाकाचा व्यवसाय कसा वाढवायचा, वेळोवेळी येणाऱ्या समस्या कशा सोडवायच्या, यावर त्यांचं सतत काम सुरू असतं.   पण म्यानमारी चंदनाची ही शेती सध्या थोडी अडचणीत आहे. स्थानिक आणि परदेशी ग्राहक जेवढी थनाकाची साल वापरायला पाहिजे तेवढी वापरत नाहीत. भेसळ वाढल्यामुळे भाव घसरून शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे. पूर्वी एका पाच वर्ष जुन्या थनाकाच्या शेतातून ५० लाख कॅट म्हणजे अडीच लाख रुपये मिळायचे. ते प्रमाण आता घसरून ३० लाख कॅट म्हणजे दीड लाख रुपयांवर आलंय. त्यामुळे २० टक्के शेतकरी या शेतीकडे पाठ फिरवत आंबे आणि शेवगा लागवडीकडे वळू लागले आहेत.    - डॉ. सतीलाल पाटील, ९९२२४५९७८४ (लेखक हे ग्रीन-व्हिजन लाइफ सायन्सेस  प्रा. ली. कंपनीचे संचालक आणि ‘ड्रीमर अँड डुअर्स’ पुस्तकाचे लेखक आहेत.)  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com