agricultural news in marathi article by Dr. satilal patil | Agrowon

मौल्यवान रत्नांची शेती!

- डॉ. सतीलाल पाटील,
शनिवार, 27 मार्च 2021

माणसांचा हव्यास कधीही न थांबणारा आहे. एखाद्या गोष्टीतून फायदा होतोय, असं दिसलं, की त्याची लालसा सुसाट सुटते. म्यानमारमध्येही कधी ती रत्नांच्या शोधात, तर कधी वाळूच्या उपशातून आपल्याला दिसते. लाल रूबीच्या शोधात माणसांसाठी सर्वाधिक मौल्यवान असलेली हिरवी रत्ने (पिके) मातीमोल होतात, त्याचं वाईट वाटत राहतं.

माणसांचा हव्यास कधीही न थांबणारा आहे. एखाद्या गोष्टीतून फायदा होतोय, असं दिसलं, की त्याची लालसा सुसाट सुटते. म्यानमारमध्येही कधी ती रत्नांच्या शोधात, तर कधी वाळूच्या उपशातून आपल्याला दिसते. लाल रूबीच्या शोधात माणसांसाठी सर्वाधिक मौल्यवान असलेली हिरवी रत्ने (पिके) मातीमोल होतात, त्याचं वाईट वाटत राहतं.

ब्रह्माच्या या देशातून माझ्या बुलेटरथातून हिंडतोय. वाऱ्याशी स्पर्धा करत माझा वारू उधळलाय. रस्त्याच्या दुतर्फा म्यानमारी पिकं पानांच्या टाळ्या वाजवत माझं स्वागत करताहेत. देशाच्या वेगवेगळ्या भागातून फिरताना पिकांची विविधता जाणवतेय. म्यानमार हा दक्षिणपूर्व आशियातील सर्वांत मोठा देश. एकूण जमीन पावणेसात लाख वर्ग किलोमीटर. येथील शेतीचं गणित, थायलंड, मलेशिया, सिंगापूर यांच्यापेक्षा जरा वेगळं आहे. जरी हा देश मोसमी प्रदेशात मोडत असला तरी संपूर्ण देशाच्या वेगवेगळ्या भागात पाऊस मुक्तछंदात वावरतो. म्हणजे समुद्रकिनाऱ्याच्या प्रदेशात तो अगदी ५००० मिलिमीटरपर्यंत बदाबदा कोसळतो, त्रिभुज प्रदेशात तो २५०० मिलिमीटरपर्यंत ओसरतो, कोरड्या प्रदेशात तो १००० पर्यंत आटतो, तर काही ठिकाणी वार्षिक ५०० मिलिमीटरचं कंजूष उदकसिंचन करतो. या देशाच्या जीडीपीत ५४ टक्के शेतीचा वाटा आहे. एकूण ६५ टक्के लोकांना हा शेतीव्यवसाय रोजगार देतो. म्यानमारचा मोठा भूभाग जंगलांचं पांघरून घेऊन लपलाय. त्यामुळे शेतीसाठी उपलब्ध जमीन त्यामानाने कमी आहे. त्यातही देशातल्या एकूण शेतीयोग्य जमिनीपैकी फक्त ४५ टक्के क्षेत्र लागवडीखाली आहे. 

संध्याकाळी बागान शहरात थांबलो. हे ऐतिहासिक शहर आहे. बागानला देवळांचं शहर असंही म्हणतात. कित्येक शतकानुशतकांचा इतिहास सांगत शेकडो मंदिरं भूछत्रासारखी सर्वत्र उगवलेली दिसताहेत. जिभेचे म्यानमारी चोचले पुरवून झाल्यावर बाहेर रस्त्यावर आलो. तेवढ्यात एक माणूस हातात कसलीशी डबी घेऊन विकत घ्या असं म्हणू लागला. कुतूहलाने विचारल्यावर ‘‘रूबी आहेत’’ असं उत्तर मिळालं. ‘‘माणिक?’’ मी उडालोच. केसांवर फुगा विकावा एवढ्या सहजपणे तो लुंगीवाला माणूस रूबीचा मौल्यवान खडा इथं रस्त्यावर विकत होता. मनातील आश्‍चर्याचा पाट रोखत, माझ्याबरोबर असलेल्या श्री. हताय यांना विचारलं. तेव्हा उत्तर मिळालं ‘‘खरंय सर! इथल्या खाणीतून वेचलेले लहानसहान, न तराशलेले रूबीचे तुकडे इथले लोक विदेशी पर्यटकांना विकत असतात.’’ 

‘‘रूबी हा हीरा आहे का?’’ मी माझी बौद्धिक दिवाळखोरी प्रदर्शित करत विचारलं. त्यावर त्यांनी हसत ‘‘नाही, ते रत्न आहे.’’ असं उत्तर दिलं. आता प्रश्‍न पडला, हीरा आणि रत्नांमध्ये फरक काय? पण पडलेला प्रश्‍न उचलून घेत इथल्या संथ इंटरनेटवाल्या ‘गुगल’गाईने सांगितलं, की हीरा म्हणजे १०० टक्के अस्सल कार्बनचा स्फटिक. त्यात भेसळ मुळी नाहीच. त्याचे रूपरंग काचेपेक्षाही नितळ आणि चकचकीत. पण रत्नांमध्ये मात्र इतर मूलद्रव्यांची सरमिसळ असल्यामुळे त्यांना वेगवेगळे रंग येतात. जसं रूबी ऊर्फ माणिकमध्ये अॅल्युमिनिअम ऑक्साइडचं मिश्रण असतं, त्यामुळे तो रक्तवर्णी होतो. १०० टक्के अस्सल असल्यामुळे हीरा सर्वांत कठीण. मात्र काठिण्याचा बाबतीत हिऱ्यानंतर रूबीचा दुसरा नंबर लागतो. 

‘‘इथं किती प्रकारचे रत्न मिळतात’’ असं विचारल्यावर ‘‘भरपूर’’ असं उत्तर मिळालं. माणिक, नीलम, पुष्कराज, पाचू यांसारखे बक्कळ. माणसाची वर्णद्वेषी वर्गवारी करणाऱ्या माणसाने या रत्नांचीही रंगावरून विभागणी केली आहे. म्हणजे लाल, केशरी, तपकिरी किंवा जांभळा असेल तर त्याला रूबी म्हणतात. यांच्या व्यतिरिक्त इतर रंग असेल तर त्याला सफायर म्हणजे नीलम म्हणतात. सगळ्यात प्रसिद्ध नीलम हा ‘रॉयल ब्ल्यू’ म्हणजे रॉयल निळा आहे असं समजलं. आजही जगातील ९० टक्के रूबी म्यानमारमधून येतात. रत्नांचा हा व्यवसाय आहे तरी किती मोठा? तर २०१४ मध्ये म्यानमार सरकारला या रत्नांच्या धंद्याने घसघशीत  २५ हजार कोटी रुपये मिळवून दिले होते. अमेरिकेने घातलेल्या बंदीला न जुमानता कमावलेली ही माया होती.  

‘मेगॉक स्टोन ट्रॅक’ हा म्यानमारच्या वरचा प्रदेश उत्कृष्ट मौल्यवान खड्यांच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. मौल्यवान खड्यांच्या खोदाखोदीचा उद्योग इथं सोळाव्या शतकापासून सुरू आहे. या पट्ट्यात नीलम, पुष्कराज, स्पिनेल, पेरिडॉट, झिरकॉन यांसारखे मौल्यवान खडे आणि रत्ने मुबलक प्रमाणात मिळतात. एक पाचू सोडल्यास इतर सर्व रत्ने या पट्ट्यात सापडतात. जगातील खूप कमी ठिकाणी या प्रकारची क्वालिटी मिळते. सर्वांत महागड्या रत्नांपैकी म्यानमारची रत्ने गणली जातात. जगातलं सर्वांत महागडं रत्न ‘पिजन ब्लड रेड रूबी’ म्हणजे माणिक ही म्यानमारची खासियत आहे. २०१५ मध्ये येथील २५.५९ कॅरेटच्या सनराईज रूबी’ने किमतीच्या बाबतीत विश्‍वविक्रम केला होता. त्याचा लिलाव तब्बल बावीस कोटी रुपयांना झाला. 

म्यानमारमधील रत्नांचा इतिहास फार जुना आहे. तो पार इसवीसनाच्या सहाव्या शतकापार जातो. १५९७ मध्ये ‘नुहा-थुरा महाधम्मा-याझा’ याने ‘मोगोक आणि क्याटपीन’ प्रांतावर आणि पर्यायाने या मौल्यवान व्यवसायावर कब्जा केला. एकोणिसाव्या शतकापर्यंत इथल्या खाणींवर स्थानिक राजवटींचं नियंत्रण होतं. पण १८८६ मध्ये इंग्रजांनी म्यानमार बळकावलं आणि या मौल्यवान धनावर गोरा भुजंग बसला. इंग्रजांना कंपनी-कंपनी खेळायला आवडतं असावं. जसं भारतीय सोन्यावर ‘ईस्ट इंडिया कंपनी’द्वारे डल्ला मारला गेला, तसाच इंग्रजांनी ‘बर्मा रूबी कंपनी’ स्थापन करून तिच्या मार्फत इथली रत्ने मनसोक्त लुटून त्याचा रतीब राणीच्या खजिन्यात घातला. पूर्वी इथले लोक जुन्या पद्धतीने खाणकाम करायचे. पण औद्योगिक क्रांतीच्या जोरावर जग लुटणाऱ्या गोऱ्या साहेबाने आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर मोठ्या प्रमाणात खाणी सुरू केल्या. मशिनच्या साह्याने पहाड खोदून रूबी काढला. रत्नांच्या खाणीसाठी लोकांचे सोन्यासारखे संसार उद्ध्वस्त करत गावंच्या गावं उठवली गेली.  

जसा भारताचा कोहिनूर पळवून इंग्लंडला नेला. त्याच पळवापळवीच्या पिढीजात परंपरेने म्यानमारचा हा ८३ कॅरेटचा १६.६ ग्रॅमचा ‘स्टार ऑफ बर्मा’ म्हणजेच ‘ब्रह्मदेशाचा तारा’ रूबी युरोपात पोहोचला. १९३५ मध्ये या रूबीला हिरेजडित-प्लॅटिनमच्या कोंदणात बसवलं गेलं. असं म्हटलं जायचं, की ‘या सम हाच’ अख्ख्या जगात यांच्यापेक्षा मौल्यवान कोणीच नाही. या रुबाबदार रूबीने अगदी हॉलिवूडच्या चित्रपटातदेखील एन्ट्री मारली. इंग्रजांनी इंग्रजांना पळवून लावत बनलेल्या, जगातील सर्वांत श्रीमंत देशात हा रुबाबदार रूबीचा रुबाबदार मौल्यवान खडा ताठ मानेने खडा आहे. 

असा हा ‘रूबीच्या रत्नांचा’ देश, ‘हिरव्या-रत्नाच्या’ निर्मात्याच्या मुळावर उठलाय. शेतकऱ्यांचं रक्त शोषत खणलेला हा ‘कबुतराच्या रक्तवर्णी रूबी’ मात्र रुबाबात जगभर मिरवला जातोय.  

खाण व्यवसायामुळे अंतिमतः शेती येतेय धोक्यात...
म्यानमारमध्ये खाण व्यवसाय जोरात आहे. रत्नांच्या जोडीला जेड, सोने, कोळसा आणि बांधकामासाठी वाळूचा उपसा करणाऱ्या खाणी सर्वत्र पसरल्यात. त्यामुळे शेतकरी, कामकरी यांच्यासाठी रोजगारनिर्मिती होतेय. पण या धरतीला झालेल्या खरुजीमुळे अंतिमतः पर्यावरणाचं आणि शेतकऱ्यांचं नुकसान होतंय. जंगलांचं अस्तर विस्कटतंय. येथील जैवविविधता धोक्यात आलीय. शेतीयोग्य जमीन खड्ड्यात जातेय. वातावरणात अनपेक्षित बदल होताहेत. इथं मिलिट्रीराज असल्याने पारदर्शकतेचे पार बारा वाजलेत. खासगी कंपन्या आणि सरकार साटंलोटं करून पर्यावरणाकडे दुर्लक्ष करत खोदत सुटलेत. दात कोरून पोट भरावं तसं सिंगापूर वाळूचे कणाकणांचा भराव टाकत जमीन पैदा करतोय. आजूबाजूच्या देशातून वाळू विकत घेतली जातेय. म्यानमारची वाळूचा वेलू पार सिंगापूरपर्यंत पोहोचलाय. बोटीने ही वाळू सिंगापूरला निर्यात होते. या वाळूच्या उपशामुळे कित्येक शेतकऱ्यांची भातशेती वाळूत गेलीय. आपल्याकडे वाळूमाफिया असतात, पण इथं सरकारनेच माती खाल्लीय. कुंपणानेच वाळू खाल्ल्याने फिर्याद कोणाकडे करणार? 

- डॉ. सतीलाल पाटील, ९९२२४५९७८४


इतर ताज्या घडामोडी
सोयाबीन पेंडची आयात शुल्काविना करावीनागपूर : भारतात सोयाबीन पेंडचे दर गगनाला...
दूधदरात पुन्हा दोन रुपयांची कपातनगर ः कोरोना संसर्ग वरचेवर वाढत असल्याने लॉकडाउन...
देशातील पहिले कृषी निर्यात मार्गदर्शन...पुणे ः राज्यातील शेतकरी व उदयोन्मुख...
उत्तर भारतातील कापूस लागवड पूर्णत्वाकडेजळगाव ः देशात उत्तर भारतातील कापूस लागवडीने वेग...
कृषी खात्यातील बदल्या लांबणीवरपुणे ः ऐन कोरोना कालावधीत बदल्यांचा घाट रचलेल्या...
खाद्यतेल दरात गतवर्षीपेक्षा ८० टक्के वाढनागपूर : शेंगदाण्याची निर्यात तसेच पाम तेलावरील...
पूर्व विदर्भात ४५ लाख क्विंटल धान खराब...गोंदिया : भात उत्पादक पूर्व विदर्भातील पाच...
पशुवैद्यक करणार घरपोच सेवा बंदनागपूर : पशुवैद्यकांना फ्रंटलाइन वर्कर्स व कोरोना...
सोयाबीन बियाणे निर्बंध मध्य प्रदेशकडून...पुणे ः परराज्यांत सोयाबीन बियाणे विक्रीवर निर्बंध...
‘महाबीज’चे सोयाबीन बियाणे दर ‘जैसे थे’अकोला : खरीप हंगामासाठी ‘महाबीज’ने सोयाबीन...
देशाच्या तुलनेत निम्मी साखर एकट्या...कोल्हापूर : देशाच्या साखरनिर्यात कोट्यापैकी जवळ...
‘गोकुळ’चा कल सत्तांतराकडेकोल्हापूर : अत्यंत चुरशीने झालेल्या कोल्हापूर...
‘सह्याद्री’च्या पर्वतरांगेमधून...नाशिक : सह्याद्रीच्या पर्वतरांगेत पश्‍चिम घाट...
राज्यात आंब्याचा हंगाम ऐन बहरातअकोल्यात बदाम आंबा ४००० ते ४५०० रुपये क्विंटल...
सोशल मीडियाद्वारे ६५ टन कलिंगड विक्रीपुणे : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी एप्रिल...
मध्य प्रदेश सरकारकडून बियाणे विक्रीवर...पुणे ः सोयाबीन बीजोत्पादनात देशात सर्वात मोठा...
पशुखाद्य निर्मितीचा कच्चा माल दुपटीने...सांगली : पशुखाद्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या...
दक्षिण भागात गारपिटीची शक्यतापुणे :  गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका...
परभणी जिल्ह्यात कडक निर्बंध लागूपरभणी ः  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी...
परभणी जिल्ह्यात लघु तलावांत सरासरी १९...परभणी ः वाढते तापमान, बाष्पीभवनाचा वाढलेला वेग,...